माझी अमेरिका डायरी - ११ - खाऊगल्ली !

Submitted by छन्दिफन्दि on 23 May, 2023 - 21:23

“वा! इकडे पण अगदी छान ताज्या, टवटवीत भाज्या आहेत. “ इंडिया बाजार मध्ये जाऊन अगदी रिलायन्स फ्रेश मध्ये आल्यासारखाच वाटलं. फक्त कांदे बटाटे वाईच जास्तच मोठे होते. एक कांदा म्हणजे कांदेश्वर, अगदी दोन दिवस पुरवावा, फ़्लोवर आणि कोबीचीही तीच गत. दोन प्रकारची लिंब, हिरवी लाईम आणि पिवळी लेमन, ही जरा जास्तच मोठी असतात आणि त्यांना आंबटपणा जरा कमीच. सरबतासाठी उत्तम. पण बाकी सगळा बाजार होता तोंडली, भेंडी, गाजर, बीट, लाल - पांढरा भोपळा, मेथी , कांद्याची पात, झालच तर अळूची पानही होती. आठवड्याला भाज्या रिपीट होणार नाहीत एव्हढी व्हरायटी बघून जीव भांड्यात पडला . कोथिंबीर म्हणजे कोरीअंडर काही दिसेना. साधारण कोथिंबिरीला मिळती जुळती पार्सली दिसली आणि दुसरी “cliantro” दिसली.
“ही cilantro दिसत्ये तर कोथिंबिरीसारखीच पण न जाणो पार्सली सारखी दुसरी एखादी वेगळीच भाजी असावी का ?” शेवटी न राहवून दुकानातच फोन वरून गूगल केल्यावर कळलं की कोथिंबिरीला स्पॅनिश मध्ये “Cilantro” म्हणतात.. इंडिया बाजारमध्ये आठवड्याची वाणसामान खरेदी हे वीकेण्डच मग ठरलेलं एक कामचं होऊन गेलं.
नवीन ठिकाणी जातो ते लागेल तशी, वेगवेगळ्या पातळ्यांवर अडजस्टमेन्ट करायच्या तयारीनेच, पण जेव्हा रोजच जेवण आपल्या सवयीचं मिळतं तेव्हा इतर आव्हाने आणि तडजोडी करायला जास्त जड जात नाही.
अलीकडे तर पूर्वी सहज न दिसणारे पदार्थ जसं भाजणीचं पीठ, मेतकूट, पोह्याचे पापड आणि आता तर बेडेकरांचे उकडीचे खास मोदकही मिळायला लागलेत.
रोजच्या जेवणाची सोय झाली कि मग इतर चवी चाखण्याचाही मोह होतो.
सात-आठ वर्षांपूर्वीचा काळ, भारतात इकडची सगळी चॉकलेट्स मिळत नसत त्यामुळे त्याच विशेष आकर्षण होतं. सुरवातीला हर्शीपासून ते लिंड पर्यंत सगळ्यांवर यथेच्छ ताव मारून झाल्यावर मग नजर जरा इतर ठिकाणी वळली.
इकडे जगभरातून लोक आल्यामुळे विविध प्रकारचे पदार्थ, फळे, भाज्या मिळतात. त्यामुळे बरेच नवीन आणि छान छान पदार्थ खायला मिळाले. ते आम्ही आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांनाही खाऊ घातले. तर आज मी अशा आमच्या गोतावळ्यातल्या हीट पदार्थांच यादी तुमच्याबरोबर शेअर करणारे.
Tres Leches Cake : हा स्पॅनिश पध्द्तीचा केक, खूप हलका आणि जाळीदार असतो, ट्रेस म्हणजे स्पॅनिशमध्ये तीन आणि Leches म्हणजे दूध, तर हा तीन प्रकारच्या दुधात बुडवलेला असतो. वरती strawberry , किवी अशा फळांच्या चकत्यांनी सजवलेला असतो. तोंडात टाकताच जिभेवर विरघळतो. Safeway ह्या ग्रोसरी चेन ची खासियत आहे.

food-photographer-jennifer-pallian-8Jg4U4xHu-o-unsplash.jpg

त्या व्यतिरिक्त कॅरेट केक, लेमन केक आणि बनाना वॉलनट केक/ मफिन मी इकडेच पहिल्यांदा खाल्ले. विशेषकरून छोटया बेकऱ्यांमध्ये उत्कृष्ट प्रतीचे आणि रुचकर मिळतात.
इकडची अजून एक खासियत म्हणजे pies, चेरी, ऍपल ही नेहेमीची पण pumpkin pie (लाल भोपळ्याचे pie ) हॉलोवीन स्पेशल तर pecan pie thanksgiving ते ख्रिसमस च्या दरम्यानच मिळतो. Pecan pie इतका सही असतो की सेप्टेंबर ऑक्टोबरपासून आम्हाला त्याचे वेध लागतात.

geri-chapple-MXcKTYuKq_U-unsplash.jpgIMG_1269_0.png (31.94 KB)

stollen3b.jpg

तसच फ्रेंच मॅक्रोन, जर्मनीच्या lebkuchen cookies, marzipan, डॅनिश kringle हे खास युरोपियन पदार्थही Trader Joes मुळे कळले आणि लाडके झाले.

योगर्टलँड: फ्रोझन योगर्ट
आमच्या जवळपास योगर्टलँड आणि पिंकबेरी ह्या दोन फ्रोझन योगर्टच्या चेन्स आहेत. पैकी योगर्टलँड जास्त लोकप्रिय आहे.
हे फ्रोझन योगर्ट म्हणजे साधारण सॉफ्टी सारखे दिसणारे पण चवीला थोडे वेगळे, वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये मिळते. तर ह्याची खासियत त्या दुकानात आहे. प्रवेश केल्या केल्या कप घ्यायचा, सात आठ फ्लेवर्स चे योगर्ट असते. खिट्टी दाबून आपण आपल्याला हवं तेव्हढं आणि हवं ते फ्रोझन योगर्ट कप मध्ये घ्यायचं, मग कॉउंटर वर वीस एक प्रकारची टोपिंग्स असतात, त्यात गोळ्या , चॉकलेटं, फ्रेश / फ्रोझन फळांपासुन ते बदाम, अक्रोड, सुकं खोबरं जे म्हणाल ते टॉपिंग टाकायचं. मग त्याचे वजनाप्रमाणे पैसे द्यायचे.
तर हे योगर्टलँड शाळेच्या रस्त्यावर असल्यामुळे महिन्यातून १-२ खेपा तर ठरलेल्याच होत्या. हे मुलांबरोबर मोठ्यांचही तेव्हढच लाडकं आहे.

P_20180531_165854.jpg

पिझ्झा
आपल्याकडे जसे कॉर्नर कॉर्नरला वडापाव असतात आणि प्रत्येक गाडीची स्वतःची खासियत असते तीच गत इकडे पिझ्झाची म्हणता येईल. ह्या छोट्या पिझ्झाजॉइंट्स मध्ये बरयाचदा ताज्या बनवलेल्या पिझ्झाचा आणि चीजचा दरवळ तुम्हाला सहजच साद घालतो आणि तुम्ही खेचले जाता, कुणाचा सॉस स्पेशल तर कुणाचा कुरकुरीत crust किंवा हटके टॉपिंग्स प्रत्येकाची स्वतःची खासियत. .
दोन पिझ्झाची दुकानं विशेष लाडकी.
एक MOD (Made On Demand) Pizza,
ह्यात तुम्ही क्रस्ट निवडायची, मग त्यांच्याकडे २-४ प्रकारचे सॉस असतात त्यातला तुम्हाला हवा तो निवडायचा, तुमच्या आवडीप्रमाणे meat, veggies, चीज, ड्रेसिंग तुम्ही सांगाल त्या प्रमाणात घालून तुमच्या समोरच तुमचा पिझ्झा बनवतात आणि लगेच त्यांचा मोठा दगडी ओव्हन आहे त्यात भाजायला ठेवतात. हा फ्रेशली मेड पिझ्झा आमचा आणि आमच्या पाहुण्यांचा एकदम फेवरीट आहे.
दुसरा म्हणजे देसी पिझ्झा/ curry पिझ्झा, ह्यात इंडियन मसाल्याचा अंश असणारे सॉस असतात आणि टॉपिंगही तंदूर, आचारी पनीर, चिकन असे देशी मिळतात. हे फ्युजन पिझ्झा पण खूप लोकप्रिय आहेत.

IMG_20160929_152136216.jpg

नॉन वेजिटेरिअन लोकांसाठी तर खूपच सारे पर्याय आहेत, त्यापेक्षा त्यांची चंगळ आहे असे म्हणणे जास्त योग्य होईल. भारतात तेव्हा एक KFC सुरु झालेलं जवळच्या मॉल मध्ये, इकडे तशा चिकफीला, सुपरचिक्स, पोपेयेस अशा अनेक चेन्स आहेत त्यांच्या स्पेशल fries, sauce आणि वेगवेगळ्या crunchiness सह. (आमच्या घरच्या खादाड खाऊच्या सांगण्यानुसार )
आता हे बरेच जंक फूड आणि गोड पदार्थ झाले पण तुम्हाला काही पथ्ये असतील, तुम्ही आरोग्याबाबत आणि आहाराबाबत जागरूक असाल तरी काही हरकत नाही, सगळ्यांसाठी खूप ऑप्शन्स आहेत.

Chipotle- मेक्सिकन फूड, त्यांच्या कडचा बरिटो बोल हा पदार्थ बऱ्याच वयस्कर मंडळींनाही आवडतो, म्हणजे तरुणांना आणि मुलांनाही तर आवडतो पण त्यांना बऱ्याचदा फुकट ते पौष्टिक या नात्याने त्यांना सगळंच आवडत म्हणून हा विशेष वयाचा उल्लेख. हा खूप सर्रास मिळणारा, पौष्टिक, रुचकर, आणि वाजवी दरात व्हेज / नॉनव्हेज दोन्ही पर्यायात मिळणारा भारतीय चवीशी मिळता जुळता पदार्थ.
साधा किंवा ब्राउन राईस, ब्लॅक / पिंटो बीन्स, परतलेली सिमला मिरची, साल्सा, पिका-दिया-गो (म्हणजे टोमॅटो-कांदा कोशिंबीर असते तशी पण चव वेगळी असते), कॉर्न्स, सार क्रीम, ग्वाकामोले ह्यांनी तो सजलेला असतो.
छोट्या छोट्या मेक्सिकन फॅमिली रेस्टॉरंट्समध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे साल्सा, नाचों चिईप्स आणि अतिशय रुचकर भात, बीन्स आणि टॉर्टिला पासून बनवलेले पदार्थ मिळतात. प्रवासात तर ती हमखास अतिशय सोयीचा पर्याय असू शकतात.
अवोकाडोचा ग्वाकामोले तर एकदम nutritious, फ्रेश आणि versatile पदार्थ आहे चिप्स, ब्रेड कशाही बरोबर खा.

great-burrito-bowl-3.jpgIMG_20230330_135945537_0.jpg

फलाफल :
हा अजून एक अतिशय healthy, टेस्टी आणि भारतीय चवीच्या जवळ जाणारा mediterranean पदार्थ. ह्यात फावा beans ची पेस्ट करून त्यात दिल (शेपू , शेपू म्हणून दचकू नका, छान फ्लेवर येतो), इतर मसाले आणि मुख्य म्हणजे तीळ घालून छोटेगोळे करून पकोड्यांसारखे तळतात. आतापर्यंत मी बघितलेला मराठी पदार्थांव्यतिरिक्त खमंग चवीच्या जवळ जाणारा एकमेव अभारतीय पदार्थ.
हे फलाफल नुसतेच आरामात संपवू शकतो पण ते साधारणतः पिटा ब्रेड मध्ये घालून किंवा भात इतर सलाड्स, भाज्या, बाबागनुश म्हणजे वांग्याचं भरीत, वेगवेगळ्या चटण्या घालून खातात. ताहिनी म्हणून एक तिळापासून बनवलेला sauce असतो तो यांची लज्जत अजूनच वाढवतो.
जवळच एक डिश न डॅश नावाची चेन आहे त्यांची स्पेशालिटी म्हणजे ताहिनी बरोबरच मिळणारे अजून ३ प्रकारचे sauce आणि अत्यंत खमंग, कुरकुरीत फलाफल.

images.jpg

बक्लावा हा mediterranean गोड पदार्थ. उत्तम प्रतीचा बक्लावा जिभेवर ठेवताच विरघळतो आणि अतिशय हलका असतो. आपल्या खारी बिस्कीट सारखं खूप साऱ्या पापुद्र्यांचे हलकं, क्रिस्पी आवरण असतं, आत काजू, पिस्ता किंवा अक्रोडच पुरण असतं, आणि तो मधाच्या पाकात घोळवलेला असतो .
आता उत्कृष्ट म्हणजेच हलका, उत्तम दर्जाची ड्रायफ्रूट्स असणारा, गोड - ओलसर तरीही क्रिस्पी असा बक्लावा आमच्या इकडे एक छोटा लघु उद्योग करणाऱ्यांकडेच मिळालाय अगदी दुबई एअरपोर्ट आणि ग्रीक मधला पण टेस्ट केलेला पण त्याला तशी सर काही नव्हती.

omer-haktan-bulut-RorWhjgHcHw-unsplash.jpg

आता तुम्ही अजून जास्त हेल्थ कॉन्शस असाल तर तुमच्या साठी असंख्य प्रकारची सॅलड्स आहेत. रेडी टू इट पाकिटं असतात, त्यात चिरलेल्या भाज्या असतात, त्यातच छोटी ड्रेसिंग ची पाकीट असतात. आयत्या वेळी हवे तेव्हढे मिक्स करायचे, झाले सलाड तयार.
बऱ्याचशा हॉटेल मध्येही खूप मोठा सलाड मेनू हि असतो.
इकडे कोविडच्या आधी स्वीट टोमॅटो नावाची एक चेन होती, ते सलाडसाठीच प्रसिद्ध होते. बुफ्फेच पण तो सलाडचा . त्याबरोबर मग २-३ प्रकाची सूप, बेड्स आणि डेझर्ट्स. कधीही गेलं तरीभरपूर गर्दी असणारं स्वीट टोमॅटो अगदी मुलांच्याही खूप आवडीचं होतं.

IMG_20191003_205846046.jpg

इकडच्या स्थानिक विविध प्रकारच्या बेरी, हिरवी, पिवळी सफरचंद, पेर, परसिमोन (उगम जपान) ही फळं, Quinoa, सोयाबीनचे दाणे, ऍस्परॅगस, सेलरी, लेट्युस ह्या भाज्या, त्या बनविण्याच्या वेगळ्या पद्धती, त्या खाण्याचे वेगळे portions अशा बऱ्याच नवीन गोष्टी आमच्या आधीच्या भारतीय पद्धतीच्या जेवणात, आहारात समाविष्ट झाल्या आणि आमचे खाद्य जीवन अजूनच समृद्ध झाले.
खादाडी ह्या अत्यंत लाडक्या विषयावर लेख लिहायला घेतल्यावर थांबणे कठीण होऊन बसले आणि तो फुटलोन्ग सब पेक्षाही खूप मोठा झालाय तर आता थांबते.
ही खाऊगल्ली तुम्हांला आवडली असेल तर जरूर कळवा!

#americadiary

Disclaimer - माझे वास्तव्य असलेल्या आणि थोडेफार स्थळ दर्शन केलेल्या जागेवरील अनुभवांवरून लिहिलेला ललित लेख आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख मस्त
मी पण अनुभव घेतलाय / घेतोय पण भारतात
Tres Leches Cake : लोअर परेल ला एका मेक्सिकन रेस्टॉरंट मधे . नाव आठवत नाही. माबोवरच मामींनी लिहले होते.
Macrons - Theos नोएडा / गुरगाव
फलाफल - Beyroute, Powai, BKC
बकलावा - Beyroute, Powai, BKC, Jio world Drive मधे एक टर्किश जॉइंट आहे. हुरेम
Fresh Pizza - Jamie's Pizzeria, Viviana Mall Thane
Salad - येथेच सुचवा मी फक्त सब वे खाल्लय.
बाकी वरच एवढ्यासाठी लिहल की जर लेख वाचुन खावस वाटल भारतात तर येथे खाता येइल Happy

वा वा !

झकास खाद्यभ्रमंती. USA is the melting pot of the food world !!!

मी पण अनुभव घेतलाय / घेतोय पण भारतात, बाकी वरच एवढ्यासाठी लिहल की जर लेख वाचुन खावस वाटल भारतात तर येथे खाता येइल>>
अगदी अगदी .
मी लेख लिहिताना माझ्या मनात आलंच होत कि २०१३-१४ मध्ये KFC आणि सबवे सुरु झालेल आता तर बहुतेक हे सर्व हि तिकडे मिळतच असेल.

अंधेरीला/ साऊथ मुंबईला बकलावा मी मागे ३ वर्षांपूर्वी शोधून ठेवलेले .

पण anyways, मी इकडे येऊन पहिल्यांदा खाल्लेले .

मागच्या ट्रिप ला viviana मॉल मध्ये फलाफल खाल्लेले .

इकडे हे पदार्थ सर्रास मिळतात एव्हढा एक फरक.

सध्या अनुभव घेतेय या खाद्य संस्कृतीचा >>> एन्जोय
USA is the melting pot of the food world !!!>>> १००% सहमत

mandard, अनिंद्य, निर्मल प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

मूळचे अमेरिकन पदार्थ कोणते? बर्गर ? डोनट ?

फूड ट्रक हा प्रकार मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या अमेरिकेत केलेल्या भागांत पाहिला होता. ट्रकमध्ये खाद्य पदार्थ शिजवून , फक्त गरम करून नव्हे, विकायचा.

Mashed potatoes, burger, hotdogs che origin US आणि जर्मनी दाखवत.
चीझ बर्गर us origin दाखवते.
Hotdogs तळून कॉर्न dog करतात त्याच origin US aahe.
बफेलो विंग्ज च origin US आहे. माझ्या माहितीनुसार (ऐकीव) लुसियाना, केंटकी आणि इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने आणि sauces वापरून उत्कृष्ट ( बहुदा टेस्ट लाच) chicken wings आणि fried chicken मिळते. Cajun fries पण लोकप्रिय आहेत.

तसच मागे वाचलेली माहिती, Californians brag about having the best sushi in the world..

Food truck इकडे पण आहेत. आता इंडियन आणि Nepalese food truck आहेत.
इकडे एका गल्लीत इंडियन फूड trucks असतात उभे त्याला लोक प्रेमाने खाउगल्ली म्हणतात.
तिथे पावभाजी hut, वडापाव, दाबेली, चाट इ. सर्व मिळत आणि famous आहे.
पण ह्या सगळया पदार्थांचे आमचे references मात्र अजूनही Canon, Prashant कॉर्नर वगैरे आहेत. त्यामुळे फूड ट्रक विषयी लिहील नाही

नायगरा जवळ एक काठी रोल वगैरेंवर फूड ट्रक आहे तो बेस्ट वाटलं.

>>> मूळचे अमेरिकन पदार्थ कोणते?
असं सांगणं अवघड आहे, कारण हा स्थलांतरितांचाच देश आहे.
तरीही त्यातल्या त्यात (थम्ब रूल म्हणून) थँक्सगिविंग मेनू बहुतांशी 'मूळचा' (नेटिव्ह) अमेरिकनसदृश आहे असं म्हणता येईल. टर्की (ही थँक्सगिविंगला, पण एरवी कुठलंही मीट किंवा किनारपट्टीजवळ फिश), कच्च्या किंवा अर्धकच्च्या स्थानिक भाज्या/बीन्स, फळांचे सॉस किंवा पाय, ब्रेड, राइस, चीज.
ब्रेड म्हणजे मैद्याचा पाव असंच नव्हे. भारतात पोळी, भाकरी, पाव, नान वगैरे ब्रेड याच सदरात येतात तसेच इथेही कॉर्न ब्रेड, पोटेटो ब्रेड, गव्हाव्यतिरिक्त इतर धान्यांचे ब्रेड दिसतील.
आपलं बेसन जसं बहुगुणी तसं इथे कॉर्नफ्लावर किंवा मैदा ग्रेव्हीला थिकनेस आणण्यापासून ते मीट खरपूस भाजता येण्यापर्यंत सगळ्यासाठी उपयोगी.
मीट शिजवून, वाफवून, तळून, भाजून, खारवून, पाकवूनसुद्धा खातात.
दूध नाशिवंत म्हणून आपण तूप करायला शिकलो - हे चीज करायला शिकले.
भारत समशीतोष्ण कटिबंधात येत असल्यामुळे भाज्या आणि फळफळावळ वर्षभर मिळते - इथे उदा. विंटरमध्ये काही पिकवणं शक्य नसल्यामुळे मांसाहारावर पारंपरिकरीत्त्या भर.
मसाले 'अमेरिकन' कुठले असं सांगता येणार नाही, बहुधा त्यांचा उगम दक्षिण गोलार्धात सापडेल.
भारतीय स्वयंपाकात सहसा एक 'बॅलन्सिंग अ‍ॅक्ट' असतो - गोडाला आंबट (चिंच-गूळ), खारटाला तिखट अशा जोड्या जुळवतो आपण सहसा - हे आशियाई कुझिन्समध्ये जास्त प्रॉमिनन्टली दिसतं.

स्वाती सुरेख प्रतिसाद.
छंदीफंदी - अजुन मी लेख वाचलेला नाही. सवयीनुसार आधी प्रतिसाद वाचलेत. मग वाचून कळवते. पण मस्त यमी दिसतोय लेख.
-----------------
लेख उत्तम झालेला आहे.
पर्सिमोन माझे जीव की प्राण फळ आहे. मुलीला लिचीज तर मला पर्सिमोन.

Creole cuisine, real stake gravy and biscuits. Yummy. Barbecued meat and game.

दक्षिणेकडे - म्हणजे लुझिआना, जॉर्जिआ - क्रॉफिश मस्त करतात, गार्लिक बटरमध्ये बुडवुन खाणे, वेगवेगळ्ञा सॉसेसमधील क्रॉफिश फार छान लागतात.
व्हरमाँट, मेन - क्रॅब चाऊडर, , क्लॅम चाउडर मस्त मस्त यमी!!
व्हर्जिनिआ - भरपूर खेकडे खातात, स्टीमड क्रॅब्ज, क्रॅब केक्स
टेक्सास, कॅलिफोर्निआ मध्ये मेक्सिकन क्विझिन छान मिळते - फिश टाकोज, बरिटोज वगैरे

इकडे कोविडच्या आधी स्वीट टोमॅटो नावाची एक चेन होती, ते सलाडसाठीच प्रसिद्ध होते. बुफ्फेच पण तो सलाडचा . त्याबरोबर मग २-३ प्रकाची सूप, बेड्स आणि डेझर्ट्स. कधीही गेलं तरीभरपूर गर्दी असणारं स्वीट टोमॅटो अगदी मुलांच्याही खूप आवडीचं होतं.>>> स्विट टोमॅटो उर्फ सुप्लाटेशन वॉज लव्ह, तशी मी फुडी आहे त्यामुळे 'तु नही तो और सही ' करत आवडत्या फुडचे पर्याय शोधतेच पण एखादी रेस्टॉरन्ट चेन बन्द झाल्याने दु:ख वैगरे होइल अस वाटल नव्हत पण सुप्लाटेशन वॉज लाइक दॅट, पॅनडेमीकने घाला घालत अनेक बफे जॉइन्ट कायमस्वरुपी बन्दच केले हे त्यातलेच एक.

आधिच्या दहा लेखानंतर अकरावा भाग म्हणजे 'Cherry on Cake'.
सुंदर लेख.

Disclaimer ची गरज नाही. लोक काही ना काही बोलतातच. तशा कॉमेंट्स कडे दुर्लक्ष करा.

उत्तम मालिका... पु भा प्र

KFC बंगलोरमधे 2003 सालापासून आहे. इतरही वर लेखात लिहलेले पदार्थ मागची पंधरा वर्षंतरी नक्कीच भारतात मोठ्या शहरात मिळतात. माॅलच्या फुडकोरटात किंवा स्टायलिश होटेलांमधे. वडापावच्या गाड्यांसारखे नाक्यानाक्यावर मिळत नाही हे खरं पण तरी सर्रास मिळतात.

मस्त जमला आहे लेख. ग्रोसरी मधे मिळाणार्‍या गोष्टी, चेन रेस्टॉ आणि फ्रॅन्चायझी वाले - बराचसा लेख या तीन ठिकाणी मिळणार्‍या पदार्थांबद्दल आहे असे वाटले वाचून.

Sweet Tomatoes बंद झाले? आमच्याही आवडीचे होते. त्याच स्टाइलचे एक "फ्रेश चॉइस" होते सनीवेल मधे एल कमिनो वर. मात्र या दोन्ही ठिकाणी सॅलडने सुरूवात करून मग इतरच असंख्य गोष्टी जास्त खाल्ल्याचे आठवते Happy

त्रेस लेचे केकची कॅलिफोर्नियात खरेच रेलचेल आहे. एकतर खूप सहज कोठेही मिळतो. पण या केक मधे साखर व ते इतर दुधाचे पदार्थ याचे प्रमाण परफेक्ट जमले तर तो फार मस्त लागतो. नाहीतर अनेक ठिकाणी खूप साखर ठोसतात त्यात.

इतकी वर्षे बे एरियात राहून तेथील मूळचे स्थानिक पदार्थ कोणते हे पटकन सांगता येणार नाही मला तरी. सॅन फ्रान्सिस्को मधे फिशरमन्स व्हार्फ वर मिळणारे क्लॅम चाउडर, तेथीलच बूडिन्/बावडिन बेकरीचा सावरडो ब्रेड, तेथीलच जवळचे घिराडेली - हे तसे म्हंटले तर स्थानिक पदार्थ. पण ते ही गेल्या शंभरएक वर्षातच लोकप्रिय झाले असावेत.

हा लेख आवडला. अजून काही पर्याय म्हणजे
थाई फूड. हेही भारतात मिळत असेल.
बर्मिज फूड. ज्ये ना साठी इंडियन फूडला पर्याय समोसे पराठा वगैरे. हे भारतात मिळतं का माहीत नाही. बे एरियात मिळतं व इतरत्रही. (भारतात याची गरज नाही म्हणा).
टर्किश फूड- यामध्ये humus pita bread falafel baklava सोबतच त्यांची ती कडक कॉफी एकदा तरी प्यावीच. छान छोट्या कपमध्ये येते आणि कडू असते पण कॉफीप्रेमीनी जरूर ट्राय करा. हेही बहुधा भारतात मिळत असणार.
Ghiradelli square- बे एरियात जगात भारी आईस्क्रीम चॉकलेट्स इत्यादी मिळण्याची जागा. हे आता भारतात सुरू करायला पाहिजे.
कॅलिफोर्निया पिझ्झा किचन व चीजकेक फॅक्टरी- या दोन्ही चेन आवडतात. व्हेज लोकांना काही ना काही मिळून जातं. सीपीकेमध्ये व्हेज पिझ्झा ऑप्शन्स छान आहेत. चीझकेक फॅक्टरी बहुधा त्या शेल्डनच्या शोमध्ये आहे- त्यांचे अर्थात चीजकेक एकदा तरी ट्राय करावेत.
स्वीट टोमॅटोला कोणाला पर्याय सापडला असल्यास सांगा. एकेकाळी फारच नियमित जाणं व्हायचं तिथे.

अर्थात भारतात इतकं छान छान फूड मिळत की भारतीयांना अमेरिकन फूडचं कौतुक सांगणं म्हणजे मुकेश अंबानीला उगाचच परवा मला स्विगीवर पाचशे रुपयांवर तीस टक्के डिस्काऊंट भेटला असं सांगण्यापैकी आहे. नुसतं पुण्यात एक दोन मैल परिघात मराठी पद्धतीच्या थाळीपासून बार्बेक्यू नेशन ते साऊथ इंडियन ते नॉर्थ इंडियन व्हाया इटालियन, चायनीज असे किती पर्याय असतात. भारत फार श्रीमंत आहे त्या बाबतीत. Chipotle Qudoba कितीही कौतुक केलं तरी मिसळपाव, छोले भटुरे याची सर नाहीच.

तो tres leches केक मात्र सेफवे costco सगळीकडे ट्राय केला पण आवडला नाही. अति गोड वाटतो. त्यापेक्षा इथले बाकीचे केक छान असतात. एकूणच केक हा एक(च) प्रकार भारतापेक्षा अमेरिकेत चांगला मिळतो असं म्हणावं लागेल. भारतात आपल्या देशी मिठाया, चितळे स्वीट असतातच. त्या भारतीय होम बेकर नामक बायकांची तर भीतीच वाटते.
Mic drop.

. ज्ये ना साठी इंडियन फूडला पर्याय समोसे पराठा वगैरे. हे भारतात मिळतं का माहीत नाही>> बर्मा बर्मा, काळा घोडा Happy

स्विट टोमॅटो उर्फ सुप्लाटेशन >> काल परवाच कळलं स्वीट ग्रीन्स आणि chop't नावाच्या दोन सलाड चेन आहेत. बघू नजीकच्या काळातच जमल तर.
तसच स्वीट टोमॅटो वेगळ्या फॉर्म मध्ये परत सुरु करणार आहेत हेही वाचनात आलं होत.

ठाण्यात उतृकष्ट थाई आधीच खाल्लेलं, एक sankaya म्हणून नारळाच्या दुधाचा पदार्थ तिकडे मिळे तो मी इकडे कधी बघितला नाही.
थाईफूड वरून आठवलं, इकडे मलेशिअन रोटी -पराटा ( नाव चुकलं असेल तर करेक्ट me ) पहिल्यांदा चाखलं. अप्रतिम. जवळची काही चांगली फॅमिली रन रेस्टॉरंट्स बंद झाली त्यात हे मलेशिअन, एक फलाफल बार होते . बहुदा जागेच्या वाढत्या किमती हे एक कारण असावे .

SF बौडीन चा सूप bowl वैशिष्ट्यपूर्ण . सार डो ब्रेड पोखरुन त्याचा बाउल बनवतात आणि त्यात सूप सर्व्ह करतात. आमच्या घरा जवळ आहे एक.

1200x0.jpg

Ghiradelli आईस्क्रिम म्हणजे SF मधलं एक टुरिस्ट आकर्षण आहे, खूप मोठी लाईन असते. छान सजवून आईस्क्रिम संडे मिळतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे थंड आईस्क्रिम बरोबर मिळणार हॉट फज.
SF ला ट्रॅफिक आणि पार्किंग सारख्या कारणांमुळे जास्त जण होत नाही म्हणून विसमरणात गेलेलं.
1200x0 (1).jpg

WHITEHAT, फलक से जुदा , फारएण्ड, सामो आणि सगळ्याना धन्यवाद!

मांसाहारी पदार्थ समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद! माझ्याकडे त्याचा विशेष अनुभव नाही. SF आणि मॉन्टेरी ला मोठे मोठे क्रॅब बघितलेले निश्चितच पॉप्युलर असणार.

आशियाई पदार्थांमध्ये इकडे HOT POT पण लोकप्रिय आहे.

छन्दिफन्दि , व्हाईटहॅट >> तुम्ही तुमच्या भागात असेल जर मेक्सिकन बेकरी तर तिथे त्रेस लेचेस खाऊन बघा. ती चव एकदम मस्त असते. त्या बेकरी मधील इतर गोष्टी पण मस्त असतात. मध्यंतरी आपल्याकडच्या लिटील हार्ट्स चा मोठा अवतार असणार्‍या पेस्ट्रीज मिळाल्या होत्या. मला तिथले वाटी केक पण आवडतात.

इतरही वर लेखात लिहलेले पदार्थ मागची पंधरा वर्षंतरी नक्कीच भारतात मोठ्या शहरात मिळतात. माॅलच्या फुडकोरटात किंवा स्टायलिश होटेलांमधे. वडापावच्या गाड्यांसारखे नाक्यानाक्यावर मिळत नाही हे खरं पण तरी सर्रास मिळतात.>>>
चान्गल आहे.
ठाण्यात २०१४ पर्यंत तरी मिळत नव्हतं किंवा माझ्या बघण्यात नव्हतं. आम्ही हे सगळे पदार्थ इकडे आल्यावर बघितले. आता वर सांगितल्याप्रमाणे बहुदा बऱ्याच ठिकाणी तिकडे मिळू लागलेत.

New South Korean restaurant alert in Bandra West guys. All the Ramen andBibimbap you can eat.

Pages