चिकमगळूर भटकंती- भाग १/3

Submitted by विशाखा-वावे on 12 May, 2023 - 05:33

गेल्या आठवड्यात शनिवार-रविवारला जोडून बुद्ध पौर्णिमेची सुटी आली आणि आम्ही चिकमगळूर भागात फिरायला जायचं ठरवलं.

चिकमगळूर हा भाग पश्चिम घाटात आहे. डोंगरदर्‍या, जंगले यांनी नटलेला आहे. अनेक प्रेक्षणीय ठिकाणे या जिल्ह्यात आहेत. त्यापैकी आम्ही ’कळसा’ भागातली काही ठिकाणं आणि हळेबिडू इथलं होयसळांच्या काळातलं पुरातन मंदिर बघण्याचं ठरवलेलं होतं. तीनच दिवसांची ही सहल असल्यामुळे एवढंच पुरेसं होतं. बंगळूरहून साधारण साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आहे.
शुक्रवारी सकाळी साडेसहा-पावणेसातच्या सुमारास घरून निघालो. बंगळूर-मंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागलो. वाटेत नाश्ता करून आणि कॉफी पिऊन पुढे निघालो. हासन हे या मार्गावरचं सर्वात मोठं शहर आहे. एच. डी. देवेगौडा यांचा हा पूर्वीचा लोकसभा मतदारसंघ. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे प्रचाराचं वातावरण थोडंफार जाणवत होतं.
बेलूरच्या थोडं पुढे गेल्यावर घाटाचा रस्ता सुरू झाला. रस्ता एकदम छान होता. कोकणातल्यासारखीच आजूबाजूला झाडी. पुढे पुढे गेल्यावर मग डोंगरउतारांवरचे चहाचे मळे आणि कॉफीच्या बागाही दिसायला लागल्या. आम्ही जिथे राहणार होतो, त्या हॉटेलचं नाव ’कापी काडु’ असं होतं. कापी म्हणजे कॉफी आणि काडु म्हणजे जंगल. दुपारी एक-दीडच्या सुमारास आम्ही तिथे पोचलो. ही एक कॉफी इस्टेटच आहे. शिवाय सुपारीची बाग आहे. त्यातच मधे छोटं हॉटेल बांधलेलं आहे. हॉटेलचे मालक भेटले. त्यांच्या वडिलांनी चाळीसेक वर्षांपूर्वी ही इस्टेट विकत घेतली. हे हॉटेल मात्र त्यांनी अगदी अलीकडे बांधलेलं आहे. या परिसरात फिरताना हे ’मॉडेल’ सगळीकडे दिसतं. कॉफी आणि सुपारीची बाग आणि त्याला जोडूनच होम स्टे/ हॉटेल.

IMG-20230512-WA0009.jpg

साधी, मोठी खोली होती. हवा छान होती. पावसाळी हवामान होतं. समोरूनच भद्रा नदी वाहत होती. ही नदी इथून जवळच असलेल्या कुद्रेमुख भागात उगम पावते. शिवमोग्याला ती तुंगा नदीला मिळते आणि मग पुढे ती तुंगभद्रा म्हणून वाहते. तुंगभद्रा नदी आम्ही काही वर्षांपूर्वी हंपीला गेलो असताना पाहिली होती. तिचं हे बाल- किंवा किशोरीरूप आहे असं म्हणायला हरकत नाही. मे महिन्यातही खळाळत वाहण्याइतकं पाणी तिला होतं. नदीत उतरून पाण्यात खेळायचं असेल, तर सुरक्षित जागाही तिथे आहे. तिथे काही सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे असं कळलं. तिसर्‍या दिवशी तिथे चित्रीकरणाची तयारी चालू असलेली आम्हीही बघितली. एक जीप किनार्‍यावरून जोरात पाण्यात येताना दोन-तीन वेळा दिसली. कुठला तरी पाठलागाचा वगैरे सीन असणार! आम्ही काही नदीच्या पाण्यात उतरलो नाही, पण आमच्यानंतर दुपारी उशिराने तिथे मुंबईची दोन कुटुंबं येऊन पोचली, त्यांनी मात्र पाण्यात खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. नदी, समोर दिसणारं जंगल आणि त्यातली उंच उंच झाडं बघून इथे बरेच पक्षी दिसतील, हा माझा अंदाज खरा ठरला.

प्रवासातून आल्यावर थोडे ताजेतवाने होऊन आम्ही लगेचच जेवायला गेलो. जेवण तिखट आणि चविष्ट होतं. प्रत्येक जेवणात काही ना काही स्थानिक खासियतीचा पदार्थ होताच. पोळ्या, दोन भाज्या, एखादी चटणी किंवा कोशिंबीर, भाताचा पुलावासारखा एखादा प्रकार, सांबार, रसम आणि शिवाय साधा पांढरा भात आणि गोड पदार्थ असा एकंदर प्रत्येक जेवणाचा मेनू होता. पहिल्या दिवशी गोड म्हणून गूळ आणि ओल्या नारळाचं सारण भरलेली पोळी होती. ’अप्पे मिडि’ नावाचे, मलनाड भागात येणारे खास लोणच्यासाठीचे लहान लहान आंबे (कैर्‍या) असतात. छोट्या छोट्या अख्ख्या कैर्‍यांचं हे लोणचं एकदम वेगळंच, चटकदार लागतं. यापूर्वी नाव ऐकलं असलं, तरी इथे पहिल्यांदाच हे लोणचं खाल्लं. ते खूपच आवडल्यामुळे नंतर परत निघताना लोणच्याची एक बाटली विकत घेतली!
IMG-20230512-WA0005.jpg

थोडी विश्रांती घेऊन मग आम्ही नदीच्या काठाने फिरायला गेलो. नदीपात्रातल्या मोठ्या सपाट खडकांवर निवांत बसलो.
ढगाळ हवेमुळे फार ऊनही नव्हतं. पक्षी दिसत होते. या काठावरून त्या काठावर उडत जाणारे मलबार राखी धनेश (मलबार ग्रे हॉर्नबिल) बघणं, रॅकेट-टेल्ड ड्रॉंगो (भृंगराज किंवा पल्लवपुच्छ कोतवाल) आपली लांबलचक आणि टोकाला पिसासारखा आकार असणारी शेपटी मिरवत उडताना बघणं म्हणजे ’आहाहा’ अनुभव! अनेक पक्ष्यांचे आवाज येत होते. तांबटासारख्या काहींचे आवाज ओळखता येत होते, अनेक आवाज ओळखता येत नव्हते.

IMG-20230512-WA0003.jpg

मलबार राखी धनेश
IMG-20230512-WA0011.jpg
रॅकेट-टेल्ड ड्रॉन्गो (पल्लवपुच्छ कोतवाल)

हॉटेलमालकांशी थोड्या गप्पा झाल्या. ते म्हणाले की नदीच्या पलीकडच्या बाजूला हरणं, रानडुकरं सर्रास दिसतातच, पण गेल्या वर्षीपासून हत्तीही दिसायला लागले आहेत. ते बागेत घुसून नुकसानही करतात. त्यांच्या दृष्टीने हत्ती त्रासदायक असणं बरोबरच आहे, पण आम्हाला मात्र हत्ती बघायला मिळाले असते तर आनंद झाला असता. Happy

संध्याकाळी चहा-खाणं झाल्यानंतर अंधार पडत असताना अंगणात निवांत बसलेलो असताना मलबार व्हिसलिंग थ्रश ( मलबार शीळकरी कस्तुर) या पक्ष्याची शीळ ऐकू येऊ लागली. माणसाने शीळ वाजवावी, तशा आवाजातली ही सुरेल शीळ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. पश्चिमेला आकाशात शुक्र छान तेजस्वी दिसत होता. बाकीच्या आकाशात मात्र ढग होते. त्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण होतं, पण ढगांमुळे चंद्र दिसत नव्हता.
IMG-20230512-WA0006.jpg
शुक्र

IMG-20230512-WA0010.jpg

रात्री जेवायच्या वेळेस अजून एक कुटुंब येऊन पोचलं. ते आदल्या दिवशी येऊन आज दिवसभर ’टेम्पल व्हिजिट’ करत होते असं कळलं. या भागात कळसेश्वर, अन्नपूर्णेश्वरी आणि अजून बरीच देवस्थानं आहेत. बेलूर तर प्रसिद्धच आहे. शृंगेरीलाही इथून रस्ता जातो.
दुसर्‍या दिवशी कुठे कुठे जायचं हे आम्ही ठरवत होतो. राणी झरी पॉईंट आणि क्यातनमक्की नावाचा सनराईज/सनसेट पॉईंट ही दोन ठिकाणं नक्की बघावीत असं हॉटेलच्या स्टाफचा आग्रह होता. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानही इथून अगदी जवळ आहे. पण तिथे जाण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते असं सगळेजण सांगत होते. मात्र कुठल्याही वेबसाईटवर असा उल्लेख दिसत नव्हता. कुद्रेमुख शिखरावर चढाई करायची असेल तर आगाऊ परवानगी घ्यावी लागते असंच सगळीकडे लिहिलेलं होतं. कुद्रेमुख हे मलयनगिरीनंतर कर्नाटकातील दुसर्‍या क्रमांकाचं उंच शिखर आहे. कन्नडमध्ये कुद्रे म्हणजे घोडा. मुख म्हणजे अर्थात तोंड. या शिखराचा आकार एका बाजूने घोड्याच्या तोंडासारखा दिसतो म्हणून हे नाव पडलेलं आहे. ट्रेकिंग वगैरे करण्याचा आमचा यावेळी विचार नव्हता. पण तिथे बरेच पक्षी दिसतात, ते बघायची मात्र इच्छा होती. त्यासाठी परवानगी लागणार नाही असं आम्हाला वाटत होतं त्यामुळे उद्या तिथे जाऊन तर बघू, आत सोडलं तर जाऊ, नाहीतर परत फिरू असं ठरवलं.

पहाटे चारच्या सुमारास जाग आली तेव्हा बाहेर स्वच्छ चांदणं पडलं होतं म्हणून आम्ही दोघं जरा वेळ खोलीच्या बाहेर खुर्च्यांवर जाऊन बसलो. शांतता असली, तरी नदीचा खळखळाट, जंगलातून येणारे काही पक्ष्यांचे अनोळखी आवाज ऐकू येत होतेच. थंडी होती. बराच वेळ छान गेला. अचानक नदीच्या पात्रातून कुठला तरी प्राणी अलीकडच्या काठावर उडी मारून चढल्याचं दिसलं. नंतर मात्र काही आवाज आला नाही आणि काही दिसलं नाही, पण कुणीतरी टॉर्चचा प्रकाश अलीकडच्या काठावर टाकत होतं. हा काय प्रकार असावा ते तेव्हा समजलं नाही, पण दुसर्‍या दिवशी राघव (हॉटेलचे मालक) यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की रात्री इथे मासेमारी करायला लोक येतात, त्यांच्यापैकी कुणीतरी असणार. प्राणी कुठला होता ते मात्र कळलं नाही.

सकाळी उठून चहा-नाश्ता आटपून कुद्रेमुखला जाण्यासाठी निघालो. अर्ध्यापाऊण तासात तिथे पोचलोदेखील. पण प्रवेशाच्या ठिकाणी असलेल्या वनखात्याच्या अधिकार्‍यांनी अडवलं आणि परवानगी घेतली आहे का, असं विचारलं. ती आमच्याकडे नसल्यामुळे (ट्रेकिंग करायचं नसेल तरी) आत जाता येणार नाही हे त्यांनी संगितलं. कालपासून सगळ्यांकडून हे ऐकलं होतंच, पण आता खुद्द कुद्रेमुखातून ( from Horse's mouth) ते ऐकलं असा विनोद करत आम्ही मागे फिरलो आणि राणी झरीला जायच्या रस्त्याला लागलो!
भाग २
https://www.maayboli.com/node/83453

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान सुरुवात.
१९९८ ला रंगनाथिट्टू, श्रवनबेलगोला, बेलूर, हळेबिडू फिरलो....
तुमचा अनुभव बघूया...

रंगनाथिट्टू, श्रवनबेलगोला यापेक्षा चिकमगळुर वेगळं आहे. सकलेशपुरही आहे. हा भाग खूप सुंदर आहे.

आम्ही उडुपी रेल्वे स्टेशन सुरुवात(कृष्णमंदीर), श्रृंगेरी(मठ परिसर आणि शारदंबा देवस्थान), चिकमगळुरू (इनाम दत्तपीठ उर्फ बुधनगिरी शिखर-माणिक्यधारा धबधबा-होन्नेमारा धबधबा, बेलवडी-हळेबिडू-बेलूर, कडूर रेल्वे स्टेशनहून परत ठाणे अशी सहल केलेली. कुठल्या रिझॉटला नाही राहिलो परंतू जमेल तेवढं पाहिलं. (मार्च २०२०)

सुंदर भाग.

फोटो आवडले आणि पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

छान लिहिले आहे विशाखा !!! कॉफी इस्टेट मधले होम स्टे कितपत चांगले असतात? आम्ही कूर्ग ला आलो तेव्हा एजंट ने रेकमेंड केले होते पण कधी राहिलो नाही म्हणून केले नाही बुकिंग. फोटो बघितले होते पण थोडे lonely वाटले होते.

सुंदरच, लेख आणि फोटो दोन्हीही. आम्ही बेलूर आणि हलेबिडू ९४ साली केलं होत. श्रवण बेळ गोळ पण. बाकी भाग मात्र करायचंय, कधी फिरणं होतंय बघू

छान लेख आणि फोटो.
खुद्द कुद्रेमुखातून ( from Horse's mouth) ते ऐकलं.. >> हे आवडलं. Happy

मस्त वर्णन आणि सुखावणारे फोटोज.
आम्ही कधीतरी(2007 ला) चीकमंगळूर ला गेलो होतो असं आठवतं. कॉफी बागा पाहिल्या होत्या.
निळे आकाश फोटो कसले कुल आहेत!!

नदीचे फोटो मस्तच... मला नदीच्या काठावरचे (फोटोत न दिसणारे) दगडगोटे दिसायला लागले Lol

लहान कैर्‍यांचं लोणचं - इंटरेस्टिंग.
इथे मंगलोर स्टोअरमध्ये ते लोणचं बघितलंय, घ्यावं की नाही असा कायम प्रश्न पडतो. आता एकदा घेऊन बघते.

सर्वांचे मनापासून आभार Happy
ललिता-प्रीति, तिथे दगडगोट्यांपासून बनवलेली दोन चित्रं लावली होती. मी फोटो काढलाय, पुढच्या भागात देते. (मी तुझा पासवर्डमधला लेख वाचला होता त्याचीच आठवण झाली मला Happy )
Srd, तुम्ही खूप फिरला आहात असं लक्षात येतं. तुम्हीही थोडक्यात प्रवासवर्णन का नाही लिहीत?
अश्विनी११, चांगले असतात होम स्टे. म्हणजे जे ऐकलंय त्यावरून तरी. आम्हीही आत्ता पहिल्यांदाच राहिलो होतो. एक आहे, की जेवण ते देतात तेच. पण चांगलं होतं आणि आपण सांगितलं तर ते हवे तसे बदल करून देऊ शकतात. आमच्यानंतर जी अजून दोन कुटुंबं होती ती बरीच हौशी होती. त्यांनी संध्याकाळी कँप फायर करायला सांगून चिकन वगैरे आणून यांच्याकडून काही पदार्थ बनवून घेतले होते. (त्याचे वेगळे पैसे दिले)

छान लिहिलंय वावे. फोटो ही सुंदरच.
कॉफी आणि मसाले घेतलेस की नाही.

5-6 वर्षांपूर्वी तिकडचा भाग बघितलाय ते आठवलं. सिरसी, गोकर्ण -महाबळेश्वर, हळेबीडू, बेलूर (इथं गाईड घ्यावाच) , उडपी (इथले समुद्रकिनारे खूप स्वच्छ वाटले) , शृंगेरी, होर्नाडू (इथलं अन्नपूर्णा मंदिर खूप खूप सुंदर आहे) , चिकमंगळूर असं एका वेळी बघितलं होतं. या सगळ्या प्रवासात वाटेत हिरवीगार जँगलं आणि काही भागात मसाल्याच्या ,कॉफीच्या बागा आहेत. इतकं की जीपीएस बाईंमुळे आम्ही पूर्ण घनदाट जनगलातल्या रस्त्याने शृंगेरी ते होर्नाडू गेलो. वाटेत कित्येक किमी एकही गाडी नाही, छोटी खेडेगावं. जँगल मात्र घनदाट. खेडेगाव आलं की आधी मसाल्याचा वास यायचा रस्त्यात. त्यात रात्र होत आलेली. होर्नाडूला पोचायच्या आधी 200 मीटर पर्यंत पूर्ण शुकशुकाट .. आता रहायचं कुठं ते पण कळेना , आणि एकदम मंदिर, भक्तनिवास, एखाद दुसरी टपरी , बसेस आणि ही एवढी गर्दी दिसली. मग कळलं दुसऱ्या बाजूने बरेचजण आलेले. जंगलातल्या मार्गाने फारसं कोणी येत नाही.

तुंबा संतोषा आयतु, वावे. नावू हदिनैदु वर्षा हिंदे अल्ली होग-बंदिद्दीवी. हळेबीडु मत्तु बेलूर कूडा बहाळा छन्नागिदे.

छान लेख व माहिती फोटो. पहिल्यच दिवशी वाचलेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.