But first, coffee.....

Submitted by ज्येष्ठागौरी on 15 April, 2023 - 13:09

But first, coffee.....
परवा मॉलमध्ये चालताना स्टारबक्सच्या बाहेर तो एकेकाळचा ,मत्प्रिय वास आला, अगदी मन भरुन तो वास घेतला,त्या वासाबरोबरची चव जीभ विसरलीये, अगदी पूर्णपणे. पावलं जरा रेंगाळली, मागून चालत येणारी लेक म्हणाली आई कॉफी प्यावी असं वाटतंय का?नाही म्हणून हलकेच पुढे झाले .मी कॉफी प्यायची सोडून देऊन चोवीस वर्ष झाली, ती सोडण्याबद्दल कधीही पश्चाताप किंवा दुःख अजिबात झालं नाही कारण एका अतीव प्रिय व्यक्तीच्या अकाली जाण्यानंतर निषेध म्हणून(कोणाचा निश्चित सांगता नाही येणार) आजवर, एकवेळच्या ह्या मत्प्रिय चवीला मी जाणूनबुजून दूर केलं आहे.
पण एकेकाळी ह्या कॉफीनं किती धमाल केलीये आयुष्यात. ही कॉफी आयुष्यात आली ती शाळेतल्या साधारण सातवीच्या म्हणजे कुमार तरुण वयाच्या पायरीवर!मैत्री घट्ट पक्की होण्याच्या योग्य वयात.लहान असताना मी खूप चहा पीत असे. माझ्या अत्यंत गोऱ्या एका नातेवाईक बाईंनी सांगितलं होतं की चहा प्यायलं की काळं होतं, म्हणून दूध प्यायला लागून खूप वर्षं झाली होती आणि अचानक खजिना सापडावा तशी कॉफीची चव गवसली.त्याला कारण होती मैत्री!कोणाची तरी घट्ट,गाढ मैत्री कॉफीपर्यंत घेऊन गेली बोट धरुन, तिथपासून ते कॉफी सोडेपर्यंतचा प्रवास गंधवेल्हाळ आणि चववेल्हाळ होता. त्यावेळी एक मोगम्बोचा फॉरमुला(!) सापडला. मोठा मग, दोन चमचे साखर,एक चमचा नेसकॉफी ,अगदी पाव चमचा पाणी चमचा, गंधासारखा हलका रंग येईपर्यंत घोटून घोटून मग त्यात उकळते दूध घालायचं आणि ते फेसाळ चैतन्य पेय हळुहळू प्यायचं.पण हे खरंय घोटायची ही क्रिया मैत्रिणी असताना आणखी लांबायची, जास्तचं ,मैत्री जितकी गहिरी तितकी कॉफी हलक्या रंगाची आणि दुधाळ व्हायची! कॉफी जितकी जास्त घोटलेली, तितकी जास्त फेसाळ, !.ते बघून बापूंनी कपाची काच नक्की कॉफीत उतरेल म्हणून धातूच्या भांड्यात घोटायचं असा नियम केला.त्या भांड्यानाही भरपूर चरे आले.गणेश उत्सवात किंवा घरी साधी कॉफी पिण्यात मजा होती,नाही असं नाही! ती काहीशी पातळ , जायफळ वेलदोडा घातलेली कॉफी आवडायची पण नेसकॉफीला तोड नाही असंच वाटायचं...चक्र फिरत असते,मुलंही कॉफीप्रेमी निघाली .हीच घोटीव कॉफी दलगोना म्हणून कोरोनात त्यांनी समोर आणली आणि मुलांना Espresso वेळेवर नाही मिळाली तर त्यांना depresso व्हायला होतं असंही दिसलं!माझ्या कॉलेजच्या दिवसात मोजूनमापून पॉकेटमनी मिळे तेंव्हा महिन्याच्या सुरुवातीला कॉलेजशेजारच्या मुक्तामध्ये प्रत्येकी एक कॉफीची श्रीमंती किंवा दोन कॉफी तिघीत आणि शेवटी एक कॉफी दोघीत हेही वैभव उपभोगलं.त्यातून मैत्री घट्ट होत गेली,कोणाच्याही आर्थिक बौद्धिक, भाषिक स्तरापलीकडची मैत्री कॉफीनं जुळवली. अभ्यास करताना, गप्पा मारताना,रात्री जागताना, नाटकाच्या तालमीला कॉफीनं किती साथ दिली, नव्हे ती होती म्हणून ह्या गोष्टी शक्य झाल्या..तशी कॉफी प्रत्येकाला वेगळी आवडते, म्हणजे नेस आणि फिल्टर हा मुख्य भेद आहेच पण नेससुद्धा जास्त पाणी ,जास्त साखर, जास्त कॉफी किंवा पूर्ण काळी,अगदी कमी किंवा बिनसाखर, पूर्ण दुधाची, निम्मं दूध निम्मं पाणी, खंडीभर प्रकार पण आपल्या माणसांची आवडती कॉफी बरोबर बनते, हात त्या त्या पदार्थांवर नेमका जातोच जातो आणि एक सुंदर कॉफी अवतरते!बाकी सगळं नंतर पहिल्यांदा कॉफी!
But first,coffee हे बहुतेक कॉफी प्रेमी जनांचं slogan असेल! एकेकाळी पंचेंद्रियांनी रसरसून अनुभवलेल्या कॉफीपासून दूर असून हे तीन शब्द पूर्णपणे मनात तसेच पोहोचतात ,आनंद निर्माण करतात!
आत्ता ह्या कॉफीची इतकी प्रकर्षानं आठवण म्हणजे, नेसकॉफी गोल्डची एक सुंदर जाहिरात पाह्यली.ब्रिटिश अभिनेता फिलिप हिल पिअरसन हा एका पूर्ण भरलेल्या स्टेडियममध्ये येतो, सगळे उभे राहतात, काही लोक "कुटुंब"वगैरे फलक घेऊन उभे आहेत, तो सरळ भरलेल्या स्टेडियममध्ये जाऊन उभा राहतो आणि माईकवर म्हणतो ज्यांना माझं नाव ठाऊक नाही त्यांनी कृपया बसून घ्यावं,खूप मंडळी खाली बसतात, तो मंद हसतो आणि कृपया ज्यांना माझं घरचं लाडाचं नाव प्रिन्सेस आहे त्यांनी कृपया बसावं, आणखी मंडळी बसतात.. राहिलेल्या चेहऱ्यांवर ते नाव माहिती असल्याची मिश्किल भावना! परत तो म्हणतो,ज्यांनी माझ्या डोळ्यातलं पाणी बघितलं नाहीये त्यांनी खाली बसा कृपया , आता अगदीच कमी मंडळी उभी राहिलेली उरतात, त्यांच्या चेहऱ्यावर आपलेपणाचे आणि ते नातं बाळगल्याचे मऊसूत भाव आणि आता तो म्हणतो की sit down if somehow we have lost touch,आता सगळेच गोऱ्यामोऱ्या चेहऱ्याने बसतात,तो मिश्किल हसतो आणि म्हणतो we have a moment here, त्याची जिवलग मंडळी भराभर पायऱ्या उतरुन खाली येतात आणि ते सगळे कॉफी घेताना दाखवले आहेत आणि मागे शब्द ऐकू येत राहतात की आयुष्यात आपण जवळ जवळ ८०००० लोकांना भेटतो पण त्यातले फार मोजकेच म्हणजे बहुतेक हाताच्या किंवा फारतर हात आणि पायाच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक आपले सगे सोयरे असतात! एकदम सुंदर जाहिरात आहे, त्यात काम करणारी सर्व मंडळी एकदम तरतरीत आहेत अगदी तेजस्वी चेहऱ्यांची, भाव एकदम खरे.अगदी आपल्यासारखे! जाहिरात अगदी खोल मनाशी जोडली जाते कारण खरोखर असं मैत्र सुदैवानं लाभलं आहे,शाळेचे जे अनंत उपकार आहेत त्यातला ह्याचा नंबर खूप वरचा लागेल.कॉलेज आणि नाटकातून, ऑफिसातून अशी मैत्री लाभली जी कॉफी सुटल्यानंतरही टिकली. somehow we have lost the touch हे मात्र खरं नाही!हे मैत्र कॉफी प्यायला रुपालीत भेटतं, कोणाच्या वाढदिवसाला गाडीतून कॉफी घोटत जातं. मद्रासला गेलं तर तिथून कॉफी आणतंच आणतं.रात्रीला कॉफीला भेटायची टूम निघते.
माझी तमिळ मैत्रीण मात्र चहाबाज असते हे मुद्दाम सांगते पण तिला authenticकॉफीची कृती विचारताना आपण थकत नाही.आपण कॉफी घेणार नसलो तरी कॉफी घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव फार आनंद देणारे असतात हे अगदी मनापासून जाणवतंय..
नुकतंच लेकीनं एक पुस्तक वाचलं आणि त्याचा गोषवारा सांगितला, पुस्तकाचं नाव आहे before the cofee gets cold, ह्या पुस्तकात एका कॅफेचं वर्णन आहे तिथे तुम्ही कॉफी घेत असताना तुम्हाला भूतकाळात जाता येतं. तुमच्या काही चुका दुरुस्त करता येतात किंवा जे भूतकाळात जमा झालेत अशा काही लोकांना भेटता येतं पण ते किती वेळ तर before the coffee gets cold! कॉफी थंड होईपर्यंतच! अटी आणि नियम लागू**
भलतंच आहे हे प्रकरण असं वाटलं, क्षणभर थरारलं आणि जर खरंच उलटं फिरलं चक्र, तर आपलं गंतव्य काय असेल हे बघणं फार विस्मयकारक असणार आहे असंही वाटलं. मोजण्यासारख्या(मला वाटणाऱ्या) चुका दुरुस्त करायच्या तर आहेत पण ज्या काही बदलाव्या किंवा बदलल्या तर आपल्या आयुष्यात फरक पडला असता असं मनापासून वाटणाऱ्या अगदी हात पायाच्या बोटांएवढ्याच नक्की आहेत पण कॉफी गार व्हायच्या आत त्यातली एक शोधून ती दुरुस्त करायची तर खरंतर आधीच तयारी करावी लागेल.मग ती उजळणी करावी लागेल आणि चढत्या क्रमाने लावून करुन प्राधान्य ठरवून मगच या कॅफेमध्ये जायला लागणार हे निश्चित.ह्या कॅफेत आणखी एक सोय आहे की तुम्ही एखाद्या, ह्या दुनियेतून बाहेर गेलेल्या व्यक्तीला भेटू शकता, नियम परत तोच, before the coffee gets cold! वेळ तेवढाच!आता मात्र परीक्षेचा क्षण.अशी माणसं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी नक्कीच आहेत.माझे आजोबा मी पाच वर्षांची असताना गेले ,अतिशय सार्थ जीवन.ते फार अंधुक पण तरीही स्मरणात आहेत,शेवटच्या आजारात हॉस्पिटलमध्ये माझी आठवण काढत होते म्हणे, हाका मारायचे मला.. ते एक भन्नाट व्यक्तिमत्व होते आणि भावंडाना त्यांच्या ज्या अफलातून आठवणी आहेत, त्या आजोबांना मी अनुभवलंच नाहीये! आजोबा आजीचं सुख कमी मिळालंय, एका आजीवर तहान भागवलीये.भेटून त्यांना मिठी मारावी का! ब्रिटिश आर्मीमध्ये डॉक्टर असलेल्या
आजोबांचे इतके अतरंगी किस्से ऐकले आहेत की खरंच त्यांना भेटून मला त्यांना सांगायचं आहे की माझ्या स्मृतीत तुम्ही अंधुक असलात तरी सगळ्यांनी तुमच्याबद्दल इतकं सांगितलंय की मनात अगदी तसेच सजीव स्पष्ट आहात, पण मी त्यांच्या स्मृतीत तशीच असेन का, मला माझी ओळख करुन घ्यावी लागेल का? आता इतकी वर्षं लोटली आहेत तर ओळखतील का आता ते मला!मला भेटून त्यांना तोच आनंद होईल का!
नवऱ्याची आई आमच्या लग्नाआधी गेली होती पण मी भेटले आहे त्यांना,आम्ही लग्न करणार आहोत हे त्यांना ठाऊक होतं,त्यांना भेटले तर अगदी मनापासून सांगणार आहे की सगळा संसार मी सासूशिवाय केला ह्याचा मुळीच आनंद नाहीये, तुम्ही असतात तर माझ्या धडपडीला, चाचपडण्याला मर्यादा आल्या असत्या.त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल का?
आई ,बापू ,दोन्ही वडील बंधू जे वयाची वडीलकी न गाठता गेले,ह्यांना भेटायला फार फार आवडेल पण कॉफी थंड होण्याच्या आत संभाषण संपेल का, मला त्यांना जे सांगायचंय ते इतकं लहान असेल का!की फक्त दर्शनात ह्या हृदयीचं त्या हृदयी पोचेल?म्हणजे ज्यांचा सहवास अत्यल्प मिळाला त्यांना काही क्षण का होईना भेटायला आवडेल की ज्यांचा भरपूर सहवास मिळूनसुद्धा मन भरलं नाही त्यांना भेटायला आवडेल.सांगणं मुश्किल आहे.काही चुका त्या त्या परिस्थितीमुळे झाल्या, आपण तसं होतोच असं नाही मग आता ती चूक दुरुस्त करता येईल का? कोणाची माफी मागावी असं मुद्दाम तर वागलं नाहीयोत आपण, पण कोणाचं मन जाणता अजाणता दुखवलं असेल तर ते मागे जाऊन माफी मागूनही दुरुस्त करता येईल का? सांगणं अशक्य आहे. मग ह्या कॅफेत जायचं की ज्या व्यक्तींना भेटावं असं वाटतंय त्यांच्या चांगल्या आठवणी हातात वेचून, चुकलेल्या गोष्टींची प्रामाणिक जाणीव ठेवून पुढे चालता येईल का याचा विचार करायचा!
बिग बँग थिअरी ह्या मालिकेत चार शास्त्रज्ञ मित्र एक भलं थोरलं,अवजड,अगडबंब टाईम मशीन घरी आणतात आणि मग ते पुढे फिरवायचं की मागे अशी त्यांची कोंडी होते..आपलीही होणार!
भूतकाळ आठवणींचा, भविष्यकाळ स्वप्नांचा , कल्पनांचा आणि वर्तमानकाळ भानाचा! भानावर असण्याचा.मग भान सांभाळावं की मागे जावं का पुढं धावावं, सगळं अवघड! आपले चुकलेले निर्णय दुरुस्त करता येणार असले तर त्याचा वर्तमानावर काय परिणाम होणार हे सगळं बघणं फार गंमतशीर असेल का! की काही गोष्टींची कल्पना करुन त्या तशा घडल्या नाहीत तर निराशा येईल का! का"जो प्राप्त हैं वही पर्याप्त हैं"म्हणणं खरं आहे.कोणास ठाऊक पण before the coffee gets cold मुळे मनांत भरपूर तरंग उठले हे खरं.if you never go ,you will never know..त्याप्रमाणे एक सफर करुन आले एका अशा ठिकाणची ज्याची फक्त कल्पना येऊ शकते.एकाच आयुष्यात सगळं करु शकणार नाहीयोत हे पक्कं माहितीये त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अट्टाहास नाहीये.पण येणाऱ्या अनुभवांना सामोरं जास्त खुलेपणाने जाता येतंय..बाबूमोशाय लंबी नहीं बडी़ होनी चाहिए म्हणणारा आनंद काय सांगतोय ते कळतं आहे..जास्त चांगल्या पद्धतीनं, डोळसपणे आयुष्याकडे बघता येईल का असंही वाटलं. हे कॉफी थंड व्हायच्या आधी कळलं तर फार उत्तम.सगळं कळेल आणि वळेल असं नाही पण गतकाळातल्या काही चुका पुन्हा होणार नाहीत ह्याची काळजी घेता येईल का.की आपलं सगळं आयुष्य कुठंतरी कोणीतरी आखलं आहे आपण फक्त चालायचं आहे..जो मिल गया उसी को मुक्कदर समझ लिया असं म्हणून पुढं चालायचं आहे..असेल काही तरी..
कॉफी माझ्या दृष्टीनं माझ्या भूतकाळाच्या आठवणींचा खजिना असला तरी ह्या पुस्तकातल्या गार होणाऱ्या कॉफीनी त्याला भवतालात, भानावर आणलंय.. त्यामुळे कॉफी, थंड होण्याआधी खूप काय काय करायचंय. पण पहिल्यांदा तिचा आस्वाद घ्यायला हवा!
But first, coffee...
©ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
मी सुद्धा कॉफीप्रेमी.
शाळेत असताना १-२ वेळा चहा प्यायले, तो मुळीच आवडला नाही. त्यानंतर चहाकडे कधी ढुंकूनही पाहिलं नाही.
मद्रास कॉफी (जायफळ-वेलदोडा घातलेली, उकळी कॉफी - त्याला मी लग्नी कॉफी म्हणते Lol ), नेस्कॉफी, डेविडॉफ - असा चढत्या क्रमाने प्रवास झालाय माझा.
तसंच,
कपभर दूध, कमी पाणी, मॉडरेट स्ट्रॉन्ग गोड कॉफी - मग अर्धं दूध, अर्धं पाणी, मॉडरेट स्ट्रॉन्ग गोड कॉफी - जास्त पाणी, १-२ चमचे दूध, थोडीशी साखर, जवळपास काळी कॉफी - हा पण प्रवास झालाय.
आता जास्त दुधाची, गोड कॉफी मी अजिबात पिऊ शकत नाही.

डेविडॉफ फार महाग असते, त्यामुळे एक बाटली आणून ठेवते आणि पुरवून, पुरवून वापरते Proud

दोन-एक वर्षांपूर्वी घरी मोका पॉट आलं. त्यानंतर काही स्पेशालिटी ब्लेन्ड्स ट्राय केले. काय कमाल कॉफी लागते ती!
त्यानंतर असं झालंय की आता नेस्कॅफे आवडेनाशी झालीय. Lol

Before The Coffee Gets Cold पुस्तक परिचय : https://www.maayboli.com/node/80959

मी पण पहिले नेस्काफे. तेव्हा ह्याम्ची एक जाहिरात यायची. पाँडिचेरीचा बीच तिथे एक कॉटेज तिथे बसून कॉफी. हे अजुनही स्वप्न आहे.
आता ब्रू . ऑफिसात एस्प्रेसो. सीसीडी मशीन वाली. पण आवडती म्हणजे थंबी मधली फिलटर कापी. स्टील ग्लास मधली. कधी मधीच.

अतिशय सुरेख लिहिलं आहे कॉफी च्या वासासारखंच दरवळणारं.. मीही सर्व प्रकारच्या कॉफया प्यायल्या आहेत .. म्हणजे पांचट ते स्ट्रॉंग , बिन दुधाची पासून
ते दूध १ min मायक्रो ला लाऊन जस्ट सकाळच्या गडबडीत उदरभरणं म्हणून ते अगदी निगुतीने आणि तल्लीन होऊन साखर , कॉफी पूड खरंगटून , रगडून भरमसाठ फेस आणून ... वगैरे वगैरे मात्र कॉफी फॅन नव्हते अजूनही नाही .. मिळाली प्यायला तर वाहवा . नाही तर नाही ..
आज तुमच्या लेखाने सगळ्या कॉफया जागृत झाल्या Proud

छान लिहिलं आहे.

इथे बंगलोरला मायबोली गटग केलं तर (माझ्या मते इथली बेस्ट) आशा फूड कँपची फिल्टर कॉफी माझ्याकडून सगळ्या कॉफीप्रेमींना देण्यात येईल Wink

Pages