पाककृती स्पर्धा-१ - नारळी किन्वा - मानव

Submitted by मानव पृथ्वीकर on 27 September, 2023 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

किन्वा - अर्धा कप
नारळाचे दूध - १ कप
खारीक पूड (Dry Date powder) – १०० ग्रॅम्स
बेदाणे - दीड मूठ
काजुचे काप - १ मूठ
केशर - एक चिमुट
लवंग ४
साजुक तूप - २ चमचे
पाणी - २ कप

क्रमवार पाककृती: 

Screenshot_2023-09-27-21-19-34-75_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg
प्रथम किन्वा दोन वेळा व्यवस्थीत धुवून घ्या आणि निथळायला ठेवा.
एका भांड्यात नारळी दूध आणि त्यात अर्धा कप पाणी घालुन मंद आचेवर गरम करायला ठेवा. हे हाताला चटका लागे इतपत गरम करायचे मग गॅस बंद करायचा.
त्याच वेळी दुसरीकडे गॅस वर मध्यम आचेवर कढई तापत ठेवुन त्यात एक चमचा तूपावर काजु काप परतुन वेगळे काढुन ठेवा आणि मग बेदाणे थोडेच परतुन घ्या आणि बेदाणे वेगळे काढुन ठेवा.
परत एक चमचा तूप घालुन लवंगा घालुन परता. मग निथळलेला किन्वा त्यात घालुन दोन मिनिटे परता.

IMG_20230927_210335_0.jpg

मग गॅस मंद करुन एका हाताने ढवळत त्यात गरम केलेले नारळ दूध + पाणी मिश्रण घाला. थोडा वेळ ढवळुन केशर घाला. आच मध्यम करा. आता नारळ दूध तापवले होते त्या भांड्यात दोन कप पाणी घालुन उकळायला ठेवा.

IMG_20230927_210407.jpg

किन्व्यातील दूध उकळुन जरा घट्ट झाला की त्यात एक कप उकळते पाणी घाला, छान हलवुन झाकण लावुन किन्वा शिजु द्या. किन्वा शिजला की फुगतो आणि त्याची कोंबासारखी शेपटी दिसायला लागते. गरज वाटल्यास अजुन थोडे उकळते पाणी घाला. शिजला की आच मंद करा. आपल्याला अजुन खारीक पूड घालायची आहे. ती घातली की किन्वा अजुन घट्ट होईल तेव्हा किन्वा पूर्ण शिजला की तो सैलसर नसल्यास परत थोडे पाणी घालुन सैल करा.
मग थोडी थोडी खारीक पूड घालत छान मिसळुन घ्या. खारीक पूड वापरल्याने हा मोकळा होत नाही, जरा चिकटसर रहातो. पूर्ण पूड मिसळुन झाली की गॅस बंद करा, आणि अर्धे काजु आणि बेदाणे घालुन एकदा मिसळुन घ्या. खाताना आत मध्ये अनपेक्षीत काजु, बेदाणे आले की छान वाटते.
वाटीचा साचा करुन प्लेट मध्ये घेउन वरुन काजु काप बेदाणे यांनी सजवून सर्व्ह करा.

Screenshot_2023-09-27-20-55-58-12_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg

वाढणी/प्रमाण: 
तीघांसाठी
अधिक टिपा: 

१. वरील दिलेल्या प्रमाणात १०० ग्रॅम्स खारीक पूड घातली की अगदी व्यवस्थीत गोड लागतो, पण आपापल्या आवडीनुसार चव बघुन थोडी जास्त घालु शकता.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम कल्पक व एफर्ट्स घेतलेली पाककृती. लिहिलेही व्यवस्थित. कीन्वाचा हॅपी फेस वगैरे छान आहे, कीन्वा खूष झाला आहे एकदम. Happy

मस्त आहे.
आता ती अस्मिताची खजूर पेस्ट आणून तो बार, हा किन्वा, ते पंचांमृत, सगळं करून बघावं म्हणते! Proud

हो. Happy

धन्यवाद सर्वांना. ज्यांना शक्य त्यांनी नक्की करून बघा आणि सांगा हा प्रकार कसा वाटतो.
मी एक दोन वेळा गुळाचा सुद्धा केला आहे हा.

छान पाककृती...
पौष्टीक रेसिपी बनवण्यात तज्ञ आहात मानवजी तुम्ही..!

छान रेसिपी . गूळ घालून करायची असेल तर गुळ किती घ्यायचा आणि कधी घालायचा ? दूध आणि गुळ घातले की कधी कधी फाटते दूध म्हणून विचारले.

धन्यवाद रुपाली, सामो, अश्विनी११, rmd.
मी गूळ किन्वा शिजत आला की घालतो, गरजे पुरते उकळते पाणी घालुन विरघळले पर्यंत हलवत रहायचे. दिलेल्या प्रमाणाला अर्धा वाटी किसलेला गूळ घालतो.

छानच.

दूध आणि गुळ घातले की कधी कधी फाटते दूध म्हणून विचारले........ नारळाचे दूध घातले आहे.मात्र नारळाचे दूध उकळवले तरी फाटू शकते,त्यामुळे मंदाग्नीवर करावे.

नारळाचे दूध गूळ टाकल्याने बहुतेक फाटत नसावे.
पण तापवले जास्त की फाटते. मंद आच आणि ढवळत राहिले तर उकळी येई पर्यंत फाटत नाही - म्हणजे त्यात गुठळ्या तयार होत नाहीत, इमल्शन ब्रेक होते पण ढवळत राहिल्याने कण बारीक रहातात वेगळे दिसून येत नाहीत पटकन. त्याने चवीत फरक जाणवला नाही. (दुसरे काही करताना).
म्हणुन यात मी मंद आचेवर आणि हाताला चटका जाणवेल एवढेच गरम करा लिहिले आहे. एवढे करतानाही बारीक कण वेगळे दिसायला लागले की गॅस बंद करून लगेच ढवळायाचे. आणि तसेच वापरायचे जरी कण वेगळे दिसत असतील तर. त्याने काही फरक पडत नाही.

ना दू,गूळ टाकल्याने फाटत नाही.मोठ्या आचेवर ठेवल्यास,चोथा पाणी होते.म्हणजे वरा मानव म्हणाले तसे होते.
पण चवीत फरक पडतो विशेषतः माशांच्या आमटीबाबत .

देवकी, अच्छा.
तुम्हास आणि मामी, आशिका यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

धन्यवाद ममो, जाई, दसा.

जर किन्वा वापरला नसेल कधी तर आधी त्याचा उपमा करून बघा मग हे करा असे सुचवतो.

Pages