प्रिय कबीरा,
तुला काही कल्पना नाहीये इथे काय चाललंय , त्याने माझ्यासारख्या किती जणांचा गोंधळ होतोय. ज्यांना आत्मशोधाची जिज्ञासा आहे त्यांची दिशाभूल करायला इथे सर्वस्व वेचणारी लोक आहेत. असत्याबाबत केवढी एकनिष्ठता, आणि सत्याशी म्हणजे तुझ्या कैवल्याशी काही देणेघेणे नाही. आजकाल आस्तिक कोण नास्तिक कोण कळत नाहीये. बहुतांश जनता इतकी मूर्ख - व्यक्तिपूजक आहे की One Sadguru goes another comes ! सारासार कळणाऱ्यांना तूही असाच असला पाहिजेस असं वाटतं, न कळणाऱ्यांना तुला जाणूनच घ्यायचे नाही. हे म्हणजे अर्धे आंधळे व उरलेल्यांच्या डोळ्यावर पट्टी अशी अवस्था आहे. आता महाभारत झालं तर काय नवल..! त्यांना जीव तोडून सांगायला माझ्याकडे कसलाही पुरावा नाही , माझं काय मी आज आहे उद्या नाही पण तू तर चिरंतन आहेस, तुला काहीच कसं वाटत नाही. दिसामागून दिसं चाललेत, जे आहे त्याला साक्षात्कार का मानू मी तरी! 'तेरे बिन खाली आजा खालीपनमें' जमणं किती कठीण आहे.
कुणाला सांगू कुणाला बोलू, दशानन झालाय माझा! प्रत्येक जण वेगळ्या चेहऱ्याची ओळख लक्षात ठेवतेय. जोपर्यंत माझं काही खरं नाही तोपर्यंत तुझंही काही खरं नाही , धमकी समजं! ह्या अशा विचारांनाच कोहम्-सोहम् मानायला पाहिजे नं की विशिष्ट रंगाचे आसन अंथरून विशिष्ट दिशेला तोंड करून तुझे नाव मुखाने घेणे म्हणजे 'कोहम् सोहम्' आहे. मी मानव आहे, यंत्रमानव नाही. तू अवडंबरापुरता उरलायस! अवडंबराची नवी नवी फँसी रूपं बाजारात येतात व त्याचे नियम सांगणारे एजन्टही. अर्थशास्त्राचा नियम अध्यात्मात का नाही लावत लोक, जितकी मध्यस्थांची साखळी मोठी तितके ग्राहकांचे नुकसान अधिक. वेडे, क्रूर, नार्सिसिस्ट ,मूर्खं गोळा झालेत बघं. आधी सुरक्षा देणारे कवच, आता सोन्याच्या बेड्या झाल्यायत. धर्मात अध्यात्माचा लवलेशही राहिला नाहीये. तरीही काही जणांना दोन्ही एकच वाटतं. ध्यान त्यांना आवडत नाही , मंदीरात पहाटे उठून उपाशीपोटी अनवाणी जाणे, घरात ताटवाट्या बडवणे जास्त नैसर्गिक वाटते. मी काही तुझी एजन्ट नाही. सत्य जर सिंहासारखे असेल तर तुझी डरकाळी त्यांना का ऐकू येत नाहीये. तुला आयडेन्टिटी क्राईसेस कसे आले नाहीत अजून! तुझी नक्कीच शेळी झालीये. उठ आता !
एकदा काय झालं माहिती, रामकृष्ण परमहंसांच्या कानावर केशवचंद्रांची कीर्ति गेली. आता कीर्तिने भूरळ पडावी असे काही रामकृष्ण नव्हतेच. केशवचंद्र म्हणजे अचाट बुद्धिमत्ता आणि अभिनव अशा बंगाली लिपीचे संशोधक, ब्राह्मोसमाजाचे सर्वेसर्वा, ख्रिस्ती धर्माचे थोर अभ्यासक. सतत भद्र लोकांनी वेढलेले, लोकप्रिय. परमहंसांना जगन्मातेची आज्ञा 'केशवला भेटंच'. परमहंस म्हणाले 'अगं, ती मोठी लोकं वेगळीच भाषा बोलतात. मी काय सांगू त्यांना, आणि माझ्यासारख्या अशिक्षित खेडूताचं त्यांनी का ऐकावं. मातेनी नादचं लावला. मगं गेले तर त्यांचं ते ध्यान बघून कोणी त्यांना बोललंही नाही. असं तीनदा झाल्यावर केशवांची भेट झाली. केशवांना परमहंस आपलेच वाटले.भद्र लोकांना आत्मशोधापेक्षा ब्राह्मोसमाज व त्याची मतं महत्त्वाची होती. केशव यात अडकणाऱ्यांपैकी नव्हतेच. निर्मळ मनाचे असल्याने ते ब्राह्मोसमाजातूनच बाहेर पडले. ब्राह्मोसमाजाची झळाळीच गेली. सुरवातीला सगळेच समान ध्येयाने प्रेरित असतात पण हळूहळू बंधनं , एकमेकांचे अहं , समाजातले स्थान व लोकप्रियता या गोष्टीं ध्येयापेक्षा मोठ्या होतात आणि कळपाची निर्मिती होते. केशवांचा आपल्याच मूल्यांबाबत गोंधळ व्हावा व रामकृष्णांना परमहंस असून एकटेपणा यावा मग आमचे काय व्हावे.
हे तुला सगळं माहिती आहे , मलाही माहिती आहे. आपण काय विसरलो आहोत ह्याचेही विस्मरण झालेल्या माझ्यासारख्या अनेकांना हे पुन्हापुन्हा वाचण्याची गरज आहे. एखादी गोष्ट सर्वव्यापी असली की 'अतिपरिचयात अवज्ञा' ह्या उक्तीला अनुसरून काही जाणीवा बंद होतात बहुतेक !!! जिथे अर्जुनाला स्मरण करून द्यावे लागले तिथे आमच्यासारख्यांचे काय.
Integrity is doing the right thing even when no one is looking, right?! सगळी नीतिमान लोक आस्तिक व पापी लोकच खरीखुरी नास्तिक वाटतात मला आता. मी माझ्यापुरता आस्तिकत्वाचा व ईश्वराचा संबंध लावणं संपवून टाकले आहे. पण जगात वेगळ्याच कशाला तरी यश मिळतंय. हे दिसत असताना मला माझ्याकडे आता काहीच राहीलं नाही असंच वाटणार नं. इतरांच्या चुका मीही करत राहू का. जिथे माझा रस्ता संपतो तिथे मुलांचा सुरू व्हावा ना? का सगळ्यांनी एका वर्तुळातच फिरत रहायचं. ज्यांना वर्तुळ दिसत नाही त्यांचं चांगलंय, ज्यांना दिसतं ते तर बाहेर पडायचा प्रयत्न करणारचं नं. बेसिक इन्स्टिंक्ट..! भ्रमाच्या एका बुडबुड्यातून दुसऱ्या बुडबुड्यामधे जाणे म्हणजे प्रगती नाही हे मला चांगले ठाऊक आहे. तू हरवला आहेस, मी नाही. मला सगळं स्पष्टं दिसतं, शब्दांचा पाऊस पडतोय. फक्त मिळतेजुळते शब्द वेचायचा अवकाश असतो, म्हणून हा पत्रप्रपंच!
तुझी 'अस्मिता'
प्रेरणा :--
मोको कहाँ ढूंढें रे बन्दे, मैं तो तेरे पास में ।
खूप सुंदर काही वाचल्याचा आनंद
खूप सुंदर काही वाचल्याचा आनंद मिळाला हे पत्र वाचून.
शेवट तर फार उत्तम केलाय.
खूप सुंदर काही वाचल्याचा आनंद
खूप सुंदर काही वाचल्याचा आनंद मिळाला >> सहमत. बऱ्याच मनन आणि चिंतनातून आलेलं जाणवतं आहे.
खूप सुंदर काही वाचल्याचा आनंद
खूप सुंदर काही वाचल्याचा आनंद मिळाला हे पत्र वाचून.>>>+1
अस्मिता, बाई काय लिहिलंय.बंपर
अस्मिता, बाई काय लिहिलंय.बंपर जातेय्,पण आवडतेय.
डायरेक कबीर? बरीच वरपर्यंत
डायरेक कबीर? बरीच वरपर्यंत ओळख दिसते तुमची!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेख जरा विस्कळीत वाटतो आहे, पण तळमळ पोचते आहे.
>>>>>>बहुतांश जनता इतकी मूर्ख
>>>>>>बहुतांश जनता इतकी मूर्ख - व्यक्तिपूजक आहे की One Sadguru goes another comes ! सारासार कळणाऱ्यांना तूही असाच असला पाहिजेस असं वाटतं, न कळणाऱ्यांना तुला जाणूनच घ्यायचे नाही. हे म्हणजे अर्धे आंधळे व उरलेल्यांच्या डोळ्यावर पट्टी अशी अवस्था आहे.
नॅह!!! फारच शेमिंग आणि बॅशिंग आहे या लेखात. मला टोचला खूप. म्हणजे अनावश्यक निंदा वाटली. प्रत्येकाला पर्यायस्वातंत्र्य आहे. असं वन साइझ फिटस ऑल नाही म्हणवणार. मला साधगुरुंकडुन जे मिळेल ते इतरांना मिळेलच असे नाही पण म्हणुन मी महामूर्ख ठरत नाही. अंधश्रद्धा त्याज्यच आहे पण श्रद्धा आणि अंधश्रद्धेत फाइअन रेघ आखायची तर मी म्हणेन जोवर माझी श्रद्धा दुसर्याला हानी पोचवत नाही तोवर मला निंदाजनक जज करण्याचा अधिकार कोणाला नाही. अर्थात म्हणुन काय होणारे म्हणा जज करणारे करणारच.
कबीर ग्रेट असेल, आहेच पण म्हणुन कबीराच्या मागे न लागता गोंदवलेकर, स्वरुपानंद आणि फॉर दॅट मॅटर साधगुरु आवडणार्या मला मूर्ख म्हटलेले ... वेल!!!.... नाही आवडले.
तूही >>>>
तूही >>>>
मी कबीराला नाही तर आपल्या परमसत्याला म्हटलं आहे. त्यात आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेले सगळेच लोक येतात. पण 'खरे' हं. आता तुम्ही कबीरालाही सदेह ओळखीत अडकवू लागलात तर संपलंच.
व्यक्तीपूजा अयोग्यच आहे, खरा गुरूही हेच सांगेल. जो गुरू तसं म्हणत नाही, तो व्यक्ती म्हणून सुद्धा दांभिक आहे, गुरू तर सोडूनच द्या.
हा कबीर आतमधे दडलेला आहे. हा
हा कबीर आतमधे दडलेला आहे. हा स्वतःचा स्वतःशी चाललेला संवाद आहे. आपलीच मतं ठाकून ठोकून पाहण्यासाठी आपल्या आतल्या कबीराला घातलेलं साकडं आहे. जेव्हां हा स्वान्तसुखाय संवाद चालू असतो तेव्हां इतरांच्या धारणांशी देणं घेणं असण्याचं कारणच नाही. असा संवाद हळू हळू पूर्णत्वाला नेतो. खरे तर पूर्णत्वाकडे म्हणायला हवे. काही चुकीच्या धारणा गळून पडतात सापाने कात टाकावी तशा.
असा वेळ मिळणं, असं स्वसंवादी होणं ते ही इतक्या धावपळीतून ... हे कौतुकास्पद आहे.
परखड आणि रोखठोक लिहिलंय. भाषा
परखड आणि रोखठोक लिहिलंय. भाषा थोडी बाऊन्सर जाते (जाणारच) पण मुद्दे रोखठोक आहेत प्रचंड आवडलं. भले भले रूढार्थाने "यशस्वी, आचिव्हमेंट वगैरे केलेले" सुध्दा एखाद्या मार्गाचे समर्थन करतात तेंव्हा त्यांना समोर ठेऊन चालणारे सुद्धा त्याच मार्गाने जातात. "मास फॉलोअर्स" तयार होतात. मग त्याला एक असा चेहरा नसतो. अगदी "मांजराच्या मनाशी संवाद साधणारे" सुध्दा मग त्यात आपले असे वलय निर्माण करतात. योग्यायोग्य निवडायचे स्वातंत्र्य ज्याचेत्याला आहे, त्याचा आदर आहेच. पण त्या वादळांपुढे "सत्याची म्हणजे तुझ्या कैवल्याची" पणती मिणमिणती होते. तरी तिच्याकडे पाहून थोडी का असेना वाट दिसते तेंव्हा प्रचंड आशादायक वाटते. तसेच इथे वाटले. आस्तिक नास्तिकाच्या पुनरव्याख्या आवडल्या, "रस्ता संपतो तिथे मुलांचा" हा क्लायमॅक्स आहे, तो प्रचंड भावाला, निःशब्द करून गेला. "आस्तिकत्वाचा व ईश्वराचा संबंध लावणं संपवणं" खूप सहमत.
नेहमीसारखाच संग्राह्य "अस्मिता टच" लेख!
हेच जर पाश्चात्य देशात
.
तुमचा मुद्दा बरोबर आहे. आपण
तुमचा मुद्दा बरोबर आहे. आपण गुरूंची किंवा संतांची पूजा करतोच की. पण इथे व्यक्तिपूजा ही त्या अर्थाने अपेक्षित नसावी. लेखात स्व-स्तोम माजवणाऱ्या व्यक्तींच्या मागे आंधळेपणाने जाणारी जनता, याबद्दल आहे, असं मला वाटलं. फक्त ह्या गुरुब्रुव व्यक्ती व खरे संत ह्यात फरक कसा करणार? सामो, तुम्ही उल्लेख केलेले संत स्वतःच 'गुरूदेखील पारखून घ्यावा' असं सांगतात - ते महत्त्वाचं आणि योग्यच वाटतं.
लेख पोचला.
लेख पोचला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रिय कबीरा,
@सामो,
मला कुणालाही मूर्ख म्हणायचे नव्हते. हे फक्त कबीरापुरतं किंवा कबीराइतकंच नाही. हा लेख आध्यात्मिक आहे, धार्मिक नाही !
हर्पांना अनुमोदन.
-------------
पण असा कधी विचार केलायं का बुद्धाला ईश्वर हवा होता की सत्य? बौद्धप्रणाली मला वेळोवेळी नास्तिक वाटत आली आहे , ती न-आस्तिक का आहे? 'अवलोकीतेश्वर' या शब्दाचा अर्थ ज्याने सगळं बघितलं आहे असा, हे 'सगळं' म्हणजे फक्त ईश्वर असेल का?
विवेकानंद आधी जगन्मातेला मानायचे नाहीत, नंतरही किती दिवस ते अडून बसले होते. त्यांचा ठाकूरांवर त्यांना घशाचा कर्करोग होईपर्यंत विश्वास बसला नाही. त्यांना नक्की काय हवं होतं? त्यांनी ठाकूरांचा अंत का बघितला , ते नास्तिक का होते. जन्मल्यापासून बंद डोळ्यांमागे त्यांना प्रकाश दिसायचा तरीही त्यांनी इतका वेळ का घेतला?
केशवचंद्र गेल्यावर रामकृष्ण धाय मोकलून रडले, 'माते, मी आता कुणाशी बोलू' म्हणून. त्यांचे अंतरंगशिष्य तेव्हा त्यांना भेटलेे नव्हते पण जगन्मातेचे दर्शन झालेले होते. ते तिथेच थांबू शकले असते तरीही त्यांना एकटेपणा का आला असेल.
रमण महर्षी कशाच्या शोधात होते? What is self inquiry? ते फार क्वचितच बोलत पण हेच शब्द ते पुन्हापुन्हा का सांगत.
रूमींच्या सुविचारांमधे काय सांगितलेले असते.
उदा. You are not a drop in the ocean , you are the entire ocean in a drop.
If the light is in your heart, you will find your way home.”
हे होम किंवा ड्रॉप म्हणजे नेमके काय. प्रत्येकाला या घराची होमसिकनेस का वाटत नाही ?
येशू ख्रिस्ताला जे हवे ते मिळाल्यावर तो परित्याग करून का गेला नाही? त्याच्यातली अमर्याद करूणा कुठून आली असेल?
शबरी रामाची का वाट बघत होती, दुसरं कोणी का चाललं नाही या गरीब खेडूत स्त्रीला ?
ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहायला हवी असं का वाटलं. समाजाने नेहमी अवहेलना करूनही ? मंदिरातला ईश्वर तर तेव्हाही होताच, गुरू तेव्हाही होतेच! हे त्यांनी आपण आपले सत्य शोधावे म्हणून केले असेल नं?
तुकाराममाऊलींकडे विठ्ठलाचं वेड होतं, तरीही ते 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' का लिहून गेले.
ह्या सगळ्याचा एकच अर्थ आहे, ते म्हणजे चिरंतन सत्य हे बाह्य ईश्वरापेक्षा मोठे आहे, ज्याला शोधायला कुठेही जायची गरज नाही. याकारणाने माझी लेखामागची प्रेरणा 'मोको कहाँ ढूंढें बन्दे, मैं तो तेरे पास में ।' ही आहे.
मला भाषा आणि विचारातलं
मला भाषा आणि विचारातलं स्पष्टत्व यासाठी हा लेख आवडला.
(असा व्यासंग करण्याची इच्छा आहे माझी-सखाराम गटणे.)
लेख घाईत वाचल्याने खूप टिप्पणी नाहीत(हेहे, तसेही मला खूप जड विषय कळत नाहीत.पोटापाण्यासाठी जड गोष्टी नाईलाजाने शिकते इतकंच.एरवी मूळ पिंड चित्रपट मौजमजा शॉपिंग चा आहे.)
One sadguru goes another comes- सर्वाना विश्वास ठेवायला कोणी न कोणी आधार हवाय.Everyone is lonely inside. हा आधार कोणी गुरुत शोधतं, कोणी त्या रंगीत ब्रेसलेट मध्ये,कोणी नामजप लिहिलेल्या वह्यांमध्ये.पुढेमागे फिजेट स्पिनर इतका वेळ फिरवणे म्हणजे ध्यानधारणा अशी थिअरी आल्यास नवल नाही.
अस्मिता, छान लिहलयं!
अस्मिता, छान लिहलयं!
गहन असले तरी छान मांडायचा प्रयत्न केलाय.
जिथे ज्ञानेश्वर माऊली देखिल म्हणते 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे' / 'तुज स्थुल म्हणू की सुक्ष्म रे'
तिथे आपल्या सारख्या पामरांचा काय निभाव लागणार जी आध्यात्माची खोली आहे तिचा ठाव कसा लागणार? जे दिगंतरी कल्पनाविश्वाच्या पल्याड आहे तिथंवर कसे पोहोचणार?
त्यामुळे त्याचा शोध घेणे थांबवून आत्मारामाचा शोध जरी लगला तरी खूप. जो प्रत्येक जीवाच्या ठायी एकच अंश आहे.
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ १५-७ ॥
निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ १५-५ ॥
माऊली असेही म्हणते मग
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझें तुज ध्यान कळों आले
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव
फिटला संदेह अन्यतत्त्वी
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
सुरेख चिंतन!
सुरेख चिंतन!
ईश्वराशी/विश्वचैतन्याशी अनुसंधान ठेवणे हे साधं, सरळ, आणि सोपं असताना जगातलं so called "अध्यात्म" इतकं complicated का असतं? I don't know!
अस्मिता, बाई काय लिहिलंय.बंपर
अस्मिता, बाई काय लिहिलंय.बंपर जातेय्,पण आवडतेय.>+१ हो मला पण देवकी सारखंच वाटतंय.
लेख किंचित विस्कळित वाटला.
लेख किंचित विस्कळित वाटला. स्वत:चा स्वतः शी संवाद आहे खरा. पण मला असंच म्हणायचं आहे, माझं हेच मत आहे मानलं की inference आणि deductive logic च्या दृष्टीने बाकी लिहिणं व्यर्थ ठरतं.
religion आणि spiritualism वेगवेगळे च आहेत
"ईश्वराशी/विश्वचैतन्याशी अनुसंधान ठेवणे हे साधं, सरळ, आणि सोपं असताना जगातलं so called "अध्यात्म" इतकं complicated का असतं?"..... अजिबात साधं सरळ सोपं नाही. म्हणजे हे शब्द सोपे आहेत. पण आचरणात आणताना खूपच कठीण आहेत. (थोडे अधिकचे : स्वतःची अहंता अलगद बाजूला काढायची, विश्वचैतन्याला संपूर्ण शरणागत व्हायचे, सर्वांप्रती आत्मीयता राखायची, सुखातही आणि दु:खातही, हे तूच करतो आहेस, ह्यात ' मी ' कोठेच नाही, हा भाव ठेवायचा आणि सहजानंदात वावरायचे. हे कठीण नाही का? शिवाय ते नित्य अनुसंधान असायला पाहिजे...) हे सर्व म्हणजे निष्क्रियता नव्हे किंवा अकर्मण्यं नव्हे. हा तर योगेश्वर कृष्णाचा निष्काम कर्मयोग आहे. हा आधी कुणाला पटत नाही, मान्य होत नाही.
माझ्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे , पण मी संपूर्ण परमेश्वर नाही. हे विशिष्टाद्वैत असावे बहुतेक.
इतरांच्यातही त्याच न्यायाने परमात्म्याचा / चैतन्याचा / ..../ ...वगैर अंश असणारच. तो ओळखता आला पाहिजे.
शिवाय अशी धारणा बनली की बाकीचे कोणीच मूर्ख ठरत नाहीत. कदाचित अज्ञानी/ अडाणी ठरतील. तो दृष्टी भूलोकावर असलेला अवनीकडे पाहाणारा ' अवलोकितेश्वर ' ही सर्व माया वरून किलकिल्या डोळ्यांनी पाहात असतो. तो अर्थात ह्या सर्वांच्या पार असतो. तरीही करुणामय असतो. मानवामध्ये ही करुणा असेल तर तो समीपता साधू शकतो आणि मग क्रमाक्रमाने सलोकता, सरूपता , सायुज्यता वगैरे. अर्थात ते ध्येय आणि गंतव्य असेल तरच.
समर्थ रामदासांची करुणाष्टके प्रसिद्धच आहेत. इतर अनेकांनी लिहिली आहेत. त्या विश्वचैतन्याची करुणा भाकणे हे भक्तीचे आणि आध्यात्माचे एक प्रमुख सूत्र आहे. सगळेच संत करुणामय असतात. जरी काही जणांना ते एकारलेले वाटले तरी.
लेख चांगला आहे, चांगल्या शब्दांत लिहिला आहे, थोडी तगमग व्यक्त केली आहे, कधी किंचित त्रागाही आहे. एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून चांगला आहे. अर्थात उत्स्फूर्त आवेगांचे आवर्त असेच असतात. आणि उत्स्फूर्तता हीच त्यातली ऊर्जा असते.
>>>>>>>>' अवलोकितेश्वर ' ही
>>>>>>>>' अवलोकितेश्वर ' ही सर्व माया वरून किलकिल्या डोळ्यांनी पाहात असतो.
माझी प्रचंड आवडती देवता. आणि क्वान यिन.
लेख किंचित विस्कळित वाटला.
लेख किंचित विस्कळित वाटला. स्वत:चा स्वतः शी संवाद आहे खरा. पण मला असंच म्हणायचं आहे, माझं हेच मत आहे मानलं की inference आणि deductive logic च्या दृष्टीने बाकी लिहिणं व्यर्थ ठरतं.>>>>
लेख विस्कळीत आहे हे मलाही लक्षात आलं. काही दुवे नीट साधता आले नाहीत पण मला वेळच मिळाला नाही. पुढच्यावेळी अजून चांगला बांधेन. माझ्या मताबाबत इतरांकडून माझ्या काही अपेक्षा नसतात, लिहिताना इतरांचा विचारही नसतो. पण लेखातल्या मतांना मात्र जास्तीत जास्त स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न असतो, ते काहीही सिद्ध करायला नसून समोरच्याला माझा दृष्टिकोन नीट कळावा म्हणून आहे. नाही तर लेख पोचणारच नाही. माझ्या दृष्टीने मी फक्त स्ट्रेटफॉरवर्ड लिहिले आहे. तुम्ही तुमची मतं इथे मांडू शकता, तरीही व्यक्तिपूजा चूकच आहे, ह्यावर मात्र मी ठाम आहे.
हीरा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही जे प्रतिसादात लिहिलंय तेच मी लेखात लिहिलंय पण सरळसरळ, किंचीत fierce , आधुनिक भाषेत आणि जरा नव्या दृष्टिकोनात असं मला वाटतंय. कदाचित ह्यात दोन पिढ्यातलं वैचारिक अंतर आहे/ असावं, पण त्या मूल्यांचा आधार समान आहे/असावा . चूभूदेघे . धन्यवाद. तुम्हाला किंवा कुणालाही यावर अधिक लिहायचे असेल तर जरूर लिहा.
कृष्णा आणि अतुल,
कृष्णा आणि अतुल,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिसाद सुरेख आहेत. हेच म्हणायचे होते मला.
अनु ,
ADD किंवा ADHD साठी फिजेट स्पिनर चांगले आहे असं म्हणतात, त्याने एकाग्रता वाढते व ताण किंचित कमी होतो असं वाचलंय. चित्रपट , शॉपिंग मलाही आवडते, बहुतेक मला आयुष्याकडून सगळेच आनंद हवे आहेत. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनिंद्य, रानभुली, हर्पा, स्वाती_आंबोळे, सामो, हाआ, धनुडी, देवकी तै, आचार्य, अनु, जिज्ञासा , अतुल, कृष्णा , हीरा सर्वांचे आभार. सर्वांनी छान लिहिलेयं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहमीसारखाच सुंदर लेख!
नेहमीसारखाच सुंदर लेख!
आंतरिक तळमळ जाणवली....सगळीकडे
आंतरिक तळमळ जाणवली....सगळीकडे परमार्थाची दुकानं दिसतात. याला कबीर पंथीय ही अपवाद नाहीत. कबीराला ज्या गोष्टी वर्ज होत्या त्या हे लोक करतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>पोटापाण्यासाठी जड गोष्टी नाईलाजाने शिकते>>>
धन्यवाद कुमार सर आणि
धन्यवाद कुमार सर आणि दत्तात्रय साळुंके
!
"ओ माय गाॅड" या सुप्रसिद्ध
"ओ माय गाॅड" या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटातील ते वाक्य आठवले - ये सब गाॅड फिअरिंग लोग है, गाॅड लव्हिंग कोईभी नही है !
गाॅड लव्हिंगवाला थेट त्यालाच प्रश्न विचारतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्याबरोबर भांडतोही... अगदी वेळ पडली तरच तो तुकोबांसारखा लोकांना विचारप्रवृत्त करतोही... पण ते त्याचे ध्येय अजिबातच नसते..
सद्गुरुंची पूजा ही व्यक्तीपूजा नसते, "त्या"च तत्त्वाची पूजा असते. सद्गुरु म्हणतात या पायावर डोकं टेकव. तेव्हा ते पाय महत्वाचे नसतात तर तुझा/शिष्याचा अहं नष्ट होणं महत्वाचे असते. नम्रतेमुळेच अनेक दैवी गुण अंगी येण्याची शक्यता वाढते. शिष्य तोच ज्याला शिकण्याची इच्छा आहे. आणि सद्गुरु तोच जो सत् ची ओळख करुन देण्यासाठीच उत्सुक असतो.
नोरेन/नरेंद्र तर पहिल्यापासून अतिशय तार्किक, बुद्धीवादी होता. व विवेकानंद झाल्यावर तेच लिहितात की माझ्यासारख्या तार्किकाला, बुद्धीवाद्याला, निराकार मानणार्याला एका अशिक्षित व फक्त सगुण मानणार्याच्या पायाशी बसूनच सारे अध्यात्म शिकून घ्यावे लागले. मी कालीला/कालीमातेला अजिबात न मानणारा होता, पण आता काली/कालीमाता हे माझे वैयक्तीक वेड आहे - ज्याविषयी ना मी कोणाशी बोलू शकत, वाद घालणे तर फारच दूर !!
लेख मात्र नक्कीच विचार करायला करणारा आहे....
छान प्रतिसाद, शशांक.
छान प्रतिसाद, शशांक.
>>>>>>>>>पण आता काली हे माझे
>>>>>>>>>पण आता काली हे माझे वैयक्तीक वेड आहे
ओह ओके असे विवेकानंद म्हणत ओके ओके गॉट इट.
शशांकजी, खूप सुंदर प्रतिसाद.
शशांकजी, खूप सुंदर प्रतिसाद. सगुण देहधारी रूपातील गुरूला मानणे हे भल्या भल्यांना आवडत नाही, जमत नाही. आपण सूचित करता तसा अहं आड येतो. आपण आई वडील, इतर वडीलधारी माणसे,आपले गुरुजी ह्यांना मानतो, काही प्रमाणात त्यांच्याकडे सल्ल्यासाठी जातो, त्याचे सल्ले ऐकतोही. कारण त्यांना आपल्यापेक्षा थोडे अधिक कळते ह्यावर आपला विश्वास असतो. सद्गुरूकडे जायला मात्र आपण बिचकतो. कदाचित भोंदूगुरुगिरी वाढली आहे म्हणून सच्च्या गुरूची पारख होत नसावी. गुरुविण नाही दुजा आधार असे अनेक संत महात्मे सांगून राहिले आहेत.
असो.
>>>>>कदाचित भोंदूगुरुगिरी
>>>>>कदाचित भोंदूगुरुगिरी वाढली आहे म्हणून सच्च्या गुरूची पारख होत नसावी.
होय १००% म्हणुनच भिती वाटते. त्या वाटेला जायलाच नको असे वाटते. मात्र ज्यांनी स्वतःच्या आचरणातून आपले बावनकशीत्व सिद्ध केलेले आहे पण आता वैकुंठवासी आहेत असे गुरु बरे वाटतात.
अनेक देहधारी अजूनही आहेत
अनेक देहधारी अजूनही आहेत ज्यांनी आपल्या आचरणातून आपले बावन्नकशित्व सिद्ध केलेले आहे.
Pages