गुलाबजाम!

Submitted by केजो on 14 August, 2023 - 18:46

लहान मुलं तुम्हाला आयत्या वेळी तोंडघशी पाडण्यासाठीच जन्म घेतात, अशी माझी तरी ठाम समजूत आहे. लहान असताना घरी कोणी आलं आणि आपण मुलांच्या गुणप्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला की, ते तोंडातून चकार शब्द काढत नाहीत. कोणाकडे गेलो की, आपण मारे सांगावं, “ह्याला नं जिलबी अजिबात आवडत नाही, नका वाढू पानात.” त्याबरोबर त्यानं जिलब्यांची परातच उडवावी! त्यामुळे शक्यतो चारचौघात मी काही बोलायला घाबरते. पण कधी कुठली गुगली येईल, ह्याचा पत्ता नसतो.
मागच्या आठवड्यात आम्ही एकांकडे जेवायला गेलो होतो. त्या मैत्रीणीकडे तिची मोठी जाऊ-दीर, सासू-सासरे असा सगळा गोतावळा जमला होता. त्या काकू सुगरण म्हणून प्रसिद्ध होत्या. वर्हाडी, खानदेशी, चायनिज, काहीही खावं ते त्यांच्याच हातचं. मीठ, साखर, तेल, चमचमीत, तवंग असल्याशिवाय पदार्थाला रुची येऊच शकत नाही, ह्यावर ठाम विश्वास! आता त्यांच्या हातचं खायला मिळणार म्हणून मी मनातल्यी मनात खूप खूष होते. पानावर बसल्यावर नजरच आधी त्रुप्त झाली. डावी-उजवी बाजू तर सजली होतीच, पण सगळ्यात शान घेणारे एकसारख्या आकाराचे गोल- गरगरीत पाकात विराजमान झालेले गुलाबजाम माझी ब्रह्मानंदी टाळी लागण्यासाठी खुणावत होते. आजूबाजूच्यांना काय वाटेल ह्याची तमा न बाळगता मी गुलाबजामनीच सुरुवात केली. बोटांनी उचलताच गुलाबजामचा लुसलुशीतपणा जाणवला. खळी पडून ललनेचं अस्फुटसं स्मितहास्य हलकेच ठिबकावं, तसा त्यातला पाक हलकेच एक-दोनच थेंब ठिबकला. त्या गुलाबजामला ताबडतोब मी जीभेवर ठेवलं, अन् आपोआपच डोळे मिटून समाधिस्थ झाले. अक्षरश: तो गुलाबजाम विरघळलाच आणि तो अस्सल खवा, प्रत्येक कणात समरस झालेला माफक गोड असलेला पाक झिरपत -सुख म्हणजे काय ह्याची अनुभूती देऊन गेला. त्या स्वर्गीय अनुभवातून प्रुथ्वीवर यायला मला जरा वेळच लागला. डोळे उघडले तर सगळेजण माझ्याकडेच बघत होते. त्यांच्या नजरा बघून माझी, “ हे धरणीमाते, पोटात घे.” अशी अवस्था झाली. सावरून घ्यायचं म्हणून मी मनापासून दाद द्यायला सुरुवात केली. “काकू, काय गुलाबजाम झालेत, महान! इतके सुरेख गुलाबजाम मी कधीच खाल्ले नव्हते.” नवर्याचीही अवस्था तीच होती. तो म्हणाला, “ ह्यापुढे दुसरीकडे कुठेही गुलाबजाम खाणंच अशक्य! कसं जमतं तुम्हाला? हिला पण एकदा शिकवा जरा.” अस्सा राग आला नं! मी का शिकू? काही गोष्टी इतरांनीच कराव्यात, आपण त्या हाणाव्यात, त्यांचं मनापासून कौतुक करावं, ह्या मताची मी आहे. सगळंच मला जमायला लागलं तर इतरांच कौतुक करण्यची संधी कधी मिळणार? तर काकूंचं असं मनापासून कौतुक चालू असताना त्या समजावत होत्या की, “काही नाही रे, इतकी वर्षं करतेय मी. अनुभवाने जमेल तिलाही.” आग्रहानी त्या अजून गुलाबजाम वाढायला लागल्या. तितक्यात आमचे चिरंजीव पचकलेच, “मावशी, गुलाबजाम तर तू कालच केलेलेस नं? मी संध्याकाळी आलेलो तर तू मला आणि शंतनुला चवीसाठी दिलेलेस, आठवतंय? आजी तर आज सकाळी आल्या, त्यांनी नाही केले काही!”
पुन्हा एकदा “ हे धरणीमाते, पोटात घे….”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे हे ... भारीच.
गुलाबजाम मात्र जाम आवडतात.

पचकू राम पचकले Lol Lol Lol

त्यांच्या नजरा बघून माझी, “ हे धरणीमाते, पोटात घे.” अशी अवस्था झाली. >>> अनुभव घेतलेत असे

असाच एक अनुभव
*** म्हणजे देवघरची फुले!
https://www.maayboli.com/node/83674

चलताच गुलाबजामचा लुसलुशीतपणा जाणवला. खळी पडून ललनेचं अस्फुटसं स्मितहास्य हलकेच ठिबकावं, तसा त्यातला पाक हलकेच एक-दोनच थेंब ठिबकला. त्या गुलाबजामला ताबडतोब मी जीभेवर ठेवलं, अन् आपोआपच डोळे मिटून समाधिस्थ झाले. अक्षरश: तो गुलाबजाम विरघळलाच आणि तो अस्सल खवा, प्रत्येक कणात समरस झालेला माफक गोड असलेला पाक झिरपत -सुख म्हणजे काय ह्याची अनुभूती देऊन गेला. त्या स्वर्गीय अनुभवातून प्रुथ्वीवर यायला मला जरा वेळच लागला. >>> मस्त लिहिलय.