मनाला रिझवणाऱ्या गोष्टींमध्ये संगीताचे स्थान फार वरचे आहे. व्यक्तीगणिक संगीताची आवड वेगवेगळी असते, परंतु कुठलेच संगीत न आवडणारा माणूस मात्र विरळाच. वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक प्रकारे आपण संगीत ऐकत असतो - मग ती विविध संगीतप्रसारक श्रवणमाध्यमे असतील किंवा प्रत्यक्ष संगीताची मैफिल. कधी आपण शुद्ध वाद्यसंगीत ऐकतो तर बऱ्याचदा गीत आणि संगीताचा सुरेख संयोगही ऐकतो. यांच्या जोडीला अजून एक संगीताचा प्रकार आपल्या कानावर वारंवार पडतो आणि तो म्हणजे संगीतमय जाहिराती. तर अशा अनेक प्रकारचे संगीत ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे होतो.
दर काही वर्षांनी आपण नवी गाणी ऐकतो आणि त्याचबरोबर जुनी गाणी देखील पुन्हा पुन्हा ऐकली जातातच. अशा आपल्या श्रवणभक्तीतून काही ठराविक गाण्यांवर आपले अवीट प्रेम जडते. ध्यानीमनी नसताना जेव्हा असे एखादे गाणे आपल्याला कुठल्याही प्रसारमाध्यमातून अचानक ऐकू येते तेव्हा होणारा आनंद वर्णनातीत असतो. मग आपण ते गाणे तन्मयतेने ऐकतो. ते गाणे संपते परंतु आपल्या मनात बसलेली त्याची धून मात्र चांगल्यापैकी तेवत असते. मग आपण ती धून किंवा गाण्याचे शब्द देखील गुणगुणत राहतो. हा अनुभव बऱ्यापैकी सार्वत्रिक आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत अशी संगीताची धून डोक्यात राहण्याचा परिणाम सकारात्मक असतो. त्यातून आपल्याला दैनंदिन कामे करताना एक प्रकारचा उत्साह वाटतो किंवा आपल्यात जोश देखील संचारतो. त्या जोशात आपण कधीकधी आपल्या आसपासच्या व्यक्तींना देखील त्या गाण्याच्या लयीत सामावून घ्यायला बघतो. साधारणपणे आवडत्या गाण्याबाबतचा असा अनुभव ते गाणे संपल्यानंतर काही तास टिकतो. परंतु काहींच्या बाबतीत तो अक्षरशः दिवसभर देखील राहतो. बहुतेकदा अशी गाणी स्वरमधुर आणि/ किंवा तालबद्ध असतात.
इथपर्यंत जे लिहिलंय त्याच्याशी आपल्यातील बहुतेक जण सहमत होतील. कदाचित काही जण आपापल्या आवडत्या गाण्याची एखादी धून देखील मनात गुणगुणू लागतील. पण त्याचबरोबर वाचकांच्या मनात असा प्रश्नही आला असेल, की या सर्वसामान्य सुखद भावनेची आठवण करून देण्यात लेखकाचा काय हेतू असावा ?
सांगतो...
आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट आपण जमेल तितकी वारंवार करतो त्याचप्रमाणे आवडणाऱ्या संगीताची धूनही वारंवार मनात गुणगुणली जाते. परंतु ही वारंवारिता सुखद राहण्याला एक मर्यादा असते. ती जर का ओलांडून एकच एक कृती नको इतक्या वेळा (कळत/नकळत) होत राहिली तर तो प्रकार त्रासदायक ठरु शकतो.
मग एक वेळ अशी येते, की संबंधित माणूस ते गाणे गुणगुणत नसला तरीही त्या संगीताची धून त्याच्या नकळत त्याच्यावर गारुड करते आणि मनाला सतत छळत राहते. आता ही सुखद गुणगुण राहिलेली नसून ती नको असलेली भुणभुण ठरते. अशा स्थितीला सामान्य भाषेत कानभुंगा (earworm) म्हणतात तर मानसशास्त्राच्या परिभाषेत त्याला ‘डोक्यात रुतून बसलेले संगीत’(stuck song syndrome) असे गोंडस नाव आहे.
व्यावसायिक संगीतकारांच्या बाबतीत हा प्रकार सामान्य माणसापेक्षाही अधिक प्रमाणात होतो. साधारणतः सामान्य माणूस जास्त करून गाण्याचे ध्रुवपदच आळवत बसतो. परंतु संगीतकाराच्या मनात गाण्याच्या अनेक ओळी बिनचूक वारंवार गुणगुणल्या जातात. अर्थात त्यांच्या बाबतीत असे होणे हे कला-नवनिर्मितीसाठी उपयुक्तच ठरते; ते त्रास वाटण्याच्या पातळीवर सहसा जात नाही.
आता आपण सामान्य माणसाच्या बाबतीत होणाऱ्या कानभुंगा या अवस्थेची काही वैशिष्ट्ये पाहू :
१. या अवस्थेचे प्रमाण हे त्या व्यक्तीच्या संगीत ऐकण्याच्या प्रमाणाशी थेट निगडित आहे. जे लोक दिवसातील अनेक तास मन लावून संगीत ऐकतात आणि त्याचे अर्थपूर्ण आकलन करून घेतात, त्यांच्या बाबतीत ही घटना अधिक प्रमाणात दिसते.
२. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एखादे गाणे ऐकून संपल्यावर लगेचच ही अवस्था येत नाही परंतु त्यानंतर काही तासांनी ती उद्भवते.
३. काही गाणी ही माणसाच्या आयुष्यातील काही ठराविक घटनांशी निगडित झालेली असतात.
उदाहरणार्थ,
“मी परीक्षेला निघालो होतो तेव्हा घरून निघताना माझी १५ नंबरची बस चुकली होती आणि त्याच वेळेस बसथांब्या शेजारच्या घरातील रेडिओवरून ‘ते’ गाणे लागलेले होते”, इ.
काही गाणी ही आनंद किंवा वेदनेच्या प्रसंगाशी देखील निगडित असू शकतात. त्यातून अशा गाण्यांची मेंदूमध्ये एक घटनाधारित स्मृती कोरली जाते. पुढील आयुष्यात जेव्हा केव्हा ते गाणे अकस्मात ऐकू येते तेव्हा ते गाणे आणि पूर्वायुष्यातील संबंधित घटना यांची सांगडही सतत घातली जाते. मग ते गाणे आणि त्या घटनेची स्मृती असा 'मिश्रभुंगा' मनाला सतावू शकतो.
४. कानभुंगा जेव्हा काही तास किंवा फार तर त्या दिवसापुरता मर्यादित राहतो तोपर्यंत काळजीचे कारण नसते. परंतु काहींच्या बाबतीत हा भुंगा पुढे विस्तारत अगदी आठवड्यापर्यंत टिकतो. त्याची वारंवारिता जर फारच वाढली तर मग मूळ गाण्याचा अर्थ किंवा त्यातील स्वरमाधुर्य देखील हरवून गेलेले असते; जाणवते ती फक्त त्रस्तता.
५. अशा वेळेस मात्र संबंधिताच्या दैनंदिन घरगुती आणि व्यावसायिक कामावर देखील परिणाम व्हायला लागतो. तसेच झोप लागण्यातही या भुंग्याचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
६. कानभुंग्याने त्रस्त असलेल्या व्यक्तींचा मानसशास्त्रीय अभ्यासही झालेला आहे. साधारणतः अशी माणसे झपाटल्यासारखी वागत असतात. त्यांच्या मनात बऱ्याचदा विचारांचे असंतुलन होते. एखाद्या घटनेनंतर त्यातला त्रासदायक भाग मनात घोळवत बसण्याकडे त्यांचा कल असतो. बऱ्याचदा अशी माणसे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा व्यावसायिक कामांमध्ये कुठेतरी कमी पडत असतात आणि ही जाणीव त्यांना अस्वस्थ करत असते. सहसा अशी माणसे मानसिकदृष्ट्या ताठर प्रवृत्तीची असतात.
७. काही मनोविकारांमध्ये कानभुंग्याची समस्या तीव्रतेने जाणवते. असा एक परिचित विकार म्हणजे कृतीचे झपाटलेपण अर्थात OCD. अशा व्यक्तींच्या बाबतीत ताणतणावाच्या प्रसंगी कानभुंगा अधिक सतावतो. या मुद्दयावरील विवेचन या लेखाच्या कक्षेबाहेरचे आहे.
कानभुंगा घालवण्याचे उपाय
जेव्हा एखादे गाणे कानसुखाची मर्यादा ओलांडून भुंग्यासारखे मागे लागते तेव्हा सामान्य माणसासाठी काही साधे सोपे उपाय करून बघता येतात :
१. एकाच प्रकारचे संगीत दीर्घकाळ न ऐकणे; संगीतप्रेमी व्यक्तींनी त्यात सतत विविधता आणत राहायची. एखाद्या ॲपवरून जर ठराविक गाणी रोज ऐकण्याची सवय असेल, तर त्यात गाणी ‘पिसण्याचा’ जो पर्याय दिलेला असतो तो जरूर वापरायचा.
२. एका बैठकीत गाणी ऐकायला अगदी शिस्तीत वेळमर्यादा घालून घ्यायची.
३. कानभुंगा सतावू लागला की सरळ उठून ‘चालायला’ लागायचे. आपल्या आवडत्या गाण्याची एक विशिष्ट तालगती असते. त्या गतीपेक्षा एकतर खूप हळू किंवा खूप भरभर चालू लागायचे.
४. गाण्याचे फक्त ध्रुपद आळवत बसण्यापेक्षा एकदाच संपूर्ण गाणे शांतपणे आणि समजून ऐकायचे. साधारणपणे ध्रुपद किंवा गाण्याचे ‘तुकडे’ ऐकण्याची स्मृती मेंदूत खूप लवकर उमटते. त्या तुलनेत संपूर्ण गाणे लक्षात ठेवणे ही अवघड क्रिया आहे.
५. हातातले काम बाजूला ठेवून कुठले तरी पूर्णपणे वेगळे काम, वाचन किंवा अन्य छंदाकडे वळायचे. घरगुती पातळीवर, मटार सोलणे किंवा बारीक पानांची पालेभाजी निवडणे या कृती सुद्धा खूप उपयुक्त ठरतात.
६. च्युइंगम चघळत बसणे. आपण ती चघळण्याची किंवा चावण्याची क्रिया मन लावून करू लागलो की मग गाण्याच्या स्मृतीपटलाला बऱ्यापैकी धक्का लागतो.
. . .
आता जरा व्यक्तिगत लिहितो. लहानपणापासून अनेक वर्षे ऐकलेली काही गाणी आणि संगीतमय जाहिराती माझ्या कानात बसलेल्या आहेत. अर्थातच त्या कानसुख आणि गानसुख या पातळीवरच आहेत ! शालेय जीवनात रेडिओ हे मुख्य करमणुकीचे साधन होते. विविध भारतीवरील अनेक जाहिराती सुद्धा आयुष्याचा भाग बनून गेल्यात. सकाळी अंघोळ करण्याच्या वेळेस साडेआठच्या दरम्यान लागणारी ‘निरमा वॉशिंग पावडर’ची जाहिरात हे त्यातले ठळक उदाहरण.
दर 24 तासांनी त्या जाहिरातीची मनातल्या मनात उजळणी होई. त्यातली,
“जया और सुषमा,
सबकी पसंद है निरमा”,
ही ओळ ऐकून ऐकून मनातल्या मनात एकेक जया आणि सुषमा देखील कल्पिल्या गेल्यात.
भले मी निरमाचा ग्राहक नसेना का, परंतु त्या जाहिरातगीताची गानस्मृती मात्र अगदी डोक्यात चिकटून गेली अन आयुष्याचा एक कायमचा भाग बनून गेली.
एकदा शाळेत जायला उशीर झाला होता आणि शाळेजवळ पोहोचलो तेव्हा ध्वनीवर्धकावर
“हे ये जो मोहब्बत है
ये उनका है काम..”
हे कटीपतंगमधले प्रसिद्ध गाणे लागलेले होते. ते ऐकत ऐकत पावले झपझप पडत होती. शाळेत उशीर झाल्याबद्दल दारातच गुरुजींच्या छड्या खाव्या लागणार आहेत याची कल्पना होतीच आणि तसेच झाले. आजही हे गाणे जेव्हा अचानक ऐकू येते तेव्हा मनाने मी शाळेत गेलेलो असतो आणि छडीच्या वेदनेसह तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. आता इतकी वर्षे सरल्यानंतर त्याच्याकडे स्मरणरंजनातून पाहता येते.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास अनेक ठिकाणांहून ‘रिमझिम गिरे सावन’ हे गीत ऐकू येऊ लागते. आपल्या संस्थळावरील या गाण्यासंबंधीचे धागे देखील टपकन वर येतात आणि मग मनच अगदी रिमझिम होऊन जाते. जाता येता ते गाणे कुठे बाहेर ऐकले रे ऐकले की काही वेळाने बोटे आपोआप युट्युबकडे वळतात. मग किशोर आणि लता अशा दोघांच्या आवाजातील ती स्वतंत्र गाणी लागोपाठ ऐकल्यावरच तृप्तीने निथळतो.
पावसाळ्यातच येणाऱ्या गणेशोत्सवात विविध भक्तीगीते मोठ्या आवाजात दिवस-रात्र कानावर पडत राहतात आणि मग त्यांचीही एक सुखदस्मृती मनावर कोरली जाते. यामध्ये वाडकरांचे ओंकार स्वरूपा आहे, गानकोकिळेच्या स्वरातील विविध गणेशवंदना आहेत आणि आशाताईंचे रामा रघुनंदना सुद्धा आहे. त्या संपूर्ण महिनाभर या गाण्यांच्या धून व मोजके शब्द डोक्यात जवळजवळ दिवसभर झनकत राहतात. ही काहीशी गानव्यसनाचीच अवस्था असते. अशा काही गाण्यांच्या विविध प्रसंगांशी जडलेल्या स्मृती नक्कीच आनंददायी आहेत.
मात्र आयुष्यातील काही मोजक्या वेळा मी कानभुंग्याची अवस्था अनुभवली आहे- विशेषतः परदेशात एकटे राहत असताना. त्या वास्तव्यात घरी असताना संगीताला सोबती करून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर वाद्यसंगीत ऐकता ऐकताच झोपी जाण्याची सवय जडली होती. तेव्हा कधीकधी एखाद्या धुनेने डोक्यात अगदी थैमान घातलेले असायचे आणि मग त्या रात्री झोप लागायला बऱ्यापैकी त्रास व्हायचा. अर्थात हे त्या रात्रीपुरतेच टिकायचे. पुढे त्याची कधी समस्या झाली नाही.
. . .
मित्रहो,
तुमच्यापैकी बरेच जण कानसेन असतील तर काहीजण तानसेन सुद्धा असू शकतील. तुमच्या आवडत्या गाण्यांबद्दल काय अनुभव आहेत तुमचे ? त्यांच्याशी निगडित काही व्यक्तिगत आठवणी नक्कीच असतील. आवडत्या गाण्यांचे कानसुख घेता घेता तुम्ही कधी कानभुंग्याने सतावला गेला होतात का?
प्रतिसादांमधून जरूर लिहा. वाचण्यास, नव्हे ऐकण्यास उत्सुक !
****************************************************
एकदम झपाटलयासारखा वाचला लेख !
एकदम झपाटलयासारखा वाचला लेख ! मला दोन तीनदा हा अनुभव आलाय, आणि जरा घाबरल्यासारखं झालं कारण झोपल्यावरही- सुषुप्तावस्थेत कानात काहीतरी resonance जाणवत राहिला.. नुकतंच मी नीळकंठ मास्तर ह्या चित्रपटातलं "अधीर मन झाले'हे श्रेया घोषालच्या आवाजातील गाणं संध्याकाळी दोन तीनदा ऐकलं आणि मग त्या गाण्याचे सूर डोक्यात इतके घोळले की बस! अजय अतुल च्या काही गाण्यांनी असं झालंय तसंच रेहमानच्या गाण्यांनी झालंय.. जय हो ह्या गाण्यानं झालंय!फार छान वाटलं लेख वाचून!
Otolaryngology शी निगडित आहे
Otolaryngology शी निगडित आहे की psychology शी ते कळले नाही, पण प्रकार एकंदरीत रोचक आहे. अर्थात ringing in the ears (Tinnitus) पेक्षा कमी त्रासदायक प्रकरण वाटतेय एकंदरीत.
हे असं होतं हे मागच्या
हे असं होतं हे मागच्या महिन्यातच अनुभवलं. पहिल्यांदाच. आणि डॉ कुमारांकडुन लगेच शास्त्रीय माहिती आणि कारणमिमांसा मिळाली. डॉक्टर, धन्यवाद.
सकाळी अलार्म होण्याअगोदर उठले आणि चेहरा धुवत होते. चेहऱ्याला लावलेल्या facewash मुळे अलार्म बंद करायला वेळ झाला आणि ती irritating tune डोक्यात वाजत राहिली. सतत आणि काही वेळा तर फोन खरंच वाजतो आहे वाटण्या इतपत स्पष्ट. फारच त्रासदायक एक तास होता. स्वतःच्या mental health ची काळजी वाटण्याइतपत अस्वस्थ झाले होते. मग जिम मधे ट्रेड मीलवर पळताना फ्रेडी मर्क्युरीने 'radio gaga ' ने कान / मन स्वच्छ केले. पण तो त्रासदायक अनुभव परत कधीही नको आहे.
वा! खूपच छान आणि माहितीपूर्ण
वा! खूपच छान आणि माहितीपूर्ण लेख. कानभुंगा हा शब्द आवडला.
डोक्यात गाणी घुमत राहणे हे खूप सवयीचे झाले आहे. पण कानभुंगा अवस्था क्वचित कधीतरी अनुभवली आहे असं आठवतंय.
वरती ज्येष्ठागौरी यांनी उल्लेखलेलं 'अधीर मन झाले' खरंच डोक्यात घुमण्यासारखंच गाणं आहे. आजवर अनेकदा ते घुमलं आहे. आज तर ते गाणं न ऐकता केवळ त्याचा उल्लेख वाचून डोक्यात घुमायला लागलं आहे. अशी अनेकदा अनेक गाणी काही कारण नसताना डोक्यात घुमतात असा अनुभव आहे. त्यासाठी आवडच पाहिजे असं नाही. कधीकधी न आवडलेली गाणी पण घुमतात. मागे एकदा गाणं नाही, पण मनाचे श्लोक ऐकले होते त्यातले एक-दोनच श्लोक दिवसभर आवर्तनी (लूपमध्ये) चालू राहिले डोक्यात. कधी कधी एखादं विडंबन सुचतं आणि डोक्यात मूळ गाण्याऐवजी तेच चालू राहतं (अनेकदा बधीर मन झाले असं ऐकून ऐकून माझा अंतःकर्ण बधीर व्हायची पाळी आली होती). पण कानभुंगा ही अवस्था न आलेलीच बरी.
एक छो सू >>
४. गाण्याचे फक्त ध्रुपद आळवत बसण्यापेक्षा >>>> इथे ध्रुपद ऐवजी ध्रुवपद पाहिजे. ध्रुपद हा (सध्या लोप होत चाललेला) एक गीतप्रकार आहे.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
१. सुषुप्तावस्थेत कानात काहीतरी resonance जाणवत राहिला. >>>
छान अनुभव. सुषुप्तावस्था हा शब्द खूप आवडला.
2. Otolaryngology शी निगडित
2. Otolaryngology शी निगडित आहे की psychology शी >>>
कानातील चेतातंतू, मेंदूचा कानशिलावरील भाग व काही भावनाकेंद्रे आणि एकंदरीत मनोवस्था या सर्वांच्या सहभागातून कानभुंगा निर्माण होतो. मेंदूच्या वरील सर्व भागांमधून ओळीने संदेशवहन होऊन त्याची निर्मिती होते.
Tinnitus ची कारणमीमांसा वेगळी आहे. अधिकतर तो कानातील चेतातंतूच्या बिघाडाशी निगडित असतो.
३. ट्रेड मीलवर पळताना फ्रेडी
३. ट्रेड मीलवर पळताना फ्रेडी मर्क्युरीने 'radio gaga ' ने कान / मन स्वच्छ केले.
>>>
छान ! ही अशी काहीतरी आधुनिक माहिती तुमच्याकडून मिळत राहते
४. काही कारण नसताना डोक्यात
४.
काही कारण नसताना डोक्यात घुमतात असा अनुभव आहे. त्यासाठी आवडच पाहिजे असं नाही.
>>> + ११. हे मी पण अनुभवलंय
. ..
इथे ध्रुपद ऐवजी ध्रुवपद पाहिजे. >>
संगीतशास्त्रानुसार त्यात फरक आहे ते मान्य आहे. पण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून दोन्ही शब्द समानार्थी वापरलेले चालतात. हे पहा :
ध्रुपद
न. १ (संगीत) संगीतांतील चिजेचा एक प्रकार. अस्ताई, अंत्रा व आभोग असें यांत तीन भाग असतात. ध्रुवपद अर्थ ३, ४ पहा. २ (गाण्याचें, पदाचें) पालुपद, अकडकडवें.
https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81...
पूर्वी मी याची खात्री करून घेतली होती व कुठल्यातरी धाग्यावर चर्चा पण झालेली आहे. म्हणून मी या लेखात सुरुवातीला ध्रुवपद असे लिहिले आणि नंतर पुढे पुन्हा लिहिताना त्यातील एक अक्षर खाऊन टाकले
अच्छा! या अर्थाने कधी ध्रुपद
अच्छा! या अर्थाने कधी ध्रुपद ऐकले नव्हते [मला व्यक्तिशः पालुपद हा अर्थ पटला नाही. कारण ध्रुपद म्हणजे केवळ पालुपद नसून स्थायी (फारसी - उर्दू उच्चार अस्थाई), अंतरा, संचारी आणि अभोगी असे चार भाग त्यात येतात]. पण ध्रुपद हा शब्द ध्रुवपदावरूनच आलेला आहे, त्यामुळे अ=ब तर ब=अ का नाही, याकरिता हे पटू शकेल. माहितीकरिता आभार.
रोचक लेख
रोचक लेख
कानभुंगा हा प्रकार कधी अनुभवला नाही.
मिश्रभुंगा प्रकार अनुभवला आहे. दोन गाणी आहेत जी ऐकताना मला त्या त्या वेळी ज्या मुलींच्या प्रेनात होतो त्या आठवतात. ते गाणे जोडले गेले आहे त्या प्रेमाच्या आठवणींशी.
मला अजून एक अनुभव आहे, हे सर्वांशी होते का माहीत नाही. रात्रीच्या शांततेत पडून राहिले आणि एखादे आवडते गाणे आठवले की ते मला दूरहून ऐकू येते. म्हणजे दूरवर कोणाच्या घरी ते लावले आहे असे वाटते. आता ते माझ्याच मनाचे खेळ म्हणावे तर मला त्या गाण्याचे बोल पाठ नसले तरी त्यातले शब्द कर्रेक्ट ऐकू येतात हे ईण्टरेस्टींग वाटते. असे वाटते की जगाच्या पाठीवर कुठेतरी आता हे गाणे चालू असेल आणि मला ते माझ्या ईच्छाशक्तीने घरबसल्या ऐकू येतेय. पण ते ऐकायचे की थांबवायचे हा कंट्रोल माझ्याकडे असतो.
कानभुंगा व्यक्ती सापेक्ष असू
कानभुंगा व्यक्ती सापेक्ष असू शकतो.
रसवंतीच्या चक्राला बांधलेला घुंगराचा आवाज, पिठाच्या चक्कीचा आवाज या व्यवसायिक मंडळींना त्रासदायक नसतो पण इतरांना त्याचा त्रास होतो.
ते लोक स्थितप्रज्ञता प्राप्त झाल्यासारखे वागतात.
माझ्या बाबतीत हे भरती ओहोटी सारखं असतं जसं नकळत येतं तसंच नकळत जातं.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
रोचक प्रतिसाद आहेत.
* दोन गाणी आहेत जी ऐकताना मला त्या त्या वेळी ज्या मुलींच्या प्रेनात होतो त्या आठवतात >>
अरे वा, हे वाचून तुमचा हेवा वाटला !
..
* कानभुंगा व्यक्ती सापेक्ष असू शकतो >>>
चांगला मुद्दा आहे.
रोचक लेख...
रोचक लेख...
एकदा थोड्या वेळासाठी कानभुंगा अनुभवला आहे. नवरा सकाळी खोलीत हार्मोनियम वर रियाज करत होता आणि मी स्वयंपाकघरात पोळ्या करताना ऐकत होते. नंतर तो त्याचं आटोपून निघून गेला, तरी माझ्या कानात ते सूर इतके भरून राहिले होते की, २-३ वेळा खोलीत जाऊन खरंच काहीच वाजत नाही ना, याची खात्री करून घेतली. सारखा का भास होतोय म्हणून भीती वाटायला लागली. शेवटी दुपारी झोप काढली थोडी तेव्हा सगळं शांत झालं.
छान माहितीपूर्ण लेख..
छान माहितीपूर्ण लेख.. नेहमीप्रमाणेच
धन्यवाद !
धन्यवाद !
..
* सारखा का भास होतोय म्हणून भीती वाटायला लागली. >>
हा अनुभव थरारकच म्हटला पाहिजे.
माझ्या माहितीतील एक जण एका प्रसिद्ध वाद्यवृंदात ड्रमर आहेत.
त्यांना बऱ्याचदा रात्रीच्या वेळेस स्वतः च्या डोक्यात कोणीतरी बारीक घण मारते आहे अशी भावना होत असते.
फार छान लेख ! कानभुंगा हा
फार छान लेख ! कानभुंगा हा शब्द आवडला.
फार छान लेख ! कानभुंगा हा
हे अवांतर होईल पण वरती Tinnitusचा उल्लेख झालाय म्हणून विचारतो.
Tinnitus आणि व्हर्टिगो यात काय फरक आहे?
Tinnitus आणि व्हर्टिगो यातला
Tinnitus आणि व्हर्टिगो यातला फरक >>>
1. Tinnitus मध्ये संबंधित माणसाला कानाच्या आतमध्ये आणि डोक्यात विचित्र आवाज ऐकू येतात. जेव्हा ते ऐकू येतात तेव्हा आजूबाजूला तसाच आवाज होत नसतो.
2. Vertigo मध्ये गरगर फिरल्यासारखे वाटते. काही वेळेस आपण वस्तूंच्याभोवती फिरल्यासारखे वाटते तर अन्य काही वेळेस वस्तू आपल्या भोवती फिरत आहेत असे वाटते.
३. वरील दोन्ही लक्षणे एकत्रित असल्यास त्या व्यक्तीला Meniere Disease हा आजार असण्याची शक्यता असते.
माहितीकरिता आभार डॉ.
माहितीकरिता आभार डॉ.
आठवणीत गाण्याची एखादी ओळ, धून
आठवणीत गाण्याची एखादी ओळ, धून, वाद्यसंगीताचा तुकडा-तान अडकून पडणे हे अनुभवतो. जेवतांना दातात अडकलेल्या कोथिंबीर-जिऱ्यासारखेच फीलिंग. तिथे जीभ इथे मन पुन्हा पुन्हा तिकडेच जाते.
पण हे एखाद्या दिवसापुरते. याला 'कानभुंगा' म्हणायचे की नाही नॉट शुअर
लेख आवडला हे वे सां न
धन्यवाद !एखाद्या दिवसापुरते.
धन्यवाद !
एखाद्या दिवसापुरते. याला 'कानभुंगा' म्हणायचे की नाही नॉट शुअर
>>>
हा भुंगा नक्कीच नाही. त्याला कानगुंग म्हणता येईल
सकाळी साडेसहाला आकाशवाणीवर
सकाळी साडेसहाला आकाशवाणीवर लता, आशा वगैरेंची भक्तीगीते लागायची. ती ऐकतच जाग आली तर दिवसभर तेच कानात रहायची व छान वाटायचे. आठ ला सिलोन वर 'आप ही के गीत' लागायचे ( झुमरीतलैया से पिंकी, बंटी ई .) त्यात भप्पी लहिरीची नवी गाणी ( पद्मालया स्टुडिओ) मग दिवसभर तेच गाणे बसायचे व चिडचिड.
ही काही माझी रोजची इथे यायची
ही काही माझी रोजची इथे यायची वेळ नाही परंतु एका कानभुंग्याने त्रस्त केल्यामुळे यावे लागले !
रात्रीचा प्रवास चालू होता. प्रवास संपायला 15 मिनिटे असताना अचानक ध्यानीमनी नसताना किंवा गेल्या कित्येक महिन्यात ऐकले नसतानाही,
" भेट तुझी माझी स्मरते"
हे गाणे डोक्यात प्रचंड भुंगा घालू लागले.
अजूनही ते थांबत नाही आहे. धृपद किमान शंभर वेळा म्हणून झाल्यानंतर त्यातली
"सुखालाही भोवळ आली" अर्धवट सुरू झालीये.
समजा हे गाणे सीडीवर असते आणि "आली"च्या ली वर सीडी अडकल्यावर कसे
लिलीलीली…..
होते, तसेच सुरू झालेले आहे.
मेंदूचा कारभारच अजब आहे ...
(No subject)
<< मेंदूचा कारभारच अजब आहे >>
<< मेंदूचा कारभारच अजब आहे >>
हा तर मेंदूतला defect वाटतोय.
इथे वाचल्यापासून भेट तुझी
इथे वाचल्यापासून भेट तुझी माझी माझ्या पण डोक्यात वाजू लागलं. मायबोलीवर दोन खणखणीत प्रतिसाद लिहिले तेव्हा थांबलं
बरोबर भरत.
बरोबर भरत.
मी काल या लेखात दिलेला उपाय क्रमांक ४ अमलात आणला.
ते गाणे संपूर्णपणे नजरेसमोर ठेवले आणि मग त्यातले एक एक कडवे शांतपणे समजून घेत वाचू लागलो. त्यानंतर मग झोप आली आणि मग सकाळी भुंगा थांबला.
सध्या भारतात पावसाळ्याचे
सध्या भारतात पावसाळ्याचे दिवस आहेत. तेव्हा विविध भारतीवरून दिवसाच्या कुठल्या ना कुठल्या वेळेला पावसाची विविध गाणी ऐकवली जात आहेत. त्यातली बहुतेक सगळी जीवाला वेड लावणारी असतात आणि त्यातही अशी काही गाणी अवचित ऐकायला मिळाली की दिवसभर त्या गाण्याचा गानभुंगा मागे लागलाच म्हणून समजा ! मग ते संपूर्ण गीत गुगलून काढून दिवसभर स्वतःशी म्हणत राहणे आलेच !
नुकतेच सकाळच्या वेळी विविध भारतीवरून मी
रिमझिम के गीत सावन गाए .. हाए . .
हे गाणे ऐकले आणि दिवसभर त्याचा भुंगा लागला. या गाण्याशी संबंधित सर्वच कलाकार अत्युत्तम आहेत :
आनंद बक्षी + एल पी + लता आणि रफी. मग काय विचारता ?
ते गाणे शिवरंजनी रागात बसवताना काही शब्दांची तोड अप्रतिम केलेली आहे - विशेषता
‘ भीगी SS … भीS . . गी, रातो मे”
इथे ते खूपच गोड वाटते.
छान पोस्ट.
छान पोस्ट.
मिटतां कमलदल
होई बंदी भृंग
परि सोडिना ध्यास……गुंजनात हा दंग
असे भुंग्याचे पोखरणेही हवेहवेसे वाटावे अशी अनुभूती.
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख.
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख. कानभुंगा हा शब्द आवडला.
< ही काहीशी गानव्यसनाचीच अवस्था असते> +11
Pages