लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे.. -- ऋन्मेऽऽष
तुला मुलींशी बोलायची अक्कल नाही, ते तुला बायकांशी बोलायला बरे जमते.. असा माझा आजवरचा प्रवास आहे. या भरवश्यावर ईतक्या मोठ्या विषयाला हात घालायचे धाडस करत आहे
विषय मोठा म्हणाल तर किती मोठा असावा.. जिथे सारी जीवसृष्टीच स्त्रीलिंग आणि पुल्लिंग अश्या दोन वर्गात विभागली गेली आहे तिथे स्त्री असणं म्हणा किंवा पुरुष असणे म्हणा, यावर काय आणि किती अंगाने बोलावे याला मर्यादाच नाही. जसे ब्रम्हांड अनंत आहे तसा हा विषय अथांग आहे. त्यावर मी एक सूक्ष्म जीव, तो देखील भिन्नलिंगी, काय अन किती बोलणार..
म्हणूनच आयुष्यात ज्या मोजक्या स्त्रियांशी घनिष्ठ संबंध आले त्या माझ्या जवळच्या अश्या मैत्रीणींमध्ये जो समान धागा आढळला त्या आणि तेवढ्याच अनुषंगाने लिहीत आहे. कारण बिरबलाच्या तीन प्रश्नांना मिळून जसे एकच उत्तर होते तसे त्या सर्व जणींनी मिळून मला एकच सारांश दिलाय.
पहिली स्त्री,
हो तीच..
आपली या जगातली पहिली मैत्रीण,
आई!
आमचे भले मोठे कुटुंब. चारचौघांसारखेच होते. म्हणजे सुशिक्षित आणि सुसंस्कृत..
आणि पुरुषप्रधान.
ईथे बायकांना पुरेपूर सन्मान दिला जायचा. पण गंमत अशी होती की न कमावत्या बायकांना कमावणार्या बायकांपेक्षा जास्त मान मिळायचा. कारण त्या घरदार आणि पोरंबाळे सांभाळण्यासोबत देवधर्म सांभाळायच्या आणि संस्कृती जोपासायच्या. हे एक वेगळेच गणित होते. बायकांना आपली प्राथमिकता काय आहे याचा विसर पडू नये याची बहुधा तजवीज होती.
यात माझी आई कमावणार्या गटात होती. बरेपैकी चांगल्या सरकारी नोकरीत होती. बरेपैकी हा शब्द जरा तोकडाच. कारण पैश्याच्या भाषेत तोलायचे झाल्यास वडिलांईतकाच पगार घेत होती. सोबत घर देखील सांभाळत होती. बाहेरची 'पुरुषी कामे' वडिल सांभाळायचे.
जवळपास सारेच नातेवाईक मुंबई शहरात राहायला होते. सर्वांचा मिळून एक गणपती होता. जो आधी आमच्या घरी यायचा. कारण आम्ही आजी-आजोबांसोबत राहायचो. एकेवर्षी बाप्पांसोबत आजोबांचेही विसर्जन झाले. त्यानंतर तो मोठ्या काकांकडे बसू लागला. आजी होती याच जगात, पण गणपती पूजायचा मान आजोबांपश्चात त्यांच्या मोठ्या मुलाने पटकावला.
याचे तेव्हा फार वाईट वाटले होते. छे, आजीला तो मान का नाही, हे त्यामागचे कारण नव्हते. ईतके काही स्त्री-पुरुष समानता आणि स्त्रियांचे हक्क वगैरे तेव्हा डोक्यात नसायचे. पण आमच्या चाळीतल्या घरात गणपती येणे म्हणजे एक धमाल असायची, ती काकांकडे तुलनेत कमी होणार होती.
असो, जागा बदलली पण सण साजरा करायची पद्धत नाही.
सर्व आत्या काकी मामी मावश्या वगैरे त्यांच्या पोरीबाळींसह स्वयंपाकघर आणि बेडरूमवर कब्जा करायचे. दिवाणखाना आणि व्हरांडा पुरुषांच्या ताब्यात असायचा. कामेही त्याचप्रमाणे वाटून घेतली जायची. कोणत्या बाईला किती सन्मान मिळणार हे तिच्या नवर्याची मिळकत किती यावर ठरायचे. पण ती स्वतः जे काही कमावते त्याला फारसे महत्व नसायचे. उलट कमावणार्यांना बायकांना आम्हाला "हे देखील" जमते हे सिद्ध करून दाखवणे गरजेचे असायचे. कमावत असलो तरी आमचे पाय जमिनीवरच आहेत हे दाखवणे गरजेचे असायचे.
आता जे काही लिहितोय ते बदललेल्या विचारातून आलेली समज आहे. असले तेव्हा काही लक्षात नाही यायचे. आईवडिलांमध्ये प्रेम मात्र खूप दिसायचे. नुसते प्रेमच नाही तर एकमेकांबद्दल सन्मान देखील तितकाच जाणवायचा. पुढे जशी जशी आमची आर्थिक परिस्थिती बदलत गेली. म्हणजे "फिटे अंधाराचे जाळे..." या लेखात लिहिल्याप्रमाणे उतारावरून वेगाने घसरत गेली. तेव्हाही ते प्रेम तितकेच कायम आहे हे दिसले. पण ईतक्या वर्षात जी गोष्ट दिसत नव्हती ती तेव्हा दिसू लागली.
वडिल बाहेरच्या कामांसोबत घरची कामेही करू लागले. ज्यांना कधी स्वयंपाकघरात पाहिले नव्हते ते भांडी घासू लागले. कपडेही धुवू लागले. आणि धुवून सुकवू देखील लागले. त्यानंतर ईस्त्री करणे हे तर आधीपासून त्यांच्या आवडीचे काम होते. थोडक्यात घरचे-बाहेरचे, स्त्रियाचे-पुरुषांचे, अशी कामाची वर्गवारी संपुष्टात आली. ज्याला जे करता येते तो ते करू लागला. एकमेकांबद्दल प्रेम, मान-सन्मान जे त्यांच्या नात्यात आधीही दिसायचे त्या पलीकडे जाऊन मला आता त्या नात्यात समान वागणूकीतून येणारा एक आदर दिसू लागला. आणि हे झाले ते वडिलांच्या पडत्या काळात आईने त्यांना आणि घरदाराला सांभाळून घेण्याने.
आता तसा पडता काळ आलाच नसता तर हे सगळे बदल आमच्या घरात झालेच नसते का याचे उत्तर मला माहीत नाही. पण एक गोष्ट जी समजली ती म्हणजे माझी आई असो वा कुठलीही बाई, तिला नाते कसे जपायचे हे बरोबर माहीत असते. ईतके वाद जवळून पाहिले मी, आमच्या घरात, चाळीत, शेजारीपाजारी, पण प्रत्येकामागे त्याची जोडीदार बायको ठामपणे ऊभी असायची. स्वतःच्या घरात प्रॉपर्टीवरून भावंडांमधील वाद पाहिले, पण घर तुटायची वेळ आली तेव्हा सोबत नातेही तुटू नये म्हणून बहिणीच ते वाचवायला पुढे आल्या.
तर अशीच माझी दुसरी जिवाभावाची सख्खी मैत्रीण म्हणजे माझी पत्नी.
असे म्हणतात लग्न त्या व्यक्तीशी करावे जी आपल्या प्रेमात आहे. मी सुद्धा हाच विचार करून लग्नाचा निर्णय घेतला होता. पण जेव्हा आली समीप लग्न घटिका, तेव्हाच माझा पोटाचा आजार उसळून आला. म्हणजे त्या आधीही तो माफक प्रमाणात त्रास देत होताच. पण त्यावेळी तो नियंत्रणाबाहेर गेला होता. आज जरी मी त्याला crohn's disease या नावाने ओळखत असलो, तरी तेव्हा त्याचे निदान झाले नव्हते. शत्रूच माहीत नाही तर त्याचा बंदोबस्त तरी कसा करावा.
उलट्या, जुलाब, पोटदुखी हे रूटीन झाले होते. भूक न लागणे, जेवण न जाणे, यामुळे वजन वेगाने उतरत होते. ओळखीच्या पाळखीच्या सर्व डॉक्टरांनी हात टेकले होते. जिथे लग्नाआधी जोडीने शॉपिंग आणि डेटींग करायची असते तिथे आमच्या जोडीने नवनवीन डॉक्टरांच्या वार्या चालू होत्या. त्यावेळी मुंबईतील हिंदुजा म्हणून नावाजलेल्या हॉस्पिटलमधील एका प्रथितयश डॉक्टरांनी माझ्या बायकोला विचारले, बाई तू याची कोण लागतेस?
जेव्हा त्या डॉक्टरांना समजले की अजून आमचे लग्न झालेले नाही तेव्हा त्यांनी एक हितचिंतक म्हणून अप्रत्यक्षपणे माझ्या बायकोला लग्नाचा फेरविचार करायचा सल्ला दिला. जो तिने तितक्याच विनम्रपणे माझे याच्यावर प्रेम आहे असे सांगत नाकारला. कागदोपत्री रजिस्टर झाले नसले तरी मनाने नाते जुळले होते. आणि तेच बंध जास्त घट्ट होते.
लग्नानंतर देखील पहिली दोन-तीन वर्षे माझ्या आजारपणाने फार त्रास दिला. कारण निदान होतच नव्हते. जे झाले ते देखील वर्षभराने चुकीचे ठरले. जो संसाराचा गोल्डन पिरीअड म्हणतात तो बराचसा काळ या आजारपणातच गेला. पण तरी आमच्यातल्या नात्याला किंचितही धक्का लागला नाही. एकदा जुळलेले नाते तिच्याबाजूने तरी सहजी तुटणारे नव्हते. अपवाद वगळता ज्या ज्या स्त्रिया वेगवेगळ्या रुपात आयुष्यात आल्या त्यांचा असाच अनुभव घेतला आहे.
पण तिसरी स्त्री याहीपेक्षा स्पेशल आहे !
ती माझी लेक आहे.
तिच्यासोबत गेले नऊ वर्षे सोबत आहे. या वर्षात आमच्यातील नात्याचे विविध पदर अनुभवले आहेत. पण गेल्या दोनेक वर्षात ते अजून खुलू लागले आहे. आम्ही एकत्र खेळतो, फिरतो, अभ्यास करतो, पिक्चरला जातो. पटले नाही तर वाद घालतो, भांडतो चक्क मारामारी देखील करतो. पण चूक लक्षात आल्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सॉरी म्हणत रडतो.
कारण तेच!
नाते, मग ते कुठलेही असो. ते टिकवणे स्त्रियांमध्ये उपजतच असावे. ते तिलाही जमते आणि तिच्या या गुणाची मलाही जाण आहे.
लहानपणी एक पिक्चर पाहिला होता. नाव प्रहार. त्यात नाना पाटेकरचा एक डायलॉग होता. त्याचे मोठाले दंड पाहून हरखून गेलेल्या एका मुलाला तो म्हणतो, ताकद यहा नही होती. तर डोक्याला बोट लाऊन म्हणतो, यहा होती है. त्याचा हा डायलॉग तेव्हाच मनावर कोरला गेला होता. मनुष्याची ताकद त्याच्या बुद्धीत आहे. आणि तिचे वाटप करताना देवाने स्त्री-पुरुष असा कुठलाही भेदभाव केला नाहीये. गंमत म्हणजे मी जेव्हा माझ्या लेकीला तिच्या बारीक असण्यावरून चिडवतो तेव्हा ती देखील आपल्या बोटाने डोक्यावर टकटक करत म्हणते, "पप्पा, ताकद ईथे असते." तिला हे समजायला कुठला पिक्चर बघायची गरज पडली नाही.
पण आजच्या या वेगाने बदलणार्या धकाधकीच्या जीवनात "आय क्यू" म्हणजेच intelligence quotient पेक्षा महत्वाचा ठरतो तो "ई क्यू" म्हणजेच emotional quotient, जो कुठलेही नाते वृद्धींगत करायला, वादविवाद टाळायला आणि कामाचा ताणतणाव कमी करत आयुष्याचा आनंद उचलायला फार गरजेचा असतो.
आणि ईथे मात्र निसर्गाने नक्कीच भेदभाव केला आहे. कारण गूगल करून कुठल्याही सर्व्हेचे आकडे चेक न करता देखील मी माझ्या आजवरच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून हे खात्रीने सांगू शकतो की नक्कीच या emotional intelligence मध्ये स्त्रिया या पुरुषांपेक्षा कांकणभर सरस असाव्यात.
पण यात केवळ निसर्गाचाच हात नसावा..
जसे महाभारतातल्या गांधारीने आपल्या अंध पतीला साथ द्यायला म्हणून स्वताच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आणि त्यामुळे तिला दिव्यशक्ती प्राप्त झाली. जे तिची नजर पडताच दुर्योधनाचे शरीर वज्राचे झाले.
त्याच प्रमाणे आजवर पुरुषप्रधान संस्कृतीत पिढ्यानपिढ्या गेल्याने स्त्रियांची जडणघडण जशी झाली आहे ती देखील त्यांच्या या भावनिक बुद्धीमत्तेला कारणीभूत असावी.
त्यामुळे आजच्या युगात पुरुषांशी बरोबरी करताना, त्यांनी पुरुषांसारखे न होता आपल्यातील हा गुण सोडू नये. आपले स्त्री असणे म्हणजे काय हे स्वतः ओळखून ते जपावे. कारण ती तुमची कमजोरी नसून तुमची ताकद आहे!
- ईति लेखनसीमा -
-------------------------------
(ता.क. - पहिल्या प्रतिसादाला पाहता ही थोडी भर - कारण उगाच काही चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून...
स्त्रियांना नाते टिकवणे जमते म्हणून पुरुषांनी तशी अपेक्षा त्यांच्याकडून धरून ती पुर्ण न झाल्यास त्यांना जज करू नये. ही चूक मी स्वतः आयुष्यात एकदा करून झाली आहे. परीणाम भोगले आहेत. पण तरीही हा स्त्रियांचा एक गुण आहे जो त्यांच्यात कायम राहावा असे मनापासून वाटते. तो स्त्रियांमधून जाण्यापेक्षा बदल पुरुषांनी आपल्यात घडवावा आणि या गुणाची कदर करावी ईतकीच ईच्छा)
-------------------------------
एखाद्या पुरुषाची ओळख मी त्याची स्त्रियांसोबतची वर्तणूक आणि त्यांच्याबद्दलचे विचार काय आहेत यावरून करतो. त्यामुळे या निमित्ताने स्वत:चेच विचार नव्याने चाचपायला काहीतरी लिहायचेच होते. पण फार अभ्यासू वा माहितीपुर्ण लिहिणे मला कधीच जमले नाही. मी सारेच माझ्या तोकड्या अनुभवांवर लिहितो. ईथेही तेच केले. पण यावेळी लेखनस्पर्धेचे दोन्ही विषय भावले. किंबहुना सध्या माझ्या डोक्यात जे विचार चालू होते ते कुठेतरी याच दोन विषयांना धरून होते. त्यामुळे ते कागदावर उतरवून हलके व्हायची आयतीच संधी मिळतेय असे वाटले. आणि मी ती घेतली. त्याबद्दल संयोजकांचे आणि वाचकांचे आभार, आणि गणपती बाप्पा मोरया!
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
छान लिहिलं आहेस ऋन्मेष.
छान लिहिलं आहेस ऋन्मेष.
पण एक सांगते. स्त्रिया नाती टिकवायला पुढे येतात (प्रसंगी पड खाऊन ) हा तुझा (आणि अनेकांचा) अनुभव असला, तरी त्यामुळे स्त्रियांकडून तशी अपेक्षाही कळत-नकळतपणे केली जाते. मग ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर लगेच 'जज' केलं जातं.
स्त्री किंवा पुरुष असं सरसकटीकरण न करता व्यक्तीच्या पातळीवर हे बघितलं तर जास्त बरं.
छान लिहिले आहेस
छान लिहिले आहेस
छान लेख.
छान लेख.
स्त्री किंवा पुरुष असं सरसकटीकरण न करता व्यक्तीच्या पातळीवर हे बघितलं तर जास्त बरं++११११११
हे ultimate obejctive आहे समानतेचे!
छानच लिहिलेय.
छानच लिहिलेय.
emotional intelligence मध्ये स्त्रिया या पुरुषांपेक्षा कांकणभर सरस असाव्यात.>> अगदी खरे आहे.
वावे, धन्यवाद आणि पहिलाच
वावे, धन्यवाद आणि पहिलाच प्रतिसाद निशाणेपे. कारण हा मुद्दा येणारच हे लिहून झाल्यावर सर्वात पहिले डोक्यात आले.
तो लेखातच क्लीअर करावा की नाही हा विचार देखील करत होतो....
कारण - मग ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर लगेच 'जज' केलं जातं. - ही चूक एकदा आयुष्यात मी स्वतः करून झाली आहे परीणाम भोगत आहे..
पण तरीही हा एक गुण आहे जो कायम राहावा असेही मनापासून वाटते. तो स्त्रियांमधून जाण्यापेक्षा बदल पुरुषांनी आपल्यात घडवावा..
छान लिहिलं आहेस ऋन्मेष.
छान लिहिलं आहेस ऋन्मेष.
उगाच शब्द बंबाळ न करता, तीन
उगाच शब्द बंबाळ न करता; तीन पिढ्यातील स्त्रियांच्या परिस्थितीचे, मानसिकतेचे अचूक निरीक्षण करून सहज, सरळ सोप्या शैलीत एका पुरुषाने लिहिलेला लेख..
खूप खूप आवडला..
स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा!
बदल पुरुषांनी आपल्यात घडवावा.
बदल पुरुषांनी आपल्यात घडवावा.. +१
छान लेख
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे
छान लिहिले आहे . वावे शी सहमत
छान लिहिले आहे . वावे शी सहमत .
साध्या सोप्या भाषेत आपल्या
साध्या सोप्या भाषेत आपल्या आयुष्यातील महत्वाच्या , जवळच्या आणि 3 पिढयांतील स्त्रियांचा विचार करून लिहिलेला लेख खूप भावला.
उगाच बोजड शब्द न वापरता, साधं, सरळ लिहिण्याची आणि तरीही उचित परिणाम साधायची हातोटी आहे तुमच्या लेखनात.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!
चांगला लेख.
चांगला लेख.
तुला मुलींशी बोलायची अक्कल नाही, ते तुला बायकांशी बोलायला बरे जमते.. असा माझा आजवरचा प्रवास आहे. >> इथे अडखळलो. ही दोन्ही स्टेटमेंटस् कॅन कोएक्सिस्ट. कारण मुली आणि बायका ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत. बायकांशी बोलायला जमत असेल तरी सायमल्टेनियसली मुलींशी बोलायची अक्कल नसूच शकते. (ह घ्या)
अश्विनी, आशिका धन्यवाद
अश्विनी, आशिका धन्यवाद
@ हपा, हाहा..
पण ते असे आहे की मी लहान वा कॉलेजला असताना ती अक्कल नव्हती म्हणून समवयीन स्त्रियांचा मुली असा उल्लेख केला आहे आणि आता या वयात ते छान जमते तर त्याच समवयीन मुली बायका झाल्या आहेत
बाई दवे,
हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. ती अक्कल कशी नव्हती आणि कशी आली. गणपतीनंतर कधीतरी किस्से उदाहरणांसह लिहेन सविस्तर
छान लिहिलयं! वावेशी सहमत!
छान लिहिलयं! वावेशी सहमत!
एकाच व्यक्तीने तीन पिढ्या आणि
एकाच व्यक्तीने तीन पिढ्या आणि नातेसंबंध यांचं विश्लेषण केलंय.. एक प्रकारे गतायुष्याचं पुनरावलोकन वाटलं. छान आहे.
धन्यवाद स्वाती आणि प्राचीन
धन्यवाद स्वाती आणि प्राचीन
धन्यवाद स्वाती आणि प्राचीन
Duplicates
धन्यवाद स्वाती आणि प्राचीन
Duplicates
धन्यवाद स्वाती आणि प्राचीन
Duplicates
Admin he उडवता येतील का?
खूप छान लिहीलेले आहे.
खूप छान लिहीलेले आहे.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
खूप छान लिहिले आहे. वावे +१
खूप छान लिहिले आहे. वावे +१
Emotional Intelligence बद्दल सहमत. IQ पेक्षा कितीतरी महत्त्वाचे कठीण प्रसंगात तारून नेणारे व माणसं जोडायला लागणारे स्कील आहे.
धन्यवाद अस्मिता
धन्यवाद अस्मिता
एकदम सहज, सरळ आणि ज्येन्युईन.
एकदम सहज, सरळ आणि ज्येन्युईन.
वावे+१
भक्ती धन्यवाद
भक्ती धन्यवाद
जिथे सारी जीवसृष्टीच
जिथे सारी जीवसृष्टीच स्त्रीलिंग आणि पुल्लिंग अश्या दोन वर्गात विभागली गेली आहे तिथे स्त्री असणं म्हणा किंवा पुरुष असणे म्हणा,
>>> इथेच आय ऑब्जेक्ट म्हणणारे अजून कसे आले नाहीत
लेख मस्त !!!
धन्यवाद च्रप्स
धन्यवाद च्रप्स
बरेच दिवसांनी दिसलात.. गणपतीला गावी गेलेलात का
इथेच आय ऑब्जेक्ट म्हणणारे
इथेच आय ऑब्जेक्ट म्हणणारे अजून कसे आले नाहीत Light 1 >>> हे कळले नाही, यात काय ऑब्जेक्शन? अच्छा तृतीयलिंगी का?
ता क - माझा पहिला प्रतिसाद
ता क - माझा पहिला प्रतिसाद लेखात घेतला.
छानच लिहिले आहेस ऋ
छानच लिहिले आहेस ऋ
Pages