अनिकेत

Submitted by ज्येष्ठागौरी on 10 April, 2023 - 10:59

अनिकेत..
आमच्या घरात एक जुनं डेस्क आहे,अगदी जुनं! पण चांगलं ठणठणीत,लाकडी, अगदी कुलूप घालता येईल अशी कडी असलेलं.पूर्वी दुकानात दिवाणजी बसून लिहायचे तसं. बापू त्याच्याशी बसून रात्री काही लिहीत असायचे.त्यांच्यानंतर मी ते माझ्या घरी आणलं,किरकोळ दुरुस्ती केली,पॉलिश केलं आणि मग वापरायला सुरुवात केली त्यावेळी मुलं शाळेतल्या वयाची होती,कधी त्याच्याशी बसून अभ्यास करायची,कधी त्याच्या उतरत्या भागावर घसरगुंडी.ती त्यांचीच मालमत्ता होती, मी त्यात फार लक्ष घालायची नाही.एकदा काहीतरी पेन हवं होतं म्हणून डेस्क उघडलं तर मला अलिबाबाची गुहाच दिसली.. मुलांनी त्यात काय काय जमवलं होतं.चॉकलेटच्या चांदयांपासून ते अर्ध्या पेन्सिली, खोडरबरं, पट्ट्या, रिबिनी, कागदाची विमानं आणि काय काय,माझा वासलेला आ मिटायला वेळ लागला आणि मुलांनी लेखन साहित्याची जरा जास्त बेगमी केलीये असं लक्षात आलं.त्यांनी ही बेगमी हळुहळू माझ्याच हस्ते केलीये हेही लक्षात आलं . मुलांना कुठलीही गोष्ट मागितली की दोघेही थेट ह्या डेस्कात डोकं घालायचे आणि या खजिना विहिरीतून काढून द्यायचे.दिवसभर सदैव काहीतरी शोधत असलेल्या ह्या दोन खट व्यक्तींना त्या डोहात मात्र सगळं लगेच सापडायचं. त्यांच्या सगळ्या जागा नसलेल्या वस्तूंचं, तेच एक जग होतं.
बापू पत्रकार असल्यामुळे खूप आधी म्हणजे साधारण ७६-७७ साली फोन आला.त्यावेळी फार कमी लोकांकडे फोन असल्यानं, दुसऱ्यांकडून फोन करणे किंवा फोन येणे हे अगदी सामान्य होतं आणि मुळात घर दहा माणसांचं आणि खंडीभर पाहुण्यांचं होतं, मोकळं होतं त्यामुळे हे प्रकार खूप व्हायचे.मोठा भाऊ नाट्य चित्रपट व्यवसायात पाऊल रोवण्याचा प्रयत्न करत होता, त्याचे आणि बापूंचे भारंभार निरोप असायचे मग काही विसराविसरीचे प्रकार घडले आणि त्यावर मग आईनं उपाय म्हणून एक पाटी पेन्सिल आणली आणि थोडा हा प्रकार आटोक्यात आला.पण पाटीवरचे जुने निरोप जागेअभावी पुसायला लागायचे किंवा पुसले जायचे आणि मग येरे माझ्या मागल्या व्हायला लागलं.बंधू जरा उच्च अभिरुचीचे असल्यानं त्यावेळी त्यांनी एक बोर्ड शोधून काढला जो मोठा होता,ज्यावर स्केचपेननी लिहिता यायचं आणि ओल्या स्पंजशिवाय पुसता यायचं नाही.ह्या बोर्डवर मात्र भरपूर निरोप सुखेनैव वस्ती करायला लागले आणि मग आईवर थोड्या थोड्या काळानी ते destruction of old records हाती घ्यावं लागायचं. मग ती हाक मारुन ,निरोपाचं काय झालं विचारायची आणि काम झालं असेल तर तो निरोप पटलावरून नष्ट व्हायचा.फोन नंबर असतील तर नावसाहित फोनच्या डायरीत जायचे आणि बोर्ड थोडा श्वास घ्यायचा.त्या बोर्डावर विसरल्या जातील अशा अनेक गोष्टी लिहिल्या जायला लागल्या ,म्हणजे कोणाचा वाढदिवस किंवा वाणसामान काही संपत आलं असेल तर किंवा गॅस नोंदवल्याची तारीख इत्यादी आणि मग एक सर्वसमावेशक पुरण भरलेला कडबू तिथं तयार झाला.त्या विहीरीतून आपल्याला हवं ते नक्की दिसायचं..एक दिवस मात्र तिथे "पिवळी काळे पट्टे"असा निरोप दिसला.अक्षर एतद्देशीय दिसलं नाही , आईनं प्रत्येकाला विचारुन पाह्यलं पण सगळीकडे मधुर नकारघंटा! मग तो महत्वाचा निरोप तिथेच वस्तीला आला.आई जाता येता त्या निरोपाकडे बघायची आणि प्रत्येक वेळी बुचकळ्यात पडायची. हे एखाद्या वाघिणीचं वर्णन असावं का एखाद्या टॅक्सीचं की घरातल्या किंवा बाहेरच्या पुरुषवस्तीचं काही वस्त्रप्रावरण असावं अशा gender biased शंका येऊन गेल्या.आई अस्वस्थ झाली,छडा लावायचा चंग तिनं बांधला, निरोपाचं काम झालं नसल्यानं आईनं तो पुसायला नकार दिला आणि सुमारे पंधरा दिवसांनी भावाच्या विसरभोळ्या मित्रानं रहस्यमय चार शब्दांची उकल केली ती म्हणजे त्याच्या आईनं एक पिशवी दिली होती ती कुठली ते विसरु नये म्हणून आणि स्वतःच्या स्मरणशक्तीवर फार ताण नको म्हणून ती खूण आमच्या बोर्डवर मांडून ठेवली.(अर्थात ही टेप आहे असा निर्वाळा सगळ्यांनी दिला)जगातल्या सर्व आई लोकांचा 'पिशवी'ह्या संकल्पनेवर किती जीव असतो हेही त्यानं आईला तपशीलवार सांगितलं.आणि त्याच्याही आईचा त्याच्या स्मरणशक्तिवर आत्यंतिक भरवसा असल्यामुळे त्यानं कुठंही जो हरवेल असा निरोप त्या बोर्डावर लिहिला आणि काळजीकाट्याने तरला!
आईचा जीव भांड्यात पडला,तिला शंका आमच्यातल्या कोणाच्यातरी आगाऊपणाची होती पण आपले संस्कार फुकट गेले नाहीत हे पाहून तिला माफक बरंही वाटलं.वर आम्ही पिशव्या ह्या विषयावर चिंतन ऐकलं.कारण पिशवी हा तिचाही जिव्हाळ्याचा विषय होता.विविध आकाराच्या आणि पोताच्या पिशव्या वेगवेगळ्या सामानासाठी होत्या.
असेच आईचे स्वतःचे काही फंडे होते,गावातल्या घरात तिची गादी हा सेफ डिपॉझिट वॉल्ट होता.एखादी गोष्ट हुडकायला लागले की ती म्हणायची , गादीखाली बघ.बरोबर सापडायची.आमचं घर दुमजली होतं त्यामुळे प्रत्येकवेळी तिला वस्तू जागेवर वरच्या मजल्यावर ठेवायला, तिचे हात कधीच मोकळे नसायचे.जे त्या वस्तूच्या विवक्षित जागी नसायचं ते त्या वॉल्टमध्ये जमा व्हायचं.वेळच्या वेळी आणि जागच्या जागी नसणाऱ्या निराधार वस्तूंना तिच्याच गादीखाली आश्रय मिळायचा.कधी वस्तू मोठी असेल तर गादीची उंचीही वाढायची पण तिला पर्वा इल्ले..
पुढच्या आयुष्यात तर संधीवातानं तिला पूर्ण जखडून टाकलं होतं तेंव्हा ही गादी शब्दशः तिच्या जिवाभावाची झाली.आता तिच्या आसपास दीड फुटाच्या परिसरात कुठलीही वस्तू हरवणं शक्य नव्हतं कारण ती गादीखाली जायची, कागदपत्रं गादीखाली आणि किल्ल्या, कानातली, उशीखाली.पण जो निराधार त्याला तिच्या गादी उशीचाच आधार आणि तिला आधार म्हणजे वॉकर.त्याशिवाय तिला चालताच यायचं नाही,त्या वॉकरला ती एक छोटी पिशवी अडकवायची त्यात तिचा चष्मा ,एखादं औषध,पेन असलं काही तरी असायचं,दुसऱ्याला कमीतकमी त्रास व्हावा ह्या भावनेनं तिच्या दृष्टीनं तिनं केलेली व्यवस्था ही तिच्या शारीर अवस्थेतला साथीदार होता.
आमच्या पूर्वीच्या घरात दोन मोठे मोठे माळे होते. एक सगळ्यांना सहजी जाता येईल असा होता आणि एक मात्र तिसऱ्या मजल्यावर.तिथे जुन्या काचेच्या हंड्यांपासून ट्रंकेपर्यंत काहीही असायचं. तिथं उजेडाची व्यवस्था फक्त कवडशातून असायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो माळा आवरायचा एक धमाल कार्यक्रम असायचा, वर्षभरात त्यात वस्तू ठेवल्या गेलेल्या असायच्या,विस्मरणात गेल्या असायच्या कधी त्यांची उपयुक्तता संपायची तर कधी सद्दी संपलेली असायची minimalist असणं वगैरे गोष्टी नव्हत्या त्या भल्या मोठ्या घरात त्यामुळे सगळं सुखेनैव नांदायचं तिथं.मग काही आश्चर्याचे धक्के सोसून ते सगळं खाली काढून दिवस त्यात गेला की बहुतेकदा काहीही फेकून न देता संध्याकाळी, काढलं त्याच्या दीडपट सामान वर जायचं.पण मुलांचा सुट्टीतला दिवस सार्थकी लागायचा.ट्रेजर हंट व्हायची आपोआप.जगी ज्यास कोणी नाही,त्यास माळा आहे असं वाटायचं.वागले की दुनिया आठवतंय का! त्यातही हे असंच दाखवलंय.घरोघरी तसाच माळा!नुकतीच नेटफ्लिक्स वर Get organised ही web series बघितली,त्यात अमेरिकेत दोघीजणी प्रचंड पसारा असलेल्या घरांना आवरतात. वेगवेगळे ट्रे वगैरे सामग्री वापरुन,टापटीप करतात. मनोरंजन म्हणून,त्यांचा व्यवसाय म्हणून चांगलंय पण दुसऱ्यांच्या घरचे पसारे आवरणं ह्या विचारांनी काळजाचं पाणी पाणी झालं.पसारा झाला म्हणून काय झालं ,आपला तो बाब्याच! सापडतं त्यात सवयीनं!गमतीचा भाग सोडला तर पाहता पाहता फार जमून जातं सगळं.
शाळेत एक रफ वही असायची ना, नाव रफ पण स्वभावानं भलतीच फेअर असायची ती.
भयानक अक्षरापासून गुपितांपर्यंत सगळं पोटात घ्यायची.त्या वहीची प्रेरणा घेऊन ऑफिसात मी एक स्वतःची वही बाळगायला लागले, डॉन की डायरी म्हणता येईल.त्यात दिवान- ए- आम आणि दिवान-ए- खास दोन्ही नोंदी असतात..रोजच्या कामतल्या महत्वाच्या गोष्टी,काही फोन नंबर,आपलं एक छोटं वेळापत्रक, विशिष्ट वेळ पाळायची असेल तर त्याची आठवण त्यात नोंदवलेल्या असतात, आपण आठवणींचा खंदक असल्यानं अनेक
विशेष प्रसंगी त्या कामी येतात,अशा अनेक वर्षांच्या वह्या मी ठेवलेल्या आहेत.माझ्या विसारभोळेपणाच्या अनेक अपराधात ती वही मला तारून नेते.पण त्यात प्रत्येक पानावर माझं एक चित्र असतं, कधीतरी ओळ असते चित्रांची,कधी डोळे कधी कोयरी, कधी छोटी रांगोळी, पेन सतत फिरतं त्याच्यावर.फोनवर बोलताना एक पटकन काहीतरी रेखाटलं जातं.व्यावहारिक जगात वावरताना आपलं एक बोट त्या कलाविश्वात घट्ट धरलेलं असतं..त्या त्या वेळची लहर असते. सध्या नुसती कमळं फुलली आहेत ते बघून माझ्या मैत्रिणीनं मला एक सुंदर वही आणून दिलीये आणि त्यावर एक छोटी चिठ्ठी-तुझी मौल्यवान कमलचित्रे ह्यात काढ..माझ्या चित्रांना आपोआप वाली मिळालाय.मी चित्रकार नाहीये पण तरीही माझी चित्र अनमोल आहेत असं मला वाटतं.
मोबाईल असाच एक वाली -सुग्रीव आहे, कुठल्याही ठिकाणी भ्रमणध्वनीमुळे आपण एकटे पडत नाही आपल्याकडे कोणी ढिम्म लक्ष देत नसेल तरी काS ही फरक पडत नाही जोपर्यंत रेंज असते तोपर्यंत एकटेपणा वाट्याला येत नाही.एखाद्या तुरळक ओळखीच्या कार्यात आपण एकदम उपरे असतो, नाईलाज किंवा जगरहाटी म्हणून जातो तेंव्हा आपला असा फक्त मोबाईल असतो..कोणाची वाट बघणे ह्या अत्यंत कंटाळवाण्या आणि बापुडवाण्या कार्यक्रमात तोच साथीला असतो..आपण कधी अत्यंत आगाऊ आणि कधीतरी शिष्ट माणसांच्या कंपूत अल्लादपणे जाऊन पडतो आणि संपूर्ण उपेक्षा सहन होणार नाही म्हणून, मोबाईलमध्ये डोकं घातलं की बरं पडतं.
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे (इथे आभाळ ~पक्षी~ मोबाईल असा घ्यावा..)
आणि
जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारों ही इतकी सारखी गाणी लिहिणाऱ्या गीतकारांनी हा सणसणीत अनुभव घेतलेला असणार आहे..
आमचं जुनं डेस्क, बोर्ड, डॉन डायरी,सध्या एक कप्पा,पूर्वी माळा ,आता लॉफ्ट, मोबाईल, रफ वही, आठवणी आणि हिशोब अशा दोन ध्रुवावरच्या गोष्टी साठवलेल्या दैनंदिनी, ह्या सगळ्यांनी वेळेला देवासारखी साथ दिली आहे, धाव घेतली आहे. आपलं घर हे असंच असायला पाहिजे , सगळ्या गुण अवगुणांसकट स्वीकारणारं!हरेक जण त्यासाठी प्रयत्न करत असतो.बाहेरच्या जगातलं आपलं स्थान,पैसे, मानमरातब,कर्तृत्व ह्याच्या परे असणारं आपलं एक निधान!पण कधी कधी असं नसतं, घरी दारी किंमत नसणाऱ्या किंवा ज्यांना घरादाराची किंमत नाही अशी मुलं माणसं कुठल्याश्या नाक्याशी, कोपऱ्याशी, पाराशी, नको त्या व्यक्तीशी जवळीक करतात, कधी आणखी कशाशी तरी. कधी जशा वस्तू हरवतात तशी कधी माणसं सुटून आणि तुटून जातात मात्र! एक वाक्य वाचनात आलं आणि थरारलं! People do not abandon people they love, people abandon people they were using.उगाच "कुंभ के मेले" ची आठवण झाली!
अशा काही नकारात्मक गोष्टी सोडल्या तर बहुतेकदा बाकी कोणीतरी चांगल्यासाठी आपलं एक गाठोडं गुरगुटून, लपेटून घेत असतात. आपल्या आपण.. त्यांच्याकडे विशेष असं लक्ष एरवी जात नाही. कधी काही माणसं अशी असतात की तुम्ही त्यांच्यावर राग , लोभ , चिंता सगळं सोपवून निर्धास्त होत असता, dumping ground नव्हे तर आपल्या व्यक्त भावना सुरक्षित राहतील असे लॉकर्स असतात. काळजीत किंवा संकटात आपापली श्रद्धास्थानं मदतीला येतात. आपल्या भावनांना समजून घेतील असे त्या क्षेत्रात शिक्षण घेतलेले प्रकट आणि शिक्षण न घेतलेले हितचिंतक पण भूमिगत समुपदेशक असतात.
वेळच्या वेळी ,ज्याचे त्याला ,जागच्या जागी ह्या चौदा अक्षरांत शिस्त सामावली आहे, हे आपण शिकलो, ते बऱ्यापैकी अंगीकारलं ते पांथेय मुलांपर्यंत पोहोचवलं पण तरीही त्यांच्याकडून ,आपल्याकडून काही गोष्टी अशा जमा झाल्याचं झाल्या.अर्थात त्याबद्दल फार खंत नाही, प्रचंड उधळमाधळ नव्हती ती, वापरायच्याच वस्तू होत्या,मुलांची शिक्षणं, शिक्षण साहित्य, त्यांची आणि आपली हौस, जवळच्या व्यक्तींची आठवण म्हणून जपत गेलो पण आता त्या वस्तूंसाठी दप्तरात, कपाटात, टेबलवर जागाच नाही, म्हणजे मनात स्थान आहे पण रोजच्या जगण्यात जागा नाही.त्यांचं हे एक प्रकारचं अनाथपण आम्ही आता कमी करु बघतोय. त्या वस्तूंचा योग्य मान ठेवून, प्रसंगी त्यांचे उपभोक्ता बदलून,कधी त्यांचं रुप पालटून त्यांचं बेघर होणं कमी होईल असं बघतोय.
अधिकचं सामान, भावना, बोजा, जबाबदारी, आठवणी काळजी,चिंता,निरोप,इतकं कशाला आपल्याला असलेली माहिती,गजाली, जगाच्या दृष्टीनं श्रेष्ठ नसलेली पण आपल्या मनाला समाधान देणारी कलाकृती,ऐकीव ज्ञान ह्या सगळ्यांचं दायित्व कोणावरतरी सोपवावं लागतं तसं वाटतं, हे सोपवणे अगदी नेहमी सकारात्मक असतं असंही नाही आणि दर वेळी ज्यांच्यावर सोपवायचं ती माणसंच असतात असंही नाही.कधीतरी तर माणसांपेक्षाही जास्त, निर्जीव वस्तू अनेकदा आपल्या मदतीला येतात..पण अनाथपण जाणवू देत नाहीत.प्रत्येक गोष्ट,जागच्या जागी,वेळच्या वेळी आणि ज्याची त्याला, मिळायला लागली तर कसं काय होणार,व्यक्ति तितक्या प्रकृती , वृत्ती आणि विकृतीसुद्धा. प्रत्येकाचं प्राक्तन आणि प्रारब्ध वेगळं, माणसांचं आणि वस्तूंचंही. मग चुकल्या माकल्यांचे अपराध प्रमाद पोटात घालणारं काहीतरी हवं ना! माणसाचं आणि वस्तूंचं अनिकेत होणं किंवा असणं सांभाळायला हवं आणि मनुष्य प्राणी उत्क्रांत म्हणून फक्त आपण ते श्रेय घ्यावं हे काही बरोबर नाही.कारण मनुष्याशिवायही अनेक गोष्टी हे असं बेघर,अनाथ होण्यापासून वाचवत असतात.
या सगळ्याचा विचार करत असताना,कुसुमाग्रजांची स्टँडवरच्या चमच्यांची कविता आठवली."ती असती तर'स्टँड हरवला म्हणून हळहळणारे चमचे आणि मीही हरवलो नसतो म्हणणारे शिरवाडकर आपसूक आठवले.
लॉफ्ट, माळे, ह्यांच्यावर भले पसारे असतील पण त्यात कोणाच्या आठवणी असतील, कोणी पैसे जोडून जोडून त्यावेळी लागणाऱ्या ,आता त्याचं मोल नसणाऱ्या काही गोष्टी असतील काही परंपरागत असतील, आता त्यांचं कवडीमोल असेल.अशा सर्व गोष्टींना भावनांना,मूर्त आणि अमूर्त गोष्टींनाअनिकेत न होऊ देणाऱ्या माणसांना,वस्तूंना, घरांना खरोखर सलाम.अनेक खानाबदोश चिजांना समेटून घेणारी प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू, ठिकाणं फार वेगळी असते , आपल्या नजरेत काही असलं तरी सगळ्यांना विनातक्रार सांभाळून, विखरु न द्यायची काळजी आणि जबाबदारी घेणाऱ्या त्यांचं स्थान फार महत्त्वाचं आहे.नाहीतर काहीतरी फार महत्त्वाचं हातून सुटून जातं.अनिकेत ह्या शब्दाचा अर्थ फक्त बेघर असा नाही तर शिवाचं एक नाव आहे ते, जगाचा स्वामी!उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या कार्याचा एक भाग!
माझ्या चित्तरकलेला, माझ्या आलापांना , विचारांना आणि भावनांना,माझ्या आठवणींच्या आणि साठवणीच्या पसाऱ्याला,
नकारात्मक विचारांना , भावनांना,अकेतन न होऊ देणाऱ्या,त्याचं ओझं किंवा बोजा माझ्या भावविश्वावर न होऊ देता निचरा करून तरीही त्याची मोट बांधून ठेवणाऱ्या कठीण प्रसंगी पुन्हा पेश करणाऱ्या माळ्यांना, लॉफ्टना, पेट्यांना, खणांना, वह्यांना, डायऱ्यांना, पिशव्यांना, श्रद्धास्थानांना,नात्यांना, मैत्रीला,समुपदेशकांना खूप मनापासून मानस घट्ट मिठी..
©ज्येष्ठागौरी

.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे सारं वाचून मन अगदी सैरभैर झालं!आपल्याच जीवनाचा कॅलेडीओस्कोप किती सुंदर चितारलात!
आपल्या जीवनपटाचे साक्षीदार , जीवन प्रवासातल्या त्या त्या वळणावरच्या मनस्थितीचा दर्पण असलेले हे सारे सारे.. त्या त्या काळात वेगळ्यावेगळ्या वस्तूंमध्ये किंवा माणसांमध्ये साठवून ठेवलेले आपलेच आपण .. कधीतरी सिंहावलोकन करताना आपल्यालाच चकित करून सोडतात !
या सगळ्याकडे पाहण्याची एक सुंदर दृष्टी या लेखातून तुम्ही वाचकाना दिलीत ..
धन्यवाद !

पशुपत तुमच्या इतक्या सुंदर प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार! डॉ कुमार, मंजूताई,स्वाती आणि चना, लेख आवडला हे वाचून छान वाटलं.प्रतिसादाबद्दल धन्यवाद!