भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ३. नमन बस्तर

Submitted by मनिम्याऊ on 17 July, 2023 - 02:36

भाग १: पूर्वतयारी
भाग २ : सफरनामा

बस एकदम नवी, स्वच्छ आणि अतिशय आरामदायक होती.
जगदलपूर हे शहर रायपूरच्या दक्षिणेकडे असून रस्त्याने हे अंतर २९० किलोमीटर आहे. वाटेत लागणारी मोठी गावे म्हणजे कुरुंद, धमतरी, चारामा, कांकेर, केशकाल आणि कोंडागांव. कांकेर पार केल्यावर रात्री अडीच वाजता गाडी एक धाब्यावर थांबली. कोणाला चहा हवा असेल किंवा वॉशरूम वापरायची असेल तर इथेच जावे लागेल. इथून पुढे आपण संवेदनशील क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. यानंतर गाडी आता थेट जगदलपूर शहरातच थांबेल अशी चालकाने सूचना दिली आणि २० मिनिटांची विश्रांती जाहीर केली.

इथून पुढे आपण दंडकारण्यात प्रवेश करतो. या घाटाचं नाव आहे 'केशकाल घाटी' ज्याला दंडकारण्याचे प्रवेशद्वार म्हणतात. शतकानुशतके या पहाडांमुळे बस्तर प्रदेश अस्पर्श राहिला होता. इथल्या दुर्गम भूभागाने बस्तरच्या नाग चालुक्य राज्यावरील अनेक हल्ले परतून लावले.
‘केशकाल’ या नावातच त्याचे वैशिष्ट्य दडलेले आहे. इथली रस्त्याची अरुंद आणि अतिशय तीव्र उताराची अशी बारा वळणे आणि खोल दऱ्या नेहमीच वाहनांसाठी काळ ठरले आहेत. काळाच्या उदरात सामावण्यासाठी फक्त केसभर अंतराचा फरक महत्वाचा आहे म्हणून हा 'केशकाल' घाट. याचेच नाव 'बारा भंवर घाट' उर्फ 'तेलिन घाटी'.
keshkal ghati sat image.jpg
.
keshkal ghati telin.jpg
(Image: google earth)

घाटात 'तेलीण' मातेचे मंदिर आहे. तेथे सलामी देऊनच पुढील प्रवासाची सुरवात झाली. रस्ता दिसत जरी नसला तरी घाटाचे प्रत्येक वळण जाणवत होते. रात्रीच्या अंधारामुळे बाहेरची हिरवाई जरी दिसत नसली तरी या घुप्प अंधारात या गच्च जंगलाचा एक वेगळाच गंध आसमंतात जाणवत होता.

सकाळी ६ वाजता बस व्यवस्थित जगदलपूर बस स्टँडला पोचली. येथून हॉटेलवर जायला इ - रिक्षा आणि मोठ्या सहा आसनी रिक्षांची सोय आहे. मात्र ओला /उबेर कॅब सर्व्हिस जगदलापुरात दिसली नाही. इतक्या सकाळी पण बस स्टॅण्डवर बरेच रिक्षेवाले दिसत होते. त्यातलाच एकाला पकडलं.
"भैया नमन बस्तर जाना है"
हां मैडमजी, छोड देंगे, बैठिये आप आटो में" असं सांगितल्यावर रिक्षात सामान चढवून आम्ही सगळ्याजणी स्थानापन्न झालो पण महाराज काही निघायचं नाव घेईना.
आम्हाला वाटले आणखी सवारींसाठी थांबला आहे कि काय? "क्या हुआ भैय्या, चलते क्यू नहीं? "जी सब लोग आ गये क्या?" त्याचा प्रश्न. "हां भैय्या, सब बैठ गये हैं आप चलिये" असं म्हणताच तो हैराण होऊन आमच्याकडे बघत, 'खाली लेडीज्य' असं पुटपुटत चालकाच्या जागी स्थानापन्न झाला. हा असा अनुभव पुढे दोन - तीन वेळेला आला. फक्त बायका बायकाच हिंडताहेत असं पाहून अनेक लोक आश्चर्यचकित व्हायचे. काही ठिकाणी 'चार अकेली लेडीज' म्हणून छोट्या मोठ्या सवलती देखील मिळाल्या.
आता हळू हळू उजाडू लागले होते. आजूबाजूचा परिसर उजळायला लागला होता. सर्वप्रथम काही जाणवले तर कमालीची हिरवाई, रस्त्याच्या दुतर्फा असलेली उंच उंच झाडे आणि अतिशय शुद्ध हवा.
road.jpg
१५ मिनिटांत 'हॉटेल नमन बस्तर' आले. रिसेप्शनच्या दाराशी आम्हाला सोडून रिक्षावाला परत गेला.

reception.jpg
चहूकडे एकदम सामसूम. रिसेप्शनमध्ये पण कोणीच नाही. दारावरची घंटा दोनदा - तीनदा वाजवल्यावर एका अर्धवट झोपेत असलेल्या माणसाने दार उघडले. त्याला बुकिंग डिटेल्स दिलेत. डायमंड डबल रूमचे बुकिंग असून देखील आमच्यासाठी 'प्लॅटिनम स्वीट' राखून ठेवण्यात आला असल्याचे शुभवर्तमान समजले. झालं असं होतं कि आदल्या दिवशी जे त्या खोलीत राहत होते त्यांनी मुक्काम वाढवल्याने मधल्यामध्ये आम्हाला हि बढती मिळाली होती (आणि ती पण चकटफू). आनंदाने किल्ल्या ताब्यात घेतल्या.

हे हॉटेल म्हणजे साडेतीन एकर शेतजमिनीवर वसविलेले मस्त रिसॉर्ट आहे. मुख्य प्रवेशदारापासूनच दोन्ही बाजूला उंच उंच झाडे असलेला हिरवागार रस्ता पुढे स्वागतकक्षापर्यंत जातो.
resortfall_wideview.jpg
स्वागतकक्षासमोरच एका भल्या मोठ्या झाडाखाली एक सिमेंटची छोटीशी टुमदार छत्री बांधली आहे आणि तिथे आपला गणपतीबाप्पा मांडला आहे.
ganesh1.jpg
रोज सकाळी या गणूबाप्पाची छोटीशी पूजा होते. तसेच इथला प्रत्येक कर्मचारी ड्युटीवर हजर झाल्यावर आधी या बाप्पाला भेट दिल्या शिवाय राहत नाही.

बाप्पा समोरून एक लांबच लांब पायवाट आत एका टेराकोटाच्या शिल्पाकडे जाते. हे एक बस्तरचे प्रतीकात्मक चिन्ह आहे.
resortfall.jpg

या इस्टेटीमधून एक नैसर्गिक ओढा पण वाहतो. त्यावरला पिटुकला कमानदार पूल परिसराच्या सौन्दर्यात भर घालतो.
pul.jpeg

पुढे राहण्याचे कॉटेजेस आहेत. प्रत्येक इमारतीसमोर अतिशय सुंदर बाग राखलेली आहे.
room.jpg
एकीकडे भोजनगृह तर मधोमध सुंदर निगा राखलेले विस्तीर्ण लॉन, त्यावर उंच झाडाला टांगलेला झोका व लहान मुलांसाठी छोटेसे पार्क आहे.
nam.jpg
.
namanbastar decoration.jpg
.
jhula.jpg

आमचा छोटीशी बाल्कनी असलेला स्वीट पण भारी होता.
suite_0.jpg

सकाळी ८ वाजताच फ्रेश होऊन हॉटेलच्या उपाहारगृहात जाऊन थोडाफार नाश्ता केला व दिवसभराच्या भटकंतीच्या नियोजनसाठी आधी ठरल्याप्रमाणे हॉटेल मॅनेजरची भेट घेतली. इथे सरकारी वाहनाने शक्यतो कोणी प्रवास करत नसल्याने सरकारी वाहतूक व्यवस्था विशेष अशी नाहीय. शिवाय प्रत्येक ठिकाणी जायला वाहनांची वारंवारता देखील कमी आहे. त्यामुळे हॉटेलची गाडी वापरण्याशिवाय पर्याय न्हवता. बरं हॉटेलच्या गाडीचे आधीपासून बुकिंग करून ठेवायला त्याने साफ मनाई केलेली होती.

इथे मात्र मनमर्जीचे दर सांगण्यात आले. आम्हाला सांगितले गेले कि
“आता एकाच इनोवा गाडी दिवसभरासाठी उपलब्ध आहे. १० वाजता हॉटेल मधनं निघून कांगेर अभयारण्य आणि तिरथगड धबधबा दाखवून सायंकाळी ६ वाजेपर्यंत परत घेऊन येऊ. तसें तर माणशी ३००० रुपये घेतो पण तुम्ही एकूण दिवसभरासाठी ११००० रुपये भरा.”
मी घासाघीस करायला लागले पण मॅनेजर मात्र अडून बसला होता. आता मात्र थोडा लबाडीचा वास यायला लागला.
"आधे घंटे में फायनल बताईये मॅडम".
समोरून अल्टिमेटम आला.
म्हटलं ठीक आहे सांगते आणि बाहेर आले. आता पुढे काय करावं ह्याबद्दल आपापसात चर्चा चालू असतानाच हॉटेलचाच एक कर्मचारी हळूच म्हणाला
"मेरे दोस्त कि गाडी है अव्हेलेबल, खुद्द ड्रायविंग करता हैं, आपको घुमा लायेगा पुरा दिन. आप कहते हो तो बात करूं क्या?"
म्हटलं दे बाबा नंबर. त्याच्या मित्राबरोबर बोलले. दिवसभराचे ४५०० रुपये ठरले. २० मिनिटांत पिकअपला येतो म्हणाला. आम्ही तयार होतोच. पाणी आणि भरपूर खाऊ सोबत घेतला. ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हजर झालेत. चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड म्हणूनही काम करतो म्हणाला.
म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
क्रमशः
भाग ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!
काहीच माहिती नाही या ठिकाणांबद्दल !

वाचतोय.

'केश काल' नावाची उत्पत्ती पटते आहे त्या गूगल इमेज बघून.

पु भा प्र

लेखन आवडले. विजयालक्ष्मीचे फोटो फार गोड आहेत. रिसॉर्ट, बागा व सगळं वातावरण एकदम प्रसन्न आहे.
अनिंद्य+१