कणखर असलेली ' कोमल आजी '

Submitted by किंकर on 5 July, 2023 - 03:08

आषाढी एकादशीची पहाट, सर्व विठ्ठल भक्त पांडुरंगदर्शनसाठी अधीर झाले होते , काही आळंदी ते पंढरी अशी वारी करून, तर काही जण अगदी दूर दूर अंतरावरून येऊन दर्शन रांगेत थांबून , पांडुरंग भेटीसाठी अधीर झाले होते .

आणि अशा या पवित्र दिवशी तिच्या आईने देहत्याग करीत थेट पांडुरंग भेटीसाठी प्रस्थान ठेवले .
श्रीमती शैलजा विश्वनाथ खटावकर ,मृत्यु दिनांक २९ जुन २०२३ ठिकाण वाई जिल्हा सातारा महाराष्ट्र अशी नोंद सरकार दरबारी झाली . मृत्यू दाखला तयार होईल , पुढील सोपस्करासाठी त्याचा वापर होईल . जगरहाटी सुरुच राहील . पण आज मागे वळून पाहतानात्यांची आठवण मन सदगतीत करते त्यामुळे त्यांच्या निधनाची हि घटना इतक्या सहज विसरून जाण्याजोगी नाही .

माझी त्यांची प्रथमची भेट नक्की कधीची हे निश्चित आठवत नाही, पण कदाचित १९७७ साली माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नात सांगलीत झाली असेल, पण भेटीची स्वच्छ आठवण आहे ती भारतीचे बाबा पुण्यात जोशी हॉस्पिटल मध्ये असताना त्यांना भेटण्यास गेलो तेंव्हाची . त्याला हि आता तीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे . स्वतःचा पती दवाखान्यात आजाराने त्रस्त असताना , ज्या खंबीरपणे सेवावृत्तीने त्या उभ्या होत्या त्या कणखर स्त्रीचे दर्शन कायमचे मनावर कोरले गेले.

'ओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती 'या गीतपंक्ती ज्या गावची जत्रा ' बगाड ' ओढ लावत आपल्या सर्वाना बोलावते , त्या बावधन ,वाई येथील या श्रीमती शैलजा विश्वनाथ खटावकर उर्फ आताच्या 'कोमल आजी .'

उभे आयुष्य जगताना त्यांनी ईश्वराकडे नेहमीच - 'मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून' अशी साद घालतच संसार केला . पण पदरी पडलेले माप आपले मानून जगणे समाधानाने सुरु ठेवले.

बावधन सारख्या छोट्याशा खेड्यातील वावर असो किंवा वाई पासून पुण्यासारख्या मोठ्या शहरातील वावर असो , त्यांच्या वावरण्यातील आत्मविश्वास सहज जाणवत असे . बावधन या छोटया खेडेगावात त्यांचे पती पिठाची गिरणी चालवत असत .

संसाराचा गाडा ओढताना गिरणीचे चाक कधीही अडणार नाही याकडे आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने लक्ष ठेवत; जणू त्या गिरणीच्या तालावरच संसाराचा गोड्वा टिकवून ठेवला . पदरात तिन्ही मुलीच असून देखील त्याची खंत न बाळगता तिन्ही मुलींना चांगले शिक्षण दिले. त्यांना नोकरी, व्यवसाय करण्यास खंबीरपणे तयार केले .

संसार निम्यावर आला असताना पती निधनाने कपाळीचे कुंकू पुसले तरी ,थोर कवियत्री बहिणाबाई यांनी म्हटल्या प्रमाणे -'कपाळीचे कुंकू पुसले तरी पतीच्या आठवणींचे गोंदण कायम आहे , मनगटामधील ताकद शिल्लक आहे .' या उक्तीची सत्यता त्यांनी कृतीतून दाखवून दिली.

ग्रामीण भागात शेती करणे हेच दिव्य असलेल्या काळात शेती फक्त टिकवूनच ठेवली असे नाही , तर ती उपजावुन त्यातून किमान व नियमित उत्पन्न मिळेल या कडे लक्ष दिले. पेरणी , निगराणी , आणि काढणी या तिन्ही टप्यावर समक्ष हजर राहून कामे करून घेतली ; प्रसंगी स्वतः केली

भाऊ बंदकी किंवा पुढारीपण या दुर्देवाच्या फेऱ्यात शेतीवाडी , स्वकष्टार्जित मिळकत अडकण्याची शक्यता निर्माण होताच ,ज्या मुलींना कष्टाने शिकवले त्या मुलीच्या सल्ल्याने आणि प्रत्यक्ष मदतीने अगदी कोर्ट कचेरीतील कामे खंबीरपणे उभे राहत पूर्ण करून घेतली . स्वतः तटस्थ राहून पण आपल्या तिन्ही मुलींचे सर्व हक्क खंबीरपणे जपले .

सर्व गोष्टी पार पडता पडता सत्तरी ओलांडली . तीन मुलीत एक मुलगी वाईत स्थिरावल्याने आता मुक्काम बावधन बरोबरच वाईत जास्त होऊ लागला . तिन्ही मुलींची मुले आजी आजी म्हणून गराडा घालत असली तरी जवळ राहणाऱ्या नातवंडातील एका नातीचे नाव कोमल आणि त्यामुळे आता परिसरात ओळख 'कोमल आजी ' अशी झाली. आमची आजी खरेतर खंबीर आणि कणखर आजी आहे असे सर्वच नातवंडे म्हणत असली अलीकडे मनाने आजी खरोखरच कोमल झाली .

स्वतःच्या पती निधनाचे दुःख मुलींच्या साठी पापणीआड झाकून ठेवत संसार रथ एकचाकी होऊन देखील कोसळू न देता पुढे हाकला , पण दुसऱ्या मुलीच्या पतीच्या निधनाने मुलासारखा जावई गेल्याचे दुःख झाकणे जमले नाही . त्या नंतर हि भक्कम गढी पायापासून हादरली.

त्यानंतर दिनक्रम सुरु राहिले पण त्यात वैराग्य डोकावू लागले , पांडुरंग भेटीची आस वाढत चालली . तिन्ही मुली त्यांच्या नोकरी व्यवसायातून निवृत्त झाल्याचे डोळ्यांनी पाहिले . आणि उभा संसार, मोहमाया बाजूला ठेवत , तिन्ही मुलींना सामान वागणूक देत केला असल्यामुळे एखाद्या भाग्यवान संत तपस्वी वृत्तीच्या माणसाप्रमाणे आषाढी एकादशीच्या मंगल दिनी वैकुंठाला प्रस्थान केले .
अशा या कणखर , खंबीर ' कोमल आजीस ' शतशः प्रणाम !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच प्रतिसाद देणाऱ्या मायबोलीकरांचे मनपूर्वक आभार .
अधीन संदर्भातील चूक दुरुस्त केली आहे