
तुम्ही अंदमान बेटावर फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? करत असाल तर नक्की जा, मी कोण तुम्हाला थांबवणार? पण 2027 साली तिथे जाऊ नका. मी का म्हणतोय असे? थांबा सांगतो! आधी थोडी प्रस्तावना वाचा! लेख खूप मोठा झाला आहे, पण इलाज नाही! विषयच तसा आहे.
बरेचदा एखादी विज्ञान काल्पनिक कथा लेखक लिहितो, जी भविष्यात घडत असते, परंतु खरोखर तो काळ आल्यानंतर तशाच प्रकारच्या घटना थोड्याफार फरकाने घडताना दिसतात. याला लेखकाचा दूरदृष्टीपणा किंवा भविष्याचा पूर्वभास म्हणावा?
बऱ्याच दिवसांत जास्त कोणते चित्रपट किंवा वेब सीरिज मी बघितल्या नव्हत्या. चित्रपटाचे परीक्षण लिहिले नव्हते. सध्या फक्त वेळ मिळेल तसे "स्वराज्य सौदामिनी तारा राणी" सिरीयल बघणे सुरू आहे. ती बघून संपल्यानंतर मग त्याची "दीर्घ परीक्षण" मी जरूर लिहीन!
मी काही आजच्या जनरेशनसारखा वेबसीरिज बिंजवॉच (एकच दमात सर्व भाग बघून संपवणे) करणारा माणूस नाही. 2021 मध्ये पहिल्यांदा मी एखादी वेबसीरिज पहिली, ती मराठी होती! MX Player वरची समांतर. सुहास शिरवळकर यांच्या समांतर कादंबरीवर आधारित असल्याने तसेच त्यात ज्योतिष आणि हस्तरेषा हा विषय असल्याने बघण्याची जास्त उत्सुकता होती.
भारतातली सर्वात पहिली फेमस वेब सिरीज मी अजूनही बघितलेली नाही, ती म्हणजे सेक्रेड गेम्स. असो. आता मूळ मुद्द्याकडे वळतो.
नेटफ्लिक्स वरील "काला पानी" नावाची वेब सिरीज नुकतीच 18 ऑक्टोबर 2023 ला रिलीज झाली आहे. मी गेले काही दिवस वेळ मिळेल तशी ती बघत होतो. एखाद्या वेब सीरिजचा review करण्याची ही माझी पहिलीच वेळ! "काला पानी" बघून झाल्यावर review लिहिल्यावाचून राहवले गेले नाही. थ्रिलर (थरारक), सस्पेन्स (संदेह), सर्व्हायव्हल (अस्तित्वासाठी संघर्ष), मेडिकल (वैद्यकीय), एडवेंचर (साहस), सक्रीफाईस (त्याग), महत्त्वाचा सामाजिक संदेश, दर्जेदार कथा आणि उत्तम दिग्दर्शन हे सगळे एकच ठिकाणी बघायचे तर काला पानी बघाच. एक एक तासाचे सात भाग आहेत!
ही कथा भविष्यात 2027 साली अंदमान बेटांवर घडते. अंदमान बेटावर "ओराका" नावाची आदिवासी जमात राहते हे सर्वांना माहीत असेलच. तिथे ॲटम संस्थेतर्फे "स्वराज फेस्टिवल" आयोजित केलेला असतो. भारतामधून (मेन लँड वरून) हजारो लोक येणार असतात. येतात. त्याच दरम्यान पाण्यापासून पसरणारा LHF-27 नावाचा संसर्गजन्य रोग तिथे पसरतो. आणि त्यानंतर या कथेतील वेगवेगळ्या पात्रांची सुरू होते जीव वाचवण्यासाठीची धडपड! आणि यातील डॉक्टरांची सुरू होते या आजारावर उपाय शोधण्याची धडपड!
या रोगाशी ओराका आदिवासी जमातीचा काय संबंध असतो? डॉक्टरांना त्या रोगावर उपाय सापडतो का? या वेब सिरीज च्या पोस्टरवर दाखवलेल्या विशिष्ट चिन्हाचा काय अर्थ असतो? याची उत्तरे शोधण्यासाठी शेवटच्या भागापर्यंत आपण वेब सिरीज बघतच राहतो. ही उत्तरे आपल्याला व्यवस्थित मिळतात आणि एका वेगळ्या टर्निंग पॉईंटवर कथा येते आणि सातवा शेवटचा भाग संपतो. ही वेब सीरिज कोरोना काळाची आपल्याला आठवण करून देते.
निसर्गात मानवाने केलेला सतत हस्तक्षेप आणि अतिक्रमण कमी झाले नाही तर आणखी भविष्यात काय काय भयंकर संकटे येऊ शकतील याचा आपल्याला विचार करायला ही सिरीयल भाग पाडते. यात "अंगावर येणारे" काही प्रसंग आहेत, तेव्हा मॅच्युअर ऑडियन्स असला तर बरे! थोडे मन घट्ट करावे लागते सिरीयल बघतांना! जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा माणूस कसा वागू शकतो हे बघणे आपल्याला यात अंतर्मुख करते!
यात भरपूर पात्रे आहेत. कोणीच हिरो किंवा व्हिलन नाही. या प्रत्येकच कलाकाराचा अभिनय अगदीच सुंदर झालेला आहे. प्रत्येक पात्र आपापली भूमिका अक्षरशः जगला आहे. राजेश खट्टर हा कलाकार (मायाचे वडील) "बेहद" सिरीयल नंतर प्रथमच पडद्यावर दिसून आला आणि त्याचा पडद्यावरचा प्रेझेन्सच (उपस्थिती) फक्त पुरेसा ठरतो. काय परसनालिटी आहे ! आणि त्यालाच साजेशी भूमिका त्याला मिळाली आहे. आशुतोष गोवारीकर, अमेय वाघ, चिन्मय मांडलेकर यांच्या भूमिका उत्तम आहेत. वीस वर्षांपूर्वी सोनी वरील "जस्सी जैसी कोई नही" या सिरीयल मधली मोना सिंह यात आहे परंतु ती पहिल्या भागात शेवटी मरते. तिची एक्टिंग खूप छान झाली आहे.
कद्दूची भूमिका केलेली आराध्या तसेच तिचा मोठा भाऊ या दोघांच्या सुद्धा भूमिका खूपच उत्तम. त्या दोघांचे वडील संतोष हे पात्र! त्यांच्या भूमिकेत विकास कुमार या अभिनेत्याने इतके उत्तम काम केले आहे की त्याच्या करिअर मधला हा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स नक्की आहे! शेवटच्या भागात तो तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही आणि लगेच काही मिनिटानंतर एका प्रसंगात तो जे करतो त्यामुळे आपण त्याचा मनापासून तिरस्कार आणि द्वेष करू लागतो.
आयुशी शर्मा (ज्योती) आणि राधिका मेहरोत्रा (रितू) या दोघींनी अगदी कमाल केली आहे. ओराका आदिवासी जमातीचे काम करणारे कलाकार सुद्धा खूपच उत्तम!
यात खूपच कलाकार आहेत आणि प्रत्येकाचीच कामे इतकी चांगली झाली आहेत की कुणाचा अनुल्लेख केला म्हणजे त्याच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. म्हणून सर्व कलाकारांची नावे घेत नाही. इंटरनेटवर तुम्ही सर्व कलाकारांची नावे बघून घ्या. आय एम डी बी कडून काला पानी ला दहा पैकी 8.1 रेटिंग मिळालेले आहे.
अगदी शेवटच्या भागात आपल्याला दोन महत्त्वाची रहस्य कळतात तेव्हा आपल्याला सुखद आणि दुःखद दोन्ही धक्के बसतात आणि आपल्या भुवया सुद्धा उंचावल्या जातात. यातील बहुतेक महत्त्वाच्या सर्व पात्रांची एक बॅक स्टोरी आहे. ती अधून मधून फ्लॅशबॅकने दिसत राहते, परंतु कथेला ती मारक ठरत नाही. उलट कथा त्यामुळे परिणामकारकरित्या पुढे सरकत जाते. तसेच इतर काही जनरल फ्लॅशबॅक जसे जपानचा अंदमान बेटावर कब्जा असताना, ब्रिटिशांचा कब्जा असताना, तसेच 1989 झाली घडलेल्या अंदमान बेटावरील घटना बरोबर अशा वेळेस आपल्या समोर येतात की उत्सुकता खूप ताणली जाते.
शेवटच्या भागात जेव्हा आपल्यासमोर एका आठवड्यापूर्वी घडलेली घटना दाखवतात तेव्हा आपण अचंबित होतो आणि चेहऱ्यावर स्मित हास्य येते आणि आपण मनोमन लेखकाच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद देतो, कारण त्याच घटनेचा शेवटचा भाग आपल्याला पहिल्या भागाच्या सुरुवातीला दिसतो आणि त्या पहिल्या भागाच्या सुरुवातीच्या प्रसंगाचा अर्थच एकदम पालटून जातो. वा वा मस्त लेखन. इतिहासात आपण वाचलेला काला पानी चा अर्थ आणि या सिरीयल मध्ये थोडासा पण योग्य बदल करून घेतलेला त्याचा अर्थ यातही वेब सिरीज मेकर्सची कल्पनाशक्ती दिसून येते. तर आता वाट कसली बघताय? नक्की बघा. काला पानी! नेटफ्लिक्स वर! भाई, ये नही देखा, तो फिर क्या देखा?
छान परीक्षण , डाउनलोड करून
छान परीक्षण , डाउनलोड करून घेतली आता sat /sun बघता येईल
छान परीक्षण, निमिष, यात
छान परीक्षण, निमिष, यात स्पॉयलर आहेत, त्यामुळे शीर्षक एडिट करून कंसात (थोड्या स्पॉयलरसहित) असे लिहाल का?माझी बघून झालीय, पण बरेच लोक स्पॉयलर मिळाले तर सिरीज बघतच नाहीत, म्हणून म्हणतेय.
मस्त रिव्ह्यु. आता बघायलाच
मस्त रिव्ह्यु. आता बघायलाच हवी. सध्या ओझार्क बघतीये.
ओझार्क to कालापानी एकदम
ओझार्क to कालापानी
एकदम पंचपक्वानावरुन पिठल भातावर आल्या सारख
(No subject)
नाही. यात स्पॉइलर नाहीत.
नाही. यात स्पॉइलर नाहीत. खात्री बाळगा.
छान, बघायला हवे... कोणी तरी
छान, बघायला हवे... कोणी तरी अजून बघून सांगा कशीय ते..
मी पहिला भाग पाहिला आणि सोडली
मी पहिला भाग पाहिला आणि सोडली. फारच स्लो चालू होतं आणि उत्कंठा राहील असं काही झालं नाही.. सग़ळं घिसंपिटंच आहे वाटू लागलं.
आणखी कोणाला आवडली तर परत एक संधी देईन.
मला पण अजिबात आवडली नाही!
मला पण अजिबात आवडली नाही!
पहिला आणि डायरेक्ट शेवटचा भाग बघून संपवली ....
काहीच घिसंपिटं नाही. सगळे भाग
काहीच घिसंपिटं नाही. सगळे भाग नीट बघा. प्रत्येक भागात काहीतरी सस्पेन्स आहे. प्रत्येक भागात काहीतरी नवीन उलगडा होतो.
खरं सांगू का सोनार साहेब !
खरं सांगू का सोनार साहेब !
या असल्या सिरीज पाहण्यासाठी खास वातावरण पाहिजे .
शनिवार किंवा रविवार ची दुपारची वेळ असेल तर अती उत्तम , भरपूर जेवण करायचे , रिलॅक्स चेअर वर मस्त पैकी पाय ताणून आणि ब्लू टूथ हेडफोन कानाला लावून बसायचे .
त्यानंतर बहुतेक करून पाहिला भाग संपता संपता सुखाची झोप लागते ती दोन चार भाग संपे पर्यन्त राहते
आज सगळी तयारी करून नेफिवर मी बॉडीज बघायला चालू केली ,पण पाहिला भाग संपला तरी झोप येईना !
बहुतेक बॉडीज सिरीज खास दिसतेय .....
कृपया हलके घ्या
मस्त आहे ही सिरीज
मस्त आहे ही सिरीज
परीक्षण अगदी साजेसे आहे
आजच्य "दिव्य मराठी" पेपर
आजच्य "दिव्य मराठी" पेपर मध्ये आलेला कला पानी बद्दल एक लेख:
https://shorturl.at/sMQR0