मनीमोहोर यांच्या पावसावरच्या लेखामुळे मला हा माझा गेल्या वर्षी बंगळूर महाराष्ट्र मंडळाच्या अंकासाठी लिहिलेला लेख आठवला म्हणून इथे आणत आहे!
प्रिय मृद्गंधास,
यावर्षी तुझ्याशी जरा चुकामूकच झाली. आपली भेट वारंवार होत नाहीच म्हणा. होते दरवर्षी एकदोनदाच. पण जेव्हा तू येतोस, तेव्हा जो आनंद मनात दाटून येतो, तो पुढच्या भेटीपर्यंत पुरतो. अगदी खरं सांगायचं, तर तो काही निर्भेळ आनंद नसतो. एक हुरहूर कायम तुझ्या आगमनासोबत जोडली गेलेली आहे लहानपणापासूनच. तू आलास, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी संपत आली. तू आलास, म्हणजे सुट्टीला आलेल्या भावंडांबरोबर उन्हातान्हात भटकण्याचे, खेळण्याचे, गप्पा मारण्याचे, हसण्या-खिदळण्याचे, मनसोक्त आंबे-फणस खाण्याचे दिवस संपत आले, ही जाणीव टोचायला लागायची लहानपणी. पण तरी तू तेव्हाही आवडायचास. मुक्त मजेचे दिवस संपून परत चाकोरीबद्ध वर्ष सुरू होताना तुझी जुनी, ओळखीची सोबत कदाचित आश्वासक वाटायची. कारण काहीही असो, तुझं येणं म्हणजे किंचितशा हुरहुरीमुळे अधिकच हवासा वाटणारा आनंद!
तुझ्या येण्याची चाहूल एखाद्या दिवशी सकाळीच लागते, भरून आलेलं आभाळ बघितल्यावर. दिवसभर वातावरणनिर्मिती करून, कधीकधी एकदोन दिवस वाट पहायला लावून मग संध्याकाळी तू अवतरतोस. सोसाट्याचा वारा, काळ्या ढगांचा गडगडाट, लखलखणारी वीज असे तुझे रौद्र जोडीदार. पण तुझ्यात मात्र नावालाही रौद्रता नाही. तू हळुवार, मखमलीच. मातीचा मऊशारपणा आणि पाण्याची शीतलता यांचा संगमच तू. वीज, वारा आणि ढगांच्या वाद्यमेळाने सजलेल्या मैफिलीत तू म्हणजे पहिला सूर. इतका सच्चा, मनाला भिडणारा, की तू सगळ्यांनाच ’आपला’ वाटतोस.
तू कवींचा लाडका आहेस, यात नवल ते काय! बोरकर ’गडद निळे गडद निळे’ कवितेत म्हणतात, ’वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले’. जमिनीतून येणारा तू म्हणजे भूमीचा आशीर्वाद, ही कल्पनाच किती सुंदर आहे! कवयित्री पद्मा गोळ्यांची ’ग्रीष्मातल्या सकाळी’ ही कविता म्हणजे तर तुझ्याशी जोडल्या गेलेल्या आनंदाचं आणि हुरहुरीचं अगदी यथार्थ वर्णन! आकाशात भरून आलेल्या मेघांमुळे कवयित्रीच्या मनावर आलेलं मळभ दूर करताना ’ सद्भाग्य केवढे हे, आले भरून मेघ’ या कल्पनेने रोमांचित झालेला चाफा म्हणतो, ’होईल तृप्त धरणी, मृद्गंध दरवळेल’.
ग्रीष्माच्या चटक्यांनी तापलेल्या, तहानलेल्या धरणीवर पावसाचे पहिले थेंब पडतात, तेव्हा ती जणू आनंदाने निःश्वास सोडते. शास्त्रीय दृष्टीने बघितलं, तरी तुझ्या निर्मितीचं रहस्य असंच काहीसं आहे. उन्हाळ्यात झाडांमुळे, मातीत असणार्या जीवाणूंमुळे तयार झालेली द्रव्यं पावसाचे पहिले थेंब पडताच हवेत उधळली जातात आणि तू येतोस!
तुझ्या नावाचं अत्तरही मिळतं. पेट्रिकोर परफ्यूम. ते बनवण्याची प्रक्रिया जितकी निगुतीची आणि अवघड, तितकं ते अत्तरही महागडं. असणारच म्हणा. तुझ्यासारख्या नाजूक, अस्सल नैसर्गिक गंधाची निर्मिती करणं माणसासाठी सोपं नाही. तू कितीही आवडत असलास, तरी मी तुझ्या नावाचं हे अत्तर कधी विकत घेईन असं मात्र मला वाटत नाही. निसर्ग ज्याची उधळण मुक्त हस्ते करतो, ते बंद कुपीतून कशासाठी मिळवायचं? ती कुपी हवी तेव्हा उघडून कदाचित तुझी भेट होईलही, पण तू म्हणजे केवळ मातीचा गंध नव्हेस, तर त्या गंधाची दुर्लभता, अनपेक्षिततासुद्धा तुझ्यातच सामावलेली आहे. ती काढून टाकली, तुला सहजप्राप्य केलं, तर तू, तू उरणार नाहीस!
त्यामुळे, जेव्हा तू उत्स्फूर्तपणे येशील, तेव्हा भेटूया.
-विशाखा
वा किती सुंदर आणि तरल लिहिलं
वा किती सुंदर आणि तरल लिहिलं आहेस वावे. खुप आवडलं
धन्यवाद मनीमोहोर. (हो ना,
धन्यवाद मनीमोहोर. (हो ना, एरवी तरल वगैरे लिहिण्याचा माझा स्वभाव नाही, पण हे लिहिलं खरं
)
किती सुंदर लिहिलंयस!
किती सुंदर लिहिलंयस!
सुंदर!
सुंदर!
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
खूप छान.. यानिमित्ताने आठवलं
खूप छान.. यानिमित्ताने आठवलं,
पेत्रिकोरवर एक ललितकथा होती मायबोलीवर.. कंनोजचं हे मृदगंधीअत्तर बनवतात तिथलं वर्णन, नायिकेसोबत बहुतेक फ्रेंच माणूस असतो..
खूपदा शोधली होती ही कथा.. पण नाहीच सापडली.
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहेस.
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
’वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले’. जमिनीतून येणारा तू म्हणजे भूमीचा आशीर्वाद >>> हे फार सुंदर आहे!
कॅलिफोर्नियामधे मला मातीचा वास आठवत नाही. पण त्याचा संबंध कॅलिफोर्नियापेक्षा बाहेर असलेले प्रचंड अर्बनायझेशन व त्यामुळे सुटी नैसर्गिक माती जवळपास नसल्याने असेल. पण अमेरिकेत इतर ठिकाणी एकदा पावसाच्या सुरूवातीला जेव्हा हा गंध जाणवला तेव्हा एका झटक्यात पुण्यातील जून महिना आठवला होता!
खूपच छान. वाचताना मृदगंध
खूपच छान. वाचताना मृदगंध भासवणारा लेख
>> सुंदर आणि तरल
+१
पेट्रिकोर परफ्यूम माहिती नव्हते. सहज पाहिले अमेझॉनवर आहे. होय, महागडे आहे. एक मिली साठी ५०० रुपये
निसर्ग कोट्यवधी रुपयांची मुक्तहस्ताने उधळण करत असतो...
मस्त!
मस्त!
सुंदर!
सुंदर लिहिलंयस!
'माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार' ही गदिमांची एक सुंदर कविता होती आम्हाला. तिच्यातही मृद्गंधाचा उल्लेख आहे. अशीच एकदम आठवली म्हणून इथे देते. यातला शेवटचा विचारही खूप उच्च आहे.
माऊलीच्या दुग्धापरी, आले मृगाचे तुषार
भुकेजल्या तान्ह्यासम, तोंड पसरी शिवार !
तुकोबाच्या अभंगाला, टाळ चिपळ्यांची साथ
वाजताहे रानवारा, चिवारीच्या झुडुपांत !
पिऊनिया रानवारा, खोंड धावे वारेमाप
येता मातीचा सुगंध, स्तब्ध झाला आपोआप
अवखळ बाळापरी, पक्षी खेळतो मातीत
उभारल्या पंखावरी, थेंब टपोरे झेलीत !
धारा वर्षता वरून, बैल वशिंड हालवी
अवेळीच फुटे पान्हा, गाय वत्साला बोलवी !
गावानेच उंच केला, हात दैवी प्रसादास
भिजूनिया चिंब झाला, गावदेवीचा कळस
निसर्गाने दिले धन, द्यावे दुसऱ्या जाणुनी
झाली छप्परे उदार, आल्या पागोळ्या अंगणी !
स्नान झाले धरणीचे, पडे सोन्याचा प्रकाश
आता बसेल माऊली, अन्नब्रह्माच्या पूजेस !
- ग. दि. माडगूळकर
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
अजिंक्यराव, विपू पहा.
मामी, काय सुंदर कविता आहे.. आहा.. खास गदिमा! धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल.
खूपच छान लिहिल आहे
खूपच छान लिहिल आहे
वाचताना मृदगंध भासवणारा लेख, >> सुंदर आणि तरल
+१००
खूप खूप सुंदर लेख. मखमली.
खूप खूप सुंदर लेख. मखमली.
सुंदर लेख.
सुंदर लेख.
मलाही "पिऊनिया रानवारा, खोंड धावे वारेमाप, येता मातीचा सुगंध, स्तब्ध झाला आपोआप" एवढ्या ओली आठवतात मृद्गंध आला की, बाकी कविता लक्षात नव्हती. पूर्ण कविताही सुंदर.
ओहो !! किती सुरेख लेख !! एकदम
ओहो !! किती सुरेख लेख !! एकदम मखमली
नशिबाने इथे कडक उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस पडल्यावर मस्त वास येतो मातीचा .. अर्थातच भारताची आणि त्या दिवसांची आठवण येते. आपल्या स्मृती वासांशी निगडित असतात!
छानच लेख. तुमचे निसर्गाशी
छानच लेख. तुमचे निसर्गाशी जवळचे नाते आहे ते अगदी कळून येते.
तुझ्या नावाचं अत्तरही मिळतं. पेट्रिकोर परफ्यूम. ते बनवण्याची प्रक्रिया जितकी निगुतीची आणि अवघड, तितकं ते अत्तरही महागडं>> तेच लिहायला आलेले. हे बनवायला फार अव घड आहे. कन्नोज जिथे भारतातली पारंपारिक इत्र इंडस्ट्री आहे. तिथले मिट्टी का इत्र फार फेमस आहे. बनवण्याची प्रक्रिया मॅन्युअल व अवघड आहे. ह्यांचे रोझ गुला ब, हीना पण फार फेमस आहे.
मामी तुम्ही कोट केलेली गदिमांची कविता आम्हाला पण शिकायला होती कुमार भारतीत.
सर्वांना धन्यवाद _/\_
सर्वांना धन्यवाद _/\_
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
सुंदर लेख !
सुंदर लेख !
ढगांच्या वाद्यमेळाने सजलेल्या
ढगांच्या वाद्यमेळाने सजलेल्या मैफिलीत तू म्हणजे पहिला सूर>>
ती कुपी हवी तेव्हा उघडून कदाचित तुझी भेट होईलही, पण तू म्हणजे केवळ मातीचा गंध नव्हेस, तर त्या गंधाची दुर्लभता, अनपेक्षिततासुद्धा तुझ्यातच सामावलेली आहे. ती काढून टाकली, तुला सहजप्राप्य केलं, तर तू, तू उरणार नाहीस!>>>
विशेष आवडली
काल ट्विटर वर माहिती मिळाली.
काल ट्विटर वर माहिती मिळाली. की मृद्गंधाचा तो वास जिओस्मिन ह्या केमिकल मुळे येतो. जमि नीतील ब्याक्टेरिआ ते रिलीज करतात व पाण्याशी संयोग होउन तो वास येतो. ही जास्तीची माहिती. तुमच्या लेखा मुळे अजून एक केमिकल चा अभ्यास झाला. धन्यवा द.
https://en.wikipedia.org/wiki/Geosmin
हो अमा https://bhavatal.com
हो अमा
https://bhavatal.com/Soil-Smell-Reason
आणि
https://bhavatal.com/Mitti-Ka-Attar
हे दोन लेखही खूप छान आहेत. तुम्हाला आवडतील.
छन्दिफन्दि, कुमार सर, शर्मिला, मनःपूर्वक धन्यवाद
किती सुंदर
किती सुंदर
सुंदर लेख!
सुंदर लेख!
मामी, कविता इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
अमा, ऑथेन्टिक कुठली कंपनी
अमा, ऑथेन्टिक कुठली कंपनी माहीत आहे का या अत्तरासाठी? (गूगल केलं तर नावात कनौज असलेल्या बर्याच दिसतात.)
उदा. ही वावेने लिंक दिली आहे त्यातल्या फोटोची मालक कंपनी : https://kannaujattar.com/