भाग ६ : सा रम्या नगरी...
बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या 'कालाय तस्मै नमः '
पुढे...
बारसूर पासून दक्षिणेला ४० किमी अंतरावर एक अनोखी जागा आहे. देशातील सर्वोत्तम प्रतीच्या लोहखनिजाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या बैलाडिला पहाडांवर, ढोलकल येथे ३००० फूट उंचीवरती बाप्पा विराजमान आहेत.
अस्सल ग्रॅनाईटच्या दगडातून कोरून काढलेली हि मूर्ती तज्ज्ञांच्या मते ११व्या शतकातील आहे. साडे तीन फूट उंचीचे आणि ५०० किलो पेक्ष्या जास्त वजनाचे हे बाप्पा कालांतराने लोकांच्या स्मृतीतून नाहीसे झाले होते. अनेक शतकांच्या अज्ञातवासानंतर ते १९४३ साली ब्रिटिशांनी जेव्हा बायलाडिला टेकड्यांमध्ये लोहाच्या खाणी सुरु केल्यात तेव्हा सापडले. तथापि, स्वातंत्र्यानंतर हि गणेशमूर्ती परत एकदा विस्मरणात गेली ते अगदी आत्तापर्यंत.
२०१२ साली दोन पत्रकार खाणींना भेट द्यायला आले असताना सहजच आसपासच्या जंगलात ट्रेक करत पहाडाच्या ढोलकल नामक शिखरावर चढाई केली. या मोहिमेची जणू फलश्रुती म्हणून त्यांना ढोलकल गणेशाचे दर्शन झाले. तेव्हा या पुनःशोधाने आजूबाजूच्या परिसरात बरीच खळबळ उडवून दिली होती.इतके की ढोलकल गणेश मंदिर यात्रेकरू, ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले.
पायथ्याशी वसलेल्या फरसपाल गावापासून ५ किमी अंतराचा हा जंगलट्रेक आहे. अतिशय घनदाट जंगल असल्यामुळे परिसरात एकट्याने फिरायला बंदी आहे. गावातून माहितगार माणूस बरोबर घ्यावा लागतो. तीव्र चढाव असलेला हा ट्रेक बराच कठीण आहे.
अनेक शिखरे असलेल्या या पहाडांवर इतर तीन मंदिरांचे अवशेष सापडले आहेत त्यांपैकी एक सूर्य मंदिर होते. रोज सकाळी सूर्याचे पहिले किरण इथे पडतात. सूर्यमंदिराच्या समोरच्या शिखरावर खड्या उभ्या कातळावर हा लंबोदर विराजमान आहे. समोरच्या बाजूला एका खांबावर भगवा आणि तिरंगा ध्वज फडकत असतो.
२०१७ साली काही असामाजिक तत्वांनी या गजाननाला शिखरावरून खाली फेकून दिले होते. मात्र छत्तीसगढ पोलीस, CRPF चे जवान आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून गणेशमूर्तीच्या तुकड्यांचा घनघोर जंगलात शोध घेऊन त्याची पुन:बांधणी केली आणि गणेशचतुर्थीच्या दिवशी हा एकदंत आपल्या मूळ स्थानी विराजमान झाला.
पुढील मोठे शहर दंतेवाडा. डंकिनी आणि शंखिणी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे एक शक्तिपीठ. बस्तरच्या कुलदेवीचे स्थान. प्रचंड मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले हे शहर आज मात्र माओवाद्यांचे एक मोठे केंद्र बनलेले आहे. इतके कि नक्षलवाद = दंतेवाडा असे समीकरणच तयार झाले आहे.
दुपार टळायला सुरवात झाली होती. गाडीने दंतेवाडा शहरात प्रवेश केला, भारतातल्या कोणत्याही छोट्या शहरासारखेच साधे शहर. नदीवर बांधलेला पूल ओलांडून मंदिराच्या आवारात आलो.
अगदी आताआत्तापर्यंत या मंदिरात स्त्रियांना साडी व पुरुषांना धोतर नेसूनच प्रवेश होता. लॉकडाऊन नंतर हा नियम शिथिल केला आहे. तिरंगा चौक ओलांडून गेल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. प्रत्येक तीर्थक्षेत्री असतात तशी ओळीने पूजासाहित्याची, फूला-हारांची दुकाने पार केली कि पांढऱ्या व विटकरी रंगात रंगवलेले भव्य प्रवेशद्वार आहे.
बस्तरची आराध्य देवता व एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या या ठिकाणी देवी सतीचे दात पडले होते म्हणून हि दंतेश्वरी.
आता गेल्यावर विस्तीर्ण चौक आहे व मंदिराच्या मुख्य दरवाजावर भगवान विष्णू दशावतारात विराजमान आहेत. सध्याचे मंदिर १८८० मध्ये वारंगलचा राजा हिराला चितार यांनी बांधले आहे. वारंगलच्या राजांची कुलदेवी दंतेश्वरी होती आणि ते राजे विष्णूभक्तही होते. मुख्य द्वारासमोर काळ्या दगडातील कोरीवकाम असलेला गरुडस्तंभ उभा आहे.
या गरुडस्तंभाला जो कोणी पाठीकडून दोन्ही हातांच्या कवेत घेऊ शकतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी समजूत असल्याने प्रत्येकाने आपापले नशीब आजमावले.
मंदिराचे चार भाग पडतात. गर्भगृह, महामंडप, मुख-मंडप आणि सभामंडप. यांपैकी गर्भगृह आणि मुख-मंडप दगडी बांधकामात असून महामंडप आणि सभामंडपाचे लाकडी बांधकाम आहे. हे मंदिर सागवानाच्या 24 खांबांवर उभे आहे ज्यावर ओडिशा शैलीत सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते.
गर्भगृहात दंतेश्वरी देवीची सहा हात असलेली काळ्या ग्रेनाईटची मूर्ती आहे. सहा हातांमध्ये शंख, तलवार, त्रिशूल घंटा, श्लोक आणि राक्षसाचे केस धारण केलेले आहेत.
या मंदिराच्या स्थापनेमागे अनेक अनोख्या कथा आहेत. त्यांपैकी एका कथेनुसार बस्तरचा राजा अन्नमदेव जो मुळात वरंगळचा राजा होता त्याला दंतेश्वरी आईने दृष्टांत देऊन दिग्विजय करण्यास सांगितले. देवी म्हणाली कि तू समोर निघ. मी तुझ्या मागे मागे येईन. जिथपर्यंत जाशील तितकी भूमी तुझी. त्याप्रमाणे अन्नमदेव घोड्यावर बसून निघाला. देवी मागेमागे येत होती. मात्र एका ठिकाणी नदी पार करताना राजाला देवीच्या पैंजणांचा आवाज ऐकू आला नाही म्हणून त्याने मागे वळून बघितले. तर देवी नदी पार करत होती व पाण्यात पाय असल्याकारणाने पैंजणांचा आवाज येत न्हवता. राजाने वळून बघितल्यामुळे देवी तिथेच थांबली. नंतर राजाने या जागी तिचे भव्य मंदिर उभारले. नदीकाठी देवीचे चरणचिन्ह कोरलेले दिसतात.
डंकिनी व शंखिनी या दोन नद्यांच्या संगमावर हे मंदिर उभे आहे. या दोन्ही इंद्रावती नदीच्या उपनद्या आहेत. डंकिनी नदीचे उगमस्थान डांगरी-डोंगरी आहे आणि शंखिनी नदी जवळच्याच बैलाडिला पहाडावर उगम पावते. डाकिनी आणि शाकिणी या दोन यक्षिणींच्या नावावरून नद्यांना नावे देण्यात आली. या दोन्ही नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान केल्यास भूतबाधा नाहीशी होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
हे तंत्र साधनेच मोठं केंद्र असून या मंदिरात २०० वर्षांपूर्वीपर्यंत नरबळी दिले जात असत. १८८५ साली शेवटचे १५ नरबळी दिल्याची नोंद ब्रिटिश दप्तरात आहे. मंदिराच्या आत नरबळी देण्याचा दगड अजूनही उभा आहे.
नरबळीची वेदी
आणखी एका कथेनुसार इथल्या पुजाऱ्याच्या स्वप्नात डाकिनी आणि शाकिणी आल्या व त्याला मासे पकडण्याचा गळ घेऊन दोन्ही नद्यांमध्ये एक एक वेळा टाकायला सांगितले. तसे केल्यावर डंकिनी नदीमधून डंका सापडला तर शंखिनी मधून एक शंख गळाला लागला. मंदिरात या दोन्ही वस्तू ठेवल्या आहेत. शंखिनी नदी छत्तीसगडमधली सर्वात छोटी व नैसर्गिकरित्या सर्वाधिक प्रदूषित नदी आहे जिच्या पाण्यात अतिशय जास्त प्रमाणात लोह मिसळले गेले असल्याने पाण्याचा रंग लाल झाला आहे. नदीत जलचर नसल्याने व पाणी पिण्यायोग्य नसल्याने व या नदीला मृत नदी असेही म्हणतात.
मंदिरात विशेष गर्दी न्हवती. छान दर्शन झाले. देवीला साडी अर्पण केली. मंदिराच्या आत आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या देवतांच्या प्राचीन मूर्ती ठिकठिकाणी ठेवलेल्या आढळतात. काही चांगल्या अवस्थेत आहेत तर काही भग्न.
बाजूलाच भुनेश्वरी देवीचे मंदिर आहे.
आवारात फिरत असतानाच फोन वाजला. माझ्या नवऱ्याचा फोन होता. खरंतर त्याच्याशी सकाळीच बोलणे झाले होते. “जंगलात जात आहोत त्यामुळे एकदम रात्रीच बोलू” असे ठरले असताना अचानक मध्येच कसा काय फोन केला असेल बरं असा विचार करून फोन उचलला तर पलीकडून नवरा पॅनिक झालेला.
"आत्ता कुठे आहात तुम्ही? सुरक्षित आहात ना?" त्याचा काळजीने भरलेला प्रश्न. म्हटलं "काय झालं रे?" नंतर लक्षात आले कि नागपूरहून निघताना त्याला गुगल लाईव्ह लोकेशन शेअर केलेले त्यात आमचे 'दंतेवाडा' हे कुप्रसिद्ध लोकेशन बघून त्याला तिकडे टेन्शन आलेलं. "म्हटलं सगळं ठीक आहे थांब व्हिडीओ कॉल करते." व्हिडीओ कॉलवर मग त्याला पण देवीचं दर्शन करवलंन. विजयालक्ष्मीने तिच्या बाबाला पूर्ण मंदिर परिसर फिरून दाखवला. आणि पुण्यातला जीव भांड्यात पडल्याचा आवाज दंतेवाड्यापर्यंत पोचला.
मंदिर परिसरातून डंकिनी नदीच्या किनाऱ्यापर्यंत जायला पायऱ्यांचा घाट बांधला आहे. तिथे जरा रेंगाळलो.आता संध्याकाळ झाली होती. मावळतीच्या किरणांत नदीचे पाणी लाल सोनेरी रंगांत चमकत होते. काही स्थानिक तरुणी घाटावर आलेल्या दिसल्या. त्यातल्या एकीची विजयालक्ष्मीसोबत गट्टी जमली. त्या ताईने विजीच्या हातातील फुले नदीत प्रवाहित करून दिली. मुलींना टाटा करून परतीचा प्रवास सुरु केला.
परत एकदा पूल ओलांडून मुख्य रस्त्याला लागलो. जवळजवळ ९० किमी अंतर पार करायचे होते. 'लाल-सावलीच्या' या प्रदेशातून खूप रात्र होण्यापूर्वी बाहेर पडणे भाग असते. त्यामुळे गीदम शहर येईपर्यंत कुठेही थांबता आले नाही. बाहेरून रातकिड्यांचा आवाज येत होता. अतिशय व्यस्त दिवस घालवल्यानंतर आता सगळे गाडीत शांत बसून होते.
रात्रीच्या अंधारामुळे म्हणा किंवा मनातल्या भीतीमुळे म्हणा पण आजूबाजूच्या परिसराची जरा जरा भीती वाटायला लागली होती.
गीदम पार केल्यावर आपण कोअर नक्षलवादी भागातून बाहेर पडल्याचे किरणभैय्यांनी जाहीर केले व रस्त्याच्या कडेला एका लहानशा टपरीसमोर गाडी थांबवली. तेथे चहा घेऊन पुढे जगदलपूरच्या दिशेने निघालो. भैय्यांबरोबर दुसऱ्या दिवशीचे नियोजन करून सकाळीच ८ वाजता रिसॉर्टवर भेटायचे पक्के करून गाडी नमन बस्तरच्या दारात उभी केली.
रिसॉर्ट वर पोचल्यावर फ्रेश होऊन जरा आराम केला. लॉन वर जागोजागी शेकोट्या लावलेल्या होत्या. त्याचा आस्वाद घेत दिवसभराच्या क्षणांना उजाळा देत एका सुंदर दिवसाची सांगता झाली.
क्रमशः
(टीप :
१. वेळेच्या अभावी आम्हाला ढोलकल गणेशाचे दर्शन घेणे शक्य न्हवते मात्र 'गजानन ट्रॅव्हल्स' च्या सौजन्याने काही फोटो मिळाले तेच येथे दिले आहेत)
२. काही दिवस पावसाळी भटकंती करायला मध्यप्रदेशातील पंचमढी येथे जात आहे. त्यामुळे पुढील भाग जरा उशिराने येतील)
बाप्पा देवस्थान आवडले.
बाप्पा देवस्थान आवडले.
लेखमाला आवडली.
_____________
पंचमढीपचमढी आहे.
Thanks srd
Thanks srd
सुंदर वर्णन!
सुंदर वर्णन!
दंतेवाडा म्हटल्यावर नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्याच बातम्या आठवतात. आता हे वर्णनही आठवेल
छान वर्णन. पुभाप्र.
छान वर्णन. पुभाप्र.
अजून एक अप्रतिम भाग.
अजून एक अप्रतिम भाग. दंतेवाड्याला भेट वाचून खरंच दचकायला झालं.
बाप्पा काय देखणे आहेत! देवीही सुंदर.
तुझी छोटी देवीही फार गोड आहे.
अजून एक अप्रतिम आणि
अजून एक अप्रतिम आणि माहीतीपुर्ण भाग.