https://www.maayboli.com/node/83914
झाड !! (भाग ४ )
संध्याकाळची उन्हे खिडकीतून आत यायला लागली तशी हृषीकेश ला जाग आली , तेवढ्यात मोबाईल वाजू लागला त्याने पहिले तर बाबांचा फोन होता , “हॅलो ..अरे तु काल येणार होतास ना ? काय झालं ? “
“ बाबा एक महत्वाचं काम निघालं म्हणून थांबलो ,उद्या निघेन यायला कदाचित ,पण तसा आधी फोन करीन “
“ ठीक आहे , पण तुझ्या आवाजाला काय झालंय ?एवढा खोल का गेलाय ?”
“थोडं टेम्परेचर होतं बाबा , एक क्रोसीन घेईन, थोड्यावेळाने बरं वाटेल “
“ नक्की ना ? कि लपवतो आहेस काही ? तुला इंजिनिअरिंग जड जातंय का ? अभ्यासाचं काही टेन्शन आहे का? कोणी टगी पोरं त्रास देतायत का ? “
“नाही हो बाबा खरंच नाही , मी बरा आहे आणि तुम्ही मुळीच काळजी करू नका “ एव्हाना हृषीकेश बराच सावरला होता . फोन झाल्यावर मनाशी काही एक निश्चय करून तो उठला , तोंड वैगेरे धुवून , आवरून तो पुन्हा बाहेर पडला चैत्याच्या हॉटेल पाशी येताच सायकल भिंतीच्या कडेला लावून तो आत आला , एक चहा आणि मस्का पाव ऑर्डर देऊन झाल्यावर तो गल्ल्याशी जाऊन चैत्याशी गप्पा मारत उभा राहिला , बोलता बोलता त्याने चैत्याला सकाळच्या गुरुजींबद्दल विचारले , त्याबरोबर चैत्या एकदम कानाची पाळी पकडत सद्गदित होत म्हणाला , “गुरुजी गुरुजी SS त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं , देवानं धाडलेलं मानूस हाय बघ ते दादा ..अक्षी देवमानुस हाय .. “
त्याचीच री ओढत हृषीकेश ने म्हटले , “चैतू दादा मला पत्ता देता का ? भेटायचं होतं त्या देवमाणसाला … “
“पत्ता ,? राजे इथनं थेट वरच्या रस्त्यावरनं निघाला की त्यो रस्ता जिथपर्यंत सरळ जाईल तिथपर्यंत जायाचं मग उजव्या बाजूला रंजीचा मळा लागतूया , त्यो वलांडला की ,फुढं एक मैदान लागतंय त्याच्या पल्याड गुरूजींचं घर , कुनी पन दावील , रंजीची शेम्बडी कार्टी पन दावतील, तिथंच खेळत असत्यात , तु इचारलंस का शेंबूड वर ओढून तुज्या मागं धावत येतीन घर दावाया “ असं म्हणून चैत्या गडगडाटी हसला . त्यावर थँक्स अशा अर्थाने अंगठा दाखवून , हृषीकेश पुन्हा टेबलापाशी आला , सकाळचा गोपाळ पुन्हा चहा द्यायला आला तसे हृषीकेश ने त्याला हाताने थांबवून ठेवले , “गोपाळ सकाळी जे बोलत होतास ते आता सांग “
“कशाबद्दल बोलतोयस दादा तु ?”
“ हॉस्टेल वर एकटं राहू नकोस असं म्हणत होतास तु , विसरलास का एवढ्यात?”
“ हा त्ये व्हय , तसं वंगाळ इथं काय बी कानावर आलेलं न्हाई पन हा माजा आजा सांगायचा त्याच्या तरुन पनी हिथंनं हॉस्टेल वरचं एक पोरगं एकाएकी गायब झालं त्ये परत कंदीबी कुनाला बी दिसलंच न्हाई “
“अरे गावी गेला असेल त्याच्या “
“न्हाई , माज्या आज्यांनं सवताच्या डोळ्यानं बघितलेलं त्या पोराला, अवसच्या राती झाडात गायब व्ह्ताना “
“क्काय ? खुळ्यासारखं काय बोलतोस तु गोपाळ ?”
“ बघा म्हनून म्या बोललो की काय न्हाय , तुमी शिकल्याली लोकं तुमचा इस्वास न्हाय “
“असा एकदम कसा विश्वास बसेल ? काय पाहिलं तुझ्या आज्या ने सांग की नीट “
“दादा तु एक काम कर , पुड्ल्या आळीला माझं घर हाय , तिथं दारात माझा आज्या बसलेला असतो ,तु जाऊन त्याला इचार , त्यो समदं बायजवार सांगल तुला , त्या दिसापासून त्येला येड लागलया म्हन्त्यात ,काम धंदा सगळं बंद क्येलं त्यान, पन ही कथा मातुर रंगून सांगतो . “
“खरंच जाऊ म्हणतोस ?”
“व्हय , ऐका स्वथाच्या कानांनी , जा ..” गोपाळने असे म्हटल्याबरोबर हृषीकेश उठला बिल वैगेरे देऊन त्याने थेट गोपाळ च्या घरचा रस्ता पकडला , गोपाळने म्हटले त्याप्रमाणे खरच त्याचा आजा दारात बसला होता , तुरळक पांढऱ्या केसांची टोकं त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर गवत उगवल्यासारखी दिसत होती , सुरुकुतल्या चेहेऱ्यावर मिचमिचे डोळे आणि पान खाऊन रंगलेलं बोळकं . हृषीकेश ने त्याच्याजवळ बसकण मारली तेव्हा अंधार पडायला सुरूवात झाली होती त्यामुळे डोळ्यावर दोन्ही हात ठेऊन तो हृषीकेश ला बघण्याचा प्रयत्न करू लागला त्यावर हृषीकेश ने गोपाळने दिलेली विडी त्याच्या हातावर ठेवली तसे आजाच्या बोळके झालेल्या चेहऱ्यावर निरागस हसू पसरले ,
“ आजा मला तुझी गोष्ट ऐकायचीय , तु एका मुलाला अवसेच्या राती झाडात गायब होताना पाहिलं ना ती !.. “विडी पेटवून देता देता हृषीकेश म्हणाला . त्याबरोबर डोळे बारीक करून मान डोलावत ,बिडी फुंकत आजाने कथेला सुरुवात केली ,
“ त्या दिशी आमुशा व्हती … मी उसाच्या मळ्याला मधान रातीच पानी द्यावं लागतंय म्हनून निघालो व्हतो , आपल्या गंगूबाईंच्या खानावळीच्या फुडं एक झाड हाय बघ , तिथनं मला कसलं तरी मंत्रांचं आवाज यायला लागलं आनी ढोल बडवल्याचा आवाज बी येत व्हता बारीक बारीक … काय हाय म्हनून लपून बघाया ग्येलो तर ह्ष्टील मधलं एक पोरगं झाडाखाली रडत बसलं व्हतं ,तेच्यासमोर पुजा मांडली व्हती कसलीतरी , आनी एक आक्षी झाडावानी उचं बाबा त्याच्या डोक्यावर हात ठिऊन कायी बाई बोलत होता ,आन तुला काय सांगू लेका एकदम त्ये उब मानूस गायब झालं , मग त्यो पोरगा उबा राहिल्येला दिसाया लागला आनी मग एकदम निपचित झालं सगळं . काय होतं काय की , दोनाच येक होताना माझ्या डोळ्यानं बघितलंय म्या , कुनाचा इस्वास बसल का ? माजाबी न्हाई बसत , पन घडलंय खरं लेका असं , लै इचार क्येला एक नग कुटं ग्येला आसन ? मग भुऱ्या भगताला इचारल तवा त्ये म्हनल त्या पोराचा आत्मा त्या झाडात घुसला असल आनि त्यो बाबा त्या पोरात घुसला असल .. लै वाईट च च … “ हृषीकेश चमकला , खरंच असं असेल ? असं आत्मा वैगेरे काही असतं का ? हा आजा खरं बोलतोय का मनच काही सांगतोय ? पण कुठेतरी लिंक लागतीये आपल्या अनुभवाशी असं त्याला वाटून गेलं .
“असं काही बघू ने , लै वंगाळ , पोराचं काय झालं असलं , अडकलं रे बिचारं ..तुज्या एव्हडच व्हतं .. “ आजा अजूनही त्याच तंद्रीत बोलत होता . हृषीकेश कपडे झटकत उठला . सायकल दामटत हॉस्टेल वर परत आला .
सकाळी लवकर जाग आली तसे स्वतः:चे आटपून सायकल वर टांग मरून तो थेट रंजीच्या मळ्याकडे निघाला . जवळजवळ तासा भराच्या रपेटीनंतर लांबून त्याला रंजीचा मळा दिसू लागला , जवळ जाताच दोन -तीन लहान मुलं खेळत असलेली त्याला दिसली , त्याने सायकलची घंटी वाजवली तशी ती लहानगी त्याच्याजवळ धावत आली ,
त्यांना एक एक चॉकलेट दिलं तशी खूष झाली , “गुरूजींचं घर ?”
एका सुरात सगळ्यांनी लांब हात करून दाखवलं , दूरवर मैदान पसरलं होतं आणि त्याच्या पलीकडे त्या काळ्याभोर जमिनीच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची एक छोटीशी टुमदार बंगली दिसत होती . सायकल दामटवून दमलेल्या हृषीकेश ने आता खाली उतरून पायी चालायला सुरुवात केली , थोड्याच वेळात तो त्या बंगलीपाशी पोहोचला . अंगणात पांढऱ्या आणि लाल गुलाबांचा सुंदर ताटवा वाऱ्या बरोबर डोलत होता . निशिगंध , चाफा , मोगरा , जाई यांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता , फाटक उघडून तो आत आला आजूबाजूला निरव शांतता होती , दारावर बेल ऐवजी एक छोटीशी घंटी टांगलेली होती ,वरती पांढऱ्या शुभ्र कमानीवरती बंगलीचे नाव होते “अजितेश ‘ . घंटी वाजवून ऋषिकेश दार उघडायची वाट बघतच होता तेवढ्यात दार उघडले , काल पाहिलेले गुरुजी ! तेच हास्य आणि तीच चमकती भेदक नजर ,पण आज त्या नजरेत त्याला कमालीचे वात्सल्य दिसत होते . “ये ये … मी वाटच बघत होतो तुझी . “बस , मी आलोच ..” त्याला बसायला पांढऱ्या रंगाचं कुशन असलेली एक लाकडी खुर्ची देऊन ते आत गेले . बसल्या बसल्या हृषीकेश घराचे निरीक्षण करू लागला , हॉल अगदी साध्या पद्धतीने सजवला होता , जुन्या काळातील खिडक्यांना असायचे तसे पांढरे शुभ्र झुळझुळीत पडदे , आणि भक्कम लाकडी खुर्च्या , एक छोटा दिवाण त्यावर पांढरे लोड आणि तक्के ,पलीकडे टेबलवर फ्लॉवर पॉट त्यात काल ताजी फुले ठेवली असावीत कारण आज ती अर्धवट सुकलेल्या अवस्थेत होती . भिंतीवर एक कृष्णाचे नयन मनोहर पेंटींग . हृषीकेश चे निरीक्षण चालू असतानाच गुरूजी चहा आणि बिस्किटे असलेला ट्रे घेऊन बाहेर आले , त्यांना बघून तो पट्कन उठला , “ अरे बस बस … एवढ्या सकाळी आला आहेस , चहा नाश्ता काही केला नसशील , घे, माझ्याकडे स्वयंपाक करायला बाई माणूस नाही मी एकटाच असतो तेव्हा या बिस्किटांवरच तुला भागवावे लागेल “
“नाही नाही काही प्रॉब्लेम नाही “ त्यांचा जिव्हाळा बघून त्याला कसे तरी वाटले , आपली ओळख पण नाही आणि आपण कोणत्या हक्काने ईथे येऊन त्यांना असा त्रास देतोय .
क्रमशः:
पटपट भाग टाकल्याबद्दल धन्यवाद
पटपट भाग टाकल्याबद्दल धन्यवाद
धनवन्ती : आभारी आहे . कथा
धनवन्ती : आभारी आहे . कथा अर्धवट वाचायला मिळाली तर उत्सुकता वाढायच्या ऐवजी मूड जातो हे एक वाचक म्हणून मी नेहेमी अनुभवते ,त्यामुळे शक्यतो पूर्ण लिहून झाल्यावरच कथा अपलोड करायची असे मी ठरवले आहे . त्याप्रमाणे सर्व भाग टाकले आहेत , वाचून नक्की अभिप्राय द्यावा हि विनंती .
त्यामुळे शक्यतो पूर्ण लिहून
त्यामुळे शक्यतो पूर्ण लिहून झाल्यावरच कथा अपलोड करायची असे मी ठरवले आहे .
>>> हे बेष्ट केलंय तुम्ही.