अंमली! - भाग १६

Submitted by अज्ञातवासी on 27 July, 2023 - 03:33

अंमली - भाग १५! https://www.maayboli.com/node/83761

"तुझा आशिर्वाद इतक्या लवकर लागू पडेल असं मला माहिती नव्हतं."
"काय झालं?" शराने विचारले.
"प्राजक्ता सापडली. आणि हो, तिचं नाव प्राजक्ताच आहे." तो त्याच्या भावना लपवू शकत नव्हता. मोठ्या मुश्किलीने त्याने त्याच्या भावना आवरल्या.
"ऑल द बेस्ट. आणि हो, अजून एक. मी युएसला जातेय काही दिवसांनी. सो... मोस्ट प्रोबब्ली, ही आपली शेवटची भेट..."
"शरा..." तो कासावीस झाला.
"नको आता तुटूस. आयुष्य नव्याने जग. सुरू कर. मला हवा तो शेयर मिळाला. भरभरून मिळाला. इतका की त्याची परतफेड नाही करू शकणार मी. तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस ना, की त्याची भरपाई मी नाही करू शकत. पण आता आयुष्यभरासाठी तिचा हो. शांत हो. स्टेबल हो.आपली मैत्री सुंदर होती, खूप सुंदर. आयुष्यभर असेन. पण आता प्रेम मिळव. तथास्तु."
"जाऊ नकोस असं म्हणणार नाही. पण खूप हॅप्पी रहा." त्याचा कंठ दाटून आला.
"त्याच्याच शोधात निघतेय रे आता."
"तथास्तु." तोही म्हणाला. नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
"शरा...आपलं नातं या जगात सगळ्यात सुंदर होतं. आणि आय प्रॉमिस, प्राजक्तासोबत त्याहीपेक्षा सुंदर नातं बनवेन. पण तू कधीही परत दिसणार नाहीस असं म्हणून जाऊ नकोस. प्लीज..."
"यासाठीच मी तुझ्या प्रेमात होते, कळलं का रे? सगळ्या जगाला जिंकणारा, पण माझ्यासाठी हळवा होणारा, डोळ्यात टचकन पाणी येणारा... आता मला रडवू नकोस. चल. येते मी."
शरा जायला उठली.
"शरा ऐक ना..."
...बोल...
त्याने ड्रॉवर उघडलं, आणि एक बॉक्स काढलं.
...त्यात एक सुंदर सोनेरी पेन होतं...
"तुझी आठवण म्हणून जपलं होतं. आता माझी आठवण म्हणून जप." त्याने ते पेन तिच्या हातात दिलं.
"काळजी घे." ती हसली.
"तुसुद्धा..." तो म्हणाला.
ती निघून गेली. तो पाठमोरा तिच्याकडे बघत राहिला.
*****
तो विलास शिंदेच्या केबिनमध्ये होता. सोबत गौडा बसलेला होता.
"शिंदे, खूप मोठी बातमी आहे माझ्यासाठी ही. आयुष्य बदलणारी..."
"...हो, पण..."
"बोला ना."
"तमा. शांतपणे ऐक. त्या मुलीचं नाव प्राजक्ता जोशी. इंदिरानगरला राहते. जेजे कॉलेज ऑफ आर्ट्स मध्ये डान्स शिकतेय. फर्स्ट इयर. याआधी इंजिनियरिंग केलं आहे. जॉब वगेरे करत नाही. घरीच असते."
"मग घरी आई बाबा, भाऊ बहिण किती? त्याने विचारले.
"सासरी आई बाबा नसतात." अण्णा शांततेत म्हणाले.
म्हणजे?
"लग्न झालंय तिचं. एक बाळ आहे."
... वज्राघात...
सुन्न...
अचानक सगळं जग थांबलं...
तो खाली बसला...
त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले...
...तो कोरडा होता, अश्रू थांबत नव्हते...
प्राजक्ता आली होती...
...पण ती त्याची नव्हती.
...महादेवाने त्याचा विश्वासघात केला होता...
"नाही. अण्णा हे नाही शक्य."
"हेच खरं आहे तमा..."
तो वेड्यासारखा बसून राहिला.
*****
घरभर पसारा.
सिंकमध्ये कित्येक दिवसांची भांडी.
बाथरूममध्ये कपड्यांचा ढीग...
त्याने स्वतःला अक्षरशः जगापासून तोडून टाकलं होतं.
सतत तेच तेच तेच विचार तो करत होता.
विचार करून थकत होता.
थकून झोपत होता, आणि विश्रांती घेऊन पुन्हा विचार करत होता.
हेच चक्र अव्याहतपणे चालू होतं...
... मेथच प्रोडक्शन बंद होतं. त्याचे सगळे प्लॅन तो विसरला होता.
कधीही उठून तो कुठेही फिरायला निघून जायचा... दूरवर...
असाच त्यादिवशी तो फिरता फिरता घाटावर पोहोचला.
संथ गोदावरी वाहत होती...
"...बराच वेळ झाला, बसून आहेस. कुठे जायचं की नाही?" मागून आवाज आला.
...दादासाहेब शेलार.
तो चमकून उभा राहिला...
"मिलिंदशेठचा मुलगा ना तू?"
"हो."
"तुझ्याच ऑफिसचं उद्घाटन करायला आलो होतो ना मी?"
"हो."
"मला वाटलं, तू फार बिजी असशील. एवढा शांत बसायला वेळ मिळतो?"
तो काहीही बोलला नाही.
"नमस्कार दादासाहेब." एक माणूस तेवढ्यात नमस्कार करून निघूनही गेला.
"आम्ही मध्यमवयातील लोकं. आम्हाला शोभतं हे, असं निवांत बसणं. पण गोदावरीकडे निश्चल नजर लावून बसलं ना, तर एकतर ती मार्ग दाखवते, नाहीतर स्वतःमध्ये सामावून घेते..."
"म्हणजे?"
"म्हणजे एकतर जे काही तुझ्या मनात चालू आहे, त्यातून तू बाहेर पडशील, नाहीतर इथेच जीव देशील."
तो हसला.
"तुमचा महादेवावर विश्वास आहे?"
"जगात तोच आहे, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे."
"मग असं समजा दादासाहेब, महादेवाने मला फसवलं. खेळवलं, आणि या अवस्थेत आणून ठेवलं."
दादासाहेब हसले.
"तो कधीच कुणाला खेळवत नाही. अरे तुझ्या कपाळावर काही लिहून ठेवलं असेल ना, ते बदलण्याची शक्ती त्याच्यात आहे."
"... कुणाच्या स्वर्गात बांधलेल्या गाठी सुद्धा?"
"त्याला स्वर्ग सारखे, नरक सारखे. त्याला देव सारखे, दानव सारखे. राम सारखा, रावण सारखा. तू स्वर्गातल्या गाठी म्हणतोस? त्यामध्ये स्वर्ग आणि नरक सगळं बदलण्याची धमक आहे. पण विश्वास ठेव. रख मन मै विश्वास, है तू शिव का दास. समजलं?"
"रख मन मै विश्वास, है तू शिव का दास..." त्याच्या कानात शब्द घुमत होते...
*****
आज कित्येक दिवसांनी, तो फॅक्टरीमध्ये आला.
गौडा आणि विलास शिंदे बसलेले होते.
"द ग्रेट लवर इज बॅक." गौडा म्हणाला. "आता काय प्लॅन. मरायचं की कामाला लागायचं?"
"थोडा गॅप घ्यायचा."
"कशातून?"
"या सगळ्यातून."
"आणि?"
"आणि कॉलेजला एडमिशन घ्यायचं."
"काय?"
"हो."
"शिंदे. जेजे कॉलेज ऑफ आर्टस. बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्टस. डान्स... मला तिथे एडमिशन घ्यायचं आहे."
"त्या मुलीसाठी तू आता कॉलेजला जाशील?"
"त्या मुलीसाठी मी कुठेही जाऊ शकतो अण्णा. शिंदे, तुम्ही तयारीला लागा."
"ठीक आहे सर."
"एवढा बदल. एका दिवसात?" अण्णा म्हणाला.
"हो. एका दिवसात. एका क्षणात. अण्णा मला पर्वा नाही, तिचं लग्न झालं का, तिला मुलगा आहे का. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं.
इतकं प्रेम करेन तिच्यावर, की तिचं माझ्याकडे येईन... इतकं इतकं प्रेम करेन तिच्यावर की या जगात कुणी केलं नसेल. तिच्या नवऱ्याने जितकं प्रेम केलं नसेल ना, त्यापेक्षा जास्त प्रेम मी करेन. अण्णा जीवापाड, जिवापेक्षा जास्त प्रेम मी तिच्यावर करेन. तिच्यावर प्रेम केल्याशिवाय मी जगू नाही शकणार, आणि ती मला मरू नाही देणार. हे वेड आहे, आणि या वेडातून मला कुणीही बरं नाही करू शकत. एकतर ती माझी होईल, नाहीतर या वेडात माझा अंत होईल."
अण्णा हसला.
"मोठमोठे योद्धे असेच वेडात गलितगात्र होऊन संपले तमा."
"मग मलाही संपू दे. अण्णा. चला येतो. शिंदे. फॉर्मालीटी पूर्ण करून मला कळवा."
त्यांच्या उत्तराची वाट ना बघता तो निघूनही गेला.
******
जेजे कॉलेज ऑफ आर्ट्स.
नाशिकमधली सगळ्यात डायनॅमिक जागा.
त्यादिवशी कॉलेजच्या गेटमधून एक हार्ली डेव्हिडसन आवाज करत आली. तिच्या आवाजानेच लोक तिच्याकडे बघू लागले.
त्यावरून तो उतरला.
कित्येक वर्षानी तो या कॅम्पस मध्ये आला होता.
सगळ्या जुन्या आठवणी त्याच्या मनात रेंगाळत होत्या.
शरावती, सिनियर... एक एक क्षण.
डार्क काळी ट्राऊजर. वर एक व्हाईट शर्ट, डोळ्यांवर काळा गॉगल...
विस्कटलेले केस...
... सगळेजण कुतूहलाने त्याच्याकडे बघत होते.
...आणि तो समोरच्या इमारतीकडे...
...जिथे त्याची प्राजक्ता होती...
...फक्त आणि फक्त त्याची प्राजक्ता...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला याच्यापेक्षा जुना फॉरमॅट जास्त आवडला. हा झेपत नाहीये.
दादासाहेब आले आहेत पुढं काहीतरी वेगळं येईल अशी आशा ठेवतो.. नाहीतर पहिला अंमली चांगला होता, प्लॉट पण आणि शैली पण. आत्ता उगीच पाणी घालून आमटी उकळताय असे वाटतेय..

Timeline ची काही गडबड आहे का? प्राजक्ता दिसणे आणि पुडी मिळणे एकाच वेळी झाले ना? मग त्यानंतर इतकं साम्राज्य उभे राहिले, बिल्डिंग, शस्त्रे, २००० खाटांचे रुग्णालय वगैरे. म्हणजे २/३ वर्ष कमीत कमी झाली. येवढे पॉवरफुल लोक आजूबाजूला असताना एका मुलीचे नाव, पत्ता कळायला २/३ वर्ष लागली का?