Tour du Mont Blanc भाग ९ - सहावा दिवस

Submitted by वाट्टेल ते on 9 August, 2023 - 13:25

Courmayeur मधून सकाळी खचाखच भरलेल्या बस मधून प्रवास करून जिथून पुढे ट्रेक चालू करणार होतो तिथं पोहोचलो. आता तास २ तासात फ्रान्सच्या दिशेने कूच करणार होतो. बसमध्ये जागा मिळाली, शेजारी एक म्हातारा होता, सॅन दिएगो मधला पण मूळचा ऑस्ट्रियन. तो असाच कुठे कुठे फिरलेला. एकेकटे फिरणारे असे बरेच भेटले, त्यांची कमाल वाटते. एकेकटे असते तरी ( किंवा म्हणूनच) कोणीही भेटला तरी गप्पा मारायला उत्सुक असतात. आपल्यालाही नवीन गोष्टी कळत जातात.
आधी अगदी थोडा चढ आणि मग पुष्कळ वेळ सरळसोट रस्ता होता, एका बाजूला सतत ओढा. अशी पाण्याची सोबत असलेले routes मला आवडतात. दोन्ही बाजूला थोडे दूर डोंगर होते. असा लांबच लांब रस्ता चालताना सतत काही बदलत नसतं, मग इतर विचार घोंघावतात. आज ट्रेकशी शेवटची रात्र. उद्या संपणार. खूप काही पाहिलं. पण ते निसटून जाईल असं वाटलं. ट्रेकहून भारतवारी करून परत आल्यावर महिन्याभराने फोटो पाहिले, ते ही वरवरच. हे वर्णन लिहायला घेतलं तेव्हा आपोआप लहान मोठे रस्ते , वळणे, खुणा कुठेही document केलेल्या नसताना स्वच्छ आठवल्या, ट्रेकच्या पुनःप्रत्ययाचाच आनंद मिळत आहे. त्या लांब रस्त्यावर असतानाच हे लिहून ठेवायचं असं ठरवलं हे आठवलं. चालताना हरिप्रसाद चौरासियांच्या चंद्रकंसच एक सुंदर रेकॉर्डिंग होतं, ते ऐकलं. पुढे टाकलेल्या १०० दागिन्यांतला एकच आवडून तो बरोबर उचलावा तसं, रोज काय ऐकावं हे ठरवताना झालं. प्रत्येक जागा तिचं गाणं कोणतं ते सांगत होती. हे ऐकू की ते असं confusion झालं नाही आणि सुरु केलेलं गाणं विसंगत वाटलं, मग मोर्चा दुसऱ्याकडे वळला, असं ही झालं नाही. अनिता आणि माझ्यात पहिल्या १-२ दिवसांत किंचित तणाव आलेला. मग आम्ही एकमेकींना जरा space देत होतो. त्या रस्त्यावर काय झालं कुणास ठाऊक, आम्ही नकळतपणे एकत्र चालू लागलो पुन्हा एकदा - आमच्या इथल्या markham woods वर चालतो तशा.
9_1.jpg
थोडा वेळ नवऱ्याबरोबरही चालले. कधी बोलत किंवा निशब्द. There was something magical about it.
मग डोंगरपायथ्याशी पोहोचलो आणि चढायला सुरुवात झाली. फ्रांसमध्ये चांगली हवा होती तर स्विस आल्प्समध्ये चक्क प्रखर ऊन आणि उकाडा होता. इटलीच्या आसपास जरासा पाऊस, ढगाळ अशी हवा. तर आज प्रचंड गारठा असणार आहे असे कळले. आणि मी शॉर्ट घातली होती. पण अंगात jacket धरून ३ लेअर. मग knee cap घातल्या. त्यात गुडघ्याला आधार द्यावा यापेक्षा पायाला उब मिळावी हा हेतू होता. Gloves घातले आणि कान घट्ट बंद केले. चढ असेपर्यंत थंडी वाजली नाही पण एका पॉईंट नंतर प्रचंड प्रचंड गारठा, भणाणणारा गार वारा, धुकं, summit च्या जवळ गेल्यावर चिरंजीवांना ४ layer आणि सगळे पॅक असून थंडी भरली, दातकडी वाजत होती. मग फ्रेडने स्वतःकडचं जॅकेट दिलं. माझ्या मानाने सगळेच पॅक होते. गारठा असला तरी आपण तो सहन करू शकतो. Summit जवळच आहे, खाली उतरायला सुरुवात केली की गारठा कमी होईलच असा हिशोब होता. आता पुष्कळ दक्षिणेला Mont Blanc जिथून सगळ्यांत जवळून बघता येतो अशा पॉईंटला Mont Blanc च्या पूर्वेकडे होतो. पण धुक्यामुळे काहीही दिसले नाही. तिथे परिसराचे एक मोठे 3-D model होते त्यावर आपण कसे कसे आणि कुठे गेलो, राहिलो, सगळं फ्रेडने दाखवलं.
मग पुढे वर चढत राहिलो. २-३ वेळा बर्फ ओलांडला पण तस चांगला घट्ट होता, भीती वाटली नाही किंवा घसरायला पण झाले नाही.
9_2.JPG
Summit अगदी समोर असताना एका प्रचंड मोठ्या शिळेच्या ओडोश्याला थांबून जेवायचे ठरवले, त्यातल्या त्यात तिथे एका बाजूने protection असल्याने उब मिळाली असती. तरी थंडीमुळे उघड्यावर फारसे खाल्ले गेले नाही. चिप्स, बहुतेक नेक्टरीन आणि जरासे सॅलड असे काही सटरफटर खाल्ले. जेवणानंतर summit ला गेलो. Alps गारठा, धुकं, वारा असा असेल याची माझ्या डोक्यात जी काही कल्पना होती ती एकदाची सत्यात उतरली होती त्यामुळे मी बऱ्यापैकी काकडत असूनही मजेत होते, समाधानी होते.
9_3.jpg
उत्तार तसा सरळ होता. फार खडक किंवा steep नव्हते. उलट बाजूने summit कडे येणारे group भेटत होते. आम्ही त्यांना few min, almost there वगैरे सांगून प्रोत्साहन देत होतो. इटलीच्या बाजूने उतरताना मोठा landscape होता तसाच इथेसुद्धा दिसत होता. खाली पायथ्याशी एक छोटी मेटॅडोरसारखी गाडी दिवस होती, ती आपण घ्यायची आहे असे कळले.
9_4.jpg
उतरलो तिथे चीजची मोठी factory होती पण चीज करताना , काही प्रोसेस वगैरे बघायला मिळाली नाही. ४०० लिटर दुधापासून ४० किलो चीज बनते. चीज तारीखवार, प्रकारानुसार साठवण्याची मोठी मोठी अंधारी गोदामे पण होती. शेळ्या मेंढ्या फिरत होत्या. अचानक मोठ्यामोठ्याने घंटांचा आवाज सुरू झाला. एव्हाना हा आवाज परिचयाचा होता. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने वरून गाईंचा प्रचंड कळप जवळजवळ दौडत खाली येत होता. त्यांची कसली तरी वेळ झाली असावी. गायीच्या आसपास shepherd dogs सुद्धा होते. त्या धष्टपुष्ट गायी अगदी आमच्या वरच होत्या, मध्ये कुंपण नाही, फक्त लहानसा बांध होता. चुकून त्यातल्या काही आमच्या दिशेने आल्या तर आमचा काय चेंदामेंदा होईल हा विचार आला नाही, आम्ही त्यांचे उतारावरून वेगाने खाली उतरणे आ वासून बघत होतो आणि त्यांचा रोजचा मार्ग त्या चुकणार नाहीत, आमच्या वाटे येणार नाहीत याची खात्री होती.
WhatsApp Image 2023-08-09 at 1.23.28 PM.jpeg9_5.jpg
मॅटेडोर येईपर्यंत गायी बघण्यात वेळ कसा गेला ते कळलं नाही आणि पाय आता चांगलेच दुखत आहेत हे ही विसरले. मॅटेडोर ने ३-४ किलोमीटरच गेलो असू पण ते ही मोलाचे वाटले. आमच्या बरोबरचा दुसरा ग्रुप, आधीच खाली आला आणि मॅटेडोरसाठी थांबून कंटाळून चालत होता, ते रस्त्यात दिसले. सरळ असला तरी बऱ्यापैकी चढ होता. आम्ही त्यांना वाटेत हात हलवून दाखवत extra credit आनंदाने देऊन टाकले.
Les Chapieux मधील राहण्याच्या जागी पोहोचलो तेव्हा पाऊस पडत होता. म्हणून भराभर आत घुसलो. पहिल्याच मजल्यावर बाथरूममधून सरळ जायला सांगण्यात आले. कुलकर्णी दोघे, आम्ही तिघे, DS, शॅरन आणि जेस इतके आत घुसलो. लहान खोलीत कसेबसे ४ बंक बेड माववले होते. सुरुवातीला आमचाच गोंधळ इतका होता की शॅरन आणि जेस खोलीच्या बाहेरच उभ्या होत्या, त्यांना आत येण्यास जागा नव्हती. शेवटी आम्हाला लाज वाटून त्यांना वाट करून दिली, पण त्या अगदी कूल होत्या. आमचा रोजचा - मी व चिरंजीव यांचे - exchanging few words - त्यावर चिरंजीव आणि पारूची हास्यजत्रा , त्या ही त्यात सामील झाल्या. खोलीचा entrance बाथरूममधून आहे यावर टिप्पणी, इथपासून हसणे चालू होऊन कुठपर्यंत जाईल याला धरबंध नसायचा. पण खूप मजा यायची.
शेवटची रात्र. उद्याचे कपडे काधून घेतले आणि सामानाचे पोते (अक्षरश: पोते) एकदाचे बंद करून ठेवले. आता पुन्हा हा कार्यक्रम करायला लागणार नव्हता. घाम, दमटपणा, थंडी, महाल, पाऊस सगळ्या मोसमासाठीचे कपडे घेतलेले, आता अगदी चोंदले होते.
जेवायला खाली गेलो तेव्हा कळले, की उरलेल्यांना बिल्डिंगच्या आत खोली नव्हती तर कुठेतरी बाहेरच्या बाहेर शेड जागा मिळाली होती. याची आधी कल्पना नव्हती. थंडी आणि पाऊस दोन्ही असणार होते आणि बाथरूमसाठी त्यांना आमच्या इथे यायला लागले असते. वाईट वाटले. अर्थात आधी सर्व रात्री मी रोजच बंकबेड वर खबदाडात कशीबशी वर जाऊन झोपत होतेच, आजही फारसे वेगळे नव्हते. या सगळ्याची तयारी इथे येण्याआधीच केली होती.
जेवायच्या टेबलवर आज अगदी मजा होती. Last Supper / Dinner आणि आम्ही एकूण नेमके १३ जण. फ्रेड व चिरंजीव चेस खेळत बसले. आम्ही आजूबाजूला असेच एकेकटे कोणाशी बोलत होतो. २ तरुण मुले आली होती. ती जेवणार होती अन त्यांना झोपायला जागा अशी नव्हती. मग इथे कुठे tent टाकू वगैरे त्यांचे setting चालेल होते. एक seattle ची asian origin ची तरुण मुलगी पण अशी एकटीच TMB आणि आसपास एकटीच महिनाभर फिरत होती. त्या मुलांचे पण असेच होते. अगदीच Aimless wanderer म्हणावे तर तसेही नाही, त्यांचे वैयक्तिक goal होते.
जेवायला सूप, ब्रेड नेहमीचे यशस्वी आणि अजून जी काही डिश होती ती आपल्या साध्या मुलाच्या डाळीच्या खिचडीच्या जवळपास जाणारी होती. ट्रेकच्या अखेरीस, कोणताही प्रवास संपताना खिचडी हा एक आवडता प्रकार आहे हे यां फ्रेंचांना कसे कळले ? आम्ही मिटक्या मारत खाल्ली. नंतर मातीच्या मडक्यातलं panna cotta. हा flan किंवा खरवासाच्या जवळ जाणारा प्रकार. नंतर पुन्हा एकदा house liquor - Genepi चे shots आले, पचनास मदत म्हणून, बाकी काही उद्देश नाही.
ते हलके आहे हे सांगण्यात आले पण एक घोट घेल्यावर ब्रह्माण्ड आठवले. रम वोडका वगैरे सोडा, आपल्याकडे पहिल्या धारेची , हातभट्टीची वगैरे जी काही असते म्हणतात ती अशीच असणार असे वाटले. त्यात हलका बडीशेपेचाही नोट होता, त्यामुळे ही पचनास चांगली असेल यावर माझा झटकन विश्वास बसला. एवढ्याश्या शॉटने माझे विमान आकाशात उत्तुंग उडून बंकबेडवर कधी जाऊन पडले ते कळलेच नाही.
क्रमश: - https://www.maayboli.com/node/83854 -

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिली आहे मालिका. पण सर्व भागां ची लिंक प्रत्येक भागात दिली तर वाचकांना बेस्ट होते. ते कसे करायचे ते अ‍ॅडमिन ह्याम्ना विचारा ते मदत करतील. सर्व वाचून काढते.