पुस्तके आवरायल घेतल की नैराश्य येत. काय ठेवायच काय नाही हे ठरवताच येत नाही . ज्योतिषातील अनेक दुर्मिळ पुस्तके, अंधश्रद्धा, तत्वज्ञान, मानसशास्त्र समाजशास्स्त्र ,अध्यात्म, विज्ञान, अशा विषयांवरील विविध पुस्तके त्या त्यावेळी घेतली होती. कधी वाटत आता बास झाल घालून टाकाव रद्दीत पण धाडस होत नाही. किती भूतकाळ उराशी बाळगायचा? पत्रव्यवहार कात्रणॆ हस्तलिखिते लेख यांच्या फाईली किती कवटाळायच्या. दर वेळी आवरायला घेतो व धाडस होत नाही. याला कचरा म्हणवत नाही. तरी महत्वाचा भाग ई ग्रंथालायांवर अपलोड करुन ठेवला आहे आपण गचकलो तरी तो जालसागरात उपलब्ध असेलच. एकदा प.वि वर्तकांचा मंगळा संदर्भात जुना लेख मिळवला होता. अनेक वर्षे पडला होता फाईलीत. एकदा कुणीतरी चर्चेत त्याचा संदर्भ मागितला लगेच मी तो या गदारोळातून शोधून काढून जालावर अपलोड केला. कसल कृत कृत्य वाटल. अगदी नारायणाने ऐनवेळी पंचांग काढून द्यावे तसे. असे अनेकदा झाले. मग असा खजाना रद्दीत टाकावा का? असा विचार करुन परत जागेवर ठेवतो सगळे. तरी निग्रहाने एक दोनदा कचरा काढला होता. पण तो परत साचत राह्तो. प्रत्येक लिहिलेल्या महत्वाच्या खाजगी पत्राची सुद्धा माझ्याकडे कार्बन कॉपी असायची. कितीही फिकी झाली तरी ती ठेवली होती कधी कधी वाचली की जरा बरंही वाटायचे. त्यावेळी आपण कसे होतो नै! हा विचार येउन जायचा. कधी कधी मन कुशंकेने ग्रासले की तो पत्रव्यवहार पाहून हुश्श्य वाटायचं. अनेक पाठवलेल्या पत्रांची उत्तरे वा पोच सुद्धा यायची नाही. आपले पत्र पोहोचले की नाही याची खात्री करण्य़ाची सोय नसायची. पोस्टाने पाठवले म्हणजे पोहोचले या अंधश्रद्धेवर माझा विश्वास होता.काही पत्रोत्तरे मात्र हुरुप वाढवायची.
कधी कधी विरक्तीचा झटका आला की मी माझ्याकडची कागदपत्रे नष्ट करतो. किती काळ ओझ बाळगायचं? पत्रव्यवहार,टिप्पणे, नोटबुके जे जरुरी नाहीत , जुने आहेत पण आता कामाचे नाहीत, अशा कागदपत्रांना नष्ट करा. असे अधूनमधून वाचत असतो. पटत ही असतं.
हे जरुरी प्रकरण फार सापेक्ष आहे. कित्येक वर्षांचा जुना पत्रव्यवहार मी ठेवत आलेलो आहे. एखाद्याला पत्र पाठवले तर त्याची कार्बन प्रत माझ्याकडे ठेवतो.कधीतरी संदर्भ म्हणून उपयोगाला येतो. कधी कधी आयुष्यात आपणच आरोपी, आपणच फिर्यादी व आपणच न्यायाधीश असतो अशावेळी पुरावा म्हणुन ही कागदपत्रे उपयोगी पडतात. सामाजिक लेखनात तर कधी कधी आपल्याला निरोपयोगी असणारा कचरा इतरांसाठी संदर्भमूल्य असतो.अशी कागदपत्रे चिवडताना मी कधी कधी कालकुपीत जातो.अडकूनही बसतो.परत काळच बाहेर काढतो. वैराग्याचा झटका आला की 25-30 वर्षांपुर्वीची कागदपत्रे नष्ट करतो.त्या त्या काळाची ती अपत्ये असतात. आपण जीवापाड जपलेल्या गोष्टी इतरांसाठी कचरामूल्याच्या असतात हे माहित असूनही आपण त्या आपल्या अस्तित्वासाठी जपत राहतो.आताच्या डिजिटल युगात मी काही कागदपत्रांचे/ पुस्तकांचे डिजिटायझेशन केले आहे. पण मूळ फेकवत नाहीत. आता आवरायला हवं. तुम्ही मेलात की तुमच्यासाठी जग बुडाल.मग ते ओझे इतरांसाठी. संदर्भमूल्यावरुन आठवल की उपक्रमावर मी ज्योतिषाच्या माझ्या पुस्तकाची लेखमाला लिहित होतो. त्यात एक संदर्भ साप्ताहिक सकाळ 1989 चा होता. मी तो लिहून ठेवला होता. पुस्तक लिहिताना तो लिहिला होता. उपक्रमाचे वाचक चिकित्सक. किस पाडणारे. कुणी मागितलाच तर तयार ठेवा म्ह्णुन कागदपत्रे शोधू लागलो. मूळ तो लेख मला सापडलाच नाही. . त्यावेळी मी तो अंक उगीच सारखे पैसे का खर्च करा म्ह्णुन घेतला नव्हता असे लक्षात आले.मग अस्वस्थ झालो. लगेच सकाळ कार्यालय गाठले. तिथे तो त्यांच्या ग्रंथालयात मिळाला. त्यांच्या नियमानुसार प्रतिवर्षी असलेल्या संदर्भ फी नुसार काहीतरी 110 रुपये भरले व त्या लेखाची झेरॉक्स मिळवली. त्यावेळी वाचवलेले चार रुपये वसूल झाले.पण शांत झोप लागली. पुढे तो कोणी पुरावा म्हणून मागितलाच नाही ही गोष्ट वेगळी. आत्ता संगणक चाळताना मी वि.म.दांडेकरांच्या पत्नी कुमुदिनी दांडेकर यांच्याशी ईमेलद्वारा केलेला पत्रव्यवहाराचा स्क्रिन शॉट ठेवला होता. तो आपद्प्रसंगी मला जाब विचारणार्याला देता आला असता या विचारानेही जरा सुरक्षित वाटलं. नको सगळ नष्ट करायला. येत कधी कधी उपयोगाला. असा विचारही मनात येउन गेला. असो! आता मात्र आवरलच पाहिजे.नाहीतर अडकून बसायचो कलकुपीत.
माझा होर्डिंग ओसीडी
Submitted by प्रकाश घाटपांडे on 20 May, 2023 - 01:51
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेख आवडला.
लेख आवडला. होर्डिंग ओसीडीवाले घरात आहेत, म्हणून जास्त रिलेट झाला
Time Trap / Time capsule ला ‘कालकुपी’ अतिशय चपखल शब्द आहे.
Chhan लिहिलय.
Chhan लिहिलय.
पटलं. लेख फार नाहीत. पण
पटलं. लेख फार नाहीत. पण पुस्तकं आहेत. पण त्यांना वाचक मिळवून दिला आमच्या फ्रेंड्स लायब्रिने. आपल्याकडं पुस्तक द्यायचं आणि त्यांच्याकडे असलेलं कोणतंही उतरायचं. आता पुस्तकं तेवढीच आहेत पण बदल झाला. विविधता आली. मुलांना हवी असलेली आणता आली. ते ती ठेवतील किंवा रद्दीत घालतील. परंतू आपल्याच आवडीची रद्दी तरी बदलली हे काय थोडं झालं?
लेख खूपच आवडला.
लेख खूपच आवडला.
मलाही अशी संभ्रमावस्था आली आहे. टाकावे की ठेवावे. कठीण प्रश्न.
वाह!! एकदम इन्टेलेक्च्युअल
वाह!! एकदम इन्टेलेक्च्युअल होर्डिंग आहे की. नक्कीच मौल्यवान आहे. कौतुकच वाटेल मला.
आत्ता काही मासिके पुस्तके
आत्ता काही मासिके पुस्तके यांची रद्दी घातली. ती 1 टक्का पण नव्हती पण ठरवताना घालमेल झालीच. अरे हे राहू देत अरे ते राहू देत. शेवटी झटक्यात उठलो अन रद्दी देउन आलो.
हीरा, आपण मग या ओसीडी वर काबू
हीरा, आपण मग या ओसीडी वर काबू कसे ठेवता?
आता गेली सात आठ वर्षे नवीन
आता गेली सात आठ वर्षे नवीन पुस्तके, मासिके, घेणे बंद केले आहे. कोविड pकाळापासून वृत्तपत्रेही बंद आहेत. त्यामुळे नवी आवक थांबली आहे. चांगले वाचनालय जवळ आहे. पण तिथे असतील तीच पुस्तके वाचावी लागतात ही मर्यादा आहेच. ती तडजोड आहे. आहे तो साठा विषयवार लावून ठेवला आहे. जसे की धार्मिक, आध्यात्मिक, ज्योतिषविषयक, संतचरित्रे, ललित लेखन. ( त्यात कविता, कथा, कादंबऱ्या, अनुवाद असे पोट विभाग) आता कोणी एखाद्या विषयात रस दाखवणारे घरी आले की त्या विषयाची पुस्तके दाखवायची. काही जण घेतात निवडून. पण अशाने साठा कमी होण्याचा वेग अगदी कमी आहे. मन घट्ट करून सरळ काढून टाकणे हाच उपाय आहे. रद्दीवाल्याचे दुकान असेल तर तो त्यातली खपाची पुस्तके निवडून विकायला ठेवतो. तेव्हढीच आशा की एखाद्या सुजाण वाचकाच्या घरी त्यातले एखादे पुस्तक जाईल.
निर्मम होणे हाच उपाय आहे. पण तसे नाही ना होता येत! मागे एकदा शं बा दीक्षितांचे दाशराज्ञ युद्ध हे जवळ जवळ शंभर वर्षे घरात असलेले पुस्तक वैतागाच्या भरात काढून टाकले त्याची हळहळ अजून मनात आहे.
छान लेख आहे.
छान लेख आहे.
पण शीर्षक वाचून मला असे वाटले की एखद्या होर्डिंग शेजारून जाताना ते आपल्या डोक्यावर पडेल ही भिती वाटते तसे असेल. मध्ये दीर्घ व र्हस्व असे दोन ओ आहेत.
संग्रहलोलुपता?
संग्रहलोलुपता?
<< एखद्या होर्डिंग शेजारून
<< एखद्या होर्डिंग शेजारून जाताना ते आपल्या डोक्यावर पडेल ही भिती वाटते >>
त्याला होर्डिंग फोबिया म्हणता येईल. OCD (Obsessive Compulsive Disorder) म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करावी लागणे अशी वृत्ती.
लेख आवडला. कागदपत्रांचे/ पुस्तकांचे डिजिटायझेशन केले असेल तर मूळ पुस्तके/लेख बाद करायला काहीच हरकत नाही. अर्थात, ई-कचरा सुद्धा बराच गोळा होतो. पण तो एक वेगळाच विषय आहे आणि तो किमान डोळ्यासमोर तरी दिसत नाही.
मी कागदपत्रांचा कचरा बऱ्यापैकी नियमित साफ करतो. ६ महिन्याच्यावर एखादे कागदपत्र/वस्तू लागले नाही तर मी ते सरळ बाद करतो. (काही ठराविक कागदपत्रे/ऐवज जे आयुष्यभर सांभाळावे लागतील ते वेगवेगळ्या मोठ्या बॉक्समध्ये वर्गीकरण करून आणि चिठ्ठ्या लावून ठेवले आहेत). घरात नवीन वस्तू आली की जुनी लगेच बाद करतो, त्यामुळे पसारा/अडगळ यांना वाव नाही. आयुष्याच्या शेवटी फक्त आठवणीच महत्त्वाच्या, सामान एका सूटकेसमध्ये मावेल इतकेच पुरेसे आहे, असे माझे मत आहे.
छान मांडलंय.
छान मांडलंय.
पुस्तकांच्या बाबतीत खरंच असं होतं. बरेचदा सुरसुरी येते की कमी करूयात.. आणि तसं करायला बसलं की काय होतं.. बराच वेळ उलथापालथ झाली की "हाती ज्यांच्या शून्य होते" या न्यायाने टाकाऊ असं काही सापडतच नाही. हीरा म्हणतात तसं निर्मम होणं अवघड आहे.
सामो "संग्रहलोलुपता" हा उत्तम
सामो "संग्रहलोलुपता" हा उत्तम पर्यायी मराठी शब्द वाटतो
म्हणून मला सामो तथा शुची विषयी असूयायुक्त आदर आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत सहज संचार आहे. मला वैचारिक विषय इंग्रजी मधे पचवता येणे फार कठीण जाते. मी त्या वाट्याला जात नाही. अगदी नाईलाज झाला तर कष्टपूर्वक आकलन करावे लागते.
घाटपांडे धन्यवाद.
घाटपांडे धन्यवाद.
उबो, डिजिटायजेशन झाल्यावर
उबो, डिजिटायजेशन झाल्यावर देखील मूळ फेकवत नाही. शिवाय व्यक्तिगत डिजिटायजेशन्ला मर्यादा आहेत. माझ्याकडे मूळ पुस्तक आहे, मूळ लेख आहे ही प्रौढी सुखावणारी असते. हार्ड डिस्क करप्ट झाली तर? ही भीती पण वाटते.
छान विषय आहे. अनेकांना
छान विषय आहे. अनेकांना पुस्तके जतन करण्याचा मोह असतो . पसारा वाढत जातो, कमी करण्याचे धाडस होत नाही. शक्य असेल तिथे पुढे सरकवायचे , दुसरा कुणीतरी वापरेल.
पण आता सगळेच digital आहे. कधी काय erase होईल सांगता येत नाही. बॅकअप घेण्याला पण मर्यादा आहेत.
कागदपत्रे जपून ठेवावी लागतात. काही कागदपत्रां चे महत्व केवळ आपल्या पुरतेच मर्यादित असते. इतरांसाठी त्याची किम्मत बहुधा शून्य ( जिर्ण फोटोवर अमेरिकन अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेत्याची स्वाक्षरी).
... अनेकांना पुस्तके जतन
... अनेकांना पुस्तके जतन करण्याचा मोह असतो...
+१. बरोबर.
पुस्तके वाचण्याचा आणि पुस्तके जमवण्याचा नाद हे दोन वेगवेगळे छंद आहेत. संग्रह मोठा असला की एका पॉईंटनंतर आपल्याकडे कोणती पुस्तके आहेत हे सुद्धा लक्षात राहात नाही, पुन्हा वाचणे तर दूरच.
अर्थात प्रकाश घाटपांडेंच्या संग्रहातील दुर्मिळ ग्रंथांबद्दल असे होत नसावे.
स्त्रियांच्या बाबत हा
स्त्रियांच्या बाबत हा होर्डिंग ओसीडी साड्या, ड्रेसेस या बाबत असतो. कधी कधी केवळ मूड ऑर्डर मूळे खरेदी होत असते. कंपल्सिव बायिंग डिस ऑर्डर. पुस्तकांची लायब्ररी असते तशी साड्यांची पण लायब्ररी असावी अशी कल्पना मी मांडून पाहिली. पण समस्त हितचिंतक स्त्री वर्गाने ती उधळून लावली
छान लिहिलय पण माझे दोन पैसे
छान लिहिलय पण माझे दोन पैसे ऍड करते.
माझ्या मते एकदा वाचलं की त्या पुस्तकाची रद्दी होते. विकत घेतलेल्या पुस्तकांपैकी एक टक्का ही पुस्तकं पुन्हा वाचली जात नाहीत. अगदी काही पुस्तकंच असतात संग्राह्य. आमच्याकडे मासिक मनोरंजनचे शंभर वर्षांपूर्वी चे असे अंक आहेत, ते टाकून देववणार नाहीत कधी ही. पण बाकी पुस्तकाचं काय करायचं हा पेचच असतो. दुसऱ्या दिवशी ती रद्दीत ही देववत नाहीत आणि छोट्या घरात कुठे ठेवायची हा पण पेचच असतो. वाचनालय ही घेत नाहीत फुकट दिली तरी. चार वर्षांपूर्वी अशी अफाट पुस्तकं रद्दीत दिली होती. त्यामुळे हल्ली पुस्तकं विकत घेऊन वाचा म्हणून सांगत असले तरी मी घेत नाही. तसेच माझ्याकडचं पुस्तक वाचायला घेऊन कुणी परत नाही केलं तर मला खूप आनन्द होतो.
तसेच माझ्याकडचं पुस्तक
तसेच माझ्याकडचं पुस्तक वाचायला घेऊन कुणी परत नाही केलं तर मला खूप आनन्द होतो. ## श्या,।मला खूप बोचत राहतं. सारे प्रवासी घडीचे ह्या पुस्तकाची नवीन आवृत्ती आली ती घेतली होती. कोण घेऊन गेले ते आठवत नाही, पण परत आलीच नाही.
पुस्तकांना जीवापाड जपणार्या
पुस्तकांना जीवापाड जपणार्या लोकांनाच मी पुस्तके देतो. अन्य लोकांना टाळतो. कधी कधी लोकांना पुस्तक दिल्यावर ते परत केले असे सांगतात पण प्रत्यक्शात त्यांनी ते दिलेले नसते असा अनुभव आहे
सामो, संग्रहलोलुपता शब्द अती
सामो, संग्रहलोलुपता शब्द अती आवडला आणि सुयोग्य वाटला.
किंडल मुळे पुस्तकं घेणं कमी झालं आहे, पण जुनी ढिगाने जमवलेली पुस्तकं आणि आता कमी पडणारी book shelves ही समस्या आहेच. अर्थात आमच्याकडे दुर्मिळ पुस्तकं नसल्यामुळे एखाद्या आवराआवरी धडाक्यात बरीच पुस्तकं काढून टाकली जातील. तो दिवस लवकर आणण्यात या लेखाचा मोठा वाटा असेल.
संग्रह मोठा असला की एका
संग्रह मोठा असला की एका पॉईंटनंतर आपल्याकडे कोणती पुस्तके आहेत हे सुद्धा लक्षात राहात नाही, पुन्हा वाचणे तर दूरच.>>>>> हे अगदी खरे आहे. आत्ता घेउन ठेवा नंतर निवांत वाचू असे म्हणून काही पुस्तके खरेदी केली असतात. कही दुर्मिळ पुस्तकांच्या मी नंतर मिळणार नाहीत म्हणून दोन प्रती घेतलेल्या असतात. काही वाचण्यासाठी काही चाळण्यासठी तर काही केवळ संदर्भासाठी घेतली असतात.
मला आलेली विरक्ती आहे कि नैराश्य आहे की उदासीनता आहे की निष्क्रियता आहे कि तटस्थता आहे माहीत नाही पण घालमेल होते हे मात्र खरे!