ब्रेकफास्ट जवळजवळ सगळीकडेच अंडी, toast, वेगवेगळ्या जेली, croissant, coffee , फळे , cereal असा भरपूर असायचा. Cereal बरोबर दुधाऐवजी दही असायचे. आज आमचे स्विसमध्येच दक्षिणेला La Fouly कडे प्रस्थान होते. लॉजच्या इथून खाली उतरत होतो तेव्हा बाजूला पाटाच्या बाजूने चालत होतो. शेतीसाठी बहुदा चांगले लाकडी लहान मोठे पाट सुबक बांधलेले. त्यातले खळाळते स्वच्छ थंड पाणी, त्याचा आवाज. त्याला पूरक म्हणून पुन्हा लता सुरु केली. मध्ये मध्ये किशोर-रफी पण. हे लोकही माझ्याबरोबर या पृथ्वीवरच्या स्वर्गात आलेत ही भावना होती.
काही वेळातच Champex Lake लागला.
त्याचे पाणी गार पण अजून खाली असल्याने कालच्या धबधब्याच्या मानाने कमीच होते. मार्क सरळ कमरेपर्यंत अगदी छातीपर्यंत त्यात जाऊन उभा राहिला. आम्ही पण गुढग्यापर्यंत गेलो. आनंदला पायाला जरा blister आल्याचे लक्षात आले, मी आशा करत राहिले की ते वाढणार नाही कारण त्याचा असह्य त्रास होतो पण नशिबाने ते पुढे वाढले नाही. लक्षात आले आपले शूजही जुने झालेत. याच एका old and faithful shoes वर Angels Landing Utah , Inca Trail Peru , Mount Mitchell ( २ वेळा), Colorado मध्ये Pikes Peak आणि Mount Bierstadt, किलीमांजारो झाले आणि आता TMB सुरू आहे. त्यांनी दगा दिला नाही. एकही blister आला नाही आणि शूज सुखरूप घरी परत आले.
आमच्याबरोबरचा group लेकपाशी फारसा रेंगाळला नाही, आम्हाला उशीर झाला असावा, तेव्हा वेळ भरून काढण्यासाठी म्हणून फ्रेडने अत्यंत steep आणि अरुंद अशा दुहेरी कठीण पायवाटेवर नेले. रस्त्यात अर्धवट पडलेल्या , कापलेल्या झाडांच्या खोडातच कोरलेले लहान मोठे प्राणी , मोठी artistic वाट होती. अनेकदा घसरायला झाले. पण एकूण मजा आली.
एके ठिकाणी थांबवले, तिथे समोरच्या खडकांत २ -३ लोखंडी दरवाजे, हा प्रकार काय विचारलं तर ते म्हणे इथे सैनिकांना व नागरिकांना युद्धकाळात लपण्यासाठीचे बंकर होते. एकेक महिन्याचे supplies वगैरेही साठवले जायचे. या एक प्रकारे middle of nowhere मध्ये आसपास कितीही सुंदर असले तरी असे लपून राहणे भीषणच असणार. शॉर्टकट संपला तिथे प्रचंड लाकडाची रास. आमच्या बरोबरच्या group च्या जरा आधीच आम्ही तिथे पोहोचलो. त्यांच्या गाईडने जरा आमच्याकडे ‘हे कसे काय इतक्यात पोहोचले’ म्हणून कुतूहलाने पहिले. आमच्यातील एक दोघे जण, विशेषतः सुझनला असे वाटायला लागले की काही करून रोज ५ च्या आधी फ्रेड आपल्याला मुक्कामी पोहोचवत नाही, कदाचित त्याची लॉज वाल्यांना सोयीचे पडावे म्हणून arrangement असेल. अर्थात त्याने आम्हाला तसे काही सांगितले नाही. दुसरा group काही करून आमच्या आधी जरा पोहोचतो म्हणून त्यांना राहण्याच्या खोल्या जरा बऱ्या, किमान खालच्या मजल्यावर मिळतात. आज आपण लवकर पोहोचण्याचे बघू म्हणून तिने canvassing सुरू केले.
डोंगरातली पायवाट संपली आणि पायथ्याशी Essert नावाचे अतिसुंदर गाव लागले. वाऱ्यापासून रक्षण व्हावे म्हणून गावातील सगळ्या घरांची छते एकाच ( बहुदा ) दक्षिणोत्तर दिशेत होती.
गावात curfew होता की नकळे पण माणूस एकही दिसला नाही. मात्र जिथे तिथे सुंदर टुमदार घरे,
कडेला फोडून ठेवलेल्या सरपणाच्या भिंती,
खिल्लारांसाठी वाळक्या गवताचे भारे आणि जागा मिळेल तिथे कुंड्या आणि रस्त्याच्या कडेला जमिनीत बहरलेली फुले.
इथे सगळीकडेच पाण्यासाठी अतिसुंदर सोय होती. मोठ्या झाडाचे खोड आडवे करून कोरून त्याला tub सारखे बनवलेले, वरून संततधार पाणी, तेही खोडापासूनच बनवलेल्या नळांत, अर्थात खाली drainage असणार पण एकूण सौन्दर्यदृष्टी बघून अतिकौतुक वाटले.
फुलझाडांचे वाफेही अशा कोरलेल्या लाकडांत सर्वत्र दिसायचे. फुले तर अशी बहरलेली की जणू पाहुणे येणार म्हणून खास सजावट करून ठेवल्यासारखी वाटावी अशी. लहान मुलांसाठी सुंदर बाग ( खरेतर वेगळ्या बागेची गरजच नाही, प्रत्येक घरच बागेसारखे होते) झोपाळे, सीसॉ , zipline सुद्धा होती. फक्त मुलेच नव्हती. बागेत आम्ही आमची हौस भागवून घेतली. त्या सुंदर गावात झोपाळ्यावर झोके घेताना पुन्हा लहान लहान झाले. तिथून आम्हाला बाहेर काढताना फ्रेडला मोठ्ठे लोक लहानांना ओरडून बाहेर काढतात तसे करावे लागले.
बागेपासून पुन्हा डोंगरातील पायवाट सुरु झाली. मध्ये पाणी - ओढे, थोडे निसरड्या जागाही अनेक ओलांडल्या. आज जेवायची जागा सुंदर होती. सगळीकडे उंच झाडं, त्यांची सावली, बसायला, पाठ टेकायला किंवा अगदी टेबल म्हणून वापरता येतील असे दगड. बहुतेक त्यांची आवडती जागा असावी. इतर group पेक्षा आधी पोहोचल्याने आपल्याला ही मिळाली म्हणून फ्रेड खुशीत होता. नाहीतर नक्कीच त्यांनीच ती पटकावली असती
जेवणानंतरच्या रस्त्यात पुन्हा एक छोटेसे तळे लागले. आनंदच्या पायाची ब्लिस्टरसाठी तपासणी झाली, जैसे थे. मी नेहमीप्रमाणे थंडगार पाण्यात पाय बुडवून बसले. इथे जास्त वेळ दवडायला नको, म्हणून मंडळींनी लवकर बाहेर काढले. पुढची वाट अधिक अरुंद, डावीकडे झिजणारे ढासळणारे कडे, उजवीकडे दरी असा प्रकार. एक दोन वेळा चेन धरून जावे लागले. अजून काही वर्षांत ही वाट शिल्लकच राहणार नाही, इतकी अरुंद झाली आहे आणि अधिकाधिक ढासळत आहे, जरासे वाईट वाटले. सर्व glacier वितळण्याच्या आधी एकदा अंटार्क्टिकाजवळ जायचे आहे वगैरे गप्पा झाल्या.
नंतर एकदा मोठा ओढा ओलांडल्यावर वाट सरळ होती. भरभर चालत होतो. फ्रेड मात्र काही ना काही दाखवत होता, क्चचित वेळ काढत आहे असे वाटले पण ठीकच होते. मध्येच एका ठिकाणी थांबवून झाडांमधला sexual intercourse वगैरे दाखवतो म्हणून त्याने थांबवले. मंडळी एकदम उत्साहाने पुढे सरसावली. आमचे highschool मधले चिरंजीव जरा अधिकच. मग एखाद्या काडीने एका विशिष्ट फुलाच्या मध्यभागी स्पर्श केल्यावर फुलाच्या दांड्यातून पांढरा चीक , स्त्राव बाहेर येत होता याचे demonstration झाले. फ्रेड अगदी उत्साहाने दाखवत होता. डोंगरात तो बराच भटकलेला होताच, शिवाय पूर्वी एका botanist कडेही काम करत होता त्यामुळे त्याला बरीच माहिती असायची. पाचव्या दिवशी vanilla ची फुले , कधी अतिशय विषारी किंवा दात पडणारे झुडूप, रंगासाठी वापरले जाणारे झुडूप वगैरे दाखवत असे. हा भाग बराचसा माझ्या डोक्यावरून गेला.
बरेच चाल चाल चालल्यावर एक लहान धरण आणि एकदाचे La Fouly गाव लागले. अर्थात एक उंच दरड चढल्यावरच गावातला मुख्य रस्ता लागला. डाव्या बाजूला मोठी मोठी हॉटेल्स , अगदी गोल्फ वगैरेही आणि उजव्या हाताला उंच उंच कडे. अर्थात आमच्या ट्रेकच्या बजेटमध्ये ही हॉटेल बसणारी नव्हती हे माहीतच होतं . पारू राहायला जाईल तेव्हा आम्ही तिचे पाहुणे म्हणून जाऊ वगैरे तिला चिडवले. तो रस्ता संपता संपेना. संपला तरी हॉटेलचा पत्ता नव्हता, तेव्हा कळले की डावीकडच्या झाडीतून अजून १०० एक फूट वर चढल्यावरच आम्हाला गती म्हणजे डोकं टेकायला जागा मिळणार आहे. पाय भरपूर बोलू लागले होते पण चढत राहिलो. वाट छान होती पण पोहोचण्याची घाई होती. लॉजच्या दारात सुंदर पाउंड केक आणि lemonade ने स्वागत झाल्याने प्रसन्न वाटले. बाहेर छान आरामखुर्च्या होत्या, वरून गाव आणि दरीचा, आणि डोंगरमाथ्याचा view सुंदर होता.
इथे मी प्रथमच एका छोट्या रिकाम्या जागेत दक्षिण पूर्वेकडे तोंड करून सईदला नमाज पढताना किंवा जी काही प्रार्थना असेल ती करताना पहिले. नुसते डोक्यात नोंदले गेले म्हणून लिहिले इतकेच, बाकी काही अर्थ नाही. बाकी आम्हाला कोणालाच असा काही व्याप नव्हता. अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे आतापर्यंतच्या रस्त्यात, गावांतसुद्धा कसे काय ते माहित नाही पण एकही चर्च , किमान क्रॉससुद्धा दिसलेला नव्हता.
राहण्याची जागा ( नेहमीप्रमाणे) ३ ऱ्या मजल्यावर, भरपूर वेडेवाकडे जिने अर्थात १५ किलोचा भर वाहत गेल्यावरच आली. पण एका प्रचंड मोठा लांबच्या लांब आणि रुंद असा हॉल होता. प्रत्येकाला स्वतंत्र बेड, एका रांगेत किमान ८ बेड होते. मध्ये भरपूर जागा. तिथे मोठे टेबल. मोठ्या खिडक्या. अगदी झक्कास होते. बाथरूमसाठी ३ मजले उतरून यावे लागले तरी काही वाटले नाही.
जेवायला स्विस raclette हा एक मस्त प्रकार होता. मांसाहारींसाठी पोर्क किंवा अन्य मांसाचे तुकडे, शाकाहारींसाठी उकडलेले बटाटे, टोमॅटो, छोट्या pickled आणि अत्यंत चविष्ट काकड्या, pearl onion प्लेट मध्ये घ्यायचे. समोर एक griddle आणि मध्य चौकोनी चमचा दिलेला होता. त्या चमच्यांत raclette चीज टाकून धग दिली की ते वितळते. ते गोल्डन brown चीज भाज्यांवर ओतायचे आणि स्वाहा !
तो प्रकार भलताच चविष्ट होता. मजा आली. त्यानंतर on the house म्हणून छोटे liquor shots आले. चीज पचायला कठीण, liquor पचनाला मदत करते असे सांगण्यात आले. At the end of such a grueling day it can help almost everything !
झोपायला वर आले, माझ्या शेजारी सुझन होती. आम्ही एरवी इथल्या तिथल्या गप्पा मारल्या असल्या तरी पर्सनल फारसे बोललो नव्हतो. तिला insta story साठी जरा मदत हवी होती, ती केली आणि तिने तिची सगळी कहाणीच मला सांगितली. मी ऐकत राहिले. तिची श्रोत्यांची गरज भागवत राहिले. आयुष्यातील सर्व कटकटीला कंटाळून ती म्युनिकमधून निघाली ते एका लग्नासाठी प्रथम एकटीच गाडी चालवत क्रोएशियाला गेली होती, तिथे फिरून मध्ये एक असा ट्रेक करून मग या पुढच्या TMB साठी आली होती. ट्रेक संपल्यावर मात्र शामनी मध्ये पार्क केलेली गाडी घेऊन पुन्हा म्युनिकला, जवळजवळ २ महिने आणि २००० मैलाचा प्रवास करून परतणार होती. अशा मंडळींबद्दल मला नेहमी अपार कौतुक असते. मी ते सढळ कंठाने केले, जरा pep talk दिला आणि काहीतरी चांगले केले या आनंदात झोपी गेले.
क्रमश: - https://www.maayboli.com/node/83846 -
सुरेख हाही भाग!
सुरेख हाही भाग!
सुरेख हाही भाग! >> +१
सुरेख हाही भाग! >> +१