(लहानपणी लिहीलेले निबंध वाया गेले. जे जे आम्हाला शिक्षकांनी व्हायला सांगितले ते झालोच नाही, पण परीक्षेत पण असा निबंध आल्यावर जे व्हायचं ठरवलं ते ही झालो नाही. आता शाळा सुटल्यावर इतक्या वर्षांनी जिथून आलो तेच व्हायची तयारी नाही आणि जी आपली औकात नाही ते व्हायची कल्पना करून सुद्धा उपयोग नाही. तरीही उपक्रम आहे म्हटल्यावर सगळं माफ म्हणून मायक्रोतोंडी झिटा घास).
समजा मी मुकेश अंबानी झालो (असतो) तर.
या कल्पनेने पण गडाबडा हसायला येतं. भारतातल्या एकशे तीस कोटी लोकसंख्येपैकी कुणी तरी एक क्षुद्र जीव एक महान संकेतस्थळावर स्वतःला मुकेश अंबानी व्हायची स्वप्ने बघत असेल हे मुअंच्या गावीही नसेल. मुळात त्यांचं लाईफ हे कधीच आकर्षण नव्हतं. ते मिनिटाला किती खर्च करतात याचे आकडे कल्पनेतही बसणारे नाहीत तरीही हा घास घ्यायचं कारण संयोजकांच्या गुड बुक्स मधे जाऊन त्यांच्या शिफारशीवरून आयडीचे आयुष्य सहा महीन्यांनी वाढावे एव्हढीच इच्छा.
एखादी व्यक्ती होण्याचे स्वप्न बघण्यासाठी त्याचे वैभव आपल्याकडे असावे असे वाटायला पाहीजे. त्याच्याकडे असलेली सत्ता बघून हेवा वाटायला पाहीजे, त्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला हवे कि त्या व्यक्तीची प्राप्ती हे ध्येय बाळगताना आपण त्या व्यक्तीसारखेच व्हायची इच्छा व्हायला हवी. एके काळी मोठा झाल्यावर अमिताभ बच्चन होणार असे पाहुण्यांना सांगितले होते. पण उंची काही सहा फूट चार इंच झाली नाही. कपिल देव सुद्धा व्हायचे होते. त्यासाठी बॅटींगला जाताना मागे वळून वर सूर्याकडे बघण्याचा सराव सुद्धा केला होता. पण आमच्या ग्राऊंड मधे आम्ही जिथे बसायचो तिथून जातान सूर्य मागे कधीच नसायचा. त्यामुळे मग पॅव्हिलियनकडे ( तो एक पाण्याचा बुजवलेला हौद होता, ज्यावर ज्याच्या कडे अंपायरींगची
जबाबदारी दिलीय तो सोडून उरलेली बॅटींगची टीम बसायची . अंपायर चेंज म्हणून गलका झाला कि मग आउट दिलेला आणि वादग्रस्त अंपायर असे दोघेही हौदाकडे परतायचे. आलेल्या अंपायरला मग कॅप्टन रागात विचारायचा " तुला पाठवलं कशाला होतं ? पायाला लागलं कि आउट द्यायचंच नाही. आता बघ ते देतात का आउट ? एलबी सोड,क्रीझ आउट, रन आउट तरी देतात का ?") वळून सूर्याकडे बघावं लागायचं.
एव्हढा प्रयत्न करूनही कपिलदेव होता आलं नाही. त्याच्या इतका जोरात बॉल टाकला कि समोरचा बॅट्समन त्याला फक्त दिशा द्यायचा. लाख प्रयत्न करून तो कधी स्विंग झाला नाही. तसंच बॉल टाकताना हात अंगाला घासून वर झाली करताना त्याच क्षणाला कपिल स्टाईल जंप मारून चेंडू फेकताना उडी क्रीजच्याबाहेर जायची. मग नोबॉल ! १५ बॉलची ओवर टाकून दम लगायचा. मग कपिल बनण्याचं स्वप्न सोडलं.
नंतर ऐश्वर्याराय च्या प्रेमात पडलो. इतका कि ती नाही मिळत तर आपणच ऐश्वर्या राय बनून आपल्यालाच पटावं. त्या वेळी जर निबंध लिहायला सांगितला असता तर मी ऐश्वर्या राय असतो तर असाच लिहीला. असता. मी ऐश्वर्या राय असतो तर सलमान खान , विवेक ओबेरॉय यांच्या सारख्या सेलेब्रिटीजना कधीच पटलो नसतो. ज्यांना कदर नाही त्यांना पटण्यात काय अर्थ ? त्या पेक्षा ज्यांना ध्यानी मनी नसेल कि ऐश्वर्याराय आपली होऊ शकेल अशा रघू आचार्य टाईप लोकांना सॅन्ताक्लॉजाप्रमाणे थोडं थोडं प्रेम वाटलं असतं असा निबंध नक्कीच लिहीला असता. शिक्षकांनी त्यावर आपले अमूल्य मत काय दिले असते ते दिले असते.
तर मुकेश अंबानींच्या बाबतीत असला काहीच प्रकार नाही.
अशा परिस्थितीत जर मुकेश अंबानी झालो असतो तर ?
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अँटिलिया वरच्या एका मजल्यात तीन बीएचके मधे गरजेपुरतं फर्निचर करून ते रहायला घेतलं असतं. बाकिचे मजले भाड्याने दिले असते. तळमजल्यावर दुकाने काढली असती. महालक्ष्मी प्रोव्हिजन स्टोअर्स, साई फास्ट फूड, लाडका वडापाव, आगीनगाडी मिसळ या सर्वांना ती दुकाने अकरा महीन्यांच्या कराराने दिली असती. वीजेचं रीडींग घेतलं असतं.
नीताला क्रिकेटच्या टीमा विकत घ्यायला बंदी केली असती. तुला काय क्रिकेट खेळायचंय ते मोबाईलवर खेळ कि. त्यासाठी एव्हढी उधळपट्टी कशाला ? तिचं कोट्यवधी रूपयांचं घड्याळ विकून टाकलं असतं आणि साडेअकराशे रूपयांचं एक डिसेन्ट घड्याळ घेऊन दिलं असतं. वेळच बगायचीय ना ? मग ती शंभर रूपयाच्या घड्याळात पण दिसते.
हेलिकॉप्टर विकून टाकलं असतं. गरज पडलीच तर ओला /ओबेर चं हेलिकॉप्टर मागवता येईल.
एव्हढ्या कार्सची एकट्या माणसाला काय गरज ? बेस्टने आणि लोकल ट्रेनने जाता येत असताना एव्हढ्या ट्रॅफिक जाम मधून कशाला कारमधे जायचं ?
व्यवसाय कसा करावा याच्या मार्गदर्शनासाठी अधून मधून मायबोलीवर आलो असतो. काय लिहीतात एकेक जण !
गरजा कमी ठेवल्या कि खर्चही कमी लागतो. खर्च कमी झाला कि व्यवसाय कमी मार्जिनवर करता येतो.
मग जिओचे दर पुन्हा कमी करता आले असते. बीएसएनएल चे टॉवर घेतले अशी माबोवरची टीका वाचून ते त्यांना परत केले असते. कशाला अशी चिटींग करायची ? आपल्या व्यवसायाला पाहिजेत ना ? मग आपल्या खर्चाने बांधू कि टॉवर ? वर जाताना हे सगळं इथेच सोडून जायचंय.
(पण शेजारच्या तिखटजाळ हॉटेलच्या पोर्टलवर गेल्यावर पुन्हा दर वाढवावे लागले असते. कारण तिकडे नेमके उलटे सल्ले मिळाले असते.).
जिओ सिनेमाच्या सीईओ पदी ऐश्वर्या रायची नेमणूक केली असती. मार्केटिंग हेड म्हणून सोनाली बेंद्रे. या विभागाकडे जातीने लक्ष पुरवलं असतं. अॅशने सांगितलं तर अभिषेक साठी वर्षाला पाच सहा सिनेमे पण काढले असते आणि हजार कोटीचा धंदा होईपर्यंत तिकीटे विकत घेतली असती. कसं आहे , नफ्याचं प्रमाण वाढलं कि जबरी टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे थोडा पैसा समाजसेवेवर खर्च झालाच तर बिघडलं कुठं ?
महत्वाचं म्हणजे बॉलिवूडचं आकर्षण आहे म्हणून धाकट्या भावाची जिरवण्यासाठी लग्नात वाढपी म्हणून अमिताभ बच्चनला कधीच बोलवलं नसतं. उंची नाही वाढली म्हणून काय झालं ? आर्थिक उंची सर्वात उंचीची. करमणूक म्हणून अमिताभला बोलावून डायलॉग बोलून दाखवायला सांगितले असते. धागे कशाला काढायचे ?
" तुम मुझे वहां ढूंढ रहे हो पीटर, और मै तुम्हारा यहा इंतजार कर रहा हूं" या संवादावर एखादी हिर्याची अंगठी काढून दिली असती. आपल्याकडे ठेवून काय करायची ? उगीच हरवली तर रूखरूख लागणार.
आणि मुकेश अंबानी झालो म्हणून काय झालं ?
मायबोलीवर येऊन लेख लिहीले असते. अक्षयकुमारसाठी धागे काढले असते. मायबोली गणेशोत्सवात भाग घेतला असता. माझीच कंपनी त्यामुळे वेळच वेळ. कधीही गेलो तरी चलतंय. त्यामुळे ऑफीसला जायच्या आधी लेख पाडा हे कंपल्शन नसतं.
मग मी पण लेख लिहीला असता...
मी रघू आचार्य असतो तर !
Lol..
Lol..
सामो, ममो मनापासून आभार.
सामो, ममो मनापासून आभार.

सुनिधी धन्यवाद सूचनेसाठी. याच उपक्रमात पोस्टायचे असल्याने घाई केली.
स्वाती आंबोळे , आभार
रूपाली विशे, चन्ना@१२, मी मानसी,
हपा आणि भरत
सर्वांचे आभार.
भक्ती साळुंखे आभार.
लै भारी आचार्य!
लै भारी आचार्य!
धन्यवाद रमड
धन्यवाद रमड
Pages