सूर्य माथ्यावर आला होता. आतापर्यंत दाट जंगलात असल्यामुळे ऊन अजिबात जाणवले न्हवते मात्र आता कांगेर राष्ट्रीय उद्यानाचा निरोप घेऊन पुढे निघाल्यावर उन्हाचा चटका जाणवायला लागला.
राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून वायव्येकडे पुढे १५ किमी अंतरावर ‘तीरथगढ’ धबधबा आहे. वीस मिनिटांचा रस्ता. रस्त्यातच एका ठिकाणी ‘व्हू पॉईंट’ आला. तिथून लांबूनच या जलप्रपाताचे दर्शन होते. पुढे गेल्यावर एक छोटासा फलक दिसला – ‘तीरथगड जलपात कि ओर’. हा धबधब्याकडे जाण्याचा ट्रेकिंगचा मार्ग. एक छोटी वाट जंगलात गेली आहे. पण गाडीमार्ग थोडा लांबचा फेरा घेऊन जातो. दुपारचे दीड वाजून गेले होते. पार्किंगला गाडी लावली. परिसरात छोटी छोटी दुकाने, ढाबासदृश खानावळी, माळबांगड्यांची दुकाने, प्लास्टिकची खेळणी विकणारे विक्रेते, काय विचारू नका. गावाकडच्या जत्रेत आल्यासारखे वाटले. इथे खाण्या पिण्याची रेलचेल आहे. मात्र आधुनिक तऱ्हेचे पदार्थ मिळत नाहीत. कडकडून भूक लागली होती. किरणजींना म्हटले "आधी पेटपूजा करू, बाकी सगळं नंतर". किरणभैय्या एका ढाब्याकडे घेऊन गेले. गल्ल्यावरच्या माणसाबरोबर नमस्कार चमत्कार झाले. ४ व्हेज थाळींची ऑर्डर दिली. म्हटलं " किरणजी, तुम्ही पण बसा आमच्या बरोबरच". तर म्हणाले "आप शुरु किजीये, हम बादमे आते हैं". ठीक आहे. कदाचित त्यांना संकोच वाटत असावा. निवांत बसून आजूबाजूचे निरीक्षण सुरु केले.
झाडाची मोठाली पाने, टिनाचे पत्रे आणि बांबूचे खांब वापरून मांडव घातला होता. त्यालाच ढाबा म्हणायचं. धाब्याच्या दारातच एका बाजूला भली मोठी चूल पेटवली होती. त्यावर भाताचे मोठे पातेले चढवलेले दिसत होते. दुसऱ्या चुलीवर फ्लॉवर - बटाटा भाजी रटरटत होती.
मागील बाजूला भाज्यांचे वाफे केले होते. मिरच्या, पालक, टोमॅटो, कोथिंबीर लावलेली दिसत होती. एक मोठा प्लास्टिकचा ड्रम भरून पाणी आणि लोटा ठेवला होता, तिथेच हात धुवायचे.
बांबूच्या फळ्यांचा टेबल आणि बसायला बांबुचेच बाकडे. मनात विचार आला कि आपण जणू टाईम ट्रॅव्हल करून काही वर्षे मागे गेलो असून हा कोणतातरी दुसराच काळ आहे. दहा मिनिटांतच कागदी पत्रावळींवर गरम गरम भात-भाजी आणि लिंबू मिरचीचे लोणचे समोर आले. साधे तरी अतिशय चवदार अन्न. किरणभैय्या भाजलेले पापड घेऊन समोर आलेत. इतर कोणाच्या ताटात तर पापड दिसत न्हवते मग आपल्यालाच खास पाहुणचार का बुआ? तर भैय्या म्हणतात
"हमारे चाचाजी का होटल है ये, और आजके मेहमान आप हो जी"
ओह! तरीच उलगडा झाला कि आल्या आल्या किरणभैय्या बाह्या सरसावून मदतीला का गेले होते ते.
तृप्त मनाने उठलो, हात धुतले. चार थाळ्यांचे वट्ट २८० रुपये बिल झाले होते. भैय्या म्हणाले कि तुम्ही आता आपले आपले फिरून या. तिरथगढ धबधब्याच्या पायथ्याशी जायला इथून सरळ खाली ३०० पायऱ्या आहेत. मात्र ३ वाजेपर्यंत परत या.
भरल्या पोटी निघालो. काही मीटर अंतर चालल्यावर उतरण सुरु होते. काही ठिकाणी व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या आहेत, कुठे नुसताच मातीचा उतार आहे तर कुठे पायऱ्या आहेत पण भग्नावस्थेत. इथे जंगली माकडांचा भयंकर त्रास होतो. त्यामुळे खाण्यापिण्याचे पदार्थ शक्यतो नेऊच नये किंवा नेल्यास पिशवीच्या आत ठेवावेत. आमच्या समोरच एका कुटुंबाला माकडांच्या टोळीने दरोडा घालून लुटलेले बघितले. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आम्ही जवळची केळी व बिस्किटांचे पुडे तातडीने लपवले.
पन्नासेक पायऱ्या उतरल्यावर ज्योती मावशीला चांगलाच दम लागला. तिला खरंतर सायटिकाचा त्रास आहे, पाय पण ठणकायला लागले. पण तरी उत्साह इतका प्रचंड कि हळूहळू का होईना सर्वांच्या मागोमाग ती उतरत होतीच. हि वळणांची वाट असून घाट उतरल्याप्रमाणे पुढे जावे लागते. प्रत्येक वळणावर जरा मोकळी जागा व काही ठिकाणी बसण्यासाठी बाकांची सोय केली आहे. पाऊण अंतर उतरल्यावर मात्र मावशी मंडळींनी थांबायचे ठरवले. कारण खाली उतरून तर जाऊ, पण वर चढताना मात्र पुन्हा दमछाक होईल. तिथल्याच एका बाकावर बसल्या. समोर धबधब्याचे दर्शन होत होतेच.
थोडेच अंतर खाली जायचे राहिले होते. आईला म्हटलं "मी आणि विजी पटकन जाऊन येतो तू वाटलं तर थांब मावश्यांसोबत". असं म्हणून आम्ही पुढे निघालो. २५-३० पायऱ्या उतरून धबधब्याच्या अगदी पायथ्याशी पोचलो. आता समोर जाणारच तेवढ्यात पाठून आईची दमदार हाक.
"थांबा गं. खूप पुढे जाऊ नका."
वळून बघितल तर माँसाहेब आमच्या पाठोपाठ हजर. दोघीच गेल्या तर नक्कीच पाण्यात उतरतील ह्याची तिला खात्री होती. माँसाहेबांना आमच्यावर भरोसा नाय.
तीरथगड हा छत्तीसगडचा सर्वात उंच (कि खोल?) धबधबा. हा बारमाही प्रपात कांगेर नदीच्या दोन उपनद्या मूंगा आणि बहार यांनी मिळून बनला आहे. एकच सलग धार नसून ३ वेगवेगळ्या पातळ्यांवरून हा खाली झेप घेतो. ज्याला कंपाऊंड फॉल म्हणतात.
लोक खडकांवर चढून धारांखाली भिजत दंगा करत होते.
उंच कड्यावरून खाली आलेल्या धारा जरा डावीकडे वळण घेतात आणि मधल्या पातळीचा धबधबा निर्माण करतात.
या धारा ओलांडायला एक छोटासा कमानदार पूल बांधला आहे ज्यावरून पलीकडे असलेल्या जुन्या मंदिरसमूहापर्यंत जाता येते.
लोककथेनुसार ११ व्या शतकात तिर्थराज आणि चिंगराज नावाचे दोन भाऊ होते. इथल्या निसर्गसौंदर्याने मोहित होऊन त्यांनी बस्तर प्रदेशाचा या भागात आपली राजधानी वसवली. तीरथराजांनी धबधब्याच्या खालच्या बाजूला आपला गड बनवला आणि वरच्या प्रदेशात तीरथगड गाव वसवले जिथे अजूनही वस्ती आहे. चिंगराजने तीरथगडपासून ७ किमी अंतरावर चिंगीथराई नावाचे गाव वसवले आणि एक भव्य मंदिर बांधले. त्याचे मात्र आता अवशेष उरले आहेत.
.
तिसऱ्या पातळीवर एक खोलगट कुंड तयार झाले आहे. हे पवित्र कुंड मानले जाते. या कुंडात आसपासचे आदिवासी आपल्या प्रियजनांच्या रक्षेचे विसर्जन करतात. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. येथून पुढे मूंगा आणि बहार या दोन नद्या 'मुंगाबहार' या नावाने कांगेर नदीला भेटायला प्रस्थान करतात.
.
.
विजयालक्ष्मीला पाण्यात भिजायचे होते मात्र इतका वेळ न्हवता. कारण जर का ती एकदा धारांखाली गेली तर कमीत कमी तासाभराची निश्चिती झाली असती. मग फक्त पाय बुडवण्यासाठी १ मोठ्या कॅडबरीची मांडवली झाली. थोडा वेळ तिथे घालवून वर जायला निघालो.
मावशीला मघाशीच फोन करून परत निघायला सांगितले होते त्यानुसार दोघी आधीच चढाई करत होत्या. त्या दोघींना वाटेत माथ्याजवळ गाठले. मासाहेबांच्या स्टॅमिनाची मात्र दाद द्यायला हवी. परतीच्या वाटेवर जरा माळबांगड्यांच्या दुकानापाशी थबकलो. सहज गंमत म्हणून काही कानातले, अंगठ्या घेतल्या. इनमीन ३०० रुपयांची खरेदी पण विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप काही सांगून गेले.
फिरून पुन्हा चाचाजींच्या ढाब्याजवळ आलो. किरणभैय्या गरमागरम भज्यांची प्लेट घेऊन समोर आले. सोबत हिरवी चटणी आणि गारगार फ्रुटी. काय म्हणावं या पाहुणचाराला?
बरोबर सव्वातीन वाजता पुढे प्रस्थान केले. आजूबाजूचा निसर्ग आता बदलत होता. घनदाट जंगल जाऊन उंच सखल पठारासारख्या भागातून रस्ता जात होता. झाडे पण बरीच विरळ दिसत होती.
हा खरा संवेनदशील भाग. दर १० किमी अंतरावर CRPF चे कॅम्प्स दिसत होते. बाईक्सवर रायफलधारी जवान पेट्रोलिंग करताना दिसू लागले. हीच ती कुप्रसिद्ध 'झीरम घाटी'. इथेच १० वर्षांपूर्वी घडलेली घटना अजूनही अंगावर शहारे आणते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची सुकमा येथील प्रचारसभा आटपून छत्तीसगड काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नंदकुमार पटेल इतर बऱ्याच बड्या काँग्रेस नेत्यांसह जगदलपूरला परतत होते. सोबत मोठे सुरक्षा पथक देखील होते. दुपारी चारच्या सुमारास हा ताफा झीरम खोऱ्यातून जात होता. येथे नक्षलवाद्यांनी झाडे तोडून, ओंडके टाकून रस्ता अडवला. वाहने थांबली आणि कोणाला काही समजण्यापूर्वीच झाडांच्या मागे लपलेल्या 200 हून अधिक नक्षलवाद्यांनी धडाक्याने गोळीबार सुरू केला. सर्व वाहनांना लक्ष्य केले. यात नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला. सुमारे दीड तास गोळीबार सुरू होता.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नक्षलवादी डोंगरावरून खाली आले आणि प्रत्येक वाहनाची तपासणी करू लागले. क्रॉसफायरमध्ये मारल्या गेलेल्यांना पुन्हा गोळ्या घालण्यात आल्या. चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अजित जोगी वगळता छत्तीसगड काँग्रेसचे त्यावेळचे बहुतांश बडे नेते आणि सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते.
वळणदार सुंदर रस्ता. बाजूला तपकिरी माती, हिरवीगार भात खाचरे आणि त्यात काम करणारे शेतकरी बायका-पुरुष दिसत होते. गाई बकऱ्या चरताना दिसत होत्या. नाल्यांत म्हशी डुंबत होत्या. एकामागे एक गावे झपाट्याने मागे जात होती. गाव आले कि रस्त्यात शाळकरी मुले दिसायची. घरांसमोर खाटेवर म्हातारे पुरुष निवांत ऊन खात बसलेले असत, अंगणात कोंबड्या दाणे टिपताना दिसायच्या तर बायका दारात बसून काहीबाही निवडण- टिपण करताना दिसत होत्या. एकंदरीत समाधानी चित्र दिसत होतं. पिक्चर परफेक्ट .
चेकपोस्ट आले. दोघा जवानांनी गाडी अडवून चौकशी केली. सर्वांची ओळखपत्रे आणि वाहन परवाना व इतर कागदपत्रे तपासली आणि गंमतीने म्हणाले "दिदी, इतना गेहरा ‘लाल रंग’ पेहन कर नही घूम सकते आप यहाँ" आणि हसण्याचा गडगडाट करत पुढे जायला परवानगी दिली.
क्रमशः
(यापुढे फोटो कसे टाकावे असा प्रश्न पडला आहे. माझी खाजगी जागा संपली )
छान वर्णन, वाचायला मजा येत
छान वर्णन, वाचायला मजा येत आहे, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
सुंदर फोटो आणि चित्रदर्शी
सुंदर फोटो आणि चित्रदर्शी वर्णन
फोटोसाठी एक आयडिया आहे की
गुगल फोटो वर वै लोड करून इकडे एम्बेड करून देता येतात. मोबाइलवरून नाही देता येणार तसे.
लॅपटॉप कॉम्प्युटर वर करता येईल तसे.
असा एक धागा देखील आहे ज्यात स्टेप wise सांगितले आहे. कोणीतरी लिंक द्या रे
मोबाईल app वरून लिहितोय, एकाचवेळी सर्च करून लिंक देता येत नाहीये.
सुंदर जागा आणि वर्णन. बर्
सुंदर जागा आणि वर्णन. बर्यापैकी गर्दी आहे की तिथे.
ट्रिप छान सुरू आहे. वाचायला मजा येत आहे.
हा ही भाग छान. ते प्रेमाचे
हा ही भाग छान. ते प्रेमाचे पापड वाचून भरून आले. किती गोड. व हत्याकांडाचे वर्णन पण समर्पक आहे. बारकीचे फोटो गोड. व खरेदीपण क्युट.
तुमच्या मुळे आमची पण ट्रिप झाली.
खाजगी जागेतील जुने फोटो डिलीट करुन बघा.
खालील लिंक वर जाउन बघा
खालील लिंक वर जाउन बघा
वाचून लक्षात येईल
शेवटच्या 2 किंवा 3 पानावरचे प्रतिसाद वाचा.
https://www.maayboli.com/node/1556?page=7
Thanks all. प्रेमाचे पापड...
Thanks all
लिंक साठी धन्यवाद.
प्रेमाचे पापड..
सुंदर
सुंदर
छान.
छान.
.. इतना गहरा ‘लाल रंग’ पहन कर नही घूम सकते आप यहाँ ….
हे का? लाल रंगाच्या कपड्यांचा काय इश्यू आहे ?
हे का? लाल रंगाच्या कपड्यांचा
हे का? लाल रंगाच्या कपड्यांचा काय इश्यू आहे ?>>>
ते गमतीने म्हणाले. लाल रंग इकडे नक्षलवाद्यांचा सिम्बॉल आहे.
लाल रंग = नक्षलवाद्यांचा
लाल रंग = नक्षलवाद्यांचा सिम्बॉल
ओके, समजले
छान वर्णन !! नवीनच भागाची
छान वर्णन !! नवीनच भागाची ओळख होते आहे . नक्षलवादी भाग म्हणले की आपल्या डोळ्यासमोर वेगळेच चित्र येते , पण फोटो बघुन छान वाटले .
फोटो पाहायचे आहेत.
फोटो पाहायचे आहेत.
हा भाग वाचायचा राहिला होता.
हा भाग वाचायचा राहिला होता. हाही भाग सुंदर!
हा भागही छान.
हा भागही छान.