माझ्या नजरेतून "शिवप्रताप गरुडझेप"

Submitted by निमिष_सोनार on 16 March, 2023 - 04:54

मला विविध कालखंडातील आणि सगळ्या देशातील इतिहासाची आवड आहे. मी त्याबद्दल विविध भाषेतील पुस्तके, लेख, मालिका आणि चित्रपट बघत असतो. मी इतिहास तज्ञ नाही तर इतिहास जाणून घेण्याची आवड असलेला सामान्य माणूस आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचा "शिवप्रताप गरुडझेप" हा चित्रपट थिएटरमध्ये लागला होता तेव्हा खूप इच्छा असूनही जायला जमले नाही म्हणून आज रविवारी TFS play या app वर rent देऊन मोबाइल मध्ये बघितला, कारण हे ॲप अमेझॉन फायर टीव्ही वर compatible नाही. असो.

आतापर्यंत दिगपाल लांजेकर यांचे "शिवराज अष्टक" मालिकेतील चौघे सिनेमे मी थिएटर मध्ये पाहिले आहेत. प्रवीण तरडे यांचा "सरसेनापती हंबीरराव" हा पण थिएटर मध्ये पहिला होता. यापैकी काही चित्रपटांचे मी परीक्षण लिहिले आहे. पण "हर हर महादेव" बघितला नाही कारण त्याच विषयावर पावनखिंड आधीच पाहिलेला होता आणि आता तर "हर हर महादेव" चित्रपटात इतिहासाचा विपर्यास केला गेल्याच्या अनेक बातम्या वाचायला मिळत आहेत. तसेच ज्याची अजून शूटिंग ही सुरू झाली नाही असा "वेडात दौडले वीर सात" या चित्रपटाबद्दल पण वाद सुरू आहेत.

तथापि "शिवप्रताप गरुडझेप" बद्दल समाजमाध्यमांवर आणि टीव्ही, पेपरात अनेकांची चांगली मते वाचल्याने हा चित्रपट बघितला. त्याबद्दल काही वाद असल्याचे ऐकिवात नाही. हे परीक्षण चित्रपटाचे आहे, इतिहासाचे नाही याची नोंद घ्यावी! हा चित्रपट पावनखिंड, तानाजी, पानिपत यासारखा युद्धपट नाही हे आधीच सांगतो. यात युद्ध नाही. तलवारबाजी, लढाई नाही.*

थोडक्यात कथा अशी आहे की, शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची लूट आणि मामा शाहिस्तेखांची लाल महालात कापलेली बोटे या प्रसंगामुळे चिडलेला औरंगजेब मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांना छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या बंदोबस्त करायला पाठवतात. त्यांच्या प्रचंड सैन्यासह ते आक्रमण करतात. एकेक गड पडतो. शेवटी ऐतिहासिक पुरंदरच्या तहात (1665) शिवाजी राजे मिर्झाराजांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की आजवर मुघलांनी राजपूत सरदारांच्या जीवावर सगळीकडे सत्ता मिळवली आणि खरे तर मिर्झाराजे याने दिल्लीच्या तख्तावर बसले पाहिजे, औरंगजेबाने नाही! पण मिर्झाराजे आपल्या निर्णयावर ठाम असतात.

शिवाजी महाराजांना आग्र्याचं आमंत्रण मिळतं. शिवाजी राजे हे बहिर्जी नाईक यांना आधी आग्र्याच्या वाटेवर पाठवतात. त्यावेळेस 9 वर्षे वय असलेले संभाजी राजे यांनाही सोबत न्यावे लागते कारण ते औरंगजेबाच्या (मुघलांच्या) दरबारी पंचहजारी मनसबदार असतात. राजमाता जिजाऊ शंभूराजांना सोबत न्यायला मना करतात तेव्हा शिवाजी राजे त्यांची समजूत काढतात. शिवाजी राजे, शंभू राजे आणि मावळे, सरदार मे महिना 1666 साली आग्र्यास पोहोचतात. आल्यावरच त्यांचा एक अपमान होतो कारण कुंवर रामसिंह (ज्याच्यावर शिवाजी राजे आणि मंडळी यांच्या स्वागताची आणि व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असते) याला मुद्दाम त्यांच्या स्वागताला येऊ दिले जात नाही. दुसऱ्या दिवशी औरंगजेबाच्या दरबारात सर्वांना औरंगजेबाच्या "सालगिरह"चे आमंत्रण असते.

दरबारात शिवाजी राजे आणि इतर येत असताना सुरू असलेली "शमशिर की धार पर चलकर शेर आ गया हैं!" ही कव्वाली चपखल बसते. ते दरबारात पोचतात आणि मध्यंतर होते.

शिवाजी राजांना औरंगजेबासमोर झुकायला (कुर्निसात) सांगितले जाते, तसेच राजांच्या अपमानाचे विविध प्रसंग औरंगजेब घडवतो. ते चित्रपटातच बघणे योग्य होईल. शिवाजी महाराजांना राजासारखा सन्मान मिळत नाही. रामसिंगची औरंगजेब आणि शिवाजीराजे यांच्यामध्ये गळचेपी होते. राजे "खिल्लत" धुडकावून शंभू राजांसमवेत दरबारातून निघून जातात. आग्रा शहरात फिरताना शिवाजी राजांना राजंदाज खानच्या क्रूर हवेलीबद्दल आणि त्यातील क्रूरतेच्या कथा कळतात. पण मिर्झाराजांनी "बेल भंडार उचलून" शिवाजी राजांच्या सुरक्षिततेची हमी घेतलेली असते. शिवाजी राजांचे राजंदाज खानच्या हवेलीत जाण्यापासून रक्षण होते पण औरंगजेब रामसिंग आणि शिवाजी राजे यांना काबूलच्या मोहिमेवर पाठवण्याचां आदेश देतो. तिथे पाठवून त्यांना वाटेत ठार मारण्याचा औरंगजेबाचा डाव असतो परंतु रामसिंहच्या मदतीने या मोहिमेवर जाण्याचे शिवाजी राजे नाकारतात.

नंतर शिवाजी महाराज चातुर्याने काही चक्रे फिरवतात आणि त्यांना पुन्हा "दख्खनला" जाऊ देण्याची विनंती औरंगजेबाला करतात. पण औरंगजेब ते ओळखतो. मग फौलाद खानाला सांगून शिवाजी महाराजांना नजर कैदेत टाकले जाते.

सव्वा दोन तासांच्या या चित्रपटात चित्रपटाची मूळ घटना किंवा कथा (आग्र्याहून सुटका) येईपर्यंत तब्बल पावणे दोन तास निघून जातात. त्या प्रसंगाची पार्श्वभूमी तयार करण्यात म्हणजे शिवाजी महाराजांना नजर कैदेत टाकणे सगळा वेळ खर्ची घातला आहे. नंतर पुन्हा एक गाणं आहे: "सापाच्या विळखात अडकलं काळीज मराठमोळं!" नंतर शिवाजी महाराजांना मारण्याची योजना औरंगजेब बनवतो.*

मग पुन्हा एक गाणे येते: "Something is fishy, don't take it lightly!" (सबटायटल मधल्या ओळी उचलल्या)

त्यानंतर शिवाजी महाराज तिथून कसे सुटतात हा खरा थरार आहे आणि तो बघण्यासारखा आहे. म्हणजे शिवाजी राजांना नवीन तयार झालेल्या फिदाई हुसेनच्या हवेलीत नेण्याआधी मिठाईच्या "पेटाऱ्यातून(?)" सुटका!! मिठाईचे मोठे मोठे पेटारे शिवाजी महाराजांच्या निवासस्थानापासून का जातात याचे कारण चित्रपटात कळेलच.

सुटकेच्या वेळेस रात्रीच्या पावसातील एक (शक्यतादर्शक) प्रसंग अंगावर काटा आणतो आणि शेवटी त्यातही एक अनपेक्षित असं ट्विस्ट आहे आणि मग त्या दोन प्रसंगांची लिंक आपल्याला जेव्हा लागते तेव्हा लेखकाच्या चातुर्याची कमाल दिसते आणि अगदी असेच घडले असावे अशी आपली खात्री पटते! एकूण त्या सर्व प्रसंग मालिके वेळेस दिलेले बॅकग्राऊंड म्युझिक पण खूपच मस्त आहे.*

यातील अनेक संवाद दमदार आहेत. ते तितक्याच दमदारपणे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहेत. एक उदाहरण: "भेदरट बेडकांना सगळेच दगड मारतात पण फणा काढून उभ्या असलेल्या नागाच्या वाटेला कुणी जात नाही!" यातील अनेक ठिकाणे आणि प्रसंग यांचे रामायण आणि महाभारत यांच्याशी तुलना किंवा संदर्भ सांगितले आहेत.

यतीन कार्येकर (औरंगजेब) आणि अमोल कोल्हे (शिवाजी महाराज) यांचा अभिनय लाजवाब. दोघांनी डोळ्यांनी सुद्धा खूप चांगला अभिनय केला आहे. इतर कलाकारांचा अभिनय पण चांगला आहे. मात्र चित्रपटात प्रेक्षकांना हा इतिहास आधी माहिती असल्याचे गृहीत धरले आहे, त्यामुळे प्रेक्षकांना काही पात्रे लवकर समजत नाहीत. त्यांची ओळख नीट करून द्यायला हवी होती. चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक खूप चांगले आहे.

इतिहास आणि त्यातील घटना क्रमाने आणि बारकाईने नीट जाणून घ्यायचे असतील तर हा चित्रपट नक्की बघायला हवा. निर्मितीमूल्ये चागली आहेत. दिग्दर्शन चांगले आहे. हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वीच थियेटर मध्ये पहिला होता , हंबीरराव पण बघितला , पावनखिंड पण आणि फर्जंद देखील .
आता इथून पुढे ऐतिहासिक सिनेमाच्या वाट्याला जाणार नाही अशी शप्पथ घेतली आहे.
प्रत्येक सिनेमात पावलोपावली जाणवणारे इतिहासाचे विपृद्रिकरण , मोजक्या साहित्यात / माणसात ,खर्चात उरकलेले चित्रीकरण बघून विट आला आहे .
शिवाजी महाराज राजे होते , पण लांजेकर / कोल्हे गँग ची ऐपत नाही महाराजांचे चरित्र दाखवण्याची !
नाही ऐपत तर नका ना काढू असेल small बजेट मूव्ही !
मोगल १लाखाचे सैन्य घेवून आक्रमण करायला यायचे , आणि आपले डायरेक्टर दाखवतात शे दोनशे , कारण स्पेशल इफेक्ट्स खर्च परवडत नाही !
ह्यांनी फक्त सिरीयल बनवाव्यात , पाहताना किमान आपली मेंट्यालीटी सिरीयलचीच असते , जास्त अपेक्षा नसतात ......