१४ मे बार बार! --१

Submitted by केशवकूल on 16 July, 2023 - 03:54

१४ मे.
सब तीरथ एक बार. लेकीन १४ मे बार बार!
आज काय तारीख आहे? १६ जुलै. कशावरून? कारण काल १५ जुलै होती. हा तुमचा निव्वळ भ्रम आहे. मी तुम्हाला सांगतो आज १४ मे आहे. काही दिवसांनी लोक म्हणतील आज १८ सप्टेंबर आहे. मग म्हणतील आज २० डिसेंबर आहे. तुम्ही कुणा कुणावर विश्वास ठेवणार? ही मिस्टर कुलकर्णीची कथा वाचा. मग मी काय सांगतो आहे त्याच्यावर तुमचा विश्वास बसेल.
संध्याकाळचे सात वाजण्याची वेळ असावी. कुलकर्णी हॉटेलमध्ये आला तेव्हा फक्त एकजण शेवटच्या टेबलापाशी बसला होता. हे सद् गृहस्थ नेहमीच्यातले नव्हते. त्याच्याच वयाचे असावेत.
एकाएकी वीज कडाडल्यासारखा आवाज झाला. लख्ख प्रकाश पडला. कुलकर्णी घाबरून उठून उभा राहिला. बघतच राहिला. हॉटेलमधले वेटर. गल्ल्यावरचा शेट्टी, रस्त्यावरचे लोक जणू काही झालेच नाही अश्या आविर्भावात वागत होते. कदाचित मला भास झाला असेल. होतं असं कधी कधी. कुलकर्णी मनातल्या मनात म्हणाला.
“हा भास नाही, कुलकर्णी.” तो हॉटेलच्या टोकाला बसलेला त्याच्या समोर येऊन बसला होता. “हा भास नाही.”
तो उंच, कृश शरीरयष्टी असलेला आणि गालफाडे बसलेला माणूस त्याच्याशीच बोलत होता. त्याचे नाक गरुडासारखे होते. नजर आरपार जाणारी. एव्हढा सगळा ठसठसीत माणूस का कोणजाणे कुलकर्ण्याला पुस्सट वाटला.
“तो आवाज मी ऐकला, तुम्ही ऐकला म्हणताहात. पण मग आपल्या शिवाय दोघांशिवाय कुणीच कसा नाही ऐकला?”
“मी साने. कुलकर्णी, त्याचे काय आहे, ह्या जगात, ह्या जगात अशा काही अद्भुत गोष्टी आहेत ज्याची सर्व सामान्य लोकांना शष्प देखील जाणीव नसते. तुम्हाला जे दिसतं, जे ऐकू येते ते सगळ्यांनाच दिसेल, ऐकू येईल ह्याची गॅरंटी नाही. प्र्त्येकजण त्याला ऐकू येणाऱ्या संगीताच्या तालावर लेफ्ट राईट करत जीवनाची मार्गक्रमणा करत असतो. बर, ते जाऊ द्या. मी एवढ्या साठी आलो आहे कि हा तुमचा जांभळ्या रंगाचा सदरा. गेली कित्येक वर्ष तुम्ही हाच शर्ट रोज वापरत आहात असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला वेड्यात काढाल. हो कि नाही? किती वर्ष झाली असावीत बर? हजारापेक्षा जास्तच कमी नाही. दुसऱ्या रंगाचा सदरा वापरावा असं तुम्हाला वाटत नाही? का तुमच्या वार्डरोबमध्ये हा एव्हढाच एक आहे?”
कुलकर्णीने मोठ्याने हसायचा मोह मोठ्या कष्टाने आवरला.
“अहो साने साहेब, हा शर्ट कालच माझ्या मेव्हण्याने मला भेट म्हणून दिला. माझ्याकडे निरनिराळ्या रंगाचे सात आठ शर्ट आहेत. पण बायकोनं आग्रहाने हा शर्ट वापरायला दिला. लकी माणसाचा शर्ट आहे हं.”
“”हा शर्ट प्रथमच वापरतो आहे” असं तुम्हाला वाटतंय. पण मी तुम्हाला गेली कित्येक वर्षे बघतो आहे. हाच शर्ट, हीच पँट, हेच बूट, हेच रिस्टवाच,”
कुलकर्णी मनापासून हसला. हसू दाबून त्याने पुस्सटला विचारले, “अजून काही.”
साने थोडा विचारात पडला. सांगावे कि नको. “तुमच्या मिसेसने आज नाश्त्याला उप्पीट केले होते ना?”
“हो. त्याचे काय?”
“त्याचे काय? रोज सकाळी उठून तुम्ही अजून किती वर्ष उप्पीट एके उप्पीट खाणार आहात?”
“हे म्हणजे फारच झाले. मी उप्पीट खावे का पोहे खावे माझा वैयक्तिक प्रश्न आहे, माझी मर्जी. नाही का?” कुलकर्णी जोरात बोलले.
“अर्थात अर्थात. मला पूर्ण मान्य आहे. पण एक सांगतो रावसाहेब, उप्पीट का पोहे? जांभळा का ग्रे? हा चॉइस तुम्हाला नाहीये. रोज तुम्ही उप्पिटच खाणार आहात. तुम्ही जांभळ्या रंगाचाच शर्ट घालणार. हे निर्णय तुमच्यासाठी आधीच घेतले गेले आहेत. तुम्हाला उगाच वाटतं कि मी आज बायकोला उप्पीट करायला सांगितलं. आणि केवळ मी सांगितलं म्हणून तिनं केले. मी आज मुद्दामहून जांभळा शर्ट सिलेक्ट केला. पण मिस्टर, गेले कित्येक वर्ष तुम्ही रोज रोज आणि फॉर एवर हेच करत आहात. तेच तेच पुन्हा पुन्हा. तुम्ही एकटे नाही आहात, सगळं जग हेच करत आहे. कंटाळा कसा येत नाही तुम्हाला लोकांना? सांगून काही उपयोग नाही म्हणा.”
कुलकर्णी त्याच्या बडबडीला कंटाळले. ह्याला आपल्या समोरून कसं कटवायचे?
“हे पहा साने गुरुजी, मी थोडा घाईत आहे. आपण नंतर केव्हातरी भेटून सविस्तर बोलूयात का?”
“नंतर? केव्हढी रिस्क घेऊन मी इथे निव्वळ तुम्हाला भेटायला आलो. देअर इज नो नंतर. सिगारेट पिता ना? ही घ्या.” त्याने कुलकर्णीच्या समोर पाकीट धरले.
“पण मिस्टर साने, सार्वजनिक जागी सिगारेट पिणे मना आहे. हे पहा इथे लिहिले आहे.”
“कुलकर्णी, काहीच्या काही! कुठे काय लिहिले आहे? आणि इथे आपल्याला कोण बघणार आहे? घ्या घ्या. तुम्हाला सिगारेट प्यायची आहे ना. मग प्या. अहो तुमचा चेहराच सांगतो आहे. कि तुम्हाला प्यायची जबरदस्त तलफ आली आहे. हे पहा.” त्याने स्वतः सिगारेट पेटवली. नाका तोंडातून धूर सोडत त्याने कुलकर्णीच्या समोर पाकीट धरलं.
कुलकर्णीने हळूच इकडे तिकडे बघत सिगारेट शिलगावली.
हॉटेलमध्ये अजून काही माणसं आली पण कुणीही त्यांच्याकडे ढिम्म देखील लक्ष दिले नाही.
“अजून गंमत ऐकायची आहे? नाही? ठीक आहे तुमची मर्जी. नाही सांगत बुवा. लोकांना मी असं काही सांगितले कि लोक मला वेडा समजतात. १९३० साली जर्मनीत मी एका जर्मन माणसाला सांगितले होते हिटलर बद्दल. तेव्हाही तो मला वेडाच समजला होता.”
“तसं नाही हो साने साहेब...” पण हे वाक्य ऐकायला साने तिथे नव्हतेच मुळी. ते ताड ताड पावले टाकीत केव्हाच हॉटेलच्या बाहेर पडले होते.
पुन्हा एकदा वीज कडाडली. कुलकर्णी जणू स्वप्नातून बाहेर पडला. आता म्हणजे दिवसा स्वप्न पडायला लागली होती. स्वप्न नाहीतर काय?
तस म्हटलं तर आजचा दिवस स्वपवत् होता. “कल्पित अकल्पित” नावाच्या मासिकाच्या संपादकाने त्याची कथा स्वीकृत केली होती. थोडे फार मानधनही पाठवले होते. इतक्या ठिकाणाहून नकारघंटा घेऊन आलेली ती कथा! पण सर डॉक्टर भवभूतींनी म्हणून ठेवले आहेच.
“स्पेस-टाईम अनंत आहे. तस्मात् माझी कथा कधीतरी केव्हातरी कुठेतरी कुणालातरी आवडेलच.”
त्याच्यावर विश्वास ठेवून ती कथा यच्चयावत सर्व मासिकांच्याकडे पाठवली होती. आणि सर्व मासिकांनी ती साभार परत पाठवली होती.
पण आजचा दिवस निराळा होता.
अजून एक. कुलकर्णीला आज बढती मिळाली होती. सज्जड पाच हजार दरमहाची बढती.
एक सेलेब्रेशन तो बनता ही है.
एका हातात गुलाबांचा पुष्पगुच्छ आणि दुसऱ्या हातात टायटनची लेडीज रिस्टवॉचची डबी घेऊन कुलकर्णीने घराकडे मोर्चा वळवला.
रस्त्यात एका अनोळखी माणसाने त्याला हटकले.
“एक्सक्युज मी, तो साने कुठे दिसला होता का?”
“साने? कोण साने?” कुलकर्णीचा गोंधळ झाला होता.त्यांनी आठवण्याचा प्रयत्न केला. “नाही बुवा.”
“अहो तो उंच, कृश शरीरयष्टी असलेला आणि गालफाडे बसलेला माणूस त्याचे नाक गरुडासारखे आहे. नजर आरपार जाणारी. तो सान्या. आता मी त्याला जाताना बघितला.”
“सॉरी, हा नाही माहित, एक साने आमच्या ऑफिसमध्ये आहे पण तो बुटका जाडसर आहे. तो तर कसबा गणपतीच्या देवळा जवळ रहातो.”
“तो नाही हो. मी शोधतोय तो साने कुठं काम वगैरे करणाऱ्यातला नाही. एक नंबरचा डांबिस माणूस; भेटला तुम्हाला तर ह्या नंबरवर फोन करून मला कळवा. अरेस्ट वारंट आहे त्याच्यावर. ऑफ़िशिअल सिक्रेट कायद्याचा भंग केल्याचा आरोप आहे. हे माझे कार्ड ठेवा.” अस बोलून तो माणूस चालता झाला.
घरापर्यंत येईस्तवर कुलकर्णी साने एपिसोड विसरून गेला.
घरी बायाकोनं त्याला बघितलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. गुलाबाच्या फुलांचा गुच्छ! आपला नवरा एव्हढा रसिक केव्हापासून झाला? कुलकर्णीने ऑफिसमधला प्रमोशनचा किस्सा ऐकवला. मासिकात छापुन येणाऱ्या गोष्टीची कथा सांगितली.
“आजच्या दिवसाची आठवण म्हणून हे रिस्टवाच तुझ्यासाठी.”
“अहो, कशाला खर्च केला. टाईम काय मोबाईल मधे बघता येतो की.”
चहा पिता पिता अशी बरीच काही बोलणी झाली.
एकूण हा १४ मे. असा हा दिवस आयुष्यात पुन्हा कधी येणार? चमत्कार रोज रोज होत नसतात. आज झाला. म्हणून रोज थोडाच होणार.
त्याने फुलांचा गुलदस्ता फुलदाणीत ठेवला. नवीन घेतलेले मनगटी घड्याळ बायकोने शोकेसमध्ये ठेऊन दिले.
सुखी माणसाचा लकी जांभळा शर्ट आता वार्डरोब मध्ये हँगरवर लटकत होता.
१४ मे संपत आला होता.
अशा प्रकारे ते सुखी जोडपे एकमेकांच्या मिठीत सुखाने झोपी गेले.
zzzzzzzzzzzzzzzzzzzz

Group content visibility: 
Public - accessible to all site users