Tour du Mont Blanc भाग ४ - पहिला दिवस

Submitted by वाट्टेल ते on 6 August, 2023 - 13:38

रविवार २५ जून. हॉटेलमध्ये जास्तीच्या बॅग ठेऊन दिल्या. Chamonix GARE SNCF उर्फ Chamonix रेल्वे स्टेशनला uber ने जायचे ठरले होते पण हॉटेलवाल्याने उबर मिळणार नाही असे सांगितले ( tripadvisor च्या नानाची टांग !). टॅक्सीबद्दल विचारल्यावर एक दोन नंबर देऊन आज रविवारी हे ही मिळणार नाहीत असे गोड आवाजात सांगितले. १५ किलोच्या बॅग आणि बॅगपॅक घेऊन नेहमीच्या स्टॉपला आलो. एरवी अगदी वेळेत असणाऱ्या बस रविवारी लेट. एकदाची बस आली. गर्दीत घुसलो आणि ( त्यातल्या त्यात) सोयीच्या stop ला उतरलो. मग १०-१५ मिनिटे १५ किलोहून अधिकच भरलेल्या बॅग आणि बॅगपॅक घेऊन आमची वरात Chamonix रेल्वे स्टेशनला चालत चालत निघाली. ७ दिवसात ११० किमी चालण्यासाठीच इथे आलो असलो तरी ती १० मिनिटे काही मंडळींनी ‘किती ती गैरसोय’ चे माफक हावभाव केले. सर्व planning माझे असल्याने मला अपराधी भावना. आधी विमानांनी सर्व गोंधळ झालेला, आतातरी वेळेवर पोहोचतो की नाही असे वाटले. एकदाचे पोहोचलो . फ्रेड या आमच्या मुख्य गाईडला भेटलो. सर्व पार्सले एकदाची त्याच्या हवाली केल्यावर मला हायसे वाटले. आता ज्याचे त्याचे पाय - ज्याने त्याने बघून घ्यावे, अशी भावना झाली. मी सुद्धा इथे प्रथमच एक प्रवासी म्हणून आले होते, आता कोणाकडेही लक्ष न देता आपण आपला ट्रेक enjoy करायचा असे ठरवले.
4_1.jpg
आम्ही ७ जण, शिवाय जर्मनीमधील सुझन , ऑस्ट्रेलिअन जेस आणि तिच्या मैत्रिणीची आई शॅरन, अबूधाबीचा सईद आणि CERN मधून रिटायर्ड झालेला जरासा वयस्कर मार्क असा आमचा group होता. मार्कने हा ट्रेक बाईकवरून पूर्वी केलेला. तो त्याच भागातला, भरपूर ट्रेक केलेला प्रचंड अनुभवी, उंच. तो सर्वांच्या पाठी धीरदात्तपणे हळू हळू चालत असे. अनेक वेळा फ्रेड त्याच्यावर assistant सारखा विसंबून असे. आमचे १५ किलोचे बोजे गाडीवाल्याला दिले, लंचसाठीचे सामान बॅगपॅकमध्ये भरून पाठीला लावली आणि चालायला सुरुवात केली.

या भागात भरपूर वेगवेगळ्या रेस, अख्खी TMB सुद्धा असते. फ्रेडने पूर्वी ४४ तासांत १६०-१७० किमीचे पूर्ण TMB केले होते. त्या दिवशी पण अशीच कोणतीतरी रेस होती आणि त्यातले रनर्स - विनर्स एकेक करून येत होते. सुरुवातीला गावातून चालताना तिची मजा, उत्साह बघायला मिळाला. लवकरच रस्ता संपून पायवाट लागली. बाजूला पॅराशूट घेऊन बऱ्याच लोकांचा आकाशात मुक्त विहार चालू होता. वाट क्वचित घरांच्या पुढून , मागून जात होती. त्या सुंदर, सुबक , टुमदार घरात डोकावून बघण्याचा मोह आवरला नाही. अर्थात आत काहीही दिसले नाही. मात्र प्रत्येक खिडकी आणि जिथे म्हणून जागा दिसेल तिथे भरपूर कुंड्या आणि त्यात वेड्यासारखी बहरलेली सुगंधी रंगीबेरंगी फुले. संपूर्ण ट्रेकभर गाव आले की असेच असायचे. लहानपणी वाचलेल्या fairy tails च्या पुस्तकांतली चित्रेच डोळ्यांसमोर दिसत होती. किरण कुलकर्णींना गाण्याची लहर आली की ते हे एक गाणे सुरु करायचे

हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन
के जिसपे बादलो की पालकी उड़ा रहा पवन
दिशाये देखो रंगभरी चमक रही उमंग भारी
ये किस ने फूल फूल पे किया सिंगार है
ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार

हे गाणं , गाणं म्हणून मला फारसं आवडत नाही तरी शब्द तंतोतंत होते हे खरेच. सुंदर पायवाट, माफक चढ उतार , रस्त्याला फुललेली ता ना पि हि नि पा जा रंगांच्या असंख्य छटांची रानफुले.
4_2.jpg
उजव्या हाताला पर्वतरांगेतील लहान मोठी शिखरे. पुढून फ्रेड आणि पाठून मार्क प्रत्येकाची माहिती आणि महती सांगू लागले. बहुतेक वेळा अमुक alpenion इथे चढाई करायला गेला आणि नंतरची दुर्दैवी कहाणी. मी मनात म्हटले की जरा बऱ्या कथा पण सांग की.
4_5.jpg
आमच्या आगे मागेच utracks चा अजून एक ग्रुप होता. त्यांची गाईड एक मस्त मध्यमवयीन बाई होती. तिचे आणि फ्रेडचे अधूनमधून फ्रेंचमध्ये गोड गुटरगू चालायचे. आम्ही चालताना इतर जे ४-५ मेम्बर्स होते त्यांच्याशी ओळख वाढवत होतो, गप्पा मारत होतो. ऑस्ट्रेलियन शॅरनला क्रिकेटमध्ये रस आणि माझ्या मुलाला तर भारीच. Ashes चालूच होती तेव्हा त्यांचे बऱ्यापैकी जमले. पहिले तास २ तास वेगवेगळ्या combination मध्ये त्या सर्व नुकत्याच ओळख झालेल्यांशी इतक्या गप्पा झाल्या की फ्रेड अवाक झाला. १ च्या सुमारास लंचला थांबलो ते एका सुंदर ओढ्याच्या कडेला, झाडांच्या सावलीत.
4_3.jpg
आमच्या बॅगपॅकमध्ये भरलेल्या विविध गोष्टी बाहेर काढल्या. प्रत्येक दिवशी उत्तम ब्रेड आणि वेगवेगळे चीज, शिवाय अफलातून सॅलड्स ( त्या फ्रेड करायचा) , मग चॉकोलेट्स , कधी yogurt, रसरशीत केळी, आलुबुखार, पीच, नेक्टरीन, अंडी, मांसाहारी मंडळींसाठी sausage वगैरे. मांसाहारी मंडळींची मुख्य पंचाईत अशी झाली की मांसाहारात पोर्कच मुख्यतः होते. चिकन व फिश एकेकदा. सईदला पोर्क निषिद्ध म्हणून बहुतेक बीफ होते जे आमच्या मांसाहारींना चालले नसते. पुढच्या वेळी काय हवे यापेक्षा काय चालणार नाही हे सांगण्याची सूचना देण्यात आली. शाकाहारींना काहीच अडचण नव्हती. जेवण झाल्यावर प्लेट्स बाजूच्याच खळाळत वाहत्या ओढ्यात धुवाव्या की पानांनी साफ करून मुक्कामाच्या ठिकाणी धुवाव्या व त्या अनुषंगाने जलप्रदूषण वगैरे घनघोर चर्चा झाल्याचे आठवते. मी फक्त बर्फाचे पाणी असल्याने थंडगार असलेल्या ओढ्याच्या पाण्यात पाय बुडवले (जलप्रदूषणाच्या भीतीने घाबरत घाबरत) आणि गरम झालेल्या पायांचे लाड पुरवले. एकूण तसे गरम होते, फ्रान्समध्ये डोंगरात असू नये तसे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे विचार आणि एकूणच सगळे इतके स्वच्छ होते की आपल्या अस्तित्वाने आणि जगण्याने ते घाण करीत आहोत असा अपराधगंड अशा विचारात पुढे चालत राहिले.
मध्ये एक ब्रेक घेतला तिथे ३-४ जण भारी rock climbing करताना दिसले. आमच्या अस्तित्वाची दखल न घेता त्यांचे चालले होते आणि एखादा परफॉर्मन्स बघावा तसे श्वास रोखून आम्ही बघत होतो, टाळ्याही वाजवत होतो. चालताना जरासा विरंगुळा. मग पुढच्या रस्त्याला लागलो. ३ च्या सुमारास बहुतेक गाव दिसू लागले - Argentine नावाचे.
4_4.JPG
फुलांचे ताटवे, ओढे, ब्रिज, लहान मोठी घरे, सरकारी कचेऱ्या, हॉटेल. कुठे बघू आणि कुठे नको. गोल दंड फिरवून घेण्याचे वॉटर फौंटन पण होते आणि त्यातून बर्फासारखे गार पाणी. पारुने लगेच पुढला प्लॅन जाहीर केला की ती इथे airbnb वगैरे घेऊन कधीतरी महिनाभर राहणार आहे. असे कोणतेही गाव आले की हे प्लॅन जाहीर व्हायचे. आम्ही सुद्धा - तुम्ही गेलात की पाहुणे म्हणून आम्ही येतोच लगोलग वगैरे चेष्टा चालायची. इथे लोकांनी कॉफी वगैरे घेतली आणि Le Tour च्या रस्त्याला लागलो. तो रस्ता जरा वैतागवाणा होता म्हणजे इतर दिवशीच्या सुंदर routes च्या मानाने . आधी Trient चा फाटा लागला पण तो पाठी टाकून आम्ही Le Tour च्या दिशेने निघालो. मध्ये मध्ये अमुक ठिकाणी avalanche आल्याने जागच्या जागी कसे लोक गेले वगैरे दाखवणे चालू होते. त्याचे वर्णन इतके प्रत्ययकारी होते की आता वरून एका क्षणात काहीतरी आपल्यावर कोसळून राम नाम सत्य होईल वगैरे भीती वाटायला लागली. अखेर डाव्या बाजूला एका उंचवट्यावर एक लहान बिल्डिंगसारखे दिसू लागले, आपण तिथेच राहणार आहोत असे कळल्याने मंडळी जोमाने चालायला लागली पण अख्खा वळसा घालून तिथे पोहोचेपर्यंत अर्धा तास तरी गेला.
4_6.jpg
Le Tour मुक्कामी पोहोचलो.
4_7.jpg
राहण्याच्या सगळ्या ठिकाणी एक सोय उत्तम होती. Hiking shoes, poles एका बाहेरच्या खोलीत काढायचे आणि मग slipper चपला जे काही असेल ते घालून तिथे वावरायचे. त्यामुळे बुटाची घाण आत येत नसे. आमचे सामान आलेले होते. आणि राहण्याची जागा ३ ऱ्या मजल्यावर. १५ किलोचे पोते उचलून मजल दरमजल करत तिथे पोहोचलो. रांगेने लहान लहान खोल्या, प्रत्येक खोलीत ३-४ Bunk bed अशी रचना. खिडकीतून खालचे खोरे अफाट दिसत होते. बाथरूम अतीव स्वच्छ. अंघोळीला गरम पाणी. अजून काय हवे ?
पहिल्या दिवसापासून एक क्रम ठेवला. दुसऱ्या दिवशीचे कपडे आणि इतर सामान - माझे व चिरंजीवांचे काढून ठेवायचे म्हणजे सकाळी शोधाशोध करायला नको. चिरंजीवांनी बॅगेत भरलेल्या नको नको त्या गोष्टी काढून जरा बॅगपॅक हलकी करायची. नवऱ्याला सेल्फ सर्विस होती. मी चिरंजिवांची valet असल्यासारखे एकूण चालले होते. रोज मुक्कामी पोहाचलो की पारूचे अंथरुणावर पडणे आणि माझे व महावस्ताद वकिली युक्तिवाद करणाऱ्या चिरंजीवांचे तुंबळ वाग्युद्ध जुगलबंदी चालायची. पारूला पडल्या पडल्या करमणूक. चिरंजीवांची दिवसभरातील घडामोडी, राहण्याची जागा यावर विशेष टिप्पणी आणि त्यावर दोघांनी hysterically हसत राहायचे. हा शो रोजचा.

अनिता आणि DS सार्वजनिक नळावर पाणी भरणाऱ्यांच्या त्वेषाने अंघोळ करून आवरण्याच्या कामात. नवऱ्याने खास ट्रिपसाठी मोठी लेन्स घेतलेली , तो कॅमेरा घेऊन भलतीकडे. इतर मेम्बर आमच्या देशीपणाला जरा घाबरून, सांभाळून आपापले आवरत. एकूण सोय कल्पनेपेक्षा अतिशय झकास होती. अंघोळीसाठी नंबर लागण्याची वाट बघत असताना एक मध्यमवयीन , जरा वयस्करच जोडपे समोर आले. बाईंनी केस नुसतेच धुवून सोडले होते. तिच्या नवऱ्याने मला अचानक रेफ्री केलं . “काय वाटतं तुला - हिने खाली कॉमन रूम मध्ये जाण्याआधी जरा केस नीट करायला पाहिजेत ना ? “ काकू म्हणाल्या - “इतकं वाईट दिसत नाहीये, नाही का ? काय वाटतं तुला ?” ते नक्की माझ्याशीच बोलताहेत ही खात्री केली , काकूंना म्हटले - जरा ब्रश तरी फिरवा, बरे दिसतील. काकूंना पटले, काका खूष झाले. कॉमनरूममध्ये पुन्हा भेटल्यावर ‘my body my choice’ वर लहानसे भाषण काकांना दिले. काकू पण खूष.

फ्रेश होऊन तीन मजले खाली उतरलो आणि कॉमन रूम मध्ये टेबलापाशी आपापली कॉफी - ड्रिंक्स घेऊन गप्पा मारत बसलो. आमच्यापाशी चकली - कचोरी वगैरे खुसखुशीत माल होता, गोरे लोक आवडीने खात होते. नवरा आग्रहाने वाढत होता. तरी पहिल्या दिवशी आमचे देशी लोकांचेच टेबल झाले, तेव्हा दुसऱ्या ब्रेकफास्टपासून मात्र आवर्जून वेगवेगळे, सरमिसळ करून किंवा सगळेच एकत्र बसलो. पहिल्या दिवशी चक्क
पुलाव बिर्याणीच्या जवळ जाईल असा curry मध्ये शिजवलेला उत्तम भात होता. आंब्याचे आईस्क्रीम. सॅलड , चीज ब्रेड तर असायचेच.
4_8.jpg4_9.jpg
यंदा भरपूर रेकॉर्डेड गाणी आणली होती. संध्याकाळी बाहेर बसून डोंगरदऱ्या बघत यमन, मारवा,मारुबिहाग काही ना काही ऐकायचे ठरवले होते पण आज काहीच झाले नाही. जेवण झाल्यावर फ्रेडने ३-४ वेगवेगळे नकाशे जोडून जमिनीवर ठेवले. चांगले ८ x ८ फूट तरी असेल आणि ट्रेकबद्दल आमची शाळा चालू झाली. आज फ्रांस, मग ३ रात्री स्वित्झर्लंड, १ इटली आणि शेवटी पुन्हा फ्रांस, terrain कसे बदलेल, snow कुठे आहे, steep कुठे आहे, extreme downhill कुठे याची उजळणी झाली. लोकांना दुनियाभरचे प्रश्न आणि मला काहीच नाहीत. जो होगा वो देखा जायेगा. उद्या फ्रांस स्वित्झर्लंड सीमा क्रॉस करण्याच्या उत्सुकतेत झोपी गेलो.

क्रमश: - https://www.maayboli.com/node/83835 -

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे. फोटो सरळ करायचे प्रयत्न निष्फळ झालेत आधी, माबोवर अपलोड की केला की पुन्हा आडवा. बघते, शोधते जरा.