
गौरवा....
अगदी रविवार ची घटना. आमच्या घरी सदैव येणारे स्नेहधारा पाझरत असलेले तरतरीत गौरव कदम नावाचे परेलच्या नभांगणातील चकाकणारे तेजस्वी तारे एकाएकी लुप्त झाले. अगदी तरणाबांड तरुण खेळायला गेला आणि थकून भागून घरी आला. काही क्षणात त्याला अस्वस्थ वाटू लागले. जवळच्या रुग्णालयात घेऊन जाईपर्यन्त काहीच हालचाल न करता अनेक सहकारी मित्रांना, कुटुंबाला धक्का देत निघून गेला. माझ्या मनाला ऐकून फार मोठा धक्का बसला. मनात सोनलचा विचार आला. कुटुंबाने तिला सांगितले नव्हते. आमचे कुटुंबच रडत होते तर सोनल आणि त्या लहान मिवान बाळाचे विचार मनाला चटका लावत होते. गेल्याच आठवड्यात म्हणजे 30 जुलै ला मिवान चा वाढदिवस साजरा करण्यात आला होता त्या मुलाला काय ठाऊक... आठच दिवसात आपला पिता हे जग सोडून जाणार...!
अवचित सोडून गेला
लिहू कसा मी गहिवरल्या शब्दा
शब्द देखील रडू लागले आहेत. ही माझी अवस्था तर त्या कुटुंबाची अवस्था काय झाली असेल. आपल्या पंखाखाली या पाखराला घेऊन त्याला हवं नको ते पूरविणार्या मातापित्यावर भरून भरून आभाळ आले असेल. मध्यंतरी काही वर्षे गौरव LKP security शेअर बाजार निगडीत कंपनीत काम केले. त्या कंपनीशी माझे सख्य असल्यामुळे मला त्याने सांगितले तेव्हा कळले. गौरव चे वडील श्री विलास कदम हे अभ्युदय बँकेत सेवेला... मुलांनी पण आपल्या संस्थेत कार्य करावे ही वडिलांची इच्छा. त्यामुळे त्याने अभ्युदय बँकेत सेवेला वाहून घेतले. आई या के ई एम रुग्णालयातील मुख्य परिचारिका. समाजसेवी माऊली. तिच्या पदरात नियतीने दू:ख घातले आहे. तिचा चमचमता तारा निखळून पडला आहे. मंदार आणि शुभम या … बंधुच्या मनात वेदनेची कळ उमटली आहे. त्या वेदना सहन …होत नाहीत. साहू कसा दुरावा म्हणून रडत असतील. जे संस्कार समाजात अपेक्षित असतात त्याप्रमाणे गौरववर माता पित्याकडून झाले .... ते तर प्रथमदर्शनी घरी आला तेव्हा कळले ... अशा या दू:खाने गदगदलेल्या कुटुंबाची अवस्था पाहून आमच्या लाडक्या तरुणतुर्काला श्रद्धांजली वाहायला मन धजावत नाही. सोनल चा मनात विचार आला की ईश्वरालाच न्यायाच्या कठड्यात उभे करून जाब विचारावासा वाटत आहे. एकली काशी राहू म्हणून तिच्या मनात सैरभैर होत असेल पण माता पिता आहेत. सोबत मिवान आहे. त्याच्या भविष्यासाठी आज दू:ख विसरून जगायचे आहे.
गौरव कदम हा आमच्या निखिल चा मित्र. गौरव मध्यम उंचीचा, अंगकाठी मजबूत गौरव अधून मधून घरी यायचा. सोबतीला केतन आणि सर्वेश देखील असत. उदंड चेष्टामस्करी चालत असे. हास्य दुमदुमत असायचे. आज ते हास्य वेगळ्या दुनियेत गेले आहे. दरवाज्याच्या चौकटीतून बाहेर पाहताना पून्हा पून्हा त्याचा तो हसतमुख चेहरा आठवत आहे. मन माझे हळवे हळहळते आहे. कुठेही जाताना चारपांच जन एकमेकांशी संवाद साधत बरोबर जात होते. एकमेकांच्या सुखदू:खात सहभागी व्हायचे. निखिल गौरव पेक्षा फक्त आठ दिवसांनी ज्येष्ठ. गौरव हा गॅरी नावाने परिचित. एकत्र शिक्षण घेतल्या मुळे घनिष्ट मैत्री झाली.
असा हा लाडका गौरव खूप खूप दूर गेला आहे. तेथून परतण्याचा मार्ग कठीण आहे. मनातल्या गाभार्यात त्याच्या आठवणी तेवत आहेत. त्या गौरव श्रध्दांजली अर्पण करताना मन रडू लागले आहे. गौरव च्या कुटुंबाचे सांत्वन कसे करायचे... आमच्याच कुटुंबातील घटक गेल्याचे दू:ख त्यांच्याप्रमाणे आमच्या कुटुंबाला देखील आहे. आता थांबणे बरे
घोडपदेव समुहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
अशोक भेके
घोडपदेव समूह
असा हा लाडका गौरव खूप खूप दूर
असा हा लाडका गौरव खूप खूप दूर गेला आहे. तेथून परतण्याचा मार्ग कठीण आहे.>>>> कठीण तर आहेच पण तुमच्यासारखे मित्र असतील तर अशक्य बिलकुल नाही _/\_