जुलाबावरील जीवरक्षक प्रथमोपचाराचा मौलिक शोध

Submitted by कुमार१ on 17 July, 2023 - 23:38

"हगवणीवर बहुगुणी
मीठ साखर पाणी"

या शासकीय जाहिरातीने आपल्या सामाजिक आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ अधिराज्य गाजवलेले आहे. अतिशय सोपा असलेला हा घरगुती प्रथमोपचार म्हणजे जुलाबाच्या रुग्णांसाठी वरदान असते. जुलाब ही पचनसंस्थेशी संबंधित असलेली समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते. मुळात जुलाब हा ‘आजार’ नाही, परंतु ते काही आजारांचे एक लक्षण आहे. विविध प्रकारचे सूक्ष्मजीव संसर्ग आणि अन्नातून झालेली विषबाधा ही त्याची प्रमुख कारणे. जुलाबाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे चयापचय आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो. परिणामी असा रुग्ण मलूल होतो. त्यातून जर वेळीच योग्य उपचार मिळाले नाहीत तर तो दगावण्याचाही धोका असतो. लहान मुलांचे जुलाब मोठ्या माणसांच्या तुलनेत अधिक काळजी उत्पन्न करतात. मूलतः जुलाबांमध्ये शरीरात जलक्षारन्यूनता होते. म्हणून औषधोपचारांच्या साहाय्याने ती भरून काढणे हा या आजाराचा प्रथमोपचार ठरतो.

या वरवर सोप्या वाटणाऱ्या प्रथमोपचाराच्या शोधाचा इतिहास मोठा रंजक आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी हा लेख.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जुलाबाच्या समस्येवर वैद्यकीय विश्वात संशोधन जोमाने चालू होते. याबाबतीत वैज्ञानिकांचे मूलतः दोन गट होते :
१. एका गटाने गटाचे मत असे होते, की जुलाबाचे प्रमुख कारण हा जंतुसंसर्ग असल्याने त्याच्या उपचारांसाठी प्रतिजैविकांचा शोध महत्त्वाचा आहे.
२. तर दुसऱ्या गटाचा रोख मुख्यत्वे शरीरातून बाहेर पडलेले पाणी आणि क्षार बाहेरून भरून काढण्याकडे होता.

सन 1920 च्या सुमारास या संदर्भात एक प्रमाणित उपचार उपलब्ध झाला. त्यामध्ये पाणी आणि क्षारांचे शरीरायोग्य मिश्रण रक्तवाहिनीतून देण्याचे ठरले. अर्थात यासाठी रुग्णाना रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागले. हा उपचार अर्थातच प्रभावी होता. परंतु त्या काळात कॉलरा आणि अन्य काही आजारांच्या वारंवार साथी येत. त्यामध्ये गरीब देशांतले असंख्य लोक जुलाबाने त्रस्त होत आणि त्यातून कित्येकांचे मृत्यू होत. इतक्या मोठ्या प्रमाणावरील बाधित रुग्णांसाठी रुग्णालयाच्या पातळीवरील हा उपचार व्यवहार्य नव्हता; किंबहुना तो अशक्यप्राय होता. यातून बोध घेऊन काही वैज्ञानिकांनी तोंडातून सहज देता येईल अशा मिश्रणाचा (Oral Rehydration Therapy; ORT) शोध सुरू केला. या संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विविध नैसर्गिक वनस्पती आणि फळांचा वापर करण्यात आला. त्यामध्ये शुष्क केळे, गाजराचे सूप आणि carob या झाडापासून केलेले पीठ यांचा समावेश होता. अर्थात हे उपचार crude स्वरूपाचे होते; मात्र पुढील संशोधनासाठी ते काहीसे मार्गदर्शक ठरले.

दरम्यान प्रगत देशांमध्ये infusion द्वारा देण्याच्या पाणी व क्षार यांच्या शास्त्रशुद्ध मिश्रणाचा वापर रुळला होता. या संदर्भात प्रामुख्याने Darrow या वैज्ञानिकांचे संशोधन पथदर्शक ठरले. एव्हाना वैज्ञानिकांची भिस्त जरी infusionद्वारा द्यायच्या द्रावणावरच होती तरीसुद्धा तोंडाने देता येईल अशा द्रावणाच्या शोधाची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. Darrow यांनी सुरुवातीस यासाठी पोटॅशियम, lactate आणि ग्लुकोज यांच्या मिश्रणाचा वापर सुचवला होता.

सन 1950 च्या दरम्यान तोंडातून घेण्याच्या साखर व क्षारयुक्त पावडरी औषध बाजारात मिळू लागल्या. त्या शास्त्रशुद्ध नव्हत्या आणि त्यांना औषध प्रशासनाची मान्यता नव्हती. त्या दुकानांमध्ये सहज (OTC) मिळत असल्याने समाजात त्यांचा वापर वाढू लागला. परंतु लवकरच त्या पावडरीचा एक दुष्परिणाम दिसून आला. त्यांच्यात असलेले साखर व क्षाराचे प्रमाण शरीराला गरज असलेल्या प्रमाणापेक्षा बरेच जास्त असायचे. अशा प्रकारच्या अप्रमाणित उपचारातून रोग्याचे जुलाब बरे होण्याऐवजी प्रसंगी ते वाढत असल्याचे दिसले.

या निरीक्षणामुळे वैद्यक विश्वातले बहुसंख्य डॉक्टर्स इंजेक्शनद्वारा द्यायच्या द्रावणाचाच पुरस्कार करीत होते. किंबहुना शरीरातील जलन्यूनता भरून काढताना प्रथम इंजेक्शनचाच वापर आणि त्यातून रुग्ण सुधारल्यानंतर पुढच्या टप्प्यात तोंडातून द्यायच्या द्रावणाची शिफारस केली गेली. मात्र काही वैज्ञानिकांच्या मनात हे पक्के होते, की अधिकाधिक संशोधन करून प्रथमोपचार म्हणून तोंडातून द्यायच्या शास्त्रशुद्ध द्रावणाची गरज निर्विवाद आहे.

1953 ते 1958 च्या दरम्यान वैज्ञानिकांनी गिनीपिगच्या लहान आतड्यांवर बरेच संशोधन केले. त्यांचा मुख्य उद्देश हा होता, की या आतड्यातून ग्लुकोज आणि सोडियमचे शोषण कशा प्रकारे होते, हे अभ्यासणे. या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की आतड्यातून ग्लुकोजचे शोषण होण्यासाठी सोडियमची आवश्यकता असते. पुढील काही प्रयोगांमध्ये हेही दिसून आले की ग्लुकोज आणि सोडियम एकत्र दिल्याने सोडियमच्या शोषणाचे प्रमाण देखील वाढते. यातूनच सोडियम, ग्लुकोज आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करावे हा मुद्दा पटलावर आला.

1961 मध्ये फिलिपिन्समध्ये कॉलराची खूप मोठी साथ आली. तिचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर रॉबर्ट फिलिप्स यांनी तिथे नौदलातील चमू पाठवला. साथ मोठी असल्याने त्यांनी इंजेक्शनद्वारा उपचारांवर भर दिला आणि मृत्युदर आटोक्यात ठेवला. परंतु पुन्हा 1962 मध्ये तिथेच कॉलराची जोरदार साथ परतली. यावेळेस डॉ. फिलिप्स यांनी सोडियम, ग्लुकोज व पाणी यांचे मिश्रण तोंडाने देण्याचे प्रयोग सुरू केले. त्यात त्यांना थोडेफार यश आले. पुढे त्यांनी या मिश्रणाच्या संदर्भात शास्त्रशुद्ध प्रयोग चालू केले. परंतु त्या प्रयोगांदरम्यान पाच जणांचा मृत्यू उद्भवला. या घटनेमुळे हे संशोधन काही काळ रोडावले गेले. या पुढील संशोधनात तोंडाने द्यायच्या द्रावणात तीन घटकांचे सुयोग्य प्रमाण ठरवणे हा कळीचा मुद्दा होता. तसेच हाही मुद्दा समजला होता, की वरील तीन घटकांचे प्रमाण अयोग्य राहिल्यास त्याच्या सेवनातून रुग्ण बरा होण्याऐवजी दगावण्याचा धोका असतो.

आतापर्यंत वर्णन केलेले संशोधन प्रगत देशांतील वैज्ञानिकांच्या अधिपत्याखाली चालू होते. वास्तविक त्या काळात कॉलरा आणि अन्य काही साथी आशियाई देशांमध्ये जोरात होत्या. त्या दृष्टीने या संदर्भातील संशोधन केंद्र आशियात असण्याची नितांत गरज होती. 1960 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील ढाका येथे असे केंद्र स्थापन झाले. इथल्या वैज्ञानिकांची डॉ.फिलिप्स यांच्या संशोधनावर नजर होती. या वैज्ञानिकांना मार्गदर्शन करण्यासाठी पाश्चात्य देशातील काही वैज्ञानिक इथे दाखल झाले. इथली महाभयंकर साथ बघून त्यांचे असे ठाम मत झाले, की या साथी आटोक्यात आणण्यासाठी इंजेक्शनद्वारा उपचारांचीच गरज आहे. निव्वळ तोंडातून देण्याच्या द्रावणांनी अशा साथी आटोक्यात येण्याबद्दल त्यांना साशंकता होती. त्यानुसार रुग्णालयात पारंपरिक इंजेक्शनद्वारा उपचार चालू झाले. परिणामी रुग्णालयातील या आजाराचा मृत्यूदर 40% वरुन अवघ्या 1% पर्यंत कमी झाला.

सन 1966 पर्यंत झालेल्या संशोधनातून वैज्ञानिक इतपत मानायला तयार होते की तोंडाने द्यायचे द्रावण हे प्रौढांसाठी एकवेळ ठीक आहे, परंतु मुलांच्या जुलाबांमध्ये ते उपयुक्त ठरणार नाही. दरम्यान ढाक्याच्या जोडीने कलकत्त्यातही असेच एक संशोधन केंद्र चालू झालेले होते. या दोन केंद्रांची एकमेकांशी बऱ्यापैकी वैज्ञानिक स्पर्धा असायची. 1967 च्या कॉलरा साथीत बऱ्याच रुग्णांना त्यांच्या तोंडातून जठरात नळी घालून त्याद्वारे द्रावणाचे उपचार दिले गेले. त्यानंतर चित्तगांगमध्ये पुढची कॉलराची साथ आली यावेळेस रुग्णाच्या तोंडातून नळीद्वारा लिटरभर द्रावण देण्याचे उपचार बऱ्याच जणांवर झाले. परंतु द्रावण नक्की किती द्यायचे हे अद्याप ठरत नव्हते. परिणामी या उपायांना अपयश आले.

परंतु Nalin Cash या दोन वैज्ञानिकांनी अजून आशा सोडलेली नव्हती. त्यांनी झटून अभ्यास करून या उपचारांचे नवे सुधारित प्रमाण ठरवले आणि काहीही करून हा उपाय जंगलात राहणाऱ्या बाधितांसाठी वापरायचे ठरवले. ढाक्यातील पुढच्या साथीत त्यांनी त्या सुधारित द्रावणाचा पुरेपूर वापर केला. आनंदाची गोष्ट म्हणजे या खेपेस तोंडातील द्रावणाच्या वापरामुळे इंजेक्शनद्वारा द्यायच्या उपायांची गरज 80% नी कमी झाली. दरम्यान कलकत्ता इथले वैज्ञानिक देखील यावर झटून अधिक संशोधन करीत होते. या दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये या संदर्भात मोठी चुरस होती. तसेच इथल्या वैज्ञानिकांचे प्रमुख असलेल्या पाश्चिमात्य देशातील वरिष्ठांकडून त्यांना तोंडातील द्रावणाचे मोठ्या प्रमाणावर प्रयोग करण्यास पुरेशी परवानगी देखील मिळत नव्हती. परंतु या सर्व अडचणींवर मात करून Nalin व Cash या दोघांनी आपले प्रयत्न नेटाने चालू ठेवले आणि लवकरच त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये यश मिळवले :

१. कॉलराखेरीज अन्य आजारांमुळे झालेल्या जुलाबांमध्येही या द्रावणाचा उपयोग यशस्वी झाला.
२. मोठ्या माणसांच्या जोडीने लहान मुलांच्या जुलाबांमध्येही ते द्रावण चांगल्यापैकी उपयुक्त ठरले.

dehydr.jpg

या संशोधनातील यापुढील महत्त्वाचा टप्पा भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. कलकत्त्यातील संशोधन केंद्रातील बालरोगतज्ञ डॉ. दिलीप महालनबीस यांनी या उपचाराचा प्रभावी वापर 1971 च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात केला. या युद्धात तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील असंख्य निर्वासित भारतात येऊन धडकले होते. त्यांच्या छावण्यांमध्ये कॉलराची प्रचंड साथ पसरली. त्यांच्या उपचारांसाठी तिथे अवघ्या 16 खाटा उपलब्ध होत्या तर निर्वासितांची संख्या जवळपास साडेतीन लाख !

या परिस्थितीत रुग्णांना दाखल करून इंजेक्शनद्वारा उपचार देणे अशक्यप्राय होते. या परिस्थितीत डॉ. महालनबीस यांनी तिथल्या असंख्य रुग्णांवर तोंडी द्रावणाचा उपचार केला. आतापर्यंतच्या संशोधनानुसार त्यांनी या द्रावणातील घटकांचे प्रमाण असे ठेवले होते :

22g glucose, 3.5g sodium chloride, 2.5g sodium hydrogen carbonate (+ १ लिटर पाणी)

या पावडरच्या पुड्या मोठ्या प्रमाणावर तयार करुन त्या छावण्यांमध्ये वाटल्या गेल्या. एका पुडीची किंमत फक्त अकरा पैसे होती. आजारी लहान मुलांना वरील द्रावणाव्यतिरिक्त पोटॅशियम देखील तोंडातून देण्यात आले. या प्रभावी मोहिमेमुळे निर्वासितांमधील कॉलरा चांगल्यापैकी आटोक्यात आला. या आणीबाणीच्या आणि अत्यंत खडतर परिस्थितीत डॉक्टरांच्या चमूने केलेले कार्य प्रशंसनीय होते. त्याची दखल युनिसेफ आणि डब्ल्यूएचओने घेतली.
dilip REV.jpg

( गतवर्षी म्हणजे 16 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. महालनबीस यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी केलेल्या अतुलनीय सामाजिक आरोग्य सेवेबद्दल त्यांना २६/१/२०२३ रोजी भारत सरकारतर्फे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला).

या प्रभावी कार्यामुळे वैज्ञानिकांच्या चमूत उत्साहाचे वातावरण होते. यापुढील संशोधनातून हे देखील सिद्ध झाले, की अगदी एक महिन्याच्या बालकांवर देखील या तोंडी द्रावणाचा उपचार प्रभावी ठरतो. तसेच Hirschhorn या पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी असे मत व्यक्त केले की, तोंडाने देण्याचा हा उपचार इंजेक्शनच्या उपायापेक्षा अधिक चांगला आणि व्यवहार्य आहे. इंजेक्शनद्वारा द्रावण देताना ते किती प्रमाणात दिले आणि लघवीचे प्रमाण किती होते, इत्यादी गोष्टींवर काटेकोर लक्ष ठेवावे लागते.

आता Hirschhorn यांनी या उपचारांचा प्रसार अमेरिकेत करण्याचे ठरवले. तिकडे कॉलरा हा जरी आरोग्य प्रश्न नसला तरी मुलांमध्ये जुलाबाचे इतर अनेक प्रकार होते. Hirschhorn यांनी तिथल्या अनेक बालरोगतज्ञांना या उपचाराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथल्या डॉक्टरांचा या ‘सोप्या’ उपचाराकडे बघण्याचा दृष्टिकोन साशंक होता. कित्येकजण इंजेक्शन-उपचार हेच शास्त्रीय आहेत या मुद्द्याला घट्ट चिकटून होते. इंजेक्शनच्या जोडीने जेव्हा तोंडाने काही द्यायचे असते तेव्हा फळांचे रस, कोला आणि इतर काही पेयांचाच ते डॉ पुरस्कार करीत. तर कित्येकांनी ORT या उपायाची टिंगलही केली.

या उलट जगातील इतर काही देशांनी मात्र या उपायाकडे जातीने लक्ष दिले. सहा वर्षांच्या कालावधीत जागतिक पातळीवर जुलाबांच्या या उपचारासंदर्भात ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली. 1979 मध्ये ढाक्यातील मूळ केंद्राचे नाव बदलून त्याला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हटले गेले. या उपचारांचा स्वीकार जगभरातून होऊ लागल्यानंतर कित्येक वर्षांनी म्हणजे 1992 मध्ये अमेरिकेत वैज्ञानिकांच्या एका गटाने राष्ट्रीय पातळीवर या उपचारांचा पुरस्कार केला.

कॉलरामध्ये शरीरातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी व क्षार बाहेर पडतात. त्या दृष्टिकोनातून तोंडाने देण्याच्या मिश्रणातील क्षारांचे प्रमाण ठरवले गेले होते. कालांतराने जगभरात या आजाराच्या साथी ओसरल्या. अन्य आजारांमुळे होणाऱ्या सौम्य ते मध्यम जुलाबांसाठी मूळ मिश्रणातील क्षारांचे प्रमाण कमी करण्यात आले(13.5 g glucose, 2.6 g sodium chloride & 1.5 g KCl) .

1969 हे ORT उपचार प्रस्थापित झाल्याचे वर्ष समजले जाते. मात्र या सोप्या पण प्रभावी उपचारांचा जनक कोण, हा प्रश्न आजही अनुत्तरीत आणि वादग्रस्त आहे. कित्येक डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी व्यक्तिगत पातळीवर यासम उपचार पूर्वीच केलेले होते परंतु त्यांना पुरेशी प्रसिद्धी मिळाली नाही. 1953 मध्ये हेमेंद्रनाथ चटर्जी या भारतीय डॉक्टरांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण काम केलेले होते तसेच इराकमधील Al-Awqati यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. परंतु वैज्ञानिक जगतात या दोघांनाही कधी श्रेय दिले गेले नाही.

आज जगभरात कॉलऱ्याच्या जीवघेण्या साथी फारशा येत नाहीत. परंतु लहान मुले आणि वृद्धांमधील विविध कारणांमुळे होणारे चिंताजनक जुलाब हा महत्त्वाचा आरोग्य प्रश्न आहेच. विकसनशील देशांमध्ये जुलाबाचा प्रथमोपचार म्हणून ORT मोठ्या प्रमाणावर देतात. अर्थात तोंडी द्रावणाचा वापर हा काही जुलाब या मूलभूत समस्येवरचा अंतिम उपाय नव्हे. जुलाबांचे आजार कमीत कमी राहण्यासाठी सर्वांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा अणि सुयोग्य मलनिःसारण या प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
*****************************************
संदर्भ :
1. MAGIC BULLET: THE HISTORY OF ORAL REHYDRATION THERAPY
(https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1036912/)

2. Oral rehydration salts
(https://www.who.int/publications/i/item/WHO-FCH-CAH-06.1)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.
डॉ. महालनबीस यांच नाव यासंदर्भात वाचनात आलेले होते. डॉक्टरांचे काम प्रेरणादयी आहे.

छान लेख. डॉ महालनबीस यांच्याबद्दल तुम्ही याआधी लिहिले होते , ते आठवले.
शीर्षक 'जुलाबावरील......' असे अधिक योग्य वाटेल.

धन्यवाद !
'जुलाबावरील' .... असा बदल केला आहे.

डॉ महालनबीस >>
होय, गतवर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर त्याची छोटीशी दखल सोडियमच्या धाग्यावरील प्रतिसादात घेतली होती. तेव्हाच हा विषय सखोल वाचायचे ठरवून ठेवले होते.

चांगली माहिती.
माझ्याकडे डॉ. आर. के. आनंद यांचं एक अनुवादित पुस्तक होतं 'मुले अशी वाढवा' Happy चांगलं पुस्तक होतं. त्यात त्यांनी या ORS बद्दल सविस्तर लिहिलं होतं. त्यांनीही हे म्हटलं होतं की हा या शतकातला महत्त्वाचा शोध आहे.
साखर आणि मिठाच्या प्रमाणाच्या बाबतीत त्यांनी एक ठोकताळा लिहिला होता की त्या द्रावणाची चव आपल्या अश्रूंपेक्षा जास्त खारट नसली पाहिजे Happy
प्रमाणात गडबड होऊ नये म्हणून विकत घ्यायचं झाल्यास WHO ने प्रमाणित केलेलं पाकीटच घ्या आणि घरी तयार करायचं असेल तरी त्यांनी एक लिटरसाठी साखर आणि मिठाचं प्रमाण टेस्पूनच्या संख्येत दिलं होतं.

खूप रोचक लेख.
>>>ग्लुकोजचे शोषण होण्यासाठी सोडियमची आवश्यकता असते>>>> चांगली माहिती.

खूप रोचक लेख.
>>>ग्लुकोजचे शोषण होण्यासाठी सोडियमची आवश्यकता असते>>>> चांगली माहिती.

थोडक्यात आटोपशीर माहिती, बेस्ट !

बाकी ही महालनबीस मंडळी म्हणजे clan of achievers म्हणावी. या डॉक्टरांचे काका जागतिक कीर्तीचे statistician. त्यांच्या नावाने कोलकात्यात दरवर्षी एक व्याख्यानमाला होते आणि अनेक जागतिक कीर्तीचे विद्वान त्यात भाग घेतात. असो, अवांतराबद्दल क्षमस्व.

मी त्यांचंच नाव आधी ऐकलं होतं. स्टॅटिस्टिक्स वरून नव्हे, तर भारताच्या पंचवार्षिक योजनांच्या संदर्भात. ते यांचे काका हे माहीत नव्हतं

छान माहितीपूर्ण लेख. आजारांच्या बाबतीत आजकालपेक्षा तो फारच खराब कालखंड होता. अर्थात तेंव्हाचे राहणीमान, अशुद्ध पाणी वगैरे बऱ्याच गोष्टी कारणीभूत होत्या. त्यामुळे या सर्व डॉक्टर मंडळींना शतशः प्रणाम _/\_

काही प्रश्न मनात आले:
१. >> तोंडातून घेण्याच्या साखर व क्षारयुक्त पावडरी औषध बाजारात मिळू लागल्या. त्या शास्त्रशुद्ध नव्हत्या

म्हणजे मीठ साखर पाणी हे combination आधी माहिती होतेच But ultimately it is their proportion that actually matters a lot. (कि ज्या proportion वरच मग पुढे संशोधनावर भर दिला गेला). जर असे असेल तर मग सरधोपट "मीठ, साखर, पाणी... बहुगुणी" अशी जाहिरात करणे misguiding होत नाही का? (proportion ला इतके महत्व असते मलाही माहीत नव्हते जे केवळ या लेखामुळे कळले. माझा स्वतःचा सुद्धा समज होता कि अंदाजाने मीठ साखर पाणी घेतले की झाले)

२. इंजेक्शन म्हणजे सलाईन या अर्थाने ना? (मला इंजेक्शन म्हटले की ते छोट्या प्रमाणात दंडात इ. देतात तेच डोळ्यासमोर येते)

३. सर्वात शेवटचे वाक्यच खूप महत्त्वाचे वाटले. prevention is better than cure. आज हे रोग जवळपास हद्दपार झालेत कारण पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत आज प्रचंड जागरूकता आहे. पण तेंव्हा लाखो लोक आजारी जिथं पडत होते तिथे उपचारांपेक्षा पाणी शुद्ध (उकळून) करून पिण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला गेला नव्हता का?

अतुल,
काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेला सविस्तर प्रतिसाद आवडला.

१. मग सरधोपट "मीठ, साखर, पाणी... बहुगुणी" अशी जाहिरात करणे misguiding होत नाही का? >>>
शास्त्रीय दृष्ट्या हा मुद्दा अगदी बरोबर आहे. मीठ साखर पाणी ही जाहिरात आपल्याकडील दुर्गम ग्रामीण भागांसाठी एक तडजोड म्हणून केलेली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत हवालदिन न होता किमान एवढा सोपा उपचार चालू केला तरी संबंधित रुग्णाची प्रकृती एकदम खालावत नाही.

२. इंजेक्शन म्हणजे सलाईन या अर्थाने ना? >>>
अर्थात होय ! intravenous infusion असे लांबलचक लिहायचे मी टाळले होते. ‘रक्तवाहिनीतून देणे’ असा उल्लेख लेखात सुरुवातीस केलेला आहे.
पुढे चालू..

३. उपचारांपेक्षा पाणी शुद्ध (उकळून) करून पिण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला गेला नव्हता का?
>>>> अगदी बरोबर आहे.
यासाठी आपल्याला सुमारे 50 वर्ष मागे जाऊन तत्कालीन दुर्गम भागातील आरोग्य-सामान्यज्ञान आणि एकंदरीत जीवनमान याचा अभ्यास करावा लागेल. टोकाच्या गरिबीच्या परिस्थितीत त्याकाळी काय अडचणी येत असाव्यात हेही बघावे लागेल.

लेखासाठी मी जो प्रमुख संदर्भ पाहिला आहे, त्यात जंगलात राहणाऱ्या हजारो लोकांवर उपचार कसे करायचे हा वैज्ञानिकांपुढे तेव्हाचा प्रमुख प्रश्न होता. तसेच युद्धाच्या परिस्थितीमध्ये तर निर्वासितांच्या छावण्यांमधील आरोग्य परिस्थिती किती दयनीय असेल याची आपण कल्पना करू शकतो. अशा ठिकाणी लाखो लोकांना उकळून पाणी देणे सुद्धा अशक्य असणार. त्यामुळेच महासाथी उद्भवत असाव्यात.

दुसरे एक उदाहरण असे आहे :
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रंगूनमध्ये डॉ. जहांगीर अंकलेसारीया यांनी कॉलरासाथीत प्रशंसनीय काम केलेले आहे.
https://theprint.in/pageturner/excerpt/the-indian-doctor-who-saved-india...

त्यांच्या या मोहिमेत कॉलराविरोधी लसीकरण हा देखील महत्त्वाचा भाग होता.

मुद्देसूद स्पष्टीकरणासाठी धन्यवाद कुमार सर.
बरोबर आहे, शिवाय उकळून पाणी पिणे हे preventive आहे. पण एकदा आजार झाला की त्याचा तसाही फारसा उपयोग होत नसेल. तेंव्हा उपचाराशिवाय पर्याय नाही.

अजून एक :

कॉलराचे जंतू दूषित पाणी आणि दूषित अन्नाद्वारेही शरीरात शिरतात. पाण्याच्या तुलनेत अन्नाद्वारे झालेली जंतूंची बाधा रोग होण्यास अधिक पोषक असते.
( जंतूंचा कमी 'डोस' पुरतो).

माहितीपूर्ण लेख.

मुलाच्या लहानपणी होणाऱ्या आजारात आणि नंतर 'puppy' ला gastro झाला असताना दोघांसाठी अनुक्रमे electral आणि ORT powder भरपुर वापरली आहे. हा लेख वाचुन अजुन जास्त डिटेल्स कळले. आभारी आहे.

नेहेमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख.
ही भित्तीघोषणा अनेकवेळा वाचली/पाहिली असल्याने हा उपाय माहीत होता परंतु नेमक्या आणि परिणामकारक उपचारासाठी त्यातील घटकांचे प्रमाण योग्य असावे लागते ह्याची कल्पना नव्हती.

ह्या संदर्भातील एक अनुभव -
मुलगी लहान असताना तिला जुलाबाचा त्रास सुरू झाला तेव्हा बालरोगतज्ञांकडे घेऊन गेलो. त्याने तपासून आणि काय खाल्ले ह्याची चौकशी करून तिला Coke&Chips दे असे सांगितले. हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले (असणार) ते बघून बाकी कशाची सध्या गरज नाही असे अधिकारवाणीने सांगितले (थोडा विक्षिप्त होता). त्याबरोबरीने एक औषध लिहून दिले आणि २४ तासात फरक पडला नाही तर आणि तरच हे औषध दे असे सांगितले.

Coke&Chips चा औषधोपचार ऐकून मुलगी अर्थातच खुश झाली. घरी येताना एका दुकानातून मधून ही "औषधे" घेतली. नंतर विचार केल्यावर ही भित्तीघोषणा आठवली परंतु हा लेख वाचल्यावर त्या डॉक्टरने Coke&Chips ऐवजी योग्य इलेक्ट्राल सुचवायला पाहिजे होते असे वाटले.

* puppy' ला gastro झाला असताना >>>
हे पण रोचक.

**Coke&Chips ऐवजी योग्य इलेक्ट्राल सुचवायला पाहिजे होते
+१०००

29 जुलै : जागतिक ORS दिन
लेखात म्हटल्यानुसार अनेक वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांमधून ओ आर एसचा विकास झाला. या संदर्भात अजून एक नामोल्लेख महत्त्वाचा.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हॉलंडच्या Gerrit Bras या तरुण डॉक्टरांनी थायलंडमधील अनेक कॉलराग्रस्त युद्धबंदयांवर ‘सलाईनचे’ उपचार केले. तिथल्या परिस्थितीत ते नदीचे स्वच्छ पाणी रुमालाने गाळून घेतल्यानंतर उकळत व त्यात खडेमीठ घालत. जुन्या स्टेथोस्कोपची नळी, रिकामी बाटली किंवा रिकामे शहाळे वापरून त्यांनी सलाईन देण्याचा उपचार अनेकांवर केला. अनेकांचे प्राण वाचवल्यामुळे त्यांना ‘हॉलंडचे डॉक्टर कॉलरा’ असा किताब मिळाला.