मला वाटत हे त्यांच शेवटच लेखन असेल. परवा अचानक हे शीर्षक वाचून वाटलं काहीतरी विशेष नक्कीच असणार , म्हणून ग्रंथालयातून घेतल पुस्तक आणि पूर्ण वाचून काढलं. व्यासंग काय असतो , चित्रपटांची नशा किती असते, संगीतात वेड होणं कशाला म्हणतात , जगणं म्हणजे नक्की काय , छंद जोपासणं कशाला म्हणतात अशा अनेक प्रश्नाची उत्तर यात मला दिसली. हे लेखन म्हणजे वेळोवेळी त्यांनी त्यांच्या पत्रकारितेतून लिहिलेल्या व्यक्तिचित्रणाचे एकत्रीकरण आहे. जस पुलं नि लिहिलेलं व्यक्ती आणि वल्ली, मला हे तसंच वाटलं. यात एकही व्यक्ती मात्र काल्पनिक नाही. ती व्यक्ती खऱ्या नावानं , आणि आहे तशी यात नमूद केलेली आहे.
शिरीषजी लेखनाच्या शीर्षकाचं विश्लेषणही खूप चांगलं करतात. यातील ज्या व्यक्तींची त्यांनी वर्णन केली आहे त्यातील काहींना ते कधीच प्रत्यक्ष भेटले नाहीत. तरीही ते या लेखनाला "यार-दोस्त" असं नाव देताहेत. राज-दिलीप-देव - या त्रिदेवांच्या लेखाने सुरुवात होते आणि आपल्याला या प्रवासात मधुबाला , नादिरा (मूड मूड के ना देख - अनाडी चित्रपट), लतादीदी-आशाताई , अलीकडील सचिन-विराट अशी कितीतरी प्रतिभावंत भेटत राहतात. त्यांच्या आयुष्यातील काही गूढ उकलत शिरीशजी आपल्याला त्यांच्या जवळ नेतात. विद्याधर गोखले यांचे किस्से असोत कि शिरीषजींच्या कट्टा गॅंग चे मेम्बर्स असोत , आपल्याला जगण्याची एक वेगळी ऊर्जा देऊन जातात.
दिलीपकुमार आणि अमिताभजी यांची तुलना करणं किती चुकीचं आहे , लतादीदी-आशाताई यात श्रेष्ठ कोण , सचिन चांगला कि विराट , अशा सारख्या बऱ्याच प्रश्नाना त्यांनी त्यांच्या भाषेत -ज्याला - कणेकरी म्हणतात , त्यात उत्तर दिली आहेत.
एका व्यक्तिचित्रात - त्यांनी वर्णन केलेले प्रसिद्ध नाटककार वसंतराव कानेटकर यांचे चिरंजीव येतात. बँकॉक मध्ये राहून तिथल्या एका मोठ्या प्रोजेक्टचे प्रमुखपद संभाळत हि व्यक्ती आपल्या संस्कृतीला , संगीत-साहित्याला किती मन देते याच वर्णन केलं आहे. आणि साधेपणा तर इतका कि शिरीषजींना त्यांचं काम याबद्दल काहीच माहित नव्हत, इतरांनी सांगितलं कि हि व्यक्ती किती उंचीवर आहे ते. स्वतःच्या खर्चाने शिरीषजींना तो प्रदेश त्यांनी फिरवून दाखवला. आणि त्यांच्या कार्यक्रमाला चक्क जमिनीवर मांडी घालून बसून कार्यक्रम ऐकला. शिरीषजींनी विचारल असं का , तर ते म्हणले, हसायला ऐसपैस जागा मिळते म्हणून !
एका व्यक्तिचित्रात त्यांच्या एका संगीतवेड्या मित्राचं वर्णन आहे.जी चित्रपटांची नाव , जी गाणी ते सांगतात त्यातील एकही गाण्याचं नाव माहित असू नये हि माझ्या सारख्या आजच्या पिढीची मोठी खंत आहे. लतादीदींची , तलतजींची कोणती गाणी ऐकली कि स्वर्गातीत आनंद आहे . अक्खी रात्र जागून त्या कॅसेट्स हे मित्रलोक कसे ऐकायचे याच वर्णन आहे. मला वाटायचं कि मी लतादीदी खूप ऐकल्यात , मुकेशजी , किशोरदा, रफीसाहेब. तलतजी ऐकलेत. पण आता जाणवतंय , मी काहीही ऐकलेलं नाही.
आयुष्य किती घटनांनी भरलेलं असत , किती कंगोरे प्रत्येकाला लाभलेले असतात. किती वाटा चुकलेल्या असतात. किती क्षण आपण जगलेलोच नसतो. किती व्यक्ती आपण कधी ओळखूच शकलेलो नसतो. किती बाबतीत आपण विनाकारण फक्त राग राग करत फिरत असतो.
एखाद्या टपरीवरचा चहा , गप्पांमध्ये घालवलेली पूर्ण रात्र, एखाद्या उंच टेकडीवर जाऊन खाली एकटक पाहत राहणं , समुद्राच्या लाटांचा फक्त आवाज ऐकत राहणं , एखादा छानसा संगीतमय प्रवास करणं , एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात एक सेवक म्हणून मदत करणं , एखाद्यावेळी मोठ्याव्यक्तीकडून कौतुकाची थाप मिळवणं , एखाद्या लहानग्याला खेळायला प्रोत्साहन देऊन स्वतःही लहान होणं .. एखादा प्रवास फक्त प्रवास म्हणून करणं .. किती गोष्टी लपल्यात या आयुष्यात ..
आणि आपण खरंच किती जगतोय. !
हे पुस्तक संग्रही ठेवावं असच आहे ..!
"यार-दोस्त" -लेखक शिरीष कणेकर
Submitted by विश्राम कुलकर्णी on 26 September, 2023 - 00:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान परिचय. शिरीष काणेकराचा एक
छान परिचय. शिरीष काणेकराचा एक कार्यक्रम पहिला होता, आवडला होता.
उत्तम परिचय. क्रिकेटबद्दल जसं
उत्तम परिचय. क्रिकेटबद्दल जसं हर्षा भोगलेने बोलावं आणि आपण ऐकत रहावं असं वाटतं ना, तसं चित्रपटसृष्टीबद्दल कणेकरांनी. हे पुस्तक मिळवून नक्की वाचणार.
छान ओळख करुन दिलेली आहे.
छान ओळख करुन दिलेली आहे.
शेवटच्या वाक्याला, अगदी अगदी झाले.