निजखूण

Submitted by ज्येष्ठागौरी on 2 April, 2023 - 00:22

निजखूण
काही वर्षांपूर्वी एका ठिकाणी वाट बघणे ह्या कार्यक्रमात भाग घेतला गेला.त्यावेळी मोबाईल फार वेगळ्या सेवा देत नव्हतं पण पूर्वीपासूनच्या संस्कारांमुळे बरोबर एखादं पुस्तक असणं अनिवार्य होतं आणि तसंच एक नवीन पुस्तक बाळगून एक खुर्ची गाठून बसले..पुस्तक होतं मौनराग आणि महेश एलकुंचवारांचं, त्यातलं
न गंगासदृश्यम तीर्थम वाचत असताना,गंगेबद्दल लिहिताना त्यांनी 'आत्मभान 'हा शब्द वापरला आहे,तो वाचून मी चक्क ठेचकाळले, स्तब्ध झाले आणि ते पुस्तक आणि डोळे दोन्ही मिटून ठेवलं.मग तो वाट बघण्याचा कार्यक्रम कधी संपला कळलंच नाही कारण ती वेळ मंतरलेली होती.पुढचे काही दिवस काहीही वाचू नये असं वाटलं.मनाची एक वेगळीच अवस्था अनुभवली त्या काही दिवसात.एक झपाटलेपण आलं जणू!कधी अनुभवलं नव्हतं असं एक रिकामपण आणि भरलेपण एकाचवेळी! मन उचंबळून आलं होतं आणि एकदम रिक्तही वाटत होतं.असं फार क्वचित होतं असतं.आयुष्यात एखादा प्रसंग येतो, एखादी व्यक्ती अशी भेटते,एखादी कलाकृती किंवा परिस्थिती सामोरी अशी येते की ही अवस्था येतेच येते, माझीही तशीच झाली.
आत्मभान ह्या एका शब्दांत काहीतरी गारुड होतं जे मला विचार करायला,खोल विचार करायला, दीर्घ श्वास घ्यायला भाग पाडत होतं.एखाद्या व्यक्तीला आत्मभान असणं म्हणजे काय ह्याचा विचार खूप केला मी ह्या काळात.आत्मभान म्हणजे sense of your organs असतं का, म्हणजे फक्त आपल्या पंचेंद्रियांची जाणीव! आपलं दिसणं असतं का?जाणीवा नेणीवा कशा प्रकारचे असतात अगदी उथळ ,वरवरच्या असतात का की खोल ?खूप खूप मंथन झालं..उत्सवप्रिय की नीरव शांतताप्रिय..शोध सुरु आहे..मग आपण खरं कोण..
नावापासून सुरुवात केली तर खरंतर, ज्या नावानं तमाम दुनिया ओळखते ते तरी आपलं कुठं असतं, आपल्याला मिळालेलं असतं,काही बदलून घेतात, काही लग्नानंतर बदलतात ! मला माझं चांगलं पंचाक्षरी नाव आवडायचं, आई बापूंची देणगी आहे असं वाटायचं आणि नंतर त्याच्या ज्या अनेक फोडी झाल्या त्याही आवडल्या कारण त्याही तितक्याच प्रेमाच्या माणसांनी केल्या होत्या आणि त्या फोडी झाल्या म्हणून आतून थोडीच बदलले होते.आईबापूंनी त्यांचा व्हेटो वापरला असं कधीही वाटलं नाही.पण मग ते नाव वापरणारे आपण त्या नावाला साजेसे आहोत, नावाचा अर्थ आपल्याला लागू पडतो का हा एक प्रश्न वारंवार स्वतःला विचारत राहिले आणि मग त्या प्रश्नतला फोलपणा जाणवला!
शिक्षण घेताना,हे आपल्याला आवडतंय का,हा शोध घेईपर्यंत ते संपलं. शिक्षण, पोटापाण्याचा उद्योग, जबाबदाऱ्या,लष्करच्या भाजलेल्या भाकऱ्या,अगं अगं म्हशी म्हणणारी पोटातली माया ह्या सगळ्या झिम्म्यात आपलं आत्मन कुठं भिरभिरत जातं अशी खंत खेद वाटेपर्यंतच, कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती संसार मांडला आहे ना मग कर्तव्याला चुकायचं नाही असं म्हणत आपल्याला कान धरुन मार्गावर आणून सोडते, तेंव्हा मनात येतंच की मला पळायचं नव्हतंच मुळी, पण एक बारीक शोध घ्यावासा वाटत होता स्वतःच!अर्थात हे सांगायची हिम्मत होत नाही त्याचं काय करावं.
"मज काय शक्य आहे ,आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया"हे अगदी पटत राहतं.पण स्वतः आपणसुद्धा आपल्याला किती कमी ओळखतो किंवा किती चांगलं ओळखून असतो हे समजेपर्यंत डोक्यावर केसांत मीठ आणि मिरी सरमिसळ होते हे खरं. लोकांना समजून घेण्यात, सांभाळण्यात,त्यांची मर्जी राखण्यात,त्यांच्या नजरेत चांगलं राहण्यात स्वतःला समजून घ्यायची वेळ कमी येते पण कधी वेळ मिळाला, निवांतपणा मिळाला की श्वासावर लक्ष देता देता आपण आपल्याला सापडत जातो.
लडिवाळ रेशमी नात्यात आयुष्य उलगडताना, गुंतताना, सोडवून घेताना,कधी काटेरी जाळीतून हात सहीसलामत सोडवताना तर कधी बंबाळ होताना.कधी जगाच्या रहाटीच्या पल्याडचं मैत्र जीवापाड जपताना,ती घालमेल, ती असोशी सांभाळताना तर कधी काळ्याभोर आभाळाखाली निर्धोक पहुडताना आपलं यातलं नक्की खरं रुप कोणतं हा प्रश्न वारंवार पडला.
नेहमी अगदी सच्चंच वागताना कधीतरी एक खोट्याची छोटी लाट येऊन गेली हे आरशात दिसत राहतं.फक्त आपली जन्मानं आलेली, संस्कारानं मिळालेली मूल्य झाकोळत नाहीत आणि आपलं उपद्रव मूल्य दुसऱ्याला असू नये हे मात्र मनाशी पक्कं गाठ बांधलंय.
कधी समाजाला दबून आपल्या भावना दडपत राहतो तर कधी आपल्या माणसांसाठी जगाशी भांडण काढतो हे सगळं अनाकलनीय आहे..आपल्यातच किती वेगवेगळं मिश्रण आहे.त्याचा शोधही खूप हृद्य आणि साधा असतो किंवा गूढ डोहासारखाही असतो.
खूप वर्षांपूर्वी एका अनवट स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळाल्यावर एका जवळच्या मैत्रिणीनं एका कवितेतून आता तू तुला सापडशील असं लिहून दिलं आणि एक वेगळं आणखी क्षितिज खुलं झालं, मुळात हा शोध घ्यायचा असतो हे कळलं.मग ओघानं स्वतःकडे बघणं आलं,स्वतःकडे अगदी करड्या नजरेनं कधी तर कधी पोटातल्या अपार मायेनं बघणं झालं.कधीतरी स्वार्थीपणानी ह्याची अदलाबदल करतोय हेही कळलं.पण ते करतोय हे कळल्याची 'नजर'आली आणि तिथेच काहीतरी जिंकलं.
आपण कायम पारदर्शक असावं असं वाटलं पण मग त्याचा फायदा कोणी उठवत असेल तर लावावा लागणारा मुखवटा आतल्या चेहऱ्याला झाकोळून टाकणार नाही अशी पराकाष्ठा करावी लागली.पण मुखवटा आणि चेहरा ह्यातला फरक आपल्याला माहिती असला की पुरे!काय बोलावं ह्यापेक्षा काय बोलू नये किंवा काय करावं ह्यापेक्षा काय करु नये आणि कुठं थांबावं हे कळलं की पुरे की अर्थात नेहमी हे जमतं असंही नाही पण तरीही !sense of organs, पंचेंद्रिय कर्मेंद्रिय बुद्धी मन ह्यांच्या सगळ्यांच्या साथीनं एक चांगलं जीवन जगता आलं तर काय हवंय.माझ्या आयुष्याची आखणी ही माझी स्वतंत्र आणि अनन्य असणार आहे, त्याच्या सगळ्या परिणामांना आणि परिमाणांना मी एकटीच जबाबदार असणार आहे हेही कळलं हळुहळू!वयानुसार, अनुभवानुसार,परिस्थितीनुसार त्याचे अन्वय आणि अर्थ लागत राहतात.एका आयुष्यात सगळं करु शकणार नाही हे माहिती आहे तरी आपल्या अंगी असलेल्या गोष्टींचा,शिकलेल्या गोष्टींचा पुरेपूर आणि चांगला वापर करण्याची अक्कल आली की सार्थक झालं म्हणायचं..एक सामान्य, चाकोरीबद्ध आयुष्य जगतानाही मनात मागे एक जिप्सी,असामान्य,फिरस्ता आयुष्य असणं हेही मान्य करावं लागलं .कधी इकडचा रंग तिकडे मिसळण्याची प्रक्रिया होते हेही खरंय.. बुद्ध म्हणतो की the trouble is you think that you have time..हे वाक्य मनात घोळवतच, शोध मात्र चालू ठेवायला हवा.
आपला शोध हा स्वतःला इतका कठीण तर दुसऱ्यांनी कसा घ्यावा आणि का घ्यावा हाही प्रश्न आहेच. दुष्ट आणि सुष्ट ह्या दोनच गोष्टींत विभागण्याची सवय असलेल्या आपल्याच मनाला ह्या दोन्हीच्या मधून चालणारे आपण कधीतरी स्वतःला सापडणार नक्की!
"रख भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फ़रिश्ते,
पंछियों के पास कहाँ होते है नक़्शे,फिर भी ढूँढ लेते है रास्ते।
जरी परमेश्वराचा, गुरुचा हात मिळाला शोध घ्यायला तरी घ्यायचाय आपला आपल्यालाच आणि तो तसाच आखलेला आहे.
वाबी साबी ह्या जपानी संकल्पनेप्रमाणे आपण अपूर्णतेचा उत्सव आहोत की परिपूर्णतेचा ध्यास किंवा अट्टाहास आहोत हे बघणं तेही कधी फार जवळून बघणं तर कधी दुरुन बघणं फार मनोहारी आहे.आपल्यात असलेल्या विरोधाभासाकडे बघणं, फार गंमतशीर असतं, कधी अगदी सरळ तर कधी पार तिरपाकडं असं व्यक्तित्व आपण बाळगतो..
enigma हा शब्द मला म्हणूनच फार भावतो,शोध घ्यायला कठीण असे आपण. एका तीरावर अगदी सरळ साधे ,पारदर्शक, धीरगंभीर.. दुसऱ्या तीरावर मात्र आपण गूढ,समजाय उमजायला कठीण असतो, खट्याळ,उनाड!अगदी
दुधी काचेसारखे असतो,आत उजेड आहे हे कळून येतं पण कशाचा हे बाहेरच्याला समजून येत नाही. पण आत अगदी उजागर, दीप्तिमान असतो.बस हेच खरं आहे.हाच enigma! आपली निजखूण म्हणून हा शब्द अगदी चपखल वाटतो मला.
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काय सुरेख लिहिलस ग
"कधी अनुभवलं नव्हतं असं एक रिकामपण आणि भरलेपण एकाचवेळी!" - काय चपखल उतरवलस शब्दात!
कोट करायची वाक्य तर सारा लेखच कोट करावा लागेल, खूप छान वाटलं, आत वळून बघावं वाटलं पुन्हा...
धन्यवाद इथे शेअर केलस
बादवे इथल्या आयडी सह तुझी सगळीच नावं फार गोड वाटतात, प्रत्येक नावात दिसतेस तू, जरी प्रत्यक्ष बघितलं नसलं तरी Happy

सुरेख लिहिलं आहे. शीर्षक तर फारच सुंदर.

आपण उत्सवप्रिय की नीरव शांतताप्रिय हे द्वंद्व स्वतः नेहेमीच अनुभवतो, त्यामुळे भावना नीट आकळली.

लिहीत राहावे _/\_

कोट करायची वाक्य तर सारा लेखच कोट करावा लागेल- अवल ना अनुमोदन. तुमची शब्दसंपदा किती समृद्ध आहे! चिंतन आवडलं.

खूप "खरं" आहे तुम्ही लिहिलय ते.. फार छान पकडलं आहेत शब्दात..

दुर्दैवाने आपण कधीच एका भूमिकेत राहू शकत नाही. एकाच वेळेला आपण कुणाचे तरी वडील असतो किंवा कुणाचा तरी मुलगा असतो . अगदी परस्पर विरोधी भूमिका आहेत या! या आणि अशा कित्येक भूमिका सतत बदलून बदलून आपल्याला धारण करायला लागतात . त्यामुळे यातले आपण नेमके कोण हे शोधणं फार अवघड आहे!