सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १४: भूपालपल्ली- सिरोंचा (६२ किमी)

Submitted by मार्गी on 9 May, 2023 - 11:30

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)

✪ महाराष्ट्रामध्ये पुनर्प्रवेश!
✪ अविश्वसनीय निसर्ग आणि वन प्रदेश
✪ विराट गोदावरी आणि अविस्मरणीय प्राणहिता
✪ गडचिरोली- अफवांच्या पलीकडचं सत्य
✪ १३ दिवसांमध्ये १०५० किमी पूर्ण
✪ मोहीमेचा शेवट फार लवकर येतो आहे

सर्वांना नमस्कार. मोहीमेतला १३ वा दिवस, ६ ऑक्टोबर २०२२. ह्या प्रवासातला सर्वांत विशेष टप्पा आता सुरू होतोय. आज मी महाराष्ट्रात पुन: प्रवेश करेन. विशेष म्हणजे आदिवासी व वनबहुल गडचिरोली भागात राईड करेन. एका अर्थाने ही अज्ञात प्रदेशातली वाटचाल असेल. अनेक दिवसांपर्यंत ह्या भागातल्या प्रवासाबद्दल मनामध्ये शंकाकुशंका सुरू होत्या. इथले रस्ते, गावं, जंगल व कनेक्टिव्हिटी ह्याबद्दल मनामध्ये खूप अस्वस्थता होती. पण आता खूप शांत आणि हलकं वाटतंय. सकाळी लवकर राईड सुरू केली, ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन टाकलं आणि निघालो. भूपालपल्लीपर्यंतचा रस्ता तर छानच होता. आता इथून पुढे कसा असेल बघूया. काल संध्याकाळी धो धो पाऊस पडला होता, पण आता पावसाची चिन्हं नाही‌ आहेत. आल्हाददायक वातावरण आहे. लवकरच छोटसं भूपालपल्ली पार केलं आणि आता वनांचं राज्य सुरू झालं!

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/05/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

.

.
हा अजूनही राष्ट्रीय महामार्ग ३५३ आहे आणि पुढे कलेेश्वरम मंदिर हे प्रसिद्ध मंदिर लागेल. त्यामुळे रस्ता तसा चांगला असेल. हिरवागार परिसर आणि घनदाट अरण्य! रस्त्यावर अगदी थोडे वाहन! धुकं नाहीय ते बरं आहे. थोड्या अंतरानंतर मला क्षितिजालगत काही टेकड्या दिसत आहेत. किती वेगळं हे ठिकाण आहे! छत्तीसगढ़ सीमासुद्धा लांब नाहीय. आणि रस्ता थेट वनातून जातोय! रस्त्यावर माकडांच्या अनेक टोळ्या बसलेल्या दिसत आहेत! त्यांना माझ्यामुळे त्रास व्हायला नको! सायकल अगदी जवळ आल्यावर अचानक होणा-या चाकाच्या आवाजामुळे छोटी माकडं दचकत आहेत! बहुतेक तर त्यांनी सायकल फार वेळा बघितली नसेल. अविश्वसनीय नजारे!

आजचा टप्पा तसा छोटाच आहे, फक्त ६३ किलोमीटर. अर्ध्या अंतरापर्यंत मस्त रस्ता आहे. ३५ किलोमीटर अंतर झाल्यावर एका छोट्या गावात चहा- बिस्कीटाचा ब्रेक घेतला. आता रस्ता डावीकडे वळेल आणि त्याचा आकारही लहान झाला आहे! अगदी साधा छोट्या गावांमधला रस्ता वाटतोय तो आता. पण अगदी निबीड अरण्य! अहा हा! हळु हळु दिवस वर आल्यानंतर थोडी वाहनं दिसत आहेत. काही दुचाक्याही दिसत आहेत. ह्या प्रदेशात अगदी दाट वनं आणि छोट्या टेकड्या आहेत. पण इथे पर्वत किंवा घाट नाहीत. त्यामुळे नेहमीच्या वेगाने जात राहिलो. फक्त दृश्यं इतके जबरदस्त आहेत की सारखं फोटो घेण्यासाठी थांबावं लागतंय! पुढेही माकडांच्या टोळ्या लागल्या! पण त्यांनी काही त्रास दिला नाही. हळु हळु मी कलेेश्वरमच्या जवळ आलो. आता सिरोंचा फक्त १४ किलोमीटर!


.

.

.

अहा हा, किती मोठी गोदावरी दिसते आहे! ओहो! अद्भुत. इथे तिचं पात्र किमान तीन- साडेतीन किलोमीटर असेल. विराट! अगदी समुद्र किना-यासारखं वाटतंय. दुसरी बाजूच लवकर दिसत नाहीय! केवळ आणि केवळ आनंद! अवाक् होऊन काही काळ हा आनंद घेतला आणि हळु हळु ब्रिज ओलांडला. काय भाग्यवान आहे मी. सिरोंच्याच्या काही अंतर आधी रस्त्यावरच माणिकजी मला भेटले व त्यांनी सिरोंचात कुठे भेटायचं सांगितलं. लवकरच तिकडे पोहचलो. तिथे माणिकजी, दामोदरजी आणि इतर मंडळींनी माझं आपुलकीने स्वागत केलं. आणि फक्त स्वागत नाही, तर मला लोकांशी थोडं बोलायची संधीही दिली. मला भेटून सगळ्यांना इतका आनंद होतोय! खरं तर मी त्यांच्यासाठी अनोळखीच ना. पण सायकलीने मला त्यांच्यासोबत जोडलंय! नंतर प्राणहिता नदीच्या अगदी जवळ स्वामी विवेकानंद छात्रावासामध्ये माझी थांबण्याची सोय केली गेली. हे सगळं स्वप्नच वाटतंय मला!

दुपारी मुळच्या नांदेडच्या असलेल्या एका पोलिस अधिका-यांना भेटलो. तिथेच परभणी- माझ्या गावचे असलेले अधिकारीही भेटले! संध्याकाळी एका शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत संवादही करता आला. ह्या संधीचा पूर्ण आनंद घेतला. कारण ब-याच गॅपनंतर मला ही संधी मिळाली आहे. माझे अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले आणि त्यांना सांगितलं की, त्यांच्यातही अशी राईड करण्याची क्षमता आहे. काय दिवस आहे पण हा! मी ज्या छात्रावासामध्ये थांबलोय, ते प्राणहिता नदीला लागून आहे. समोरच्या बाजूला तेलंगणा! इथून मंचेरियलसुद्धा फक्त ५० किलोमीटर अंतरावर आहे. आणि माझे आजोबा एके काळी बाबा व त्यांच्या भावा- बहिणींसोबत तिथे राहिलेले होते. ६० वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल! असा अनेक प्रकारे हा प्रवास खूपच विशेष ठरतोय! आजचा दिवस तर स्वप्नासारखाच म्हणावा लागेल. मला भेटलेल्या लोकांची आपुलकी सतत जाणवतेय. इथे येऊन प्रत्यक्ष ह्याचा अनुभव घेऊन बरं वाटलं. नाही तर गडचिरोली जिल्हा फक्त नक्षलवादासाठी प्रसिद्ध आहे. पण इथली परिस्थिती बघताना सत्य काय आहे ते कळतंय. गंमत म्हणजे इथली बोलीभाषा ही तेलुगुसारखीच आहे आणि मराठी नाहीय!


.

.

.
उद्याचा रेपणपल्लीचा रस्ता खूप तोडकामोडका आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की, तो सुरू आहे हे मला सांगितलं गेलंय. म्हणजे मला गूगल मॅप सांगत होतं तसं फिरून लांबच्या बाजूने जावं लागणार नाही. त्याही रस्त्याचा आनंद घेईन उद्या. एका बाजूला थोडं वाईटही वाटतंय की, आता मोहिमेतले सायकलिंगचे फक्त ५ दिवस शिल्लक आहेत! उद्याचा दिवसही खास असणार आहे!

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १५: सिरोंचा- रेपणपल्ली (६३ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

Group content visibility: 
Use group defaults