सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)

Submitted by मार्गी on 27 March, 2023 - 07:45

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)

✪ ನಮಸ್ಕಾರ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ!! (नमस्कारा नम्मा कर्नाटका!)
✪ जहीराबादमध्ये विद्यार्थ्यांसोबत अविस्मरणीय संवाद
✪ नॅनो सेलिब्रिटीसारखं स्वागत
✪ दक्षिण भारतीय अनुभूती
✪ ८ दिवसांमध्ये ७१५ किमी पूर्ण
✪ संगारेड्डीमध्ये जागते रहो

१ ऑक्टोबर २०२३, सोलो सायकल प्रवासातला आठवा दिवस! हळु हळु मी अर्ध्या अंतराच्या जवळ येतोय. आज कर्नाटकातून तेलंगणामध्ये जाईन. आजचं अंतर ८२ किमी म्हणजे आधीच्या काही टप्प्यांपेक्षा थोडं कमि असेल. मन्नेखेल्लीमध्ये शाळेच्या परिसरामध्ये मस्त सकाळ झालीय! पहाटे २ पासून जागा असल्यामुळे झोप तशी चांगली झाली नाहीय. पण आता हेही सवयीचं झालंय. अपुरी झोप, डास ह्या सगळ्यांसोबत शरीराने जुळवून घेतलंय! आपलं शरीर हे अतिशय अद्भुत यंत्र आहे!

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/03/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

शाळेतल्या प्रभू राव सरांनी मला निरोप दिला आणि मन्नेखेल्लीहून निघालो. तेलंगणा सीमा फक्त २० किमी दूर आहे. माझा पहिला टप्पा जहीराबाद असेल. जहीराबादच्या डॉ. विजयालक्ष्मींना वंदे मातरम फाउंडेशनच्या श्री. माधवजी रेड्डींकडून माझ्या सायकल मोहीमेची माहिती मिळाली व त्यांनी जहीराबादमध्ये कार्यक्रम करायचं ठरवलं. इथे त्यांची विद्यार्थ्यांसोबत काम करणारी एक संस्था आहे, तिथे त्यांनी मला यायला सांगितलं. त्यामुळे आज वाटेत राईडच्या मध्ये थांबून ही भेट घ्यायची आहे!

सायकल चालवताना एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला काही राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम सुरू असलेला दिसला. एक क्षण वाटलं की, इथे अनेक लोक भेटतील, त्यामुळे त्यांच्याशी बोलावं. पण ही ‘गर्दी’ आहे, त्यामुळे थांबलो नाही. काही वेळाने दुचाकीवरून दोन जण आले व त्यांनी मला तिथे बोलावलं आहे असं सांगितलं. बहुतेक तिथल्या नेत्याने मला जाताना बघितलेल्या लोकांना सांगितलं असेल की, त्या सायकलिस्टला बोलावून आणतो. पण त्यांना नम्रपणे नकार देऊन पुढे जात राहिलो. आता प्रत्येक अंतराच्या फलकात हैद्राबादचं अंतर दिसत आहे. उद्या हैद्राबादला पोहचेन आणि ह्या सायकल प्रवासाचा मध्यबिंदू ओलांडेन.

जहीराबादमध्ये फारच मस्त भेट झाली. डॉ. विजयालक्ष्मींची इथे एक शैक्षणिक संस्था आहे. त्यात त्या इंग्रजी संभाषण, बुद्धीला चालना देणारे खेळ, सॉफ्ट स्किल्स अशा गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. आपले अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर करणं हा नेहमीच आनंद देणारा अनुभव असतो! इथे तर त्यांनी मी जणू नॅनो सचिन तेंडुलकर आहे असं माझं स्वागत केलं! इतकं मोठं अंतर अशा सायकलवर कोणी जाताना ते पहिल्यांदाच बघत आहेत. मी माझे अनुभव थोडक्यात शेअर केले व मानसिक फिटनेसबद्दल त्यांच्याशी बोललो. अवघड विषयाचा एखादा धडा निवडून त्याचा अभ्यास करण्याचं एखादं मानसिक फिटनेस चॅलेंज तुम्ही घ्याल का, असं त्यांना विचारलं. ह्या कार्यक्रमातच जहीराबादचे उत्साही कार्यकर्ते श्री अप्पम सर्वम कुमार हेही भेटले. तासाभराच्या कार्यक्रमानंतर आयुष्यभराच्या आठवणी घेऊन पुढे निघालो!


.

.

.

संगारेड्डीपर्यंत मस्त प्रवास झाला. रस्त्याच्या आजूबाजूची दृश्य बघून वाटतंय आता की, मी दक्षिण भारतात आलोय. गोपूर असलेली मंदिरं आणि जेवणामध्ये मुख्य भात! सुंदर रस्त्यांमुळे ४ तासांच्या आत ८२ किलोमीटर पूर्ण झाले आणि माधवजी रेड्डींनी सुचवलेल्या जागी पोहचलो. एका वकिलाच्या कार्यालयामध्येच मला मुक्काम करायचा आहे. तिथे आराम केला आणि संध्याकाळी थोडं फिरूनही आलो. संध्याकाळचं भाताचं जेवण लवकर घेतलं आणि कार्यालयातल्या मंडळींसोबत थोडी चर्चाही केली. परंतु ही संध्याकाळ फारच लांबली. मी ९.३० ला आडवा झालो. पण कार्यालयात अनेक जण आले होते. सुरुवातीला ही फक्त मोठ्या आवाजातली चर्चा होती, पण नंतर शिवीगाळ व आरडा- ओरडा सुरू झाला. तो सुरूच राहिला आणि वाढतच गेला. कोणता तरी कौटुंबिक वाद होता जिथे पालक मुलीला कोणती तरी गोष्ट करायला विरोध करत होते. मध्यरात्री तर भांडणच सुरू झालं आणि मारामारी होते की काय अशी स्थिती होती. मोठमोठ्याने ओरडणं व रडणं सुरू होतं. मला झोप लागणं शक्यच नव्हतं. कशीबशी वाट बघत होतो की, ते आता तरी थकतील, थांबतील आणि जातील. पण ते तसंच पहाटे ३ पर्यंत सुरू राहिलं. त्यानंतर मलाच झोप लागली. ही रात्रसुद्धा कालच्या दिवसासारखी संस्मरणीय ठरली!

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख हा सुद्धा. ते भांडण काय असेल. असा प्रश्न पडला. आमच्या घरामागे अशी भांडणे कायम ऐकली आहेत.

माझा नवरा जेव्हा फार्मा मध्ये मेने जर होता तेव्हा हैद्राबाद ते जाहिराबाद / संगारेड्डी टूर करायचा. बजाज चेतक वरून व पाठीवर मोठ्या दप्तरात फार्माची सांपले. कफ सिरपे गोळ्या, डॉक्ट्रांना द्यायची पेने डायर्‍या हे ते. डे ट्रिप किंवा कधी मधी रात्री मुक्कामाला तिथे थांबायचे. वे बॅक इन त एटीज.

छान लेखमाला !
खरेच फार चांगले काम करत अहात !

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! Happy

@ अश्विनीमामी जी, ओह! ८० च्या दशकात तर हा सगळा परिसर व प्रवास खूप खूप वेगळा असणार!