पनीर ग्रेव्ही रेसिपी

Submitted by mrunali.samad on 25 October, 2023 - 04:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

● पनीर २०० ग्राम
● दोन मध्यम कांदे
● एक छोटा टोमॅटो (ऑप्शनल)
● काजू ५-६
● मनुका २०-२५
● हिरव्या मिरच्या २
● हिरवी इलायची २
● जीरे पावडर पाव छोटा चमचा
● गरम मसाला पावडर अर्धा छोटा चमचा
● मध्यम तेज पत्ता
● अर्धा इंच दालचिनी
● फोडणी साठी तेल
● बटर एक चमचा
● कसुरी मेथी
● मीठ
● पाणी

क्रमवार पाककृती: 

● कांदे दहा मिनिटं कच्चा वास जाईपर्यंत उकळून थंड होऊ द्यावे
● मिक्सर जारमधे उकडलेले कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, इलायची, काजू, मनुके, जीरे पावडर, गरम मसाला पावडर पेस्ट करून घ्यावी
● कढईत तेल गरम करून तेजपत्ता,दालचिनी टाकून, वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
● मिक्सर जार विसळून तितकेच पाणी कढईत घालावे.
● एक उकळी आली कि पनीर चे तुकडे घालावेत.
● शेवटी कसुरी मेथी आणि बटर घालावे.

वाढणी/प्रमाण: 
एका वेळी चार जणांना पुरते
अधिक टिपा: 

मनुके मस्ट आहेत यात.. एक छान गोडसर चव येते..रेस्टॉरंट टाईप फ्लेवर येतो ग्रेव्ही ला.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पण ह्यात वेगळं असं काय आहे? म्हणजे ह्यातही कांदा, टोमॅटो आहेच की. बाकी रंग अगदी फिका आहे हे एकच काय ते वेगळं वाटतंय.

आलं लसूण पेस्ट नाही.. धने पावडर, मिरची पावडर, हळद नाही... करायची पध्दत जरा वेगळी आणि किशमिश असल्याने चव नेहमीच्या ग्रेव्ही पेक्षा फारच वेगळी लागते..

कांद्याला पर्याय नाही खरंतर. मलातरी सगळे मसाले, आलं लसूण पेस्ट परतायला अगदी पाव वाटी का होईना कांदा लागतोच. टोमॅटो स्कीप करता येऊ शकतो.
काही वर्षांपूर्वी ही रेसिपी टाकली होती त्यात टोमॅटो नाही.
https://www.maayboli.com/node/56294

ह्यात पण टोमॅटो ऑप्शनल आहे खरंतर मैत्रिणी ने सांगितलेले..पण ग्रेव्ही पुरेल कि नाही म्हणून मी एक छोटा घातला.. एडिट करते वर.

पूर्वी इथे आलं-लसूण खात्रीने मिळत नसे तेव्हा साधारण अशा प्रकारची ग्रेवी करायचे. मात्र किशमिश आणि हिरवी मिरचीही नसे. एक युकेच्या कंपनीचा तंदूरी मसाला आणि गरम मसाला मिळायचा तो निम्मा निम्मा घालून केशरी रंगाची ग्रेवी!
माझी मैत्रीण चातुर्मासात कांदा-लसूण खात नाही तर ती ग्रेवी बेससाठी गाजर उकडून त्याची प्युरी वापरते.

>> पूर्वी इथे आलं-लसूण खात्रीने मिळत नसे >> बापरे, हे कोणत्या काळात? अमेरिकेत सगळीकडे सगळ्या भारतीय भाज्या, वाणसामान न मिळणं समजू शकते पण आलं लसूण हे मिळत नसावं हे अशक्यप्राय वाटतंय.

सायो.
अर्ली नाईटीजमधे आम्ही वर्षातून २-३ वेळा शिकागोला इं ग्रो साठी जात असू. खरेदी केलेले आलं-लसूण-हिरव्या मिरच्या फ्रीज करुन ठेवायच्या, संपले की पर्याय वापरायचा.
मिडवेस्ट मधल्या स्थानिक मंडळींच्या स्वयंपाकात ताजे आलं-लसूण नाही. गरज पडल्यास ते लोकं गार्लिक पावडर, जिंजर पावडर वापरतात.
y2k च्या सुमारास इथे टेकी देशी लोकं वाढले, जोडीला हिस्पॅनिक मंडळीही वाढली. मालाला उठाव आणि जोडीला सप्लाय चेन मधल्या सुधारणा यातून जवळच्या शहरात इं ग्रो त बरेचसे घटक मिळू लागणे, हळू हळू अमेरीकन ग्रोसरी चेन वाल्यांनीही थोड्या प्रमाणात माल ठेवायला सुरुवात करणे असे होत गेले. आता यूट्युबच्या कृपेने इथले स्थानिक हौसेने देशी आणि इतर संस्कृतीतले पदार्थ घरी करुन बघतात त्यामुळे गावातल्या क्रोगरमधे आलं, लसूण , कोथिंबीर, जीरे पावडर, नादु, पाटकच्या करी पेस्ट , तंदुरी/गरम मसाला, गोचुजांग सॉस वगैरे मिळते. आता ती मंडळी हिंग कुठे मिळेल , तुझ्याकडे वेलची पावड आहे का वगैरे विचारत बसतात. Happy

छान आणि थोडी वेगळी वाटतेय रेसिपी. नक्की करून बघणार.

मनुकांमुळे चव छान येईल अस वाटतंय. एकदा मी कांदा बटाटा रश्श्या मध्ये संपवण्यासाठी म्हणून घरातली द्राक्ष घातली होती , ती भाजी खुप आवडली होती.

यक्क!

रंग बघूनच पोटात ढवळायला लागले
हाच वेगळेपणा की बघूनच भूक मरून डायट होईल

छान आहे
मला हा असा फिका आणि पौष्टीक रंग आवडतो भाज्यांना.. पनीर आणि भडक रंग पाहिले की हल्ली नकोसे वाटते.

कांदा आणि मनुका त्यामुळे गोडसर होत असेल.
सध्या ऑक्टोबर हीटमुळे तसैही मसालेदार भाज्या बघवत नाही.
एक वेगळा प्रकार म्हणून करून बघण्यात येईल.
मध्यंतरी टोमॅटो महाग झाले होते तेव्हा माझी मैत्रीण काजू वाटून ग्रेव्ही बनवायची. टोमॅटोपेक्षा काजू परवडतात म्हणून Happy .काजू आणि मनुका वाचून ते आठवलं.

थँक्यु ऋन्मेSSष, अमुपरी,मनिम्याऊ, आबा, स्वस्ति Happy
मी दोन वेळा बनवली हि रेसिपी, मुलांना फारच आवडली.. इथे शेअर करावी वाटली..

छान रेसिपी आहे. अशी एका मैत्रिणीकडे (विनाकांद्याची) नवरात्रात खाल्ली होती. कन्यापूजनासाठी खास गोडसर केली होती. सर्वांना आवडली होती. Happy

तू करून दिली तर नक्की खाईन मृ.
वेगळीच चव असणारे.
ह्या ग्रेव्ही मध्ये कोफ्ते टाकले तर आणखी मस्त लागेल चवीला

छान आहे रेसिपी.
पुढे पास केली आहे. करुन बघुन सांगेन कशी झाली ते. रंग वेगळा दिसला तर माझा लेक पण खायला का कू करतो. उस्का लॉस! अपने को क्या! तो ओम्लेट खाईल Proud

अस्मिता, थँक्स.
किल्ली, ऑल्वेज वेलकम, थँक्स
रिया थँक्यु
मनमोहन, देवकीतै थँक्यु.. लेकाचा डबा आहे म्हणून तुपाच्या चपात्या नाहीतर मोठ्यांसाठी कोरडे फुलके असतात.. Happy

Pages