यापूर्वीच मी युद्धपटांवर एक धागा काढलेला आहे. त्यात फक्त चित्रपट, सिरीज आणि डॉक्युमेंट्रीज होत्या. इथे आपण दुसऱ्या महायुद्धावर आधारीत पुस्तकांवर चर्चा करुया...
दुसरे महायुद्ध हा इतका प्रचंड व्यापक विषय आहे आणि त्याला इतके कंगोरे आहेत की सरसकट दुसऱ्या महायुद्धावरील पुस्तके अशी वर्गवारीच करता येत नाही. कारण त्यात आघाडीवरील सैनिकांनी लिहीलेले अनुभव, अनुभवी जनरल्स जसे की रोमेल, मार्शल झुकॉव्ह यांची पुस्तके, चर्चिल, हिटलर यांची आत्मचरित्रे, विविध लढाया आणि त्याचे परिणाम उलगडून दाखवणारी माहीतीपर पुस्तके, त्याकाळातील लष्कर संरचना, विविध विमाने, टँक, मशिन्स, जहाजे, पाणबुड्या यांच्याबद्दल माहीती असलेली पुस्तके, विल्यम शिअरसारख्यांनी संपूर्ण नाझी राजवटीचा घेतलेला धांडोळा
त्याच सोबत येतात ती नाझींच्या अत्याचाराच्या कहाण्या उलगडून दाखवणारी अॅन फ्रँक डायरी, बॉय इन स्ट्राईप पजामा सारखी पुस्तके
त्यानंतर मग येतात ती फिक्शन विभागातील - अलिस्टर मॅकलीनने तर यात मास्टरीच मिळवली होती, त्याची गन्स ऑफ नॅव्हेरॉन आणि व्हेअर इगल डेअर यासारखी पुस्तके तुफान गाजली.
त्यामुळे इथे माझा प्रयत्न राहणार आहे की नुसती पुस्तकांची जंत्री देण्यापेक्षा चार ओळीत का होईना त्याची ओळख, काय आवडलं, काय नाही इ इ. असे द्याव.
१. To Hell and Back - Audie
१. To Hell and Back - Audie Murphy
ऑडी मर्फी हा अतिशय प्रसिद्ध अधिकारी आणि वर्ल्ड वॉर नंतर चक्क तो अभिनेता म्हणून फेमस झाला
त्याचं हे पुस्तक इतकं अफलातून आहे की या आधीच का नाही वाचलं असं झालं.
इटली मधून दक्षिण आघाडीवर लढणाऱ्या मर्फी ने इतका अशक्य पराक्रम गाजवला आहे की एकेकाळी तो highest decorated officer होता
लहानपणीच आई वडील गमवल्यामुळे अनाथ झालेल्या मर्फी ला १८ पेक्षा कमी वयामुळे सैन्यात दाखला मिळत नव्हता त्यामुळे बहिणीच्या सांगण्यावरून त्याने वयात फेरफर करून लष्करात प्रवेश मिळवला आणि झपाट्याने प्रमोशन मिळवत गेला.
आणि वयाच्या १९ व्या वर्षी एका स्वाड्रनचे नेतृत्व करू लागला. त्यानंतर अनेक लढाया त्याने लढल्या पण ज्या एका लढाईमुळ त्याचे नाव रातोरात प्रसिद्ध झाले ती इटलीत झाली. मोठ्या संख्येने आलेल्या जर्मन लोंढ्याला रोखताना मर्फीच्या तुकडीतले बहुतांश सैनिक मारले गेले, उरलेल्या ९ लोकांना माघार घेण्याची आज्ञा देत मर्फी ने एका जळत्या टॅंक वर उभे राहून एकट्याने प्रतिकार सुरु केला. कोणत्याही क्षणी मरण येईल अशा परिस्थीतीतही त्याने आपली जागा सोडली नाही. सोबत तोफखान्याशी सातत्याने रेडिओ संपर्क करत आपल्या अक्षरशः आजूबाजूला बॉम्ब पडत राहतील आशा सूचना देत त्याने पुढे येत असलेल्या शेकडो जर्मन्सना रोखून धरले. जर्मन्सना हे पटतच नव्हते की एकटा सैनिक आपल्या कित्येक तुकड्यांची आगेकूच रोखून धरू शकतोय.
अतिशय विलक्षण आणि जबरदस्त शौर्य पण पुस्तकात मर्फी इतक्या सहजपणे ही घटना सांगून मोकळा होतोकी त्यात त्याला काही विशेष वाटलंच नसावं. याच पराक्रमाबद्दलच त्याला नंतर मेडल ऑफ ऑनर मिळाले.
पुस्तक तर वाचनीय आहेच. त्यात नुसतं आम्ही इकडून गेलो तिकडे हल्ला केला असे न लिहीता बहुतेक ठिकाणी सैनिकांचे संवाद आणि त्यातून परिस्थितीचे चित्र जसे उभे राहील तसेच्या तसे दिले आहेत
ते इतके भन्नाट आहेत की हे वाचत नसून त्यावेळी आपण तिथे बसलोय आणि त्यांना बडबड करताना ऐकतोय असे वाटते. हे संवाद इतके तपशीलवार आहेत की एकाच वेळी ते वाचताना हसूही येतं आणि वाईट ही वाटतं की कसल्या बिकट परिस्थितीतही हे लोकं विनोदबुद्धी टिकवून ठेवत होते किंवा असे म्हणता येईल की की विनोदबुद्धी होती म्हणून टिकून राहिले.
गंमत म्हणजे या पुस्तकावरच याच नावाने एक सिनेमाही आला आणि त्यात मर्फीचे काम खुद्द मर्फीनेच केलं आहे.आपल्यावरच आधारीत सिनेमात काम करण्याची ही अपवादात्मकच घटना असू शकेल.
२. Code Talker: The First and
२. Code Talker: The First and Only Memoir By One of the Original Navajo Code Talkers of WWII
कसलं जबरदस्त पुस्तक आहे. कोणत्याही युद्धात संपर्क व्यवस्था अभेद्य असण्याला प्रचंड महत्व आहे आणि आपले संदेश शत्रूने अनकोड करून महत्वाची माहिती मिळवू नये यासाठी खुप रिसर्च करण्यात येतो. अक्षरशः युद्ध हरणे जिंकणे यावर अवलंबून असते असं म्हणलं तरी अतिशयोक्ती वाटणार नाही
तर याच प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकेतील मूळ स्थानिक म्हणजे नावाहो (नावाजो??) जमातीच्या लोकांची मदत घेतली जाते. नावाहो भाषेला लिपी च नाही, ती फक्त तोंडी बोलली जाते आणि बऱ्यापैकी क्लिष्ट आहे आणि त्यामुळे इंग्रजी बोलता येणाऱ्या 30 नावाहो स्थानिकांना कोड तयार करण्याची कामगिरी दिली जाते ते हे कोड टॉकर्स
आणि या कोड टॉकर्स पैकी एक होता चेस्टर निझ, हे त्याचे खरे नाव नव्हे, खरे नाव लिहितच नव्हते त्यामुळे प्रत्येकाला ही अशी नवी नावे देण्यात आली. हे पुस्तक निझ चे आत्मचरित्र आहे आणि अंगावर सर्रकन काटा येतो हे वाचताना, म्हणजे हे स्थानिक आणि त्यांनी सोसलेले छळ अपमान आणि तेही आपल्याच सरकार कडून.
नावाहो लोकं मूळची मेंढपाळ पण यांच्या मेंढ्या खूप जागा व्यापत असल्याने लाईव्हस्टोक मास्कार (livestock massacare) चे आदेश दिले जातात आणि डोळ्यासमोर त्यांच्या शेळ्या मेंढ्या जाळून मारल्या जातात, या मेंढ्या, त्यांची पिल्ले, त्यांना लाडाने ठेवलेली नावे याचे अतिशय हृदय वर्णन आधीच्या पानात येऊन जाते आणि तो प्रसंग वाचताना विलक्षण कालवाकालव होते
तोच प्रकार शाळेत, अगदी मला इथल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची काय अवस्था झाली असेल हेच मनात येत होतं
मेंढपाळ म्हणून मोकळ्या रानावनात वाढलेला निझ शाळेच्या शिस्तीत कसा बुजून जातो, शाळेचा युनिफॉर्म कसा विचित्र वाटतो, खोल्या आणि टीचभर पाणी अंघोळीला हे सगळं वर्णन इथला मेंढपाळचा मुलगा शाळेत गेल्यानंतर वर्णन करेल तसेच आहे
इंग्रजी चा गंधही नसलेली ही ८ आणि १० वर्षांची मुले कडक मेट्रेन च्या हवाली केली जातात आणि आपल्याला काय सांगितले जात आहे हेही न कळल्याने बेदम मार खात राहतात, त्यांची नावाहो नावे अवघड असल्याने नवीन नावे दिली जातात तीच मुळात त्यांना कळत नसत, त्यात पुन्हा शाळेचे आदेश की यांची नावाहो पाळेमुळे निपटून टाका त्यामुळे नावाहो भाषेत बोलल्यावर त्यांना कपड्याच्या साबणाने दात घासायची शिक्षा दिली जाते जेणेकरून आतल्या बाजूला फोड येऊन ती आठवण राहावी
याही परिस्थितीत निझ शिकत राहतो, मरीन मध्ये नाव नोंदवतो आणि पॅसिफिक मध्ये जवळपास सगळ्या युद्धत सहभागी होतो, ग्वादलकानाल, बोगनव्हील, पेलेलीयु, ग्वाम. या कोड टॉकर्स चा इतका प्रचंड फायदा होतो की पूर्वी जो कोड पाठवायला ३० मिनिटे लागत असत (कोड डिकोड आणि बॅक) ते नावाहो भाषेमुळे केवळ चाळीस सेकंड ते २ मिनिटं इतक्या कमी वेळेत शक्य होऊ लागले
जपान्यांनी प्रचंड प्रयत्न करूनही त्यांना हा कोड शेवटपर्यंत ब्रेक करता आला नाही, इतकच काय सुरुवातीला या प्रोजेक्ट बद्दल कमालीची गुप्तता बाळगल्या मुळे जेव्हा नावाहो टॉकर्स ने कोड पाठवायला सुरुवात केली तेव्हा जपान्यांनी आपल्या वेव्हलथ वर घुसखोरी केलीये असं वाटल्याने सगळी सिग्नल यंत्रणाच जॅम केली गेली. तर एकदा जपानी समजून नावाहो लोकांना अमेरिकन सैन्याच्या काही हौशी सैनिकांनी जवळपास मारण्याचाही प्रयत्न होतो
गुप्तता इतकी होती की याना युद्धानंतरही कित्येक वर्षे याबद्दल बोलण्यास सक्त मनाई होती, अखेरीस कित्येक वर्षांनी त्यावरची बंधने मोकळी करण्यात आली, त्यामुळे त्यांच्यासोबत च्या कित्येक मरिन्स ना हे किती महत्वाचे काम करत होते याची जाणीव च नव्हती. त्यामुळेच मी इतकय पुस्तकात एकदाही यांच्याबद्दल वाचले नाही. पण निझ्झ ने युजीन स्लेज चा आवर्जून उल्लेख केलाय
युद्धात इतका पराक्रम करूनही याना ना सैन्यात बढती ना कसली पदे.
इतकंच काय युद्ध संपल्यावर त्यांना नागरिक म्हणूनही मान्यता नव्हती आणि मतदानाचा अधिकार नव्हता आणि बार मध्ये दारू सर्व्ह केली जात नसे (निझ मरीन च्या गणवेशात गेला तर दारू दिली जात असे पण साध्या कपड्यात गेला तर बाहेरूनच हाकलून दिले जात असे)
यावरही आधारीत एक सिनेमा आहे, पण तो पुस्तकाच्या जवळपास पण जात नाही
छान धागा. डिटेल्स नंतर लिहिन
छान धागा. डिटेल्स नंतर लिहिन पण महायुद्धावरचं पुस्तकं म्हंटल्यावर आठवणारं पहिलं पुस्तक (आणि तसही एकूण घटना माहित करून घेण्यासाठी उपयुक्त असं पुस्तक) म्हणजे 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'. त्या शिवाय वॉर्सा ते हिरोशिमा, चर्चिल, हिटलर ह्यांची आत्मचरित्रे आणि एक आफ्रिका मोहिमेवरच्या ब्रिटिश सैनिकाने लिहिलेलं पुस्तक (नाव विसरलो) ही वाचली आहेत.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/With_the_Old_Breed
युजिन स्लेज ह्या सैनिकाचे अनुभव ह्या पुस्तकात आहेत. वर त्याचा उल्लेख आलेला आहेच.
हा अलाबामात रहाणारा मुलगा. पर्ल हार्बरवरील झालेल्या हल्ल्यामुळे ह्याने सैन्यात भरती व्हायचे ठरवले. अमेरिकेबाहेर कधी पाऊलही न ठेवणार्या ह्या तरूण मुलाला पॅसिफिक आघाडीत सामील करण्यात आले. जपानच्या ताब्यात असलेल्या अगम्य नावांच्या बेटांवर अनेक मोहिमांत ह्याने भाग घेतला. हा आर्टिलरी सैनिक (तोफ चालवणारा) होता. अनेक वेळा प्रसंग येऊनही केवळ नशिबाने जिवंत राहिला. उलट त्याच्या दोन पावले पुढे चालणारे सहकारी जागीच ठार झाल्याचे त्याने पाहिले. युद्ध संपल्यावर येणारा ट्रॉमा (जो त्या काळात नीटसा समजलाही नव्हता) ह्याचेही चांगले वर्णन आहे. सुदैवाने काहीशा सुखवस्तू कुटुंबातून असल्यामुळे त्याला पुन्हा शिक्षण घेऊन नवे करियर करता आले. पण अनेक सहकारी तसे करू शकले नाहीत. युद्धातील अनुभव शांततेच्या काळात बहुतांशी निरुपयोगी असल्याने अनेक जण निराश, उध्वस्त होऊन घरी आले.
एका सामान्य सैनिकाचा युध्दातील प्रत्यक्ष अनुभव फारच प्रभावी पद्धतीने लिहिला आहे. हा एक अमेरिकन देशभक्त होता. जिवावर उदार होऊन शत्रूला मारणे ह्या कामात कुठलीही कुचराई केली नाही. परंतु जेव्हा जपानी सैनिकांचे मृतदेह सापडतात आणि त्यांच्या खिशात जपून ठेवलेले कुटुंबियांचे फोटो, लहान मुलाची आठवण म्हणून एखादी वस्तू सापडते तेव्हा ह्याला वाईट वाटते. जेव्हा जपानी सैनिकांनी अमेरिकन सैनिकांचे अमानुष हाल करून त्यांचे मृतदेह फेकलेले दिसतात तेव्हाचा संताप. सहकारी लोक जपानी सैनिकांच्या दातातले सोने वगैरे काढू पहातात तेव्हा वाटणारी शिसारी इ. वाचनीय आहे. ह्यावर एक टीवी मालिकाही आहे. पण पुस्तक जास्त चांगले आहे. एकंदरीत युद्ध हे प्रकरण किती भीषण असते आणि त्यात सहभागी होणारे सैनिक काय भयानक भावनिक उलथापालथी अनुभवतात ते कळते. सामान्यतः सैनिक, लढाई वगैरे रोमँटिक पद्धतीने दाखवली जाते पण ते पूर्ण सत्य नाही.
ड्युटीवर असताना खिशातील बायबलच्या कोर्या पानावर जमतील तशा आठवणी लिहून नंतर त्याचे संकलन करुन पुस्तक बनवले आहे.
शेंडेनक्षत्र - मी युजीनच्या
शेंडेनक्षत्र - मी युजीनच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करत आहे, जवळपास 60 टक्के झालं आहे, संबंधित संस्थेला परवानगी देखील विचारली होती पण त्यांच्याकडून अद्याप काही उत्तर आले नाही.
या पुस्तकाच्या निमित्ताने खरं तर युद्धविषयक पुस्तके वाचायला सुरुवात झाली. सैनिकांच्या अनुभवावर आधारित पुस्तकांमध्ये याचा नंबर सर्वात वरती असेल इतकं प्रभावी आहे
अतिशय प्रांजळ आणि प्रामाणिक अनुभवकथन
आणि तो आर्टिलरी मध्ये नव्हता, मोर्तर विभागात होता म्हणजे जरी ते तोफखाना म्हणलं जात असेल तरी तो आघाडीच्या सैनिकांसोबत होता कायम
तो आणि त्याचा पार्टनर स्नाफु, पेलेलीयु आणि नंतर ओकिनावा मधल्या युद्धात कशी मानसिकता बदलत जाते हे विलक्षण आहे
त्याच्या पुस्तकावर आधारित अनेक प्रसंग एचबीओ च्या द पॅसिफिक सिरीज मध्ये घेतले आहेत
'नाझी भस्मासुराचा उदयास्त हे
'नाझी भस्मासुराचा उदयास्त हे तर विल्यम शिअर च्या द राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश् चे स्वैर भाषांतर आहे, मूळ पुस्तक तर 1200 पानांचा ठोकळा आहे, ते वाचून दम लागतो.
असेही कानिटकर यांनी पुस्तकात हिटलर ची बरीच भलामण केली आहे आणि एकेकाळी ते वाचून भारावून जाणाऱ्या पिढीतील मी एक आहे
नंतर जसे जसे वाचत गेलो त्यानंतर कानिटकर यांनी रंगवलेला हिटलर फारच सोज्वळ वाटू लागतो
छान धागा. प्रतिसाद वाचायला
छान धागा. प्रतिसाद वाचायला आवडतील. पूर्वी ही पुस्तकं आवडायची, पण नंतर आवड कमी झाली.
एक छोटीशी दुरुस्ती - शीर्षकात कथा रम्या किंवा कथा: रम्या: पाहिजे. इथे विशेषण (रम्य) हे विशेष्याप्रमाणे (कथा - स्त्रीलिंगी) बदलायला हवं. त्याचं लिंग आणि वचन दोन्ही.
संधीच्या नियमानुसार काही
संधीच्या नियमानुसार काही ठिकाणी विसर्गाचा लोप होऊ शकतो असे वाटते. मूळ श्लोक असा आहे
दूरस्था: पर्वता: रम्या: वेश्या च मुखमंडने
युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दुरतः
युजिन स्लेजच्या बाबतीत मॉर्टर आणि आर्टिलरीत घोटाळा झाला. पण होय युजिन स्लेज ह्याचे काम म्हणजे शत्रू दिसला की योग्य ते मोजमापे, अंदाज घेऊन खांद्यावरील बाळगायची तोफ जमिनीवर उभी करुन ती डागून जितके मारता येतील तितके सैनिक मारायचे.
एकंदरीत वर्णनावरून किचकट आणि धोक्याचे काम असावे.
युद्धस्य तु कथा रम्या >> इथे
युद्धस्य तु कथा रम्या >> इथे विसर्गाचा लोप नाही. थोडं किचकट आहे, पण अवांतराचा धोका पत्करून विस्कटून सांगतो. विसर्गाच्या आधी आ आला असेल आणि नंतर व्यंजन तक्त्यातलं तिसर्या/चौथ्या/पाचव्या कॉलममधलं व्यंजन किंवा य, र्, ल्, व्, ह पैकी काही असेल तर विसर्गाचा लोप होतो हे खरे आहे. त्यामुळे कथा: रम्या: >> कथा रम्या: असं होईल हे बरोबर आहे. पण रम्या: त्रीणि >> इथे लोप होणार नाही. उलट तिथे स् होईल, म्हणजे रम्यास्त्रीणि असं. आता त्यात ही संधी झालेली नाही, म्हणजे रम्या हे एकवचनी विशेषण वापरलं आहे हे उघड आहे. आणि विशेषण एकवचनी असेल तर विशेष्यदेखिल एकवचनीच असलं पाहिजे, त्यामुळे कथा: नसून कथा हेच बरोबर आहे. त्यात कुठलाही विसर्गलोप नाही.
बाय द वे, त्या सुभाषितावरूनच मराठीत 'दुरून डोंगर साजरे' म्हण आली आहे की काय! याची पुढील चर्चा इथे हलवतो आहे.
१.नागासाकी- Craig collie,
१.नागासाकी- Craig collie, अनुवाद- डॉ.जयश्री गोडबोले.
हिरोशिमा,नागासाकी वर झालेले अणुबॉम्ब हल्ले, जापानी नागरिकांची झालेली होरपळ,कल्पना करता येणार नाही असा झालेला विध्वंस, त्यातूनही बाहेर पडण्याची जिद्द.मैनेजमेंटचे निर्णय, रशियाचा attack...बॉम्बस्फोटातून वाचलेल्यांचं पुढे काय झाले?अमेरिकन टिम,त्यांचं प्लानिंग, अणुबॉम्ब टाकण्यापर्यंचा त्यांचा प्रवास.. दोन्ही बाजू पुस्तकात मांडल्या आहेत..
२.अडॉल्फ हिटलर- अतुल कहाते
केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अतिशय क्रूरपणेपण वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळते.
3.द गन्स ऑफ नेवरॉन- अलीस्टिअर मैक्लीन
नेवरॉनच्या बेटावर १२०० ब्रिटीश सैनिकांना वाचवण्याच्या आणि जर्मन तोफा डिस्ट्रॉय करण्याच्या मिशनवर गेलेल्या, वादळी पावसात, भुकेने व्याकूळ, कडा चढून जाणाऱ्या, ब्रिटिश योद्ध्यांची कहाणी.थरारक, सस्पेन्स, ऐक्शन.
४.एच एम एस युलीसीस-अलीस्टैर मैक्लीन
कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. रशियाचे जर्मनीशी युद्ध सुरू असते, आणि एफआर ७७ या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्यामार्फत रशियाला जर्मनीशी लढण्यासाठी अत्यंत निकड असलेले युद्धसाहित्य पोचवण्याची योजना असते. एचएमएस युलिसिस ही ब्रिटिश आरमारातील एक क्रूझर जातीची युद्धनौका या ताफ्याची फ्लॅगशिप असते. तिच्या साथीला आणखी छत्तीRस जहाजे या ताफ्यात असतात. भयंकर थंडी, बर्फवृष्टी, प्रचंड वादळे, चिडलेले व निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव, आणि ताफ्याने रशियापर्यंत पोचता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी जर्मन बॉम्बर विमाने, युद्धनौका आणि यू-बोटी, अशा पार्श्वभूमीवरील या ताफ्याच्या– आणि पर्यायाने युलिसिसच्या– प्रवासाची ही कहाणी आहे.
नाझी भस्मासूराचा उदयास्त..सध्या वाचतेय..अर्ध झालंय...
लेखकाने हिटलरला एकदम दुरदृष्टी असलेला सच्चा देशभक्त वगैरे रंगवलंय.. खरंय...
केला बदल, धन्यवाद हपा, मला
केला बदल, धन्यवाद हपा, मला वाटलेलं काहीतरी चुकलंय यात पण काय ते कळत नव्हतं
अर्थाच्या शोधात- लेखक डॉ.
अर्थाच्या शोधात- लेखक डॉ. व्हिक्टर Frankel.अनुवाद डॉ.विजया बापट.डॉ. व्हिक्टर Frankel प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट व सायकिएट्रिस्ट होते. दुसऱ्या महायुद्धात वेळी तीन वर्षे छळछावणीत असताना आलेले त्यांचे व इतरांचे अनुभव.. पत्नी, आईवडील, भाऊ छळछावणीत गमावले,सुटका झाल्यावर इतरांना त्यांच्या आयुष्यातील अर्थ शोधण्यास मदत करण्यात उर्वरित आयुष्य व्यतीत केले.सकारात्मक पुस्तक..
अँन फ्रँक- द डायरी ऑफ अ यंग गर्ल
Ann ला तेराव्या वाढदिवसाला एक डायरी गिफ्ट मिळाली.. नाझींपासून दोन वर्षे लपून राहत असता, या मुलीने लिहिलेली हि डायरी.. सुन्न करणारे पुस्तक.
व्हिक्टर फ्रँकल यांचे मूळ
व्हिक्टर फ्रँकल यांचे मूळ पुस्तक वाचलेले आहे.
३. Blood Red Snow: The
३. Blood Red Snow: The Memoirs of a German Soldier on the Eastern Front
Book by Günter K. Koschorrek
विलक्षण पुस्तक आहे
आतापर्यंत आघाडीवर लढलेल्या सर्वसामान्य सैनिकांची कहाणी वाचल्यात, त्यात बहुतांशी अमेरिकन मरिन्स च होते
यावेळी पहिल्यांदाच जर्मन बाजूने दुसरे महायुद्ध वाचले, या आधीचे जर्मन पुस्तक वाचले होते ते all quiet on western front ज्यावर नाझी लोकांनी बंदी घातली होती
लढाईची भयानक वास्तवता, साथीदारांच्या डोळ्यासमोर मरणाने आलेली चीड, उद्विग्नता, मरणाची भीती, जीवघेण्या जखमा आणि मायदेशात आरामात बसलेल्या अधिकारी लोकांची बेपर्वा वृत्ती सगळीकडेच आहे मग तो अमेरिकन मरीन असो वा जर्मन
पण इथं दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत, एक म्हणजे प्रोपौगंडा ने भारून गेलेले हे कोवळे जर्मन युवक जेव्हा आघाडीवर जातात तेव्हा त्यांना काय कमालीचा मानसिक धक्का बसतो हे निव्वळ त्यांच्याच शब्दात वाचण्यासारखा आहे. जर्मन्स रशियाला कसे भारी पडत आहेत आणि काही महिन्यातच रशिया गुढगे टेकून शरण येईल अशा भ्रमात असलेले हे सैनिक जेव्हा stalingrad ला पोचतात तेव्हा वस्तुस्थिती कमालीची वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात येते. जर्मन्स जिंकणे तर सोडाच पण रशियन सैन्याच्या तावडीतून कसेबसे जिवंत बाहेर यायला केविलवाणी धडपड करत असल्याचे बघून काय वाटलं असेल याची कल्पनाच करू शकतो
आणि इथून प्रवास सूरु होतो तो माघारीचा. रशियन टॅंक च्या रेट्यासमोर अक्षरशः बंदुकाही फेकून देऊन जर्मन जीव वाचवण्यासाठी पळत सुटतात आणि टिपून टिपून त्यांना रशियन मारत राहतात. या पहिल्याच भयंकर अनुभवातून हा वाचतो, पुढं जर्मनीला मग इटली ला जाऊन तिथे लढतो आणि परत त्याची रवानगी रशियन आघाडीवर होते पण चित्र अजूनच भीषण असते
पुन्हा एकदा लांच्छनास्पद माघार, वर जीवघेणा हिवाळा, आणि हे अर्धपोटी, डोळे खोल गेलेले, निःशस्त्र जर्मन सैनिक कसेतरी करून माघारी जीव वाचवण्यासाठी चालत निघतात. कपडे फाटलेले, बुटांची लक्तरे, जिद्द हरपलेली अशा या जर्मन्स च्या शेजारून रशियन सैन्याचे लोंढे रोरावत जातात आणि त्यांना कैद किंवा मारायलाही वेळ घालवत नाहीत त्यावेळचे वर्णन आणि आपल्या पिछाडीवर अन्नधान्याचे साठे असूनही आपल्याला कधी मिळाले नाहीत या संतापाने तिथल्याच जर्मन अधिकाऱ्यांना गोळी मारून साठे लुटतात हे सगळंच फार प्रत्ययकारी आहे.
मरिन्स आणि याच्यातला दुसरा फरक म्हणजे युद्धाच्या जीवघेण्या अनुभवानंतर मरिन्स हे विजयी ठरले, तो एक मोठा दिलासा तरी होता, पण तितक्याच दिव्यातून जाऊन ही यांच्या वाट्याला येते लाजिरवाणी शरणागती
रशियन सैन्य त्यांच्याच नागरिकांवर प्रचंड अत्याचार करून कत्तल उडवतात आणि हे जर्मन्स नी केलं असे पसरवतात. आणि एकूणच जर्मन सैनिकांना रशियन क्रूरपणाची इतकी धास्ती बसलेली असते की काहीही करून अमेरिकन सैन्याने आपल्याला कैद करावं यासाठी त्यांची धडपड सुरू होते
लेखक तर जखमी होऊन माघारी आलेला असतो आणि रशियन जवळ आलेत म्हणून तो चक्क जखमेत गांजलेले खिळे खुपसून सेप्टिक करवतो की जेणेकरून त्याला अमेरिकन रुग्णालयात भरती करतील. हे वाचतानाच काटा येतो. अन्न आणि सिगरेटच्या बदल्यात जर्मन्स आपली मेडल्स, आयर्न क्रॉस अमेरिकन सैनिकांना विकतात हे, नंतरही युद्धकैदी छावणीत अमेरिकन सैनिकांनी ओढून फेकून दिलेली सिगरेटीची थोटके मिळवण्यासाठी जर्मन सैनिक आणि अधिकाऱ्यांची उडालेली झुंबड, आणि झेक सैनिक लेखकावर बंदूक रोखून त्याचे चांगले शूज हडपतो आणि त्याचे फाटके बूट त्याच्याकडे टाकतो आणि पराभूत मानसिकतेत तो तसले फाटके बूट घालून चालू पडतो हेही.
तरी दोन तीन खटकलेल्या गोष्टी म्हणजे यात एकदाही होलोकोस्ट चा उल्लेख येत नाही, आणि नाझी पक्षाबद्दलही फारसे नाही, थोडीफार टीका केली आहे, अगदी हिटलर वर देखील पण खूपच त्रोटक, कदाचित काही मजकूर सेन्सॉर झालेला असू शकतो
पण हिटलर ने आत्महत्या केल्यावर तो असा भेकड मार्ग पत्करून देशाला खाईत लोटेल असं वाटलं नव्हतं असे हा लिहितो आणि बहुदा बहुतांश जर्मन लोकांची त्यावेळी हीच मानसिकता असेल.
खूप काही आहे लिहिण्यासारखं. ज्यांना युद्धविषयक वाचायला आवड आहे त्यांनी तर आवर्जून वाचावे असे हे पुस्तक.
चांगले वाटते आहे पुस्तक.
चांगले वाटते आहे पुस्तक. मिळवून वाचले पाहिजे. आभार!
जे जर्मन सैनिक दुसर्या महायुद्धानंतर जिवंत राहिले त्यांना असेच वाटले असेल की मेलो असते तर बरे झाले असते.
अमेरिकन सैनिकांचे अनुभव इतके विदारक आहेत तर जर्मन सैनिकांचे त्याहून भयानक असतील असा अंदाज करता येतो.
४. Band of Brothers - Stephen
४. Band of Brothers - Stephen E. Ambrose
मी कायमच म्हणत आलोय की पुस्तकांवर आधारित सिनेमे, सिरीज कधीच पुस्तकांपेक्षा भारी किंवा तितकेच सरस ठरू शकत नाहीत. पण त्याला बँड ऑफ ब्रदर्स ही एचबीओची सिरीज सणसणीत अपवाद आहे
पुस्तकातल्या घटना त्यांनी इतक्या जिवंत केल्या आहेत ना की त्यापुढे पुस्तक अगदीच शाळेतील इतिहासाचे रुक्ष असल्यासारखं भासत होतं.
पुस्तकात निव्वळ एक वाक्यात आटोपलेल्या एक प्रसंगावर सिरीज मध्ये एक अतिशय इमोशनल सिन चित्रित आहे तो बघताना अक्षरशः पोटात तुटते. तोच प्रकार अमेरिकन सैनिक पहिल्यांदा कॉन्स्ट्रेशन कॅम्प बघतात तेव्हा त्यांना बसलेला मानसिक धक्का, कॅम्प मधल्या ज्यू ची अवस्था आणि या सगळ्या प्रकारची शिसारी हे सिरीज मध्ये इतक्या प्रभावीपणे चित्रित झालं आहे की त्याच्या जवळपास पण पुस्तकातला मजकूर जात नाही
अर्थात यात मे बी लेखकाला प्रसंग रंगवता आलेलं नाहीत हेही आहे. त्यांनी इझी कंपनीचा प्रवास हा डॉक्युमेंटरी सारखाच मांडला आहे. इथे लढले, इथून तेथे गेले, तिकडे लढले, हे हे जखमी झाले, हे हे मेले
अशा स्वरूपाचे. शेवटची कित्येक पाने इझी कंपनीचे लोक युद्धानंतर काय करत होते यावर आहे
मुख्य लोकं झाल्यानन्तर आपला इंरेस्ट संपतो आणि ती निव्वळ जंत्री राहते
तरीही पुस्तक मुळातून एकदा वाचावे असेच आहे
स्पेशली काही गोष्टी बेधडकपणे मांडल्या आहेत त्यासाठी
आघाडीवर लढणाऱ्या सैन्यासाठी येणारे रेशन, गरम कपडे आणि वस्तू वर यावर वाटेतच अमेरिकन मुलकी अधिकारी, सैन्यातील वरीष्ठ कसे डल्ला मारतात आणि शेवटी झिरपत अगदी तुटपुंजे कसे सैनिकांना मिळत असे हे किंवा फेव्हरेट लोकांना एकही गोळी न झाडताही मेडल मिळण्याच्या गोष्टी आणि घरी जाण्यासाठी मिळालेल्या तिकिटांचा लिलाव
हे सगळंच बिनधास्तपणे लिहिलं आहे
इझी कंपनी ही नॉर्मंडीच्या युद्धापासून ते हिटलरचे निवासस्थान काबीज करेपर्यंत अथक लढत होती. त्यांचा प्रमुख डिक विंटर्स याने टेक्स्टबुक स्टॅटजी अंमलात आणत मोजक्याच लोकांना घेऊन जर्मन्सच्या चार आर्टिलरी तोफांचा आणि सोबतच्या तुकडीचा कसा खातमा केला ते आजही युद्धशास्त्रातला एक आदर्श धडा मानला जातो. त्यानंतर क्रॉस रोड्स येथे माघार न घेता आक्रमण केल्याने जेमतेम २०-२५ जण बेसावध शेकडो जर्मन्सना कसे टिपून मारतात हेही.
हे पुस्तक वाचता वाचताच सिरिज बघता आली तर अगदी ते समोर अनुभवतो आहोत असा प्रत्यय येईल.
जे जर्मन सैनिक दुसर्या
जे जर्मन सैनिक दुसर्या महायुद्धानंतर जिवंत राहिले त्यांना असेच वाटले असेल की मेलो असते तर बरे झाले असते.
हिटलरची हिच इच्छा होती, शरण न येता जर्मन सैनिकांनी शेवटपर्यंत लढत रहावे, याच वेडाचाराच्या भरात त्याने लाखो सैनिकांचा बळी दिला. सैनिकांच्या पोटात अन्न नाही, बंदुकीत गोळ्या नाहीत, टँकमध्ये इंधन नाही, विमानांना धावपट्ट्या नाहीत, या कशाहीकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि मरेपर्यंत तो स्वतच्याच धुंदीत होता.
तो आणि त्याच्या नादाने बहकलेले नाझी, माघार घेतली म्हणून शेकडो शूर जर्मन्सना फासावर चढवण्यात मग्न होते.
बॅण्ड ऑफ ब्रदर्स सिरीज बघायला
बॅण्ड ऑफ ब्रदर्स सिरीज बघायला सुरूवात करून दुसरे काहीतरी इंटरेस्टिंग दिसल्यावर सोडून दिली होती. या लेखामुळे पुन्हा नीट बघायला सुरूवात केली. एकदम ग्रिपिंग आहे! मागच्या १५-२० वर्षांत विविध सिरीज मधे दिसलेले अनेक लोक यात दिसले.
ती तर माझी ऑल टाईम फेवरेट
ती तर माझी ऑल टाईम फेवरेट सिरिज आहे. एखाद्या बिगबजेट सिनेमाला मागे टाकेल अशी सिनेफोटोग्राफी, डायरेक्शन, कलाकार, असंख्य लष्करी तज्ञांना मदतीला घेऊन आणलेली कमालीची अचूकता हे सगळंच लाजवाब आहे.
स्पेशली कॅरेटिंन ची लढाई, ते गोळ्यांचे सू सू करत जाणारे आवाज, तोफा, मॉर्टर, जखमी सैनिक सगळंच इतकं प्रचंड जिवंत घेतल आहे की जणू आपण तिथे आहोत असा फिल येतो.
मागच्या १५-२० वर्षांत विविध सिरीज मधे दिसलेले अनेक लोक यात दिसले
बाकीचे फारसे कलाकार मला माहीती नाहीत, फक्त फ्रेंड्समधला रॉस ओळखता आला. त्याला बिचाऱ्याला खडूस निगेटिव्ह रोल मिळालाय इथ.
पण शोभलाय त्याला
५. X Troop: The Secret Jewish
५. X Troop: The Secret Jewish Commandos of World War II - Leah Garrett
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जे ६० लाख ज्यूंचे हत्याकांड झाले त्याबद्दल वाचताना मला कायम हा प्रश्न पडत असे की कुणीच कसा या ज्यूंपैकी विरोध केला नाही. त्या प्रश्नाचे उत्तर मला या पुस्तकातून मिळाले. जबरदस्त पुस्तक. हिटलर सत्तेवर येताच जर्मनीतील ज्यूंची गळचेपी सुरु होते. कित्येक कट्टर जर्मन हे पहिल्या महायुद्धात कैसरकडून लढलेले, शौर्य पदक मिळवलेले आणि नंतरही जवानांच्या भल्यासाठी काम करत असलेले निव्वळ ज्यू असल्याने वाळीत टाकले जातात, समाजाकडून अवहेलनेचे शिकार बनतात.
नंतर तर जीव वाचवण्यासाठी अक्षरश नेसत्या कपड्यानीशी घरदार सोडून पळून जातात. याच कित्येक कट्टर जर्मन, ऑस्ट्रीयन, झेक ज्यूंनी आपल्यापेक्षा मुलांचा जीव वाचला पाहिजे म्हणून मिळेल त्या मार्गाने त्यांना ब्रिटनला पाठवले. निदान ते तिथे सुरक्षीत राहतील या भावनेतून. अर्थात तिथेही त्यांचे जगणे सुखकर होतच नाही. हे लोक जर्मन असल्याने त्यांना शत्रुराष्ट्रातील म्हणून चक्क छावणीत डांबले जाते. मरणाच्या थंडीत, हालअपेष्टा सोसत, उपासमार सहन करत हे जर्मन ज्यू कसेतरी गुजराण करत राहतात. पण सो कॉल्ड न्यायी ब्रिटीश त्यांना फुकट का सोसावे म्हणून बोटीत शेकडो ज्यूंना ऑस्ट्रेलियाला पाठवते. जिथे ५०० लोक जाऊ शकतील तिकडे त्याच्या चौपट ज्यू भरुन पाठवलयाने बोटीवरच कित्येक जण गुदमरून मरतात. त्यात ब्रिटीश अधिकारीही त्यांच्यावर जुलुम करणे, मारहाण करणे, उपाशी ठेवणे असे जर्मन्सना साजेसे अत्याचार करतात. (याची वर्णने वाचल्यावर तर धक्काच बसला) ऑस्ट्रेलियातही केवळ त्यांना मरायलाच पाठवलेले असते कारण तिथला उन्हाळा, रोगराई, माशा यात ते जगतील अशी अशाच नसते.
पण अशा वेळी एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या डोक्यात एक सुपीक कल्पना येते. या सर्व ज्यूंचे नातेवाईक नाझींनी छळछावणीत नेऊन मारले आहेत, हिटलरबद्दल त्यांच्या मनात प्रचंड संताप आहे याचाच उपयोग आपल्याला करून घेता येईल. या लोकांना जर्मन, झेक, ऑस्ट्रियन भाषा जन्मजातच येत असल्याने यांना जर कमांडो ट्रेेनिग दिले तर ते जर्मनव्याप्त प्रदेशात घातपात, कारवाया, छुपे हल्ले करून दोस्त राष्ट्रांना मदत करतील. पण ब्रिटीशांच्या संशयी मनाला ते पटकन पटतच नाही. यांना शस्त्रांचे ट्रेनिंग दिले, खरी शस्त्रे दिली आणि ते आपल्यावरच उलटले तर म्हणून या योजनेला लवकर मंजुरीच मिळत नाही
.
अखेरीस मंजुरी मिळाल्यावर एका खेडेगावात या ८० लोकांना (सुरुवातीला.नंतर मग संख्या वाढत जाते) कठोर ट्रेनिंग दिले जाते, रेडीयो पासून स्फोटके हाताळण्यापर्यंत. आणि मग नंतर यांना डि-डे (नॉर्मंडीवरील हल्ला) नंतर सुरुवातीला फ्रान्स, इटली, हॉलंड आणि नंतर जर्मनी अशा कित्येक आघाड्यांवर आणि शत्रुच्या पिछाडीवर पाठवले जाते. ज्या हिटलरने आपल्या सुखी परीवाराची वाताहात केली त्याचा संताप आणि लवकर युद्ध संपले तर छळछावणीत कदाचित आपले आईवडील जिवंत मिळू शकतील ही आशा याच्या जोरावर हे कमांडो अक्षरश भूतो न भविष्यती असा पराक्रम गाजवतात. त्यांच्या या युनीटचे नाव असते एक्स ट्रूप्स त्याच नावाने हे पुस्तक आहे. या कमांडोची खरी ओळख गुप्त रहावी यासाठी हे गुप्त नाव. इतकेच काय, त्यांची मूळ जर्मन नावे आणि ओळख (पत्रे, फोटो वगैरे) सगळी नष्ट करण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यांना नवी ब्रिटीश नावे आणि ओळख दिली जाते.
नंतर मग रोमेलच्या मुख्यालयाचा पत्ता काढण्यापासून ते लँडमाईन्स कुठं पेरले आहेत याची अत्यंत महत्वपूर्ण माहीती मिळवण्यासोबतच जर्मन सैनिकांना प्राणहानी न करता त्यांच्या भाषेत त्यांना शरण येण्याचे आवाहन करत हजारो लोकांचे जीव वाचवणाऱ्या या जर्मन कमांडोना अनेक बढत्या, मेडल्स मिळतात. युद्ध संपल्यावरही लपून बसलेल्या नाझींना हुडकून न्यूरेबर्ग खटल्यासाठी महत्वाची माहीती, डॉक्युमेंट्स गोळा करण्याचे काम त्यांच्याकडे येते.
एका कमांडोला आपले आईवडील कुठल्या छळछावणीत पाठवले गेलेत त्याचा पत्ता लागतो आणि तो नेदरलँडमधून जीपने अख्खी जर्मनी, अख्खा झेक पार करून (युद्ध संपले तरी काही ठिकाणी कडवे जर्मन्स लढतच होते), रशियन आघाडी ओलांडत कसा तो पोचतो याचे वर्णन अफलातून आहे. सुदैवाने त्याचे आई वडील जिवंत असतात आणि एकेकाळचा लाजरा बुजरा आपला मुलगा आता ब्रिटीश कमांडो बनून आपल्याला भेटायला आलाय हे पाहिल्यावर आई वडीलांना काय वाटलं असेल याची निव्वळ कल्पनाच करू शकतो.
अर्थात स्वार्थी आणि संधीसाधू ब्रिटीश त्यांच्या वृत्तीप्रमाणे वागतातच. युद्ध संपताच यांची जबाबदारी झटकून ते मोकळे होतात. म्हणजे जर्मन ओळख नष्ट करुन यांच्या सांगण्याप्रमाणे ब्रिटीश बनलेले, मेडल मिळवलेले हे कमांडो युदध संपताच न घर के ना घाट के होतात, ना त्यांना कसली मदत, ना मृत सैनिकांच्या विधवा बायकांना आर्थिक सहाय्य, पूर्णपणे त्यांना वापरून फेकून देण्यात येते. अखेरीस ज्या ब्रिटीश अधिकाऱ्याने यांना ट्रेनिंग दिले त्याला पुढची काही वर्षे कायदेशीर लढाई लढणे भाग पडते, पार्लमेंटमध्ये आवाज उठवावा लागतो तेव्हा कुठे दयाळू ब्रिटिश सरकार त्यांना कुरकुर करत स्वीकारते.
एकूणच जबरा पुस्तक आहे. पण अर्थात या विषयाबद्दल आत्मियता असेल तरच वाचावे कारण लेखकाने या सगळ्या घटना अनुभव एक सलग मांडलेत, सोबत फोटोही आहेत पण त्यात रंजक असे काही नाही. जस्ट फॅक्ट्स, जे जसे घडले ते. त्यामुळे काही वेळा नेट लावून वाचावं लागतं. तरीही खिळवून ठेवणारे पुस्तक आहे इतके नक्की. हिटलरला गाडण्यात जर्मन ज्यू कसे कमालीचे महत्वपूर्ण ठरतात हा काव्यात्मक न्याय जाणून घेण्यासाठी एकदा तरी वाचायलाच हवे.
आणि हे वाचून इंग्लोरियस बास्टर्डस सिनेमाची आठवण होणे अपरिहार्य आहे, पण तो सिनेमा बऱ्यापैकी फिल्मी आहे, हे पुस्तक वस्तुस्थिती आहे.
. X Troop >> उत्सुकता
. X Troop >> उत्सुकता निर्माण झाली आहे. हल्ली वाचन होत नाही. सिनेमा मिळाला तर बघेन.
मस्त ओळख. इतके क्रौर्य
मस्त ओळख. इतके क्रौर्य वाचून हादरायला होते मला.
X Troop >>
X Troop >>
मस्त पुस्तक ओळख...यादीत टाकते..
सिनेमा मिळाला तर बघेन.>>>या
सिनेमा मिळाला तर बघेन.>>>या वरचा सिनेमा नाही आलाय
इंग्लओरियस बास्टर्डस त्यातल्या त्यात जवळ जाणारा पण तो सगळा काल्पनिक आहे
एक्स ट्रूपविषयी काही माहित
एक्स ट्रूपविषयी काही माहित नव्हते. चांगला रिव्ह्यू ,वाचले पाहिजे.