
इथून जवळच बारसूर नावाचे छोटेसे गाव लागते. येथे प्राचीन मंदिरांचं संकुल आहे. काही विद्वानांच्या मते ७ व्या शतकातल्या गंगावंशी राजांची हि राजधानी. तर काही म्हणतात कि इथे काकतीय वंशीय राजांचे राज्य असताना हि नगरी उभारण्यात आली. तिसऱ्या मतानुसार बस्तरच्या छिंदक नागवंशीय राजांनी इथे ६०० वर्षे राज्य केले त्यांची हि राजधानी. प्राचीन काळात, हे शहर एक अतिशय समृद्ध आणि विलासी शहर होते. बारसूरच्या सुवर्णकाळात इथे १४७ मंदिरे आणि तितकेच तलाव होते. म्हणजे प्रत्येक मंदिराचा एक तलाव.
येथे पाच प्रसिद्ध मंदिरे आहेत.
त्यातील प्रमुख एक म्हणजे ११व्या शतकातील चंद्रादित्य मंदिर. या मंदिराला लागून चंद्रादित्याने चंद्रसरोवर देखील खोदले होते, ज्याला आजकाल बुध सरोवर किंवा बुढा तालाब म्हणतात. बुध तलावाच्या काठावर असलेले हे मंदिर बस्तरच्या वैभवशाली भूतकाळाची साक्ष देत अजूनही उभे आहे. मंदिराच्या मागच्या विस्तृत ३० एकर जागेवर राजा बारसूरची/ बाणासुराची गढी होती. चंद्रादित्य नावाच्या सामंताने ह्या मंदिराची निर्मिती केली. तर कोणी म्हणतात कि चंद्र आणि आदित्य नावांवरून त्याचे नाव चंद्रादित्य पडले आहे. यात शिव, विष्णू आणि महिषासुरमर्दिनीची भंगलेली प्रतिमा आहे.
.
थोड्याच अंतरावर दुसरे शिवमंदिर आहे. कळस नसलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ३२ खांबांचा दगडी मंडप, ज्यात चार ८ असे एकूण ओळींमध्ये 32 खांब आहेत. हे बत्तीशा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
चौकोनी पायावर बांधलेल्या ह्या मंदिराला दोन समान गर्भगृहे आहेत आणि समोर दोघांत मिळून एक विशाल नंदी विराजमान आहे.
जुन्या दंतकथेनुसार या बत्तीस मंदिरातील कोण्या एका खांबामधून एक गुप्त द्वार आहे. या मंदिरातील दोन्ही गाभाऱ्यांमधील शिवलिंग केवळ एका बोटाने गोलगोल फिरवता येते. लोकमान्यतेनुसार हि एक किल्ली असून जर दोन्ही शिवलिंग योग्य त्या पद्धतीने फिरवले तर इथला गुप्त दरवाजा उघडतो. पण काळाबरोबर तो दरवाजा हि आता लुप्त झाला आहे आणि तो पासवर्ड जाणणारा पण कोणी उरला नाही.
फिरते शिवलिन्ग
नंतर आहे इथलं प्रसिद्ध मामा - भांजा मंदिर. इतर मंदिरांच्या तुलनेनं जरा बऱ्या अवस्थेत आहे. या नावामागे पण एक आख्यायिका अशी कि हे मंदिर केवळ एका दिवसात दोन कारागिरांनी जे नात्याने मामा-भाचा होते बांधून पूर्ण केले होते. मंदिराच्या कळसावर उंचावर मामा-भाच्याचे कोरीव शिल्प देखील आहे.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार बारसूरमध्ये ज्या गंगावंशी राजाचे साम्राज्य होते. त्या राजाचा भाचा कलाप्रेमी होता. आपल्या मामा (राजा)ला न कळवता भाच्याने उत्कल देशातून कारागिरांना बोलावून भव्य मंदिर बांधण्यास सुरुवात केली. आपल्या नकळत भाच्याने मंदिरनिर्माण सुरु केले हे बघून राजाचा अहं दुखावला व त्याने भाच्याला युद्धासाठी ललकारले. या युद्धात भाच्याच्या तलवारीने मामाचा मृत्यू ओढावला. पश्चतापदग्ध भाच्याने मग राजा बनल्यावर या मंदिरावर मामाच्या शिराची हुबेहूब प्रतिकृती बसवली. मग भाच्याच्या मृत्यूनंतर त्याच्याही चेहऱ्याची प्रतिमा इथे स्थापन करण्यात आली. या दोन मूर्तींमुळे याला 'मामा-भांजा' मंदिर म्हणतात.
मंदिरावर चहूकडे अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले दिसते.
आता बारसूर ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते बारसूर युगल-गणेश. अनेक वर्षं मोकळ्या आकाशाखाली असलेल्या, एकाच वालुकाश्माच्या दगडामधून कोरून काढलेल्या दोन गणेशप्रतिमा येथे आहेत. त्यांपैके मोठी मूर्ती साडेसात फुटाची तरी लहान मूर्ती साडेपाच फुटाची आहे.
पौराणिक कथेनुसार हे मंदिर राजा बाणासुराने बांधले होते. बाणासुराची मुलगी उषा आणि त्याच्या मंत्र्याची मुलगी चित्रलेखा यांची घट्ट मैत्री होती. या दोघींसाठी म्हणून बाणासुराने युगल गणेशाच्या प्रतिमा येथे स्थापन केल्या. हे मंदिर पूर्णपणे नष्ट झाले होते. केवळ गणेशप्रतिमा शिल्लक राहिल्या होत्या. मात्र आता या मूर्तींभोवती जुन्याच पायावर नव्याने सिमेंटचे लहानसे देऊळ उभारले आहे.
संकुल परिसरात सर्वत्र दगडांचे अवशेष विखुरलेले आढळतात.
येथील चार मंदिरांची पुरातत्व विभाग पुनर्बांधणी करत आहे.परंतु इथल्या परिस्थितीमुळे कामाला म्हणावा तसा वेग प्राप्त होऊ शकत नाही.
अनेक मूर्ती, शिवलिंग आणि कोरीव भग्न दगड मोकळ्या आकाशाखाली उघड्यावरच पडलेल्या आहेत.
बुध तलावाच्या पलीकडील बाजूस असलेल्या एका दगड मातीच्या उध्वस्त ढिगाऱ्यात सात घोड्यांच्या रथावर आरूढ असलेली सूर्यप्रतिमा मिळाली आहे. जी गावकऱ्यांनी एक मोठ्या झाडाखाली नुसतीच ठेवलेली दिसते.
बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या
'कालाय तस्मै नमः '
क्रमश:
(पुढील भाग लिहुन तयार आहे. हा भाग खुप मोठा झाला असता. लवकरच प्रकाशित करते)
सुंदर.
सुंदर.
सुंदर!
सुंदर!
मंदिरांचं स्थापत्य भुवनेश्वर वगैरे भागातल्या मंदिरांसारखं दिसतंय.
अहाहा! सुंदर फोटो.
अहाहा! सुंदर फोटो.
सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत् >> श्लोक अगदी चपखल.
अहाहा! सुंदर फोटो.
.
वा! किती देखणी मंदिरं आहेत.
वा! किती देखणी मंदिरं आहेत. एकेकाळी हा भाग खूपच वैभवशाली असणार.
उत्कलच्या कारागिरांची छाप
उत्कलच्या कारागिरांची छाप दिसते आहे.
सुरेख फोटो. या भागात जायची
सुरेख फोटो. या भागात जायची ऊत्सुकता आहे
सूर्यप्रतिमा बघून वाईट वाटलं.
सूर्यप्रतिमा बघून वाईट वाटलं. हा भागही छान.