भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग २ ‘सफर’नामा

Submitted by मनिम्याऊ on 14 July, 2023 - 02:32

भाग १
सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.... पुढे...

ख्रिसमस पार पडला. बॅग भरण्यावरून नेहमीप्रमाणेच असंख्य छोट्या मोठ्या चकमकी उडाल्यात (हि एक आमच्या घराची परंपरा आहे कारण आईसाहेबांना नेहमीच वजनाला हलक्या पण संख्येने जास्त बॅग्स घ्यायच्या असतात तर मला वजन जास्त झाले तर चालेल पण नग जास्त होता कामा नयेत. समोर आणून घातलेल्या ढिगातून गरजेपुरत्याच वस्तू निवडून बाकी पांघरायला घेतलेल्या चादरी,जास्तीचे पायमोजे/हातमोजे इ. वस्तूंवर काट मारली.
(इथला संवाद :
- "हि पांघरुणे कशाला घ्यायची ?"
- "अगं असू देत, आपल्या आपल्या चादरी असलेल्या बऱ्या"
- "अगं हॉटेल बुक केलं आहे तिथे. धर्मशाळा नाही"
- "बस मध्ये लागतील"
- "स्लीपर कोचचं बुकिंग आहे आपलं. ते देतात पांघरुणे"
- "छे छे. त्यांचं नको. कधी धुतात कि नाही कोण जाणे.. "
- "शाली घेतल्या आहे ना? त्या वापरा बस मध्ये". आणि मग बरीच धुसफूस होऊन पांघरुणे कपाटात परत गेलीत)
असो. तिघीत मिळून दोन बॅग्स आणि एक खाऊची पिशवी रात्रीच भरून ठेवली. सकाळी ५ वाजताच निघायचे होते. ओला शेड्युल करून ठेवली आणि रात्री जरा लवकरच गुडूप झालोत.

२६ तारीख उजाडली. ट्रेन स्टेटस ‘On Time’ बघून सव्वासहाची ट्रेन गाठायला पावणे सहालाच मध्य रेल्वेचे इतवारी स्टेशन गाठले आणि कानावर घोषणा.. 'प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे , गाडी क्रमांक 12856 , नागपूर- बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेच्या ५० मिनिटे उशिराने सुटेल. प्रवाशांना होत असलेल्या असुविधेबद्दल …

पहिली माशी इथेच शिंकली. ठीक आहे. आलिया भोगासी असावे सादर. १ तासच ना, बसुया स्टेशनवरच. तसे स्टेशन एकदम स्वच्छ होते त्यामुळे एक बेंच पकडून तिथे ठिय्या दिला. खाऊची पिशवी उघडल्या गेली. हळू हळू आमचे सहप्रवासी आजूबाजूला येऊन बसायला लागलेत. एक शाळेची सहल आली आणि शांत वातावरणात एकदम जिवंतपणा आल्यासारखा झाला. ७ वाजता मघाचीच घोषणा परत. पण आता ५० मिनिटांऐवजी २ तास ५० मिनिटे होती. आता वैताग यायला लागला. काही लोक इतर काही पर्याय मिळतात का ह्याची चौकशी करू लागलेत. आजूबाजूनी 'भारतीय रेल्वे'वर टीका / टिप्पणी सुरु झाली. विनोद सांगितले जाऊ लागलेत. काहींनी बसचा पर्याय निवडून रेल्वे स्टेशनवरून काढता पाय घेतला. पुन्हा एकदा तिसरी घोषणा झाली.... आपल्या निर्धारित वेळेच्या ५ तास १० मिनिटे उशिराने सुटेल..

आता मात्र आमचं धाबं दणाणलं. हे असंच चालू राहिलं तर कसं? जरी आपली जगदलपूरसाठीची बस रात्री उशिराची आहे तरी संध्याकाळच्या आत रायपूरला काहीही करून पोचायलाच हवं. बसल्या बसल्या मोबाईलवर इतर गाड्यांचे पर्याय शोधायला सुरवात केली. सगळीकडे १०० च्या पुढे WL किंवा मग सरळ REGREAT. आता कसं करायचं? yesss.. दुपारची २:३० ची वंदेभारत. AVL २०६. लगेच BOOK NOW वर क्लिक केले. इकॉनॉमी क्लासची ३ तिकिटे काढलीत. इंटरसिटीचं आरक्षण रद्द केलं. refund मिळाला तर ठीक, नाहीतर तेवढे पैसे 'भारत सरकार सेवार्थ' असं म्हणून १०:३० वाजता आमची वरात परत (खाऊच्या निम्म्या फस्त झालेल्या डब्यांसह) घरी दाखल झाली.

दुपारी १ वाजता जेवणे आटोपली. खाऊचा डब्बा नव्याने भरला. 'सुटसुटीतपणे वागवायला बरी' म्हणून एक एक्सट्रा बॅग तेवढ्या वेळात सामानात सामील झालीच. आणि यावेळेला ट्रेन स्टेटस तीन तीन वेळेला तपासून घेत परत एकदा आमच्या स्वाऱ्या स्टेशनात दाखल व्हायला रिक्षात बसल्यात. स्टेशन जवळ पोहोचलोच. एक उड्डाणपूल बाकी आहे कि आम्ही स्टेशनातच. पण.. पण.. पण..
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे हे कसे काय बरे विसरलो आम्ही? झिरो माईल चौकाजवळ रास्ता रोको आंदोलन चालू होते. रस्त्यात अनेक मोर्चे, पोलिसांचे कठडे. मामूच मामू चहूकडे- गेली आता ट्रिप कुणीकडे??? एका पोलिसाने रिक्षा अडवली.

"मामा, स्टेशनपर जाना है. यहांसे नजदिक पडेगा, जाने दो ना" त्याने आत डोकावून बघताच आम्ही आर्जव केलं.
"कहाँ जाना हैं? कौनसे गांव? कौनसी गाडी से?"
उलटतपासणी सुरू झाली. सगळ्या चौकशीला यथाशक्ती सामोरे गेल्यावर(च) मामांचे समाधान झाले आणि त्याने बदली रस्ता सांगितला. १० मिनिटे इथेच गेलीत. आता घाई करणे गरजेचे झाले होते. रिक्षावाल्या भैयांना १० वेळा "जल्दी जल्दी चलो भैया, सौ रुपये एक्सट्रा देंगे" बोलून झाले. पण रिक्षा भयानक ट्राफिक जॅम मध्ये फसली होती. एकदा विचार केला. जाऊदे उतरू इथेच. समोर तर आहे स्टेशन. जाऊया चालत चालत. पण भैय्यानी त्यांचे रिक्षा चालनाचे कसब, नागपुरातल्या गल्लीबोळांचे ज्ञान आणि तोंडाने मुक्तपणे समोर येईल त्या प्राण्याला शिव्या घालण्याइतका (अप)शब्दसंग्रह यांच्या जोरावर आम्हाला गाडीसुटण्यापूर्वी बरोब्बर १० मिनिटे नागपूर जंक्शन रेल्वे स्थानकाच्या मागील दारात म्हणजे 'संत्रा मार्केट गेट' वर नेऊन सोडले आणि एक्सट्रा १०० रुपये कमावलेत.

समोर आलेल्या पहिल्या कुलीला पकडले. “वंदे भारत. बोगी XYZ सीट नंबर XYZ” इतकेच सांगितले आणि सामान अक्षरश: त्याच्या हातात कोंबले. कुली "आओ मेरे पीछे" म्हणाला आणि (जवळ जवळ) अंतर्धान पावला. आम्ही अक्षरश: धूSSSSम पळत त्याच्या मागे निघालो. त्यात माँसाहेबांना स्वयंचलित जिन्यांचा फोबिया. आता आली पंचाईत. शेवटी मी समोरून आईचा हात धरून तिला हळूच ओढले आणि विजयालक्ष्मीने "आज्जी यू कॅन डू इट" म्हणत मागून हलकासा धक्का देत आजीला सरकत्या जिन्यावरून इच्छित डब्यासमोर आणण्याचे कठीण कार्य संपन्न केले. कुली आमच्या सीटवर वाट बघत बसला होताच. त्याचे भाडे घेऊन तो उतरताच गाडीचे दरवाजे बंद झालेत. हुश्श…

'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने' या म्हणीची पुरेपूर प्रचिती या अर्ध्या दिवसात आम्ही घेतली. आणि 'सफर'नामा या शब्दाचा अर्थ इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांप्रमाणे उमजला.

'वंदे भारत एक्सप्रेस' के क्या केहने... ! सगळीकडे नव्याची नवलाई झळकत होती. स्वयंचलित दरवाजे, इंग्रजी, हिंदी, मराठी आणि छत्तीसगढी अशा चौभाषिक घोषणा, स्पीड डिस्प्ले बोर्डस, सीटच्या पाठीला असलेले खानपानाचे टेबल्स, टिपटॉप गणवेशधारी कर्मचारी.
गाडीने वेग घेतला.. थोड्याच वेळात व्यवस्थित ट्रे मधून अल्पोपहार सर्व्ह करण्यात आले. त्यानंतर आईस्क्रीम. मज्जाच मज्जा..! विजीची पलीकडल्या सीटवरल्या अंकलशी गट्टी जमली होती. मग काय, त्यांच्या वाटणीचे आईस्क्रीम पण तिलाच.
vandeBharat1.jpeg

गोंदिया पार केले आणि गाडीने महाराष्ट्र सोडला. आता नवे राज्य. आजूबाजूचा भूप्रदेश पण थोडाफार बदलायला लागला होता. विरळ तुरळक झाडी जाऊन आता गच्च घनदाट झाडी दिसायला लागली. आता गाडी 'डोंगरगढ - धारा रिझर्व फॉरेस्ट' मधून जाते.
Dongargadhra1.jpg

साडेचार वाजता डोंगरगढ पार केले. 'बम्लेश्वरी' या मूळ आदिवासी देवतेचे ठाणे असलेले 'डोंगरगढ' हे या भागातले हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. घनदाट झाडीने वेढलेल्या काळ्या खड्या कातळांवर वसलेल्या उंचावरच्या मंदिराचे गाडीमधूनच दर्शन होत होते.
या देवीला झेंडूच्या फुलांची आरास करतात. सोबतच्या अंकलनी त्याबद्द्लचे एक मजेशीर लोकगीत 'चलो चले देखणं को फुल गेंदा' अगदी तालासुरात म्हणून दाखवले.

Dongargadh.jpg

असा हसत खेळत प्रवास पार पडला आणि सायंकाळी ६ वाजता रायपूर आले. आमच्या जुन्या वेळापत्रकानुसार तब्बल ७ तास उशिराने रायपूरात पाय ठेवला. तेथे कळले कि सकाळची इंटरसिटी एक्सप्रेस अजूनही पोहोचली नाहीय..

जुन्या रायपुरातील डांगानिया भागात मावशीचे घर आहे. तिने भलेमोठे स्वागत केले. रात्रीसाठी स्वयंपाक करून ठेवलाच होता. इन मिन तीन जणी जेवायला (कच्चा-लिंबू गाडीतच खाऊन-पिऊन आता सुस्तावला होता) पण जेवण एकदम साग्रसंगीत. सुपापासून तुपापर्यंत चारीठाव जेवायला होते. "अगं एवढं कशाला करत बसलीस? आता लगेच रात्रीचा बस प्रवास आहे" तर मावशी सांगू लागली, कि "माझ्याकडे पाहुणे येणार म्हटल्यावर शेजाऱ्यांनी एक- दोन पदार्थ खास बनवून आणून दिलेत. आपके मेहमान वो हमारे मेहमान" अशी पद्धत आहे. म्हणून इतके पदार्थ झालेत". थोडे थोडके अन्न पोटात आणि बरेचसे फ्रीझ मध्ये ढकलले. थोडा वेळ आराम केला .

रात्री १०:३० वाजताची 'स्लीपरकोच' बस होती. नवे बसस्थानक जरा शहराच्या बाहेर असल्याने पावणे दहा वाजताच ज्योतीमावशी तिच्या मुलासह कार घेऊन हजर झाली व आम्ही ते भले मोठे बसस्थानक गाठले.

आजच्या दिवशीचा suffer नामा अजून संपला न्हवता हेच खरे. बस स्थानकात गेल्यावर कळले कि रायपूर पासून १० किमी अंतरावर कुठेतरी दोन ट्रक ड्रायव्हर्स मध्ये भांडण होऊन मारामाऱ्या झाल्यात आणि त्यांनी आता चक्का जाम सुरु केलाय. सगळ्या बसेस तेथे अडकल्या आहेत. 'जय हरी विठ्ठल. बसा आता इथेच भजन करत'. विजयालक्ष्मीला दिवसभराच्या दमणूकीने झोप अनावर झाली होती. मग तेथेच कारमध्ये तिला झोपवले.
अर्ध्या तासानंतर एक बस दुरून येताना दिसली. मग थोड्या थोड्या अंतराने एक एक बस येऊ लागली. "चला, विठ्ठल पावला म्हणायचं." आणि मग १०:३० च्या बस मध्ये पावणे बाराला झोपलेल्या बाळासह स्थानापन्न होऊन आम्ही जगदलापूरच्या दिशेने कूच केले.
भाग ३ : नमन बस्तर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.
फक्त ' बसलोत, झाल्यात, गेलीत' ही क्रिया पदांची योग्य रूपे नाहीत, त्यामुळे ते खटकते.
ते नुसतेच बसलो, झाल्या, गेली..असे पाहिजे.

खूपच मस्त वर्णन आणि एकदम वेगळ्याच ठिकाणचा प्रवास! छान लिहीलंय!

प्रवास ह्या भागासारखा पुढेही थरारक होत जाणार की काय, अशी उत्सुकता वाटते आहे! Happy

सुंदर लिहिलंय मानिम्याऊ,

ते गाडी लेट होण्याचं प्रकरण एवढं चित्रदर्शी होत की वाचून माझीही तगमग झाली...!

अरे वा! मस्तंच...
हा भाग वाचला मग पटकन पहिला भागही पटकन जाऊन वाचला. आता पुढचा भाग येऊ द्या लवकर..

खूपच आवडला हा भाग! गाडी लेट झाली की काय चिडचीड होते ना? आई बरोबर पॅकिंग करण्याचा भाग मस्त, फक्त आता मीच आई मोड मध्ये गेल्याने हे सगळे मी करत असते Lol

प्रवासाची उत्कंठावर्धक सुरुवात Happy

त्या वंदे भारत ट्रेन्सचा मात्र धसका घेतलाय - म्हशींच्या धक्क्याने इंजिन ड्यामेज, पावसाचे पाणी गाडीच्या छतातून धो धो आत असे सगळे व्हिडियो / लाईव्ह स्ट्रीम बघितले. आता त्यात प्रवास करण्याची हिंमत होणार नाही !

पु भा प्र

बापरे ट्रेनची गडबड फारच त्रासदायक असणार. मस्त लिहीत आहेस. डोळ्यासमोर घडल्यासारखं वाटतंय. पुभाप्र.

आवडले दोन्ही भाग. पुभाप्र. ट्रेन अगदी थोडक्यात मिळाली म्हणायची!
मी रायपूरला एकदाच गेले आहे. माझी एक मैत्रीण बिलासपुरची होती. तिच्या लग्नासाठी रायपूरला गेलो होतो. पण बाकी कुठे काही फिरलो नाही तेव्हा. तिच्या तोंडून जगदलपूर वगैरे नावं ऐकली आहेत.

या भागाला दिलेल्या प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा साऱ्यांचे आभार.
पुढील भाग पोस्ट केला आहे..