द प्रॉब्लेम ऑफ द ग्रीन कॅप्सूल

Submitted by पायस on 3 October, 2023 - 18:59

एकदा अकबराने विचारले की सत्य आणि असत्य यामधला फरक थोडक्यात स्पष्ट करा. बिरबलाने उत्तर दिले "चार बोटे" कारण डोळे आणि कान यांच्यात चार बोटांचे अंतर असते. गर्भितार्थ जरी "ऐकलेल्या गोष्टींची शहानिशा करणे श्रेयस्कर" असा असला तरी वरकरणी अर्थ, "जे डोळ्यांना दिसते ते नेहमी सत्यच असते", सर्व संस्कृतींमध्ये प्रचलित आहे. सीइंग इज बिलिव्हिंग, येनजिआन वेइ शी, ह्याकुबुन वा इक्केन नि शिकाझु - जवळपास प्रत्येक भाषेत या अर्थाची म्हण सापडतेच. तसे असेल तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हाच एकमेव विश्वासार्ह पुरावा नाही का?

~*~*~*~*~*~

सॉमरसेट परगण्यातील बाथ शहराजवळ सॉडबरी क्रॉस नावाचे छोटेसे गाव आहे. एके दिवशी तिथे आक्रीत घडले. एका निष्पाप किशोरवयीन मुलाचा विषबाधेने मृत्यु झाला तर एक संपूर्ण परिवार त्याच दिवशी विषबाधेने मरता मरता वाचला. तपासाअंती लक्षात येते की या सर्वांनी विष मिसळलेली चॉकोलेट खाल्ली होती. काही साक्षीदारांच्या साक्षींवरुन संशयित म्हणून मारजोरी विल्सचे नाव पुढे येते. मिस विल्स गावातील श्रीमंत व्यक्ती मार्कस चेसनीची भाची. मार्कस चेसनी स्वत: अतरंगी नमुना! त्याच्यामते ९९ टक्के साक्षीदार कुचकामी असून, साक्षीदारांना विश्वासार्ह मानणे म्हणजे घोडचूक! अर्थातच त्याच्यामते मारजोरीचा या विषबाधा प्रकरणाशी काही संबंध नाही. पोलिस ठोस पुरावा नसल्यामुळे फार काही करू शकत नसले तरी गावात प्रकरणाचा मोठाच बोभाटा झाला आहे. अशातच चेसनीच्या डोक्यात एक कल्पना शिजते.

आपला सिद्धांत - साक्षीदार विश्वासार्ह नसतात - सिद्ध करण्यासाठी तो मध्यरात्री एक प्रयोग करतो. या प्रयोगाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून मिस विल्स, तिचा प्रियकर जॉर्ज हार्डिंग, आणि गावातील मानसशास्त्राचे प्राध्यापक इंग्राम उपस्थित आहेत. त्याखेरीज जॉर्जच्या कॅमेर्‍यामध्ये याचे चित्रीकरण देखील होते. चेसनी त्याच्या टेबलावर बसलेला असताना अचानक खोलीत एक पायघोळ कोट घातलेली व्यक्ती प्रवेश करते. डोक्यावर काळी हॅट, डोळ्यांवर काळा गॉगल, तोंड पूर्ण झाकले जाईल असा लपेटलेला मफलर आणि काळे हातमोजे घातलेल्या हातात "आर. एच. निमो, एम. डी." अक्षरे असलेली बॅग. हा निमो बॅगेतून एक हिरव्या रंगाची कॅप्सूल काढतो. ती कॅप्सूल चेसनीला बळेबळेच गिळायला लावतो. चेसनी मरण्याचे नाटक करतो आणि निमो खोलीतून निघून जातो. प्रयोग संपल्यानंतर चेसनी या तिघांना सांगतो की आता जे घडले त्यावर आधारित एक प्रश्नसूची त्याने तयार केली आहे. त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि मग तिघांची उत्तरे एकमेकांशी ताडून बघितली जातील. तेवढ्यात चेसनीला विषबाधा झाल्याची लक्षणे दिसतात आणि मिनिटाभरातच तो मरतो.

जेव्हा या खूनाचा तपास पोलिस करतात तेव्हा ते त्या प्रश्नांची उत्तरे आणि इन जनरल या घटनेविषयी माहिती या तीन साक्षीदारांकडून घेतात आणि रेकॉर्ड झालेली चित्रफीतही बघतात. आश्चर्याची बाब म्हणजे तीनही साक्षीदार आणि चित्रफीत असे चौघेही या उत्तरांच्या बाबतीत एकमेकांच्या विरोधात जातात. कोणाचीच उत्तरे कोणाशीच जुळत नाहीत. मग चेसनीच्या प्रयोगामागचे नक्की सत्य काय? विश्वास नक्की कोणावर ठेवायचा? आणि गावात घडलेल्या विषारी चॉकोलेट प्रकरणाशी याचा काय संबंध? अखेर या रहस्याचा उलगडा डॉक्टर गिडिअन फेल करतो जॉन डिक्सन कार लिखित "द प्रॉब्लेम ऑफ ग्रीन कॅप्सूल" मध्ये.

~*~*~*~*~*~

१९२०-१९४० अशी दोन दशके रहस्यकथांचा सुवर्णकाळ मानतात. इंग्रजीतील बहुतांश क्लासिक रहस्यकथा-कादंबर्‍या या काळातल्या. या कालखंडातले एक प्रमुख नाव जॉन डिक्सन कार. लॉक्डरूम मिस्टरी किंवा बंदिस्त खोलीतील रहस्ये या जॉनरचा दादा माणूस. कार मूळचा अमेरिकन पण त्याने हा कालखंड इंग्लंडमध्ये व्यतित केला आणि त्याच्या प्रसिद्ध कथा-कादंबर्‍या इंग्लंडमध्येच घडतात. त्यामुळे रहस्यकथालेखक म्हणून तो इंग्लिश लेखकांमध्येच मोजला जातो. गेल्या दशकभरात आंतरजालावरील रहस्यकथांच्या ब्लॉग/डिस्कॉर्ड सर्व्हर्सवर बर्‍याचदा कारचे नाव त्या काळातील सर्वश्रेष्ठ रहस्यकथा लेखक म्हणून घेतले जाते. हा मराठी वाचकांना फारसा ठाऊक नाही तरी त्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रॉब्लेम ऑफ ग्रीन कॅप्सूल किंवा मूळ ब्रिटिश शीर्षक द ब्लॅक स्पेक्टॅकल्स ही कारच्या नेहमीच्या कथांपेक्षा काहीशी वेगळी आहे. त्याचे नेहमीचे समीकरण म्हणजे अशक्यप्राय गुन्हा. उदा. दिवसाढवळ्या, खूप सारे लोक बघत असताना अचानक एकाचा गळा चिरला जातो पण खूनी कोणाच्याच दृष्टीस पडत नाही आणि रक्ताने माखलेले कुठल्याही प्रकारचे धारदार शस्त्र (अगदी धारदार वायर सुद्धा) खून झालेल्या ठिकाणाच्या पाच मैल त्रिज्येच्या वर्तुळात सापडत नाही. त्यामानाने ग्रीन कॅप्सूलचा गुन्हा अगदीच शक्य कोटीतील आहे. त्याचा मुख्य मुद्दा तो अज्ञात इसम निमो खून करून कुठे गायब झाला हा आहे. या प्रकारच्या गोष्टी जनरली ख्रिस्तोफर बुशच्या पुस्तकांत सापडतात. त्यामुळे ही कादंबरी एका प्रस्थापित लेखकाने शिखरावर असताना करून पाहिलेला वेगळा प्रयोग म्हणूनही इंटरेस्टिंग आहे.

कथेतील डिटेक्टिव्ह आहे डॉक्टर गिडिअन फेल. हा कारचा होम्स. डॉक्टर फेल एक बहुश्रुत, मिश्किल स्कॉटिश गृहस्थ आहे आणि त्याची विनोदबुद्धि खास ब्रिटिश आहे. डॉ. फेल इंट्युशनिस्ट स्कूलच्या सर्वश्रेष्ठ डिटेक्टिव्ह्जपैकी एक आहे. इंट्युशनिस्ट स्कूल म्हणजे काय? इन जनरल डिटेक्टिव्ह फिक्शनची दोन प्रकारात विभागणी करता येते - लॉजिकल आणि रिअलिस्ट. रिअलिस्टमध्ये जनरली पोलिस प्रोसिजरल्स, हार्ड बॉईल्ड, थ्रिलर्स आणि सोशल मिस्टरीज येतात. यात रहस्यापेक्षा गुन्हेगाराची मानसिकता, गुन्ह्याची सामाजिक पार्श्वभूमि, पोलिसाची मानसिकता, वास्तविक चित्रण वगैरे बाबींवर भर असतो. पण याचा अर्थ असा नाही की यात घडणार्‍या गोष्टी वास्तववादी असतील. याचा अर्थ इतकाच की कथेमध्ये सामाजिक वास्तवावर भाष्य केलेले असेल. लॉजिकल मिस्टरीसाठी या सर्व दुय्यम बाबी आहेत. गुन्ह्याची तर्कसंगत उकल लॉजिकल मिस्टरीसाठी सर्वोपरी आहे. अजून सोप्या शब्दांत सांगायचे तर लॉजिकल स्कूलसाठी "हाऊ डन इट" महत्त्वाचे तर रिअलिस्ट स्कूलसाठी "व्हाय डन इट" महत्त्वाचे.

लॉजिकल स्कूलचे पुन्हा दोन प्रकार पाडता येतात - इंट्युशन आणि एलिमिनेशन. एलिमिनेशनमध्ये डिटेक्टिव्ह गुन्हेगाराला लागू पडणार्‍या बाबींची लिस्ट करतो आणि मग संशयितांच्या यादीतून एक एक नाव कट करत जातो. याचे एक्स्ट्रीम उदाहरण म्हणजे एलरी क्वीन. इंट्युशनमध्ये डिटेक्टिव्ह गुन्ह्याच्या स्वरुपाविषयी आधी एक हायपोथिसिस मांडतो आणि मग त्या हायपोथिसिसला सपोर्ट करणारे पुरावे गोळा करतो. दुसर्‍या शब्दांत एलिमिनेशनमध्ये आधी सगळे पॉसिबल पुरावे, बारीक सारीक धागेदोरे गोळा करून डिटेक्टिव्ह त्यावरून हायपोथिसिस मांडतो तर इंट्युशनमध्ये आधी डिटेक्टिव्ह हायपोथिसिस मांडतो आणि मग व्हेरिफिकेशनसाठी पुरावे सापडतात का ते बघतो. डॉ. फेल इंट्युशनिस्ट डिटेक्टिव्ह आहे.

ग्रीन कॅप्सूलचा मुख्य प्रॉब्लेम - कोणताच साक्षीदार विश्वासार्ह नाही - रंगवण्यात कार यशस्वी झालेला आहे. त्या प्रॉब्लेमचे अ‍ॅक्चुअल उत्तर अतिशय सोपे आहे पण त्यासाठी एक बोल्ड हायपोथिसिस मांडणे गरजेचे आहे. ती शक्यता लक्षात आली की मग चुटकीसारखे उरलेले धागे जुळतात. तसेच त्या उत्तरावरून गावातील विषबाधा कशी झाली असेल हेही सांगता येते. प्रायोगिक कथा असूनही मुख्य रहस्य चांगलेच जमून आले आहे. तरी प्रायोगिक असल्याची चिन्हे दिसत राहतात. उदा. गुन्हेगार कोण आहे आणि त्याचा हेतु यासाठी शेवटी एक सायकोलॉजिकल क्लू सोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी टाकलेला प्रसंग अतर्क्य आहे आणि रहस्य उकलण्यासाठी त्या क्लूची काहीच गरज नाही.
तसेच गावातील चॉकोलेटची विषबाधा. असा प्रसंग खरोखर व्हिक्टोरियन ब्रिटनमध्ये घडला होता. ख्रिस्तिना एडमंड्स नामक बाईने विषारी चॉकोलेट वाटण्याचा सपाटा लावला होता आणि कथेत त्या घटनेचा उल्लेख येतो. रिअलिस्ट स्कूलमध्ये त्या घटनेची तपशीलवार कारणमीमांसा केली गेली असती. इथे कार तिचा वापर खुन्याविषयी एक सायकोलॉजिकल हिंट म्हणून करतो. हा वापरही इंटरेस्टिंग आहे.

ओव्हरऑल, द प्रॉब्लेम ऑफ ग्रीन कॅप्सूल डॉ. फेल सीरिजमधल्या सर्वोत्कृष्ट कथांपैकी एक आहे आणि डिटेक्टिव्ह फिक्शनच्या चाहत्यांसाठी मस्ट रीड!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

होय जबरदस्त परिचय आहे. मी बघते ग्रंथालयात मिळते का ते.
-----------
अवांतर - रायगड 'हार्व्हेस्ट मुन - अ विस्कॉन्सिन आऊटडोअर अँथॉलॉजी' वाचलत का? कसं वाटलं Happy प्लीज विपूतुन कळवा. वी कॅन डिस्कस. Happy

साद, रायगड, सामो, रघू आचार्य, कॉमी, च्रप्स, rmd, चिन्मय_1 >> धन्यवाद Happy

याच्यावर चित्रपट आहे का >> नाही.

रेकमेंडेड जॉन डिक्सन कार यादी:
१) द हॉलो मॅन (द थ्री कॉफिन्स) - माझ्यामते त्या कालखंडातील तीन कादंबर्‍यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ख्रिस्तीच्या अ‍ॅन्ड देन देअर वेर नन व द मर्डर ऑफ रॉजर अ‍ॅकरॉयड, आणि कारची द हॉलो मॅन (द थ्री कॉफिन्स नावानेही प्रसिद्ध).
२) द क्रूक्ड हिंज
३) द जुडास विंडो (ही कार्टर डिक्सन या टोपणनावाने लिहिली.)

भारीच