राजहंस प्रकाशनचे "विश्वास पाटील" लिखित नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या संपूर्ण जीवन गाथेवर आधारित "महानायक" पुस्तक नुकतेच वाचून संपवले. पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल सांगायला शब्द अपुरे पडत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर हे पुस्तक आधारित आहे त्यांचे व्यक्तिमत्व लिहिण्यासाठी मुळात कितीही शब्द लिहिले तरी अपुरे पडतील. नेताजींचे आयुष्य खूपच वेगळे होते. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या होत्या. केवळ आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याच्या एकाच ध्यासापोटी!
त्यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यावर लहानपणापासून तर मृत्यूपर्यंत इतक्या तपशीलवार पुस्तक लिहिणे हे खूप जिकरीचे काम आहे. इतिहासाचे संदर्भ चुकायला नको हे लेखकापुढे आव्हान असते. माझ्या माहितीनुसार, सात-आठ वर्षे संशोधन करून, सत्तर लोकांच्या मुलाखती घेऊन, तसेच अनेक जपानी, इंग्रजी व इतर भाषेतील पुस्तके यांचा संदर्भ घेऊन विश्वास पाटील यांनी हे भलेमोठे 700 पांनाचे पुस्तक लिहिले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांतरासाठी सोयीस्कर व्हावी यासाठी लेखकाने संपादित केलेली लोक आवृत्ती मी वाचली. या पुस्तकाचा 11 भाषांत अनुवाद केला गेला आहे. या पुस्तकाचे एकूण 19 मोठे प्रकरण आहेत आणि विसावा भाग उपसंहार आहे.
पुस्तकाचा पाहिला अर्धा भाग नेताजींचे लहानपण, त्यांचे कुटुंब, त्यांचा काँग्रेस मधील सक्रिय सहभाग, काँग्रेस मधील अंतर्गत राजकारण आणि तेव्हाची ब्रिटिश भारतीय राजकीय परिस्थिती याबद्दल सांगतो. लग्नासाठी सांगून आलेल्या सर्व मुली ते नाकारतात. त्यांना लग्न करायचे नसते. अत्यंत प्रतिष्ठित आय सी एस परीक्षेत तिसरे येऊनही ते ब्रिटिशांची चाकरी करायची नाही म्हणून प्रशासकीय नोकरी नाकारतात.
पुस्तकाचा उरलेला अर्धा भाग भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र हे पेशावर, अफगाणिस्थान, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, बँकॉक, ब्रह्मदेश यासारख्या ठिकाणी कसे जातात ते सांगतो. दुसरे महायुद्ध 1939 ला सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा घेऊन ब्रिटिशांना जेरीस आणायचे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी ब्रिटिशांच्या शत्रू राष्ट्र गटाला भेटून त्यांच्याकरवी भारतीय युद्धकैदी एकत्र करून आझाद हिंद सेना स्थापन करायची आणि ब्रिटिशांवर इंफाळ आणि कोहिमा येथून आक्रमण करायचे आणि दिल्ली जिंकायची अशी त्यांची योजना होती.
केवळ एका माणसाकडून हे सगळे शक्यच होऊ शकत नाही असे वाटते, परंतु सुभाषबाबू आपल्या दुर्दम्य आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर शक्य करून दाखवतात. एवढेच नाही तर त्यांच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या ठाकतात. पण त्याची परवा न करता ते आपल्या प्रयत्नात बरेच अंशी यशस्वीही होतात! जपान सरकार नेताजींना व्यक्ती म्हणून नव्हे तर एक राष्ट्र म्हणून मदत करतात.
जपानी सैन्यात बेबनाव आणि आझाद हिंद सेनेतील काही जण गद्दार निघतात, म्हणजे ब्रिटिशांना जाऊन मिळतात. त्यामुळे पण ध्येय पूर्तीत अडथळा निर्माण होतो. होत्याचे नव्हते होते. तरीही न हरता नेताजी आणि त्यांचे सहकारी प्रयत्न चालूच ठेवतात.
युद्धाचे प्रसंग लेखकाने इतक्या तपशीलवार लिहिले आहेत की आपल्या डोळ्यासमोर युद्ध सुरू आहे असे वाटते.
पण... 1945 साली एक दुर्देवी आंतरराष्ट्रीय घटना घडते आणि सर्व फासे पालटतात. त्या घटनेमुळे नेताजींना एक निर्णय घ्यावा लागतो आणि त्यानंतर....
लेखकाच्या संशोधनाला दाद द्यावीशी वाटते कारण नेताजींच्या जीवनातील अखेरचा सर्वात वादग्रस्त भाग म्हणजे त्यांचा विमान अपघात याबद्दलही आपल्या मनातील सर्व शंका दूर होतील अशा पद्धतीने लिहिला गेला आहे.
अर्थात या पुस्तकाचा दुसरा अर्धा भाग समजण्यासाठी "दुसऱ्या महायुद्धाबद्दल" थोडे तरी नॉलेज असणे आवश्यक आहे.
ब्रिटिश सरकार जेव्हा सुभाष चंद्र बोस यांना ऑस्ट्रियामध्ये तुरुंगात आणि नजर कैदेत ठेवते तेव्हा नेताजींना एक पुस्तक लिहायचे असते त्याच्यासाठी लेखनिक म्हणून एमिली ही स्थानिक तरुणी त्यांना मदत करते. त्या दोघांत प्रेमसंबंध निर्माण होतात. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा जेव्हा ती त्यांना भेटते, तेव्हा ते तिच्याशी लग्न करतात. त्यांना अनिता नावाची मुलगी होते. भारतात मुंबईतील मुग्धा सहस्त्रबुद्धे ही तरुणी सुभाषचंद्रांवर एकतर्फी प्रेम करत असते. बऱ्याच वर्षानंतर युद्ध सुरू असताना या तरुणीबद्दल सुभाषचंद्र यांना एक बातमी कळते! काय असते ती बातमी? ते पुस्तक वाचल्यावर कळेल.
जर्मनीत असताना नेताजी हिटलरला जेव्हा भेटतात तोही प्रसंग खूप छान लिहिला आहे. चर्चेदरम्यान हिटलरचे आत्मचरित्र माईन कॅम्फ (माझा लढा)" चा सुध्दा नेताजी एका कारणासाठी उल्लेख करतात, ते कारण काय? येथे सांगत नाही. तुम्ही वाचा.
याच पुस्तकाच्या उर्वरित अर्ध्या भागावर श्याम बेनेगल यांनी "बोस द फॉर्गोटन हिरो" हा चित्रपट बनवलेला आहे आणि माझे तरी मत असे आहे की या पुस्तकावरूनच तो चित्रपट बनलेला दिसतो. चित्रपट बघतांना प्रत्येक प्रसंगात ते जाणवते. नेताजींची त्यांच्या आयुष्याला योग्य न्याय देणारी एकमेव कादंबरी आणि तीही मराठीत सर्वप्रथम आली याचा मला अभिमान वाटतो. अकरा भाषेत हे पुस्तक अनुवादित झाले आहे.
खुद्द डॉक्टर अनिता बोस आणि कर्नल लक्ष्मी सहगल यांनी या पुस्तकाची प्रशंसा केली आहे.
गांधीजींबद्दल आपलं आधी असलेले मत या पुस्तकंमुळे बरंच बदलतं. हे पुस्तक वाचल्यावर कळतं की खूप मोठा इतिहास आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हता. सुभाष चंद्र बोस आणि पंडित नेहरू हे खूप जिवलग मित्र होते, अगदी राजकीय मित्र सुद्धा! त्या दोघांचीही ब्रिटिश आणि स्वातंत्र्यप्राप्तीबद्दलचे विचार सुरवातीला खूप सारखे होते, हे या निमित्ताने मला प्रथमच कळले. परंतु कालांतराने त्यांचे मार्ग का वेगळे होतात हे पुस्तकात समजते.
प्रत्येक इतिहास प्रेमी व्यक्तीने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. अन्यथा एक मोठा इतिहास जो आतापर्यंत पडद्याआड होता किंवा आपल्याला जास्त माहिती नव्हता, तो आपल्याला कधीच माहिती होणार नाही.
अनेक मराठी पुस्तकांवरून हिंदी चित्रपट आले आहेत परंतु लेखकाला पुरेसे श्रेय दिल्या गेल्याचे दिसत नाही असे मला जाणवते. रणजीत देसाई यांचा "राजा रविवर्मा" पुस्तकावर "रंग रसिया" चित्रपट आला होता. तसेच संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी चित्रपट ना. स. इनामदार यांच्या "राऊ" कादंबरीवरून घेतला आहे.