‘What we think is impossible happens all the time.’
५ डिसेंबर २०१६.
‘What we think is impossible happens all the time.’
मी अमुक अमुक.
वय वर्षे अठ्ठावीस. लग्न? नाही केलेले अजून. केव्हा करेन? करेन कि नाही? का? तशी कोणी भेटली नाहीये अजून. भेटावी अशी इच्छा आहे. आणि भेटली.
शिक्षण. सी ए. स्वतःचा बिझिनेस आहे. तुम्हाला “आरखेडीया” ही पंचाहत्तरी मजल्यांची बिल्डिंग माहित आहे? तीच ती सेन्ट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट मधली. त्या बिल्डिंगच्या बाविसाव्या मजल्यावर माझे ऑफिस आहे. मी माझ्या बळावर हे उभारले आहे. मला याचा अभिमान आहे. ऑफिस स्पेस सध्या भाड्याची आहे. विकत घ्यायची तयारी करतो आहे. थोडा वेळ लागेल.
मला वाटतं तुम्ही सूटेब्ली इम्प्रेस झाला असाल. सगळेच होतात. अर्थात काही अपवाद असतात.
तर सुरवात अशी झाली.
मी एका सन्माननीय क्लायेंटची सफेदी लावून सेवा करण्यात गुंग होतो. ह्यांनी लफडी करायची आणि आम्ही उपटायची.
फोन नाजूक किणकिणला. स्टेटमेंट? नाही थोडा वेळ लागेल. दोन दिवसात होऊन जाईल. इत्यादी बोलायची तयारी करत फोन उचलला.
“अमुक हिअर. स्टेटमें...” मला खरतर फोनच्या नाजूक किणकिणीवरून समजायला पाहिजे होते. कि फोन कुणाचा असावा.
“अमुक? अमुक कोण? मला निशानशी बोलायचंय.” कर्णमधुर मधाळ आवाजात कोणी (बहुतेक तरुणी) बोलत होती. माझा ताठरपणा विरघळला. आता हा “निशान” नामधारी पंचाहत्तर मजल्याच्या कुठल्याही मजल्यावर नसणार ही माझी खात्री होती. हा राँग नंबर कॉल होता. पण मला संभाषण लांबवायचे होते.
“मिस, निशान दहा मिनिटापूर्वी इथे होते. आमची चर्चा झाली. आपण त्यांच्या सेक्रेटरी लतिका ना. पहा मी ओळखलं कि नाही. निव्वळ तुमच्या सिंगसॉंग आवाजावरून. खरच काय आवाज लाभला आहे...”
फोन कट झाला.
मला हसू आले. काही वेळाने फोन पुन्हा येणार. माझी खात्री होती. हे रॉँग नंबरवाले पुन्हा पुन्हा रॉँग नंबर फिरवतात असे मनोवैज्ञानिक शास्त्र सांगते. का ते माहित नाही. मला वाटतं कि हा ओव्हर कोंफिडंसचा प्रकार असावा. किंवा निव्वळ हट्टीपणा. मी नंबर बरोबर फिरवतोय ह्या टेलिफोन एक्सचेजमध्ये गोची आहे.
फोन पुरुषी आवाजात खणाणला. माझा फोन पण ना. खचितच हा फोन तिचा नसणार. उचलला तर अंदाज खरा ठरला. स्टेटमेंट? नाही थोडा वेळ लागेल. दोन दिवसात होऊन जाईल इत्यादी संभाषण होऊन फोन बंद केला.
पुन्हा फोन नाजूक किणकिणला. आला. तिचा फोन आला.
“निशान? दोन चीज टोस्ट आणि दोन कॉफी. ५०५ मध्ये.”
“मिस लतिका. एक मिनिट फोन बंद करू नका.”
“आता काय झालं? डोंट टेल मी की ब्रेड संपला, चीज संपलं, मायक्रोवेव्ह चालत नाहीये. निशान हे तुझं नेहमीच झालय. आणि माझं नाव लतिका केव्हापासून झालं?”
“मिस नोलतिका, फोन बंद करू नका. माझं नाव देखील निशान नाही. पण मी तुम्हाला चीज टोस्ट पर्सनली येऊन डीलीवर करू शकतो. फक्त तुमचा पत्ता द्या.”
फोन बंद झाला. चला बस झाली करमणूक. असं म्हणून कामाला जुंपून घेतलं.
दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा फोन.
“मिस्टर कामत?” हा आवाज थोडा ऑफ़िशिअल होता. पण तिचाच होता.
“येस, कामत हिअर. कोण बोलतंय?”
“मी कोमल, डॉक्टर कुडतरकरांची सेक्रेटरी. सर, आपली उद्या दुपारची अपॉइंटमेंट कनफर्म झाली आहे.”
“पण कोमल, उद्या तर आपलं पिक्चरला जायचं ठरलय. तू सुट्टी घेणार आहेस ना?”
“यू रास्कल फ्रॉड...“ फोन कट. दोन मिनिटांनी फोन पुन्हा किणकिणला. विचार केला आता सभ्य व्हायचं.
“सर, माफ करा. मी तुमच्याशी बोलताना अशी भाषा वापरायला नको होती. सॉरी.” आवाजात मार्दव होते.
“ओ नो. तुम्ही का सॉरी. मीच सॉरी. मी पण असं बोलायला नको होतं. बाय द वे, कोमल नाव तुम्हाला शोभतं.” तिच्याशी बोलताना थंड हवेची झुळूक अंगावर यावी असं वाटत होतं.
“पहा, मी तुमचं नाव देखील विचारलं नाही. सेक्रेटरीने संभाषणाच्या सुरवातीलाच नाव विचारायला पाहिजे. मी नाही विचारलं. माझी चूक.”
आडवळणाने ती माझं नाव विचारत होती.
“विकी मलहोत्रा. नुसतं विकी म्हणलं तरी चालेल.” असल्या भानगडीत खरे नाव सांगायचे नसते.
“मलहोत्रा तुम्ही मराठी छान बोलत आहात. काय प्रकार काय आहे?”
“ओके बाबा, तुम्हाला हे नाव आवडल नसेल तर दुसरे घेतो. अशोक सराफ. मी अशोक सराफ.”
“हे पहा. कुठलाही सज्जन खोटी नावं घेणार नाही.”
ही मुलगी साधी सुधी दिसतेय.
“कोमल. आय अॅम एक्स्ट्रीमली सॉरी. माझं खरं नाव आहे. अमुक. फार सेक्सि नाहीये पण त्याला इलाज नाही. आपल्या लग्नानंतर तू ते बदलू शकतेस. माझी...” ह्यानंतर तब्बल एक मिनिट मी कोमल बरोबर नव्हे तर टेलेफोन बरोबर बोलत होतो. कारण फोन केव्हाचा कट झाला होता.
चिडली बहुतेक. गेली उडत. इथे कुणाला पडलीय!
दहा मिनिटांनी फोन पुन्हा गुणगुणला. मी फोन उचलला आणि खोट्या खोट्या रागाने बोलायला सुरुवात केली.
“तुम्ही फोन कट केला. तुम्हाला बोलायचं नसेल तर बोलू नका. सरळ सांगा, कि गेट लॉस्ट.”
“अहो प्लीज ऐका तरी. आपण बोलत होतो तर क्लाएन्ट आला. त्यामुळे लाईन कट केली होती. आता बोलूया.”
“ओ सॉरी. माझा गैरसमज झाला. सॉरी.” मला खरच वाईट वाटलं.
ccccccccccccccccccccccc
असे दिवस जात होते. आमची फोनाफोनी रंग ला रही थी.
माझे लक्ष कामात लागत नव्हते. आताशा असच व्हायला लागल आहे. सकाळी ऑफिसात आलो की कोमलशी बोलल्याशिवाय दिवस उजाडत नव्हता. कुठल्याही फाईलला हात लागत नव्हता. कधी कधी मनात विचार यायचे कि तिला काय वाटत असेल? माझ्यासारखी ती पण माझ्या फोनची वाट पहात असेल काय? माझ्यासाठी झुरत असेल का? का हे एक तर्फी आहे. मी तिच्या प्रेमात पडलो आहे का? व्हाट अबाउट हर?
जगणे किती असह्य कठीण झाले आहे. कोमलचा फोन आला. खरं सांगतो माझ्या पुरुषी ईगोला... दिवसाची सुरुवात तिच्या फोनने व्हावी. दिलासा मिळाला.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
१९ डिसेंबर २०१६
“हलो, कोमल. कशी आहेस? आज संध्याकाळी भेटायचं का?”
ही भेट-गाठ माझ्या डोक्यातही नव्हती. धाडदिशी बोलून गेलो. बोलवता धनी दुसरा कोणी होता.
फोनवर जीवघेणी शांतता.
आपण मूर्खपणा केला नाही ना? पण आता विचार करून काय उपयोग? पाटीवर लिहिलेलं पुसून टाकता येतं. गेलेले शब्द परत बोलवता येत नाहीत.
“हो भेटूयाकी. कुठं भेटायचं? अं, हं. तुम्हाला ती “नाझ३डी” टाकिज माहिती आहे. त्याच्या समोर एक डेरेदार वडाचे झाड आहे. तो वड आपल्या पहिल्या भेटीचा साक्षीदार होईल. संध्याकाळी सहा वाजता.”
“निश्चत. संध्याकाळी सहा वाजता. वडाच्या झाडाखाली. पण मी तुला ओळखणार कसं?” मला बेसिक प्रश्न पडला.
“जो अपने होते है...” बोलली खरी पण फोटो पाठवला. मी त्या फोटोतल्या सुंदरीचे वर्णन करणार नाहीये.
वटसावित्रीने फोन बंद केला.
आत्ता रात्रीचे नऊ वाजले आहेत. मी वाट पहात वडाच्या झाडाखाली उभा आहे. तीन तासात मी खाऱ्या शेंगदाण्याच्या चार सुरनळ्या संपवल्या. जवळ जवळ तेव्हढ्याच वेळा कळकट मल्टीपल उकळलेला चहा प्यालो.. चार वेळा कोमलला फोन करायचा प्रयत्न केला. नेटवर्क नॉट अवेलेबल. सगळे फोन मिळत होते. फक्त तिचाच मिळत नव्हता.
पाचव्या वेळेला शेंगदाणेवाल्याकडे गेलो.
“साब सेंग खतम हुआ. आप बुरा ना मानो तो एक बात बोलू? आपको कल आना था. कल वो आपकी राह ताकते यहा नौ बजे तक खडी थी. लेकीन आप आये नाही.”
मी मोबाईल काढून कोमलचा फोटो त्याला दाखवला.
“हुबहू, लेकीन कुछ तो छोटीसी गडबड है. वो क्या है? ये आपुनके भेजेमे नाही आता.”
शेंगदाणेवाल्या, तुझ्या काय माझ्याही मेंदूत येत नाहीये.
मी इथे तडफडत आहे आणि ती बहुतेक आपल्या मैत्रीणींना “एका गाढवाची गोष्ट” सांगून खो खो हसवत असेल.
“तो वेडा वडाच्या झाडाखाली वाट बघत असेल.. हो हो हो.”
स्वतः स्वतःला लाथा मारून घ्याव्यात असे वाटत होतं. सगळा पुरुषी अभिमान गळून पडला होता. मुकाट्याने घराची वाट पकडली.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
२० डिसेंबर २०१६
दुसऱ्या सकाळी फोन नाजूक किणकिणला. तिचाच कॉल असणार. नाही घेतला. दोन तीन वेळा असं झालं. शेवटी रहावेना. मग घेतला.
“काही सांगायचं राहिलेय?” मी तुटक सुरवात केली.
“हो नुसतंं “काही” नाही बरच काही. मी तुझी झाडाखाली तीन तास वाट पहात होते. पण तू आला नाहीस. बस्स. एव्हढंच सांगायचं होतं.”
मी काही बोलायच्या आत फोन बंद झाला.
मीच फोन केला.
“हेच सांगायला फोन केला असशील. कि “मी पण तुझी वडाच्या झाडाखाली तीन तास वाट पहात होतो.” अमुक, का कुणास ठाऊक, मला असं वाटायला लागलं आहे कि तू अस्तित्वात नाहीयेस. तू माझ्या मनाचा भ्रम आहेस. आणि माझ्या अस्तित्वासह हे जग, निव्वळ माया आहे. नसलेला तू मला कसा भेटणार?”
माणूस तत्वज्ञान बोलायला लागला म्हणजे समजावं कि तो पूर्ण हताश झाला आहे.
“कोमल, मी काय बोलू? आपण पुन्हा एकदा भेटण्याचा प्रयत्न करुया. आपल प्रेम खरं असेल तर...”
फोन बंद झाला होता.
आकाशात कितीही काळे ढग आले तरी एक सर पडून गेली कि पुन्हा निरभ्र होते.
आमची गप्पा गोष्टी पुन्हा सुरु झाल्या.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
२६ डिसेंबर २०१६
“कोमल, तुला आठवतंय कि आपण पुन्हा भेटायचं ठरवलं होते?” मी एके दिवशी विषय काढला.
“हो. पण कुठे आणि कसे?”
ह्यावेळी मी पुढाकार घ्यायचं ठरवलं.
“तुला “आरखेडीया” माहित आहे का?”
“आहे की. त्या “आरखेडीया”च्या पाचव्या मजल्यावर तर सरांची कंसल्टिंग रूम आहे. ५०५. मी त्यांची सेक्रेटरी –कम-रीसेप्शनिस्ट म्हणून तिथं काम करते.”
मी उडालोच. ही तरुणी एकदम माझ्या इतक्या जवळ आली? झूम शॉट वरून एकदम क्लोज अप!
“काय सांगतेस काय? माझे ऑफिस बाविसाव्या मजल्यावर आहे. हा मी आलोच. पण तू मोकळी आहेस ना?”
“बाविसाव्या मजल्यावर? कधी बोलला नाहीस. ये ये. सर त्यांच्या एका पेशंटला बघायला हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. मी आज तुझ्या आवडीचा लाल रंगाचा टॉप घातला आहे ना. त्याला म्याचिंग नेल पेंट लावत बसले आहे.”
मी अक्षरशः वाऱ्यासारखा धावत पळत पाचवा मजला गाठला. लिफ्टची वाट बघायला देखील थांबायची तयारी नव्हती. तसाच धाड् धाड् जिने उतरत गेलो. एका वेळेस पायऱ्या स्किप करत. बावीस वरून पळत पाच वर आलो तर दमछाक झाली. जरा दम खाल्ला.
५०५ समोर पाटी होती.
डॉक्टर ब. ल. कुडतरकर
एम. डी. एफ. आर. एस. पी.
कन्सलटींग सायकिअट्रिस्ट
आहा! हीच ती जागा.
आत शिरलो. रूम एकदम चकाचक. मधल्या टेबलावर टेलेफोन आणि कॉम्प्युटर. त्याच्या मागे माझी कोमल. अलौकिक सौदर्यवती द वन अँड द ओन्ली कोमल. हनुवटीवर चक्क एक तीळ. अलौकिक सौदर्याला दृष्ट लागू नये म्हणून देवाने लावलेली तीट. नखांना नेल पॉलिश लावण्यात मग्न. मी आलो आहे ह्याची काही जाणीव नाही.
मी मुद्दाम खाकरून तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हलक्या आवाजात साद घातली. “कोमल, मी आssssलो.”
कोमलने माझ्याकडे निरखून बघितले.
हवेत जीवघेणा गारठा पसरला. वाट गर्द धुक्यात हरवली.
तिने नेल पॉलिशची कुपी आणि इतर हत्त्यारं बाजूला ठेवली आणि डायरी उघडली.
“सो? मग? तुम्ही कोण? तुमची अपॉंटमेंट होती? माझ्या रेकॉर्ड प्रमाणे आत्ता कुणाचीही अपॉंटमेंट नाहीये. एनीवे डॉक्टर हॉस्पीटलमधे गेले आहेत. तेव्हा...”
“कोमल डोंट बी फनी. मी पाच मिनिटापूर्वीच तुझी “अपॉंटमेंट” घेतली होती. विसरलीस की काय?”
ही म्हणजे कमालीची खट्याळ आहे. माझा पंगा घेतेय.
“मिस्टर, तुम्ही खूप डिस्टर्ब दिसत आहात. तुम्ही श्रीमती प्रेमाबाई दह्याभाई मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये जावे हे उत्तम.. सर तुम्हाला तिथच भेटतील. मी त्यांना फोन करून ठेवते. तुमच्या बरोबर कोणी आहे? कोणीही नाही? मी असं करते; तुमच्यासाठी अंब्युलंस बोलावते. त्यांच्या बरोबर पॅरामेडीक असेल तो तुम्हाला ट्रॅन्क़्विलाईझर देईल.” तिनं फोन उचलला.
“एक मिनिट एक मिनिट थांबा, मी डिस्टर्ब वगैरे काही नाही. माझा थोडा गोंधळ झालाय. मला ग्लासभर गार पाणी मिळेल का? प्याल्यावर बरं वाटेल.”
“ऑफ कोर्स.” एव्हढे बोलून ती हाय हिल्सचा टिक टॉक, टिक टॉक आवाज करत सरांच्या केबिन मध्ये गेली आणि येताना थंडगार पाणी घेऊन आली.
मी या सर्व प्रकाराचा अर्थ लावण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. ही कोमल आणि माझी फोन-मैत्रीण कोमल ह्याचा मेळ कसा जमवावा? का ही कसलेली अॅक्टर आहे. मला का आणि कोण टार्गेट करतय? मी बरा नि माझा धंदा बरा अशी माझी धारणा होती. उगाच या कोमलच्या भानगडीत पडलो.
त्या वेळी माझ्या डोक्यात कल्पना आली.
“मिस, तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे. मला वाटतं मी डॉक्टरांशी बोलायला पाहिजे. केव्हाची अपॉंटमेंट मिळेल?”
तिने आपली डायरी काढली.
रुममध्ये वेटर बॉयने दोन कोल्ड कॉफीचा ट्रे घेऊन प्रवेश केला.
“ठेव इथे.” कोमल त्याला म्हणाली.
“तुम्हाला मी येत्या शुक्रवारची दुपारी चारची अपॉंटमेंट देऊ शकते. तसेच अर्ध्या पाऊण तासाचे सेशन असते. त्यातला बराच वेळ तुम्हाला चॅटजीपीटीशी बोलण्यात जाईल. उरलेला वेळ सरांच्या बरोबर.”
“ओके फिक्स करा.” मी होकार दिला.
“हा फॉर्म घ्या आणि भरून द्या.” तिने मला फॉर्म. दिला.
नेहेमी प्रमाणे त्यात नाव, पत्ता, जन्मतारीख, टेलेफोन क्रमांक इत्यादि माहिती विचारली होती. मी सगळी माहिती भरली. काही खरी काही खोटी. नाहीतरी हा डॉक्टर ती माहिती विकून पैसे कमावणार होताच. मी एक इमेल केवळ असल्या लोकांसाठी बनवली होती. ती दिली.
नाव दिले “केशव कुलकर्णी”!
नाव वाचून कोमलने “वाटलच” एव्हढेच म्हटले.
विचार करत करत बाविसाव्या मजल्यावर माझ्या ऑफिसात गेलो.
xxxxxxxxxxxxxxx
आज एका झटक्यात वाचली पण
आज एका झटक्यात वाचली पण अद्याप ठाव लागला नाही.केकू आपल्याच विचारात आहेत की अजून काही... उत्कंठावर्धक...
भाग दोन वाचतो मग कळेल.