
भाग ७ : ढोलकल, दंतेवाडा
दुसऱ्या दिवशी दि. २८-१२-२०२२ रोजी सकाळीच ७ वाजता तयार होऊन रूम बाहेर पडलो. हवा एकदम स्वच्छ होती. कोवळे ऊन अंगावर घेत थोडावेळ रिसॉर्टच्या आवारात हिंडत फिरत वेळ घालवला. थोडी फोटोग्राफी केली. तिघी जेष्ठ महिला गवतावर निवांत बसून गप्पांचा आस्वाद घेत होत्या तर मी आणि लेकीने झाडाला टांगलेल्या झुल्यावर बसून झोके घेतले. भोजनगृहात जाऊन नाश्ता आटोपला. ठरल्यावेळेवर किरणभैया हजर झाले.
आजच्या दिवसाचे खास आकर्षण म्हणजे चित्रकोट धबधब्याला भेट द्यायची होती. शिवाय जगदलपूर शहरात काही विशेष असेल तर ते देखील बघायचं होतं. छत्तीसगढची सांस्कृतिक राजधानी असलेल्या जगदलपूर शहरदर्शनाने आजच्या भटकंतीची सुरवात झाली.
काकतीय वंशातील १३वा राजा दलपत देवाने १७७० मध्ये आपली राजधानी मधोता येथून इंद्रावतीच्या दक्षिण तटावर हलवली आणि त्याचे नाव जगदलपूर ठेवले. राजधानीचे स्थलांतर आणि शहराच्या नामकरणाच्या इतिहासाच्या मनोरंजक कथा विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यानुसार एके दिवशी राजा दलपत देव आपल्या साथीदारांसह इंद्रावतीच्या या बाजूला शिकारीसाठी आला होता. तेव्हा एका सशाच्या भीतीने त्याचे पाळीव कुत्रे पुढे सरकले नाहीत. हे त्याने आपल्या साथीदारांना सांगितल्यावर या जागेला वीरभूमी मानून राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या काळात मराठ्यांच्या आक्रमणाची भीतीही होती आणि हे देखील राजधानीच्या बदलाचे एक कारण मानले जाते.
१७७० मध्ये जेव्हा काकतियांची राजधानी येथे हलवण्यात आली तेव्हा ही एक ‘महारा’ समाजाची ५० झोपड्यांची छोटीशी वस्ती होती आणि त्याचे प्रमुख जगतु महारा यांच्या नावाने 'जगतुगुडा' म्हणून ओळखले जात असे. जगतूच्या नावातले 'जग' आणि आणि दलपतदेववरून 'दल' हे नाव घेऊन त्याचे नाव ‘जगदलपूर’ पडले. आपल्या कुलदेवीची परवानगी घेऊन महारा समाजाने काकतीय राजांना या ठिकाणी स्थायिक होण्याची परवानगी दिल्याचा उल्लेख आहे. राजा दलपतदेवने शेतीच्या सिंचनासाठी म्हणून इंद्रावतीच्या वळणावर दलपत सागर नावाचा तलाव खोदला जे आज छत्तीसगड मधील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर आहे.
पुढील शंभर वर्षांत येथे ४०० झोपड्या आणि एक 'राजमहाल' असल्याचा उल्लेख आढळतो. हा राजमहाल म्हणजे आकाराच्या दृष्टीने इतरांपेक्षा जरा मोठी, माती - विटांच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेली झोपडी. पुढे इंग्रजांची मदत घेऊन इथल्या संस्थानिकांनी लंडनच्या धर्तीवर या शहराचा विकास करण्याची योजना केली होती. ब्रिटीश प्रशासक कर्नल जेम्स यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. रस्त्यांचे रुंदीकरण करून दोन्ही बाजूंनी ड्रेनेजसाठी पुरेशी जागा सोडण्यात आली. अरुंद गल्ल्या हटवून विस्थापितांना मोकळ्या जागेत स्थायिक करण्यात आले. त्या काळात जातीनुसार मोहल्ले ('पारा-टोला') वसवले. जगदलपूरला 'चौक-चौराहों का शहर' हे विशेषण याच काळात प्राप्त झाले.
आज उभा असलेला राजमहाल मात्र महाराजा भैरमदेव यांनी बांधला. उत्तरेला सिंहद्वारावर दंतेश्वरी मंदिर, राम, कृष्ण, लक्ष्मीनारायण, शीतला आणि कर्णकोटीन मंदिरे, दक्षिणेला मावळीमाता, राम आणि जगन्नाथ मंदिरे, पूर्वेला बालाजी मंदिर आणि पश्चिमेला काली कंकालीन मंदिर बांधले गेले व १८९१ मध्ये रुद्रप्रतापदेव सिंहासनावर आरूढ झाले.
इथले शस्त्रागार आणि येथे संग्रहित केलेली स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळातली जुनी छायाचित्रे आणि हा इथला एक महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे राजमहल हा बस्तरमधील काकतीय राजांच्या ७०० वर्षांच्या इतिहासाचा मूक साक्षीदारही मानला जातो.
१८९१ साली राजा भैरम देवाच्या मृत्यूनंतर त्यांचा सात वर्षीय मुलगा रुद्रप्रताप देव बस्तरच्या गादीवर बसला त्यावेळी इंग्रजी राजवट चरम शिखरावर होती. रुद्र प्रताप त्याच्या काकाच्या, कालिंदर सिंहच्या देखरेखीत राज्यकारभार बघू लागला. कालांतराने रुद्र प्रताप उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेला असता कालिंदर सिंहने आदिवासी प्रजेला आपल्याकडे वळवून रुद्र प्रतापच्या विरोधात उभे केले.
पुढे रुद्रप्रताप देवच्या निधनानंतर त्याच्या एकुलत्या एक मुलीला, प्रफुल कुमारीला बस्तरची कार्यवाही महाराणी घोषित करून तिच्या अल्पवयीन मुलाचा प्रवीरचंद्र भंजदेव याचा राज्याभिषेक केला. प्रफुलकुमारी अतिशय लोकप्रिय महाराणी होती. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीची पोस्ट - ग्रॅज्युएट असलेल्या या महाराणीने बस्तरच्या आधुनिक विकासात फार महत्वाचे योगदान दिले आहे. अनेक दवाखाने, शाळा तिने स्थापन केल्या. पुढे अपेंडिसाइटिसच्या उपचारांसाठी तिला लंडन येथे हलवले असता चुकीच्या उपचारामुळे महाराणीच्या मृत्यू ओढवला (काही तज्ज्ञांच्या मते तिला मुद्दाम चुकीची ट्रीटमेंट देण्याचे इंग्रज सरकारचे आदेश होते).
महाराणीच्या मुलगा प्रवीरचंद्र भंजदेव हा बस्तरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय शासक ठरला. १९४८ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने बस्तर संस्थानाचे विलीनीकरण झाले. त्या काळात बस्तरचे महाराज प्रवीरचंद्र भांजदेव आदिवासींमध्ये खूप लोकप्रिय होते. महाराज प्रवीरचंद्रांनी बस्तरच्या आदिवासींसाठी केलेलं कार्य इतकं मोठं आहे कि आजही त्यांना आदिवासींचा देव म्हटले जाते. आदिवासींचा आवाज लोकशाही मार्गाने सरकारपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र 'आदिवासी विकास पार्टी'ची स्थापना केली. त्यांच्या पार्टीने विधानसभेत १० पैकी ९ जागांवर दणदणीत यश मिळवलं होतं. हि पार्टी बस्तरच्या जन, जल आणि जंगल यांच्या कल्याणासाठी कार्यरत होती. पुढे १९६१ भारत सरकारशी झालेल्या मतभेदामुळे मध्ये त्यांनी स्वत:ला भारताच्या राजवटीतून मुक्त करून बस्तरमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला ज्यामुळे त्यांना सरकारने काही दिवस कारावासात टाकले होते. २५ मार्च १९६६ रोजी राजाजींची पोलिसांकरवी गोळीबार करवून हत्या करण्यात आली. या हत्याकांडात राजवाड्यातील बरेच लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर भयंकर दंगली उसळल्या. बस्तरच्या जनतेत सरकारबद्दल तीव्र संताप निर्माण झाला. सरकारविरोधी द्वेषभावना पराकोटीला पोहोचली आणि याच द्वेषाला आधार बनवत छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी चंचुप्रवेश केला. आणि आज हीच भारताची सर्वात मोठी अंतर्गत समस्या बनली आहे.
सध्या राजमहालात काकतीय घराण्यातील २३वे राजा कमलचंद्र भांजदेव आपल्या कुटुंबासहित राहतात.
जगदलपूर राजमहलच्या आवारातच दंतेश्वरी मंदिर आहे. हिला 'छोटी माँ' म्हणतात. दंतेवाडा येथील दंतेश्वरी देवी 'बडी माँ'. मंदिरात दंतेश्वरी समवेत महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीची पूजा-अर्चना होते. मूळ मंदिराप्रमाणेच येथेही (इच्छापूर्ती करणारा) गरुडस्तंभ आहेच. त्याच्याकडे "काल फ्रुटी प्यायल्याने बसलेला घसा लवकर बरा व्हावा" अशी लेकीने इच्छा व्यक्त केली. बाजूलाच दंतेश्वरीची छोटी बहीण मानलेल्या हिंगलाज देवीचे प्राचीन मंदिर पण आहे.
मंदिराच्या महाद्वाराबाहेर चौकात एक लाकडी रथ उभा दिसतो. 'बस्तर दशहरा' या इथल्या प्रसिद्ध दसऱ्याच्या उत्सवात वापरल्या जाणाऱ्या या रथाची कहाणी मोठी रोचक असून ती इथे सांगणे म्हणजे फार अवांतर होईल. (त्यासाठी 'बस्तर दशहरा' वर स्वतंत्र लेख लिहिण्याचा विचार आहे).
दंतेश्वरीच्या खालोखाल बस्तरचे आराध्य दैवत म्हणजे जगन्नाथ. राजमहाल परिसरात दुसरे प्रमुख मंदिर श्री जगन्नाथाचे आहे. १५व्या शतकात बस्तरचे महाराज पुरुषोत्तम देव हे स्वतः जगन्नाथपुरीला पायी चालत जाऊन प्रभूंच्या मूर्ती घेऊन आले. ज्यांची स्थापना जगदलपूरच्या जगन्नाथ मंदिरात झाली. जगन्नाथपुरीच्या धर्तीवर येथे देखील ऐतिहासिक गोंचा उत्सव साजरा होतो ज्यात बलभद्र-सुभद्रेसहित भगवानांची रथयात्रा निघते.
सध्याचे राजा कमलचंद भांजदेव हे ‘इथल्या भूमीचे पुजारी’ या नात्याने चांदीच्या झाडूने 'छेरा पोरा' विधी करतात. जगन्नाथपुरीत सोन्याच्या झाडूने हा विधी केल्यानंतरच बस्तरमध्ये हा विधी केला जातो.
मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंनी देवड्या असून येथे पहारेकरी राहत असत. आत गेल्यावर एखाद्या जुन्या वाड्याप्रमाणे चारी बाजूंनी अनेक खांबांच्या ओसऱ्या आणि मध्ये विस्तीर्ण चौक आहे.
एका बाजूच्या प्रशस्त दालनात भगवान जगन्नाथाच्या चौदा प्रकारच्या वेशभूषेतील शृंगार केलेल्या प्रतिमा मांडून ठेवल्या आहेत.
समोरच्या सिरसार चौकात बस्तरच्या पुरातात्विक संग्रहालय आहे. थोडं पुढे गेल्यावर दलपत तलावाच्या काठी वेंकटेश्वर बालाजी मंदिर आहे. २० वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेले हे मंदिर आज जगदलपूरातील एक प्रमुख धार्मिक स्थळ बनले आहे. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेल्या या मंदिराचा आकार एखाद्या रथाप्रमाणे आहे.
परिसरात विष्णूच्या दशावतारातल्या प्रतिमा जागोजागी स्थापन केलेल्या आढळतात.
आतमध्ये बालाजीसमोर काही गायक वादक संगीतसेवा देत होते. गरमगरम शिऱ्याचे प्रसाद वाटप चालू होते.
थोडावेळ तेथेच मंडपात बसलो. परिसराचे फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला निघालो.
क्रमशः
प्रतिक्षा संपली।
प्रतिक्षा संपली। नेहमीप्रमाणेच सुंदर आहे वर्णन आणि फोटोही। या लेख मालिका मधून हौशी पर्यटकांना आकर्षित करत करत लेखमाला मनिम्याऊ नी रंगतदार केली हे आग्रह पूर्वक सांगावेसे वाटते। आता उत्सुकता आहे चित्रकोट धबधबा पाहण्याची। मनिमाऊ खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा।
मागील सगळ्या भागांची लिंक
मागील सगळ्या भागांची लिंक पाठवली तर सगळे भाग एकत्रित वाचता येतील।
सुंदर वर्णन आणि फोटोही !
सुंदर वर्णन आणि फोटोही !
Thanks
Thanks
Meena183, Kumar sir.
पुढील भाग लवकरच टाकते.
किती unexplored एरिया आहे हा
किती unexplored एरिया आहे हा
सुंदर देखील
झकास ! पु भा ल टा
झकास !
पु भा ल टा
सुंदर वर्णन आणि फोटो ही.
सुंदर वर्णन आणि फोटो ही.
काय एकसे एक भारी जागा आहेत.
काय एकसे एक भारी जागा आहेत. राजवाडा फार आवडला. असाच थोडाफार जव्हारचा राजवाडा आहे. अनेकवर्षांपूर्वी एकदा आम्ही तो थोडा आतून बघितला होता.
मूळ मंदिराप्रमाणेच येथेही (इच्छापूर्ती करणारा) गरुडस्तंभ आहेच. त्याच्याकडे "काल फ्रुटी प्यायल्याने बसलेला घसा लवकर बरा व्हावा" अशी लेकीने इच्छा व्यक्त केली. >>> हे कसलं क्युट आहे.
राजे आणि आदिवासींच्या गोष्टी
राजे आणि आदिवासींच्या गोष्टी आवडल्या. फ्रुटी किती गोड.
माहितीपूर्ण व रंजक झाला आहे हाही भाग. फोटोही आवडले.