जेव्हा उपसंपादकांना जाग येते अर्थात लेखननियम
आपण आपले विचर बोलून किंवा लिहून दाखवतो. त्या बोलण्याला भाषा म्हणतात. भाषा हे विचारांच्या देवघेवीचे मौलिक साधन आहे . लेखनव्यवहारात तेच विचारविनिमयाचे लिखित साधन बनते. लिखित भाषा हे भाषेचे दृश्य रूप. विचार एकमेकांना समजायला हवे असतील तर एका विशिष्ट लेखनपद्धतीचे पालन करणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरेल. अशा नियमांनाच आपण शुद्धलेखनाचे नियम म्हणतो.
भाषा प्रवाही असते. सतत बोलल्या जाणार्या म्हणजे जिवंत भाषेत कालानुसार व प्रांतपरत्वे बदल होत राहतात. भाषेत बदल झाला की लेखननियमांतही बदल होतात. पूर्वी आपण संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांच्या शेवटचे इकार व उकार र्हस्व असले तर र्हस्व लिहीत असू. पण आता आपण मराठीचे लेखन मराठी उच्चारानुसार करतो, तेव्ही हे इकार व उकार दीर्घ लिहितो. क्रियापदांच्या केलें, गेलें अशा रूपांवरील
स्प्ष्ट उच्चार न होणारे अनुस्वार आता आपण लिहीत नाही. थोडक्यात लेखनाचे नियम बदलत असतात. तेव्हा शुद्धलेखनाचे नियम म्हणजे लेखनविषयक आजचे नियम. हे नियम ठरवणारी संस्था आहे. त्या नियमांना शासनाची मान्यता असते. ल आणि श या अक्षरांच्या लेखनात काही बदल होत असल्याची बातमी आपण वाचली असेल.
शुद्ध या शब्दाबरोबरच अशुद्ध शब्द येतो. अनेकांना असे वाटते की बोली भाषा म्हणजे अशुद्ध भाषा. तर तसे नाही. महाराष्ट्रात निरनिराळ्या भा गांत निरनिराळ्या बोली बोलल्या जातत. पुण्याच्या परिसरातील पुणेरी भाषा गेल्या चारशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजव्यवहाराची भाषा होती . सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी हीच भाषा प्रमाण मानून दादोबा पांडुरंगांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण रचले. याच भाषेत ग्रंथरचना होऊ लागली, शासन व्यवहार, शिक्षण आणि प्रसार माध्यमांत ती रूढ झाली. शुद्धलेखनाचे , व्याकरणाचे नियम या प्रमाण भाषेबद्दलच आहेत.
बोली भाषेचा वापर अर्थातच बोलण्यापुरता मर्यादित असतो. त्या भाषेत लेखन होऊ लागले आणि ती वापरली जाणारा भूभाग विस्तारला की तिला लिखित भाषा ही मान्यता मिळते.
यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण खेळातून शुद्धलेखनाचे, व्याकरणाचे नियम घोटून घेणार आहोत.
आम्ही काही वाक्यांचे संच देऊ. त्यातल्या चुका दुरुस्त करून तुम्ही ती वाक्ये पुन्हा लिहायची आहेत. यात र्हस्वदीर्घ आले , अनुस्वार आले, व्याकरणाचे नियम आले; क्वचित कुठे वाक्यरचनेतही चुका असतील. कुठे चुकीचा शब्द वापरला असेल.
नियतकालिकांतील मजकुरांत आढळलेल्या भाषेसंबंधी चुकांवर आधारिए उपसंपादकांच्या डुलक्या हे पानपूरक अमृत मासिकात येत असे.
आपल्याला अशा डुलक्यांचे परिणाम शोधून काढायचे आहेत.
चला तर मग, हसत खेळत लेखननियमांची आणि व्याकरणाची उजळणी करूया.
संच १
संच १
.
१. पर्वा तुझी बहिण आली होती ना?
२. गेल्या वीस मिनिटापासून तू "एक मिनिटं , एक मिनिटं" करत आहेस !
३. तंमय आणि वेदांत आताच शाळेत गेले.
४. सर्वांना सारखाच प्रकाश देणे ही सुर्याची निती.
५. पेला लवडंला आणी पाणी सांडून गेल.
६. पारंपरिक पोशाख दिनी मी धोतर घालणार आणि फेटा चढवणार.
७. कठीण प्रसंगी आपले डोके शांत राहायला हवे.
८. तुझ्याशी बोलताना वेळ कशी गेली ते कळलेच नाही.
९. आता आपण घरी जावूनच जेऊ.
१०. तु माझी मदत केली असतीस तर माझे पैसे पाणीमध्ये गेले नसते.
पहिला संच - उत्तरे
१. परवा तुझी बहीण आली होती ना?
२. गेल्या वीस मिनिटांपासून तू "एक मिनिट , एक मिनिट" करत आहेस !
३. तन्मय आणि वेदान्त आताच शाळेत गेले.
४. सर्वांना सारखाच प्रकाश देणे ही सूर्याची नीती.
५. पेला लवंडला आणि पाणी सांडून गेलं.
६. पारंपरिक पोशाखदिनी मी धोतर नेसणार आणि फेटा बांधणार.
७. कठीण प्रसंगी आपले डोके शांत राहायला हवे.
८. तुझ्याशी बोलताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही.
९. आता आपण घरी जाऊनच जेवू.
१०. तू मला मदत केली असतीस तर माझे पैसे पाण्यात गेले नसते.
--------------------------------------
संच २
१. त्यातल्या त्यात जर मौल्यवान, भरजरी, आकर्षक, उत्तम रंगसंगत व सुंदर नक्षिकाम असणारी पैठणी साडी असेल, तर मग विचारायलाच नको; कारण प्रत्येक स्त्री ची इच्छा असते कि आपल्या कडे एकतरी पैठणी असावी.
२. भगवान दत्तात्रय यांच्या मातेचे नाव अनुसया होते.
३. बारक्या गेले दोन महिने विष्णुसहस्त्रनाम पाठ करतो आहे.
४. मुंबईत मराठीभाषिक खूप कमी उरले आहेत.
५. कठीण समय येता जो कामास येतो, तोच खरा मिञ.
६. लहानपणी झाडावरून कैर्या पाडून खायला मजा येत असे.
७. पंत, तुम्ही मौन सोडा. हि शब्दब्रम्हाची ऊपेक्षा आहे.
८. मोरपीसाच्या टोकाशी जो रंग असतो, दुकानदाराने मला तो वाला दाखवावा अशी माझी इच्छा होती.
९. संगीत जाणणार्या माणसाला संगीतज्ञ म्हणतात आणि संगितात पारंगत असणार्या माणसाला संगीततज्ञ म्हणतात.
१०. लंबोदर पितांबर फणिवर वंदना | सरळ सोंड वक्त्रतुंडत्रि नयना ||
सुधारित वाक्ये
संच २ उत्तरे
१. त्यातल्या त्यात जर मौल्यवान, भरजरी, आकर्षक, उत्तम रंगसंगत व सुंदर नक्षीकाम असणारी पैठणी साडी असेल, तर मग विचारायलाच नको; कारण प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की आपल्याकडे एकतरी पैठणी असावी.
२. भगवान दत्तात्रेय यांच्या मातेचे नाव अनसूया होते.
३. बारक्या गेले दोन महिने विष्णुसहस्रनाम पाठ करतो आहे.
४. मुंबईत मराठीभाषक खूप कमी उरले आहेत.
५. कठीण समय येता जो कामास येतो, तोच खरा मित्र.
६. लहानपणी झाडावरून कैऱ्या पाडून खायला मजा येत असे.
७. पंत, तुम्ही मौन सोडा. ही शब्दब्रह्माची उपेक्षा आहे.
८. मोरपिसाच्या टोकाशी जो रंग असतो, दुकानदाराने मला तो वाला दाखवावा अशी माझी इच्छा होती.
९. संगीत जाणणार्या माणसाला संगीतज्ञ म्हणतात आणि संगीतात पारंगत असणार्या माणसाला संगीततज्ज्ञ म्हणतात.
१०. लंबोदर पीतांबर फणिवरबंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
------------------
संच ३
१. काय म्हणता? मधमाशांनी सश्याला पळवून लावलं?
२. आप्तेश्ट कुटुंबियांसह कार्याला नक्की या.
३. बेसनच्या लाडूंसाठी साखर आणायला हवी.
४. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरास होते.
५. तुझी आवडनिवड जपतांना मला माझ्या आवडनिवडी वर पाणी सोडावे लागते
६. काल आपल्या दाराचा पारिजातक काय फुलला होता!
७. मी बशीतून उतरलो तर गाडी स्टेशनात शिरतच होती.
८. कोहलीने आपल्या एकशे तिसर्या सामन्यात चाळीसवे शतक झळकवले.
९. आज पहिला तास शारिरिक शिक्षणाचा आहे.
१०. पु. ल. देशपांड्यांनी विनोदीलेखनाबरोबरच विचारपूर्वक लेखनही केले.
संच ३ उत्तरे
१. काय म्हणता! मधमाश्यांनी सशाला पळवून लावलं?
२. आप्तेष्ट, कुटुंबीय यांसह कार्याला नक्की या.
३. बेसनाच्या लाडवांसाठी साखर आणायला हवी.
४. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरास होते.
५. तुझी आवडनिवड जपतांना मला माझ्या आवडीनिवडीवर पाणी सोडावे लागते.
६. काल आपल्या दारचा पारिजातक काय फुलला होता!
७. मी बसमधून उतरलो, तर गाडी स्टेशनात शिरतच होती.
८. कोहलीने आपल्या एकशे तिनाव्या सामन्यात चाळिसावे शतक झळकावले.
९. आज पहिला तास शारीरिक शिक्षणाचा आहे.
१०. पु. ल. देशपांड्यांनी विनोदी लेखनाबरोबरच वैचारिक लेखनही केले.
------------
संच ४
१. तुमचे आशिर्वाद पाठीशी आहेत म्हणुन हे शक्य झाले.
२. उंदिर मला खुप आवडतो असं गोष्टितली मांजर म्हणली
३. तुला प्रेम करणे मला जमलेच नाही.
४. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जूनाने सुभद्रेला हरण केले.
५. नलदमयंतीच्या गोष्टीत चित्रातला हंस मोती खाल्ला.
६. रामरायाचा जन्म भर माध्यान्नी झाला.
७. हे लिखाण लिहिताना मला एक कविताही सूचली.
८. याचा मतिथार्थ काय होतो?
९.रोज दुपारी वामकुक्षी केल्याने वजन वाढते.
१०. उकाडा हळुहळू वाढू लागला आहे.
संच ४ उत्तरे
१. तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेत म्हणून हे शक्य झाले.
२. उंदीर मला खूप आवडतो, असं गोष्टीतली मांजर म्हणाली.
३. तुझ्यावर प्रेम करणे मला जमलेच नाही.
४. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने सुभद्रेचे हरण केले.
५. नलदमयंतीच्या गोष्टीतील चित्रातल्या हंसाने मोती खाल्ला.
६. रामरायाचा जन्म भर माध्यान्ही झाला.
७. हे लिखाण लिहिताना मला एक कविताही सुचली.
८. याचा मथितार्थ काय होतो?
९. रोज दुपारी वामकुक्षी घेतल्याने वजन वाढते.
१०. उकाडा हळूहळू वाढू लागला आहे.
---------------------------------
संच ५
१. प्रश्ण असा आहे की उत्तर काय आहे?
२. ह्या विशिष्ठ स्पर्धेत उत्कृष्ठ शरीरसौष्ठव असणाराच श्रेष्ठ असल्याचे जाहीर केले जाईल.
३. अकबर मशीदीत गेला तेव्हा अँथनी ही चर्च मध्ये जाण्यास निघाला होता.
४. पेस्तन काकांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झाली.
५. युध्दात आणि प्रेमात सगळं माफ असतं.
६. आमच्याकडची अनेक जोडपी पहिल्यांदा लग्न झाल्यावर शिर्डीला जातात.
७ माझ्या आधी पास झालेल्या मुलांना अजून नोकरी मिळत नाहीए.
८. मराठी भाषा गौरव दिनासाठी उपक्रम, लेख, खेळ , कोडी म्हणी वैगरेंचे आयोजन करताना आमची खूप धांदल उडाली. अगदी परीक्षाच म्हणा ना!
९ तू रहा म्हणालास म्हणून त्याने महिनाभर राहाणे उचित आहे का?
१० तुझे ला जून हसणे आणि हसून पहाणे माझ्या लक्शात आहे.
उत्तरे
१. प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे.
२. ह्या विशिष्ट स्पर्धेत उत्कृष्ट शरीरसौष्ठव असणाराच श्रेष्ठ असल्याचे जाहीर केले जाईल.
३. अकबर मशिदीत गेला तेव्हा अँथनीही चर्चमध्ये जाण्यास निघाला होता.
४. पेस्तन काकांची सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली.
५. युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं.
६. आमच्याकडची अनेक जोडपी लग्न झाल्यावर पहिल्यांदा प्रथम शिर्डीला जातात. .
७ माझ्याआधी पास झालेल्या मुलांना अजून नोकरी मिळत नाहीए.
८. मराठी भाषा गौरव दिनासाठी उपक्रम, लेख, खेळ , कोडी म्हणी वगैरेंचे आयोजन करताना आमची खूप धांदल उडाली. अगदी परीक्षाच म्हणा ना!
९ तू रहा म्हणालास म्हणून त्याने महिनाभर राहणे उचित आहे का?
१० तुझे लाजून हसणे आणि हसून पाहणे माझ्या लक्षात आहे
यात खूप सारे चुकीचे शब्द >>
यात खूप सारे चुकीचे शब्द >> यात खूप
सारेचुकीचे शब्द. सारे नको. ते हिंदी 'बहुत सारे'चं थेट भाषांतर आहे.बाकी स्पेलचेकरबद्दल उपयुक्त माहिती दिलीत. त्यातल्या त्रुटी कमी करणे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज उपलब्ध होणे या दोन कामांसाठी आपल्याला काय करता येईल?
विरामचिन्हांमधली एक चूक
विरामचिन्हांमधली एक चूक अनेकांकडून होताना दिसते म्हणून लिहितो.
: याला अपूर्णविराम म्हणतात. जेव्हा एखादा तपशील द्यायचा असतो तेव्हा तो शब्दानंतर वापरतात आणि शेवटच्या शब्दातील शेवटच्या अक्षरानंतर एक जागा सोडून तो द्यायचा असतो.
चुका दोन प्रकारे केल्या जातात :
१. :-
दोन टिंबांच्या पुढे आडवी रेघ काढायचे काहीच कारण नाही.
२. सामानाची यादी:
शेवटच्या अक्षराला लागून : हे चिन्ह काढले गेले.
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%...
कंसातले वाक्यही पूर्ण झाले
कंसातले वाक्यही पूर्ण झाले आणि कंसही पूर्ण होत असेल तर पूर्णविराम कंसातच द्यायचा कि कंसाबाहेर ?
हाच प्रश्न कंस आणि उद्गारवाचक चिन्हाबाबत पण आहे. वर्तमानपत्रांच्या वेबआवृत्तींमधे वेगवेगळे नियम पाळलेले दिसतात.
पूर्णविराम कंसाबाहेर द्यायचा
पूर्णविराम कंसाबाहेर द्यायचा असे शाळेत शिकवले होते. परंतु आता मी जालसंदर्भ पाहिलेला नाही.
पूर्णविराम कंसाबाहेर द्यायचा
पूर्णविराम कंसाबाहेर द्यायचा असे शाळेत शिकवले होते. >>> +१
धन्यवाद.
अपूर्णविरामाच्या आधी मोकळी
अपूर्णविरामाच्या आधी मोकळी जागा हवी हे माहीत नव्हतं. धन्यवाद कुमार१.
कंसातील वाक्यांबाबत जरा माहिती काढायला हवी. जेव्हा कंसात एकच वाक्य किंवा फक्त काही शब्द येतात तेव्हा कंसाबाहेर पूर्णविराम मान्य आहे, पण कंसात एकाहून अधिक वाक्ये आली तर काय करावं? त्यात पहिल्या वाक्याच्या शेवटी तर पूर्णविराम येईलच, मग दुसऱ्या वाक्याच्याही शेवटी यायला हवा. मग कंसात आणि कंसाबाहेर असे दोन पूर्णविराम द्यावेत का असा प्रश्न आहे (असा प्रश्न बिंदुरेखित यादी (बुलेट पॉइंट्स) लिहिताना येतो. तिथे सहसा पूर्णविराम वापरू नयेत असा संकेत आहे. पण एका बिंदूपुढे एकाहून अधिक वाक्ये आल्यास त्या सर्व वाक्यांना पूर्णविराम वापरावा असाही संकेत आहे.).
१. शेवटच्या शब्दातील शेवटच्या
१. अपूर्णविराम शेवटच्या शब्दातील शेवटच्या अक्षरानंतर एक जागा सोडून तो द्यायचा असतो >>>>
जर तो शेवटच्या अक्षरालगतच दिला तर त्याचा अर्थ विसर्गयुक्त अक्षर असे धरला जाऊ शकतो.
..
२. कंसाबद्दलचे सविस्तर स्पष्टीकरण आवडले.
इंग्रजीत अपूर्णविरामाआधी
इंग्रजीत अपूर्णविरामाआधी मोकळी जागा असेल तर ती जामच खटकते. प्रोजेक्ट गाईडने असल्या चुका काढल्याने ती कायम लक्षात राहिलेली आहे.
मराठीत त्याचे दोन भिन्न अर्थ असल्यने तसा नियम केला असावा.
हपा, ते दोन पूर्ण विराम दिसायला विचित्र दिसले तरी प्रोग्रॅमर असल्याने फारच अप्रिशिएट झाले (आवडले.).
अमित,
अमित,
दिसायला विचित्र दिसले तरी >> आपलेच आहेत ते! (अशी ही बनवाबनवी)
Pages