“https://www.maayboli.com/node/83914
झाड !! (भाग ५ )
“हं , बोल आता , संकोचू नकोस , “
हृषीकेश ने घसा एक वार साफ केला आणि शब्द जुळवून तो बोलायला लागला ,
“ मला कशी सुरूवात करावी कळत नाहीये , पण बरेच दिवस झाले मला विचत्र भास होतायंत, विशेषतः: ,...”
“ ..विशेषतः गंगूबाईच्या खानावळीच्या इथून जाताना एक झाड लागत त्याच्या बाबतीत … हो ना “
त्याचं वाक्य अर्धवट तोडत गुरुजी उदगारले
“हो , पण हि अशी गोष्ट कुणाजवळ कशी बोलायची हेच कळत नव्हतं ,आणि त्या दिवशी मी बेसावध असताना तुम्ही एकदम ते वाक्य बोलून गेलात तसा मी खूप गांगरलो , infact मला ते झेपलंच नाही , आणि म्हणून मी तुम्हाला उत्तर न देता पळून गेलो . “ यावर गुरुजी मनमोकळं हसले .
“काय आहे नकळत तुझा एका वेगळ्या जगात आणि वेगळ्या मितीत प्रवेश झाला आहे आणि त्याबद्दल तुला काहीही माहिती नाही म्हणून तु बिथरला असशील “
“वेगळी मिती म्हणजे ?”
“वेगळी मिती म्हणजे वेगळं डायमेन्शन , तुमच्या भाषेत २D ,३D वैगेरे , हे ब्रह्मांड अनेकविध आश्चर्यानी भरलेलं आहे , त्यातलं आपल्यापर्यंत फार थोडं ज्ञान आलेलं आहे , किंबहुना काहीही आलेलंच नाही , आपला मेंदू किंवा जाणिवेची पातळी मर्यदित असते , कारण आपल्याला असं वाटत असतं की दिसतं एवढंच जग असेल . थोड्या बुद्धीच्या मर्यादा ओलांडायचा प्रयत्न केला की कळतं डोळ्यांना दिसतं त्यापेक्षा कितीतरी अफाट मोठं हे जग आहे . “
“मला नाही समजलं .. ”
“एक उदाहरण देतो , आपल्या शरीरावर लाखो जंतु बसलेले असतात , तुला किंवा मला हे दिसतात का ? जाणवतात का ?नाही पण तरीही ते तिथे आहेत हे आपल्याला माहिती आहे. का ? कारण ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर आपल्या सायंटिस्ट ने मायक्रोस्कोपचा शोध लावला आणि तेव्हाच आपल्या साध्या डोळ्यांना न दिसणारे जंतु त्या मायक्रोस्कोप खाली दिसायला लागले , आता थोडावेळ त्या जंतूंच्या दृष्टीने विचार करायचा प्रयत्न कर म्हणजे त्यांना आपण कसे वाटत असू ? त्याना आपल्या देहाची कल्पनाच येऊ शकत नाही कारण ते २D म्हणजे अजून दुसऱ्या डायमेन्शन मध्ये असतील जिथे पुढे किंवा मागे एवढेच ज्ञान होऊ शकतं ,आता हे असे किती डायमेन्शन्स असतील काही कल्पना आहे ?
‘ स्टिंग थिअरी ‘ म्हणते 10D आहेत. तर M थिअरी नुसार 11 आणि बॉस्निक थेरी नुसार 26 डायमेन्शन्स विचार कर , आणि सगळ्यात जास्त गमंत म्हणजे आपल्या पुराणात ६५ डायमेन्शन्स सांगितले आहेत . तर सांगायचा मुद्दा असा की इंद्रियांपलीकडचं ज्ञान आपल्याला हवं असेल तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या क्षमता मिळवाव्या लागतील .असो याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करू .. तु सांग तुला भास होतात म्हणजे काय होतं ?“
“गुरुजी मी त्या झाडाजवळून चाललो की असं वाटतं कुणीतरी सुटकेसाठी मला आर्ततेने विनवतंय , अगदी आक्रोश चालू आहे असं वाटतं , पण हे कानांना ऐकू येत नाही , कुठेतरी आत प्रचंड डिस्टर्ब व्हायला होतं , ईतकं की मला सहन होत नाही , आणि हे फक्त मलाच जाणवतं , इतके दिवस मी समजत होतो की हे खोटे भास आहेत माझ्या मनाचे खेळ आहेत , पण त्या दिवशी तुम्ही मला एकदम असं विचारलंत आणि मी हबकलो . पण हे खरं -खोटं काहीही असलं तरी मला यात पडायचं नाहीये गुरुजी , प्लिज मला सोडवा , मला या भासांच्या त्रासातून सोडवा , मला माझ्या घरी जायचंय . “ हृषीकेश काकुळतीला येऊन म्हणाला .
“ शांत हो , शांत हो, खरंच तुला हे सगळं नकोसं झालंय का ? यातून बाहेर पडायचंय का? कुणाला तरी तुझ्या मदतीची नितांत आवश्यकता आहे हे कळूनही तुला यातून बाहेर पडायचंय का?”
“हो ,”हृषीकेश दोन्ही हातांनी तोंड झाकून म्हणाला .
“ठीक आहे , करू आपण तशी व्यवस्था “
“एक काम कर , आत देवघरात जा , परमेश्वरापुढे नतमस्तक हो आणि त्याला विनंती कर , “अन्यथा शरणं नास्ति , त्वमेव शरणं मम् , तस्मात कारूण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर !!..”तझ्या व्यतिरिक्त मला यातून सोडवणारं कोणी नाही ,आत्ता मला ज्या आर्ततेनं म्हटलास त्याच आर्ततेने त्याला विनवणी कर ,जा !.. “
हृषीकेश उठला आणि देवघरात गेला , नुकतीच पूजा झाल्याने देवघरात विविध प्रकारची फुलं , धूप ,अष्टगंध आणि दिव्यातील तुप याचा संमिश्र असा सुगंध येत होता , देवांच्या मूर्तीवर पाठीमागच्या खिडकीतून आलेले सूर्यकिरण पडल्याने एक वेगळेच तेज झळकत होते . ते मनोहारी दृश्य पाहून हृषीकेशच्या संवेदनाक्षम मनावरचं मळभ गेलं आणि संकुचितपणा जाऊन एक विशाल भावना आली .आपल्या वयात असतानाच तेथे कोणीतरी अडकलं होतं , आपल्या सारखीच उमेद आणि स्वप्न घेऊन तो शिकायला आला असेल आणि या विचित्र परिस्थितीत अडकला असेल , जर गुरुजींसारखी खंबीर आणि सात्विक व्यक्ती माझ्या सोबत असेल तर मी त्याला या यातनांतून सोडवायचा का प्रयत्न करू नये ? उद्या मी असा अडकलो असतो तर ? “ थोडा वेळ तो तिथेच हात जोडून बसून राहिला ,मन आता पुष्कळ शांत झालं होतं .
हृषीकेश बाहेर आला तसा त्याचा निश्चयी चेहेरा बघून गुरूजी हसले , ‘काय विचार बदलला ना ? “
त्यावर तो फक्त हसला .
“ छान , ये बस ईथे आणि आता शांतपणे सविस्तर सांग “ शेजारच्या खुर्चीवर हाताने थोपटत गुरुजी म्हणाले .
“गुरुजी आपल्या चैतु शेठ च्या हॉटेल मधला गोपाळ आहे ना त्याच्या आज्याकडून एक विलक्षण गोष्ट मला समजली त्या गोष्टीचा आणि मला होणाऱ्या भासाचा संबंध असावा असं मला वाटतं , पण वेळेचा ताळमेळ लागत नाही कारण ती घटना साधारण वीस -एक वर्षांपूर्वी घडली . “ असं म्हणून हृषीकेश ने गोपाळच्या आज्याकडून ऐकलेला सर्व वृत्तांत कथन केला . गुरुजी शांतपणे ऐकत होते .
“ठीक आहे ,आजचा दिवस मला जरा माहिती काढू दे , तुमच्या भाषेत इन्व्हेस्टीगेशन आणि उद्या तुला मी सांगतो काय करायचे ते . “ गुरुजींचा निरोप घेऊन तो बाहेर पडला तेव्हा त्याला खूप हलके वाटत होते , हॉस्टेल वर परत जायच्या आधी तो गंगूबाईच्या खानावळीत गेला , जाताना आज त्याने झाडाला टाळले नाही , उलट आवर्जून त्या बाजूने जाताना त्याने मनातल्या मनात आश्वासन दिले की काळजी करू नकोस , लवकरच तुझी या त्रासातून मुक्तता होणार आहे . खानावळ अजून सुरू झाली नव्हती , त्याने घड्याळात पाहिले आत्ताशी सकाळचे १०.३० होतायंत , तेवढ्यात सुमतीबाईंनी त्याला पाहिले आणि आत येण्याची खूण केली . “ आज लवकर आलास ? “ कणिक मळता सुमतीबाई बोलत होत्या .
“हो आज सकाळीच बाहेर पडलो होतो , तिकडून लवकर आलों “
“ बस थोडावेळ ,भाजी होत आलीय , कुकर झाला की गरम पोळ्या करीत ,पान वाढते , बस हीथंच .. ए सुलभे थोडं पलीकडं सर .. “ सुमतीने बाकीच्या स्वयंपाक करणाऱ्या बायकांना मागे -पुढे सरकवून हृषीकेश ला जागा करून दिली . थोड्या संकोचानेच तो ओट्यापाशी बसला ,
“काकू एक गोष्ट विचारू ?”
“एका का ? धा विचार ..”
“ काल मी चैतुशेठ च्या हॉटेल ला गेलो होतो ..”
“ त्या चैत्याच्या हाटिलात ? आपली खानावळ असताना ,तिथं कशाला गेलास आनी ??” सुमतीने मोठे डोळे करत विचारले .
“अहो सकाळी गेलो होतो , नाश्त्यासाठी “
“हा मग ठीक हाये ,तसही आपल्याकडं नाश्ता नसतोय , पण तुला हवा आसन तर बनवून देईन ,तेव्हड्यासाठी त्या काळ्याच तोंड कशाला बघायला जातोस ? दहावीला तीन येळा फेल झाला , ‘ढ’ कुनीकडचा , माझाच पेपर बघून लिहायचा मागं बसून , पन कॉपी पन धड करता आली नाही मेल्याला ..”
“अहो काकू नाही जाणार , पण पुढचं तर ऐका , तिथे गोपाळ आहे ना त्याच्या आज्याने एक गोष्ट सांगितली मला , त्यांनी होस्टेलच्या एका मुलाला म्हणे झाडात गायब होताना पाहिलं “
“शिवानंद !.. “ सुमती कणिक मळता मळता सुस्कारा सोडून म्हणाली .
“तुम्हाला माहितीये ? “
“हं “..
“मी दहावीला आसीन तेव्हा , शिवानंद आनि तुषार ,आपल्या कडे जेवायला यायची दोघं . रोज नाही कदी कदी , “
मग सुमती ने तिला माहिती असलेली ,कानावर उडत आलेली हकीकत सांगितली . तुषार चा विचित्र ऍक्सीडेन्ट , त्यानंतर काही दिवसांनी शिवानंदचे एकाएकी गायब होणे , मग त्या झाडाबद्दल काही अफवा.
बोलता बोलता जेवण तयार झाले , हृषीकेश बाहेर टेबलवर जाऊन बसला , पोटभर जेऊन होस्टेलवर परत आला तेव्हा दुपारचा एक वाजला होता , मग जरा नेट सर्फिंग करून त्याने पॅरानॉर्मल , अघोर , Transmigration ई .विषयांची माहिती काढली .त्यानंतर संध्याकाळी बाबांना फोन करून काही दिवस अजून लागतील असं त्याने कळवलं , रात्री गुरुजींचा त्याला फोन आला , उद्या सकाळी त्यांनी त्याला तयार राहण्यास कळवलं होतं ते त्याला घेऊन एका ठिकाणी जाणार होते .
रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताना हृषीकेश आता एका नव्या साहसाठी उत्सुक होता . गुरुजी बरोबर असल्यामुळे त्याला भीती नव्हती . सकाळी ७ वाजताच आवरून तो खाली आला तोवर वळणावरून गुरुजींची रिक्षा त्याला येताना दिसली , मग त्याला घेऊन ते पुढे निघाले , रिक्षा गावाबाहेर एका जंगलाच्या दिशेने चालली होती. थोड्याच वेळात बाहेरून अत्यन्त पडक्या दिसणाऱ्या अशा एका वाड्यापाशी ते येऊन थांबले , ते भुऱ्या भगताचे घर होते , बाहेरून विटके आणि पडके वाटणारे घर मात्र आतून चांगलेच सजवले होते , गुरुजींना पाहताच भुऱ्या अगदी अदबीने बाहेर आला , त्या दोघांना आत घेऊन गेला .
“काय काम काढलं आज सकाळी सकाळी गुरुजी ? “
“ मला एक माहिती हवी आहे तुझ्याकडून “
“ तुमि विचारा ,नाही सांगितली तर बोला “ भुऱ्या हात जोडत म्हणाला
“ मला एक सांग , गावात काही वर्षांपूर्वी कॉलेजचा एक मुलगा गायब झाला होता , तुला त्याबद्दल माहिती आहे का काही ? “
“ व्हय हाये की तेवढी एकाच तर केस घडली गावात .” शिवानंद’ आणि अघोर , आत्म्याची आल्दाबदल . पन आज ईतक्या वर्षांनी त्येचं काय निघालं गुरुजी ? “
“तो शिवानंद चा आत्मा या पोराला त्रास देतोय ,जो झाडात अडकून पडला आहे ,तुला त्याबद्दल सविस्तर काही माहिती आहे का ? “
“न्हाई बा ,माजा कायबी संबंध न्हाई त्येच्याशी , आम्ही भुरटे भगत , आनी त्या शिवानंद ला अडकवनारा त्यो लाम ग्येला तिकडं काशीला जाऊन बसला हाये ”
“तुला काय माहिती तो काशीला गेला ? जे काही आहे ते खरं बोल , उगाच लपवायचा प्रयत्न करू नको “ गुरुजी जरा स्पष्ट आणि कठोर आवाजात बोलले तसा भुऱ्या खाली मन घालून सांगू लागला .
“ ईस वर्षांपूर्वीची गोष्ट हाये गुरुजी ,तवा तुम्ही बी गावात आला नवता , येक डाव ह्यो अघोर माझ्याकडं आलेला , त्येला लागनार काळं उलट्या पिसाचं कोमडं, लाल वस्त्र , तांब्याचं यंत्र ,वस्तरा समदं म्या पुरवींलं , पन आईच्यान सांगतो गुरुजी तवा मला ठावं नव्हतं ह्यो असं काई करील . अवसच्या रातीला गोपाळच्या आज्यानं बघितलं नव्ह का ? त्यानं मला सांगितल्यावर मला ध्येनात आलं की ह्यानं त्या पोराचं काय क्येलं ? मंग पुढं म्या जाब ईचारायला ग्येलो त्या अघोरला तवा त्यो काशीला निघाला व्हता , सेम to सेम शिवानंद पण आवाज अघोरचा . “
“ठीक आहे तुझी काही चूक नाही म्हणतोस तर मी विश्वास ठेवतो तुझ्यावर , आता एक काम करायचं आज पासून बरोब्बर तीन दिवसांनी तीच रोहिणी नक्षत्रावरची , कौशिकी अमावस्या आहे , अघोर ला आता पुन्हा एकदा देह हवा असेल कारण शिवानंद चा देह काही काळापूर्वीच नष्ट झाला आहे . तेव्हा तु त्याच्या संपर्कात असशील तर बोलावून घे , सांग त्याला की शिवानंद सारखाच एक देह तुला मिळू शकतो , ताबडतोब बोलावून घे . “ हृषीकेश ने चमकून गुरुजींकडे पाहिले . भुऱ्या ला माहिती असल्यासारखे त्याने मान डोलावली .
गुरुजींनी एक वार पुन्हा हृषीकेश कडे पाहिले , “हृषीकेश तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ? तुझी तयारी आहे ना?”
“हो “ हृषीकेश ने आता गुरुजींवर पूर्ण विश्वास टाकायचे ठरवले होते .
“ ठीक आहे !.. भुऱ्या तुझा संपर्क झाला की ताबडतोब कळव , माझ्या अंदाजाने तो आता वाराणसी सोडून उज्जैन ला स्थायिक झाला आहे .”
“तुम्हाला इतकं सगळं कसं ठाऊक? “ शेवटी न राहवून हृषीकेश ने आश्चर्याने विचारले त्यावर ते फक्त हसले .
क्रमशः
छान! उत्सुकता वाढत आहे.
छान! उत्सुकता वाढत आहे.