मराठी भाषा गौरव दिन - पाउले चालती..- रुपाली विशे- पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 28 February, 2023 - 13:50

मराठी भाषा गौरव दिन - पाउले चालती..!!

वसे केशरी सूर्यबिंब ... दूर तिथे क्षितिजावरी...
कवेतल्या शीतल लाटा संगे गुणगुणे खोडकर वारा..
पावलांचे हळूवार उमटती ठसे सोनेरी वाळूवरी...
साद देई बेभान मनास तो अवखळ सागर किनारा...

" जिथे सागरा.. धरणी मिळते... ती जागा म्हणजे सागर किनारा ... आपल्या अथांगतेने मनाला भूरळ घालणारा निळाशार सागर किनारा...!
bordisea.jpeg

अश्या अथांग पसरलेल्या समुद्रकिनारी सुरुच्या बागेत बसून शांत लाटांच्या पाठशिवणीचा खेळ पहात संध्या समयी दूर क्षितिजावर मनमोहक रंगांची उधळण करत धरेचा निरोप घेणारा सूर्य पहात बसणे हा माझा आवडीचा छंद..!!
bordiforest.jpeg

आपल्या महाराष्ट्राला निसर्गाने समुद्रकिनार्‍याचे तसे वरदान दिलेले आहेच. त्यातलाच समुद्र किनाऱ्याचा काही हिस्सा निसर्गाने आमच्या पालघर जिल्ह्याला सुद्धा बहाल केलाय्...!

वसईपासून ते थेट बोर्डी - जाई पर्यंत विस्तीर्ण , अथांग पसरलेला निळाशार अरबी समुद्र..!

डहाणू तालुक्यातलं अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरचं एक सुंदर गाव ज्याला विलोभनीय, शांत असा समुद्र किनारा लाभलायं ..ते गाव म्हणजे बोर्डी..!!

पश्चिम रेल्वेचं महाराष्ट्रातलं शेवटचं रेल्वे स्थानक असलेलं, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या सीमेवरलं, अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं हिरवाईने नटलेलं एक टुमदार गाव ..!!

बोर्डी गाव हे विशेषतः चिकूच्या बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच पारसी किंवा झोरास्ट्रीयन बांधवांसाठी बोर्डी गावाचं एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे झोरास्ट्रीयन अग्नीमंदीर असून असं मानलं जात की, मंदिरातली आग जवळजवळ एक हजार वर्षापासून निरंतर धगधगत ठेवली गेली आहे.

बोर्डी म्हटलं की , मला मात्र हायस्कूलच्या दिवसांची आठवण येते कारण आमच्या शाळेतील आठवी- नववीच्या वर्गाचा दोन दिवसांचा कॅम्प बोर्डीला जात असे.

त्या शालेय कॅम्पमध्ये रात्री किनार्‍याजवळ सुरुच्या बागेत शेकोटी भोवती गाणी म्हणत धरलेला फेर असो किंवा गाण्याच्या भेंड्या असो... शालेय जीवनातल्या त्या स्कूल कॅम्पमध्ये केलेल्या गंमती- जमती अजूनही स्मरणात ठाण मांडून आहेत.

तर अश्या रितीने शालेय जीवनातच नाळ जुळलेल्या बोर्डीला बऱ्याच काळाने जाण्याचा योग आला तो मागच्या आठवड्यात बोर्डी समुद्रकिनार्‍यालगत आयोजित केलेल्या ' चिकू महोत्सवाला ' जाण्याच्या निमित्ताने...!!
bordidesign (2).jpeg

पालघर जिल्हा पर्यटन विभागाने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी ह्या उद्देशाने १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी बोर्डी समुदकिनार्‍यावर आयोजित केलेल्या चिकू महोत्सवाला जाण्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला होता , त्यामुळे मी सुद्धा बोर्डी गाव आणि तिथल्या समुद्रकिनार्‍याला भेट देण्याची संधी हातची सोडली नाही.

मुलांनाही आपल्या स्थानिक संस्कृतीची ओळख व्हावी सोबतच पर्यटनाचा आनंद घ्यावा ह्या उद्देशाने १९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता आम्ही सहकुटूंब घरातून बोर्डीच्या दिशेने निघालो. डहाणू पारनाका मागे पडताच बोर्डीला जाणारा रस्ता हा समुद्र किनार्‍याला समांतर असाच पुढे जातो. त्या समांतर रस्त्याने जाताना समुदाचं भरती आलेलं विलोभनीय रूप पाहून माझा जीव अगदी वेडावल्यागत झाला होता.
horse_0.jpeg

भरदुपारचा सौम्य लाटांचा फेसाळता समुद्र किनारा आणि शांत पसरलेली सुरूची बाग पाहून मला तिथे काही वेळ थांबण्याची प्रचंड इच्छा झालेली पण मुलांची चिकू महोत्सवाला जायची उत्सुकता शिगेला पोचलेली , त्यामुळे मनातल्या इच्छेला मनातच मुरड घालून आम्ही चिकू महोत्सवाची वाट धरली.

नरपड, घोलवड ही गावं ( डहाणू तालुक्यातले घोलवड हे गाव चिकूसाठी प्रख्यात आहे..) मागे टाकत आम्ही बोर्डीला पोहचलो. डहाणूपासून बोर्डीपर्यंत जाणारा रस्ता जवळ - जवळ समुद्र किनार्‍याजवळूनच जातो... त्यामुळे समुद्राचं अथांग, विस्तीर्ण रूप नजरेत साठवता येतं.

अंदाजाप्रमाणे चिकू महोत्सवाला हौशी पर्यटकांची गर्दी प्रचंड होती.

महोत्सवात प्रवेश करताच ध्यानात आलं की, स्थानिक पातळीवर लहान- थोरांपासून सगळ्यांनी ह्या चिकू महोत्सवासाठी कित्ती मोलाचं योगदान दिलंय् ते..!!

चिकू महोत्सवाच्या निमित्तानं ग्रामीण कारागीर, ग्रामीण खाद्यपदार्थ, लोककला आणि आदिवासी संस्कृती यांचं दर्शन पर्यटकांना झालं.

handi2_0.jpeg

खरंतर चिकू म्हटलं की, आपल्याला आठवतो फक्त चिकू मिल्क शेक... पण चिकूपासून काय काय बनवता येऊ शकतं, याची भली मोठी यादीच आहे आणि ती कोणती आहे आपण चिकू महोत्सवाला प्रत्यक्ष भेट दिल्यावर कळून चुकतं.

चिकू पावडर, चिकू चटणी, लोणची, चिकू चिप्स्, चिकू मिठाई,  चिकू हलवा अशा अनेक चिकूच्या पदार्थांची मेजवानीच इथं चाखायला मिळाली. याशिवाय शाकाहारी तसचे मांसाहारी खाण्याचे देखील अनेक स्टॉल्स इथं उभारण्यात आले होते. पट्टीच्या खवय्यासांठी ही मोठी सुवर्णसंधी असल्याने आम्ही सुद्धा मांसाहारी जेवणावर आडवा हात मारला.
chikkofestival.jpeg

स्थानिक संस्कृतीचे दर्शन

या महोत्सवात स्थानिकांच्या खाद्यसंस्कृतीच नव्हे, तर लोककला सुद्धा पाहायला मिळाल्या. आदिवासी समाजाच्या तारपा ह्या जगप्रसिद्ध नृत्य सादरीकरण तसचं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे पर्यटकांचं चांगलंच मनोरंजन झालं. वारली चित्रकला हे पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. महिला बचत गटाने बनवलेल्या विविध गृहपयोगी वस्तू ह्या चिकू महोत्सवात पाहायला मिळाल्या. महोत्सवात विक्रीस ठेवलेल्या विविध वस्तूंची खरेदी करताना नवऱ्याचा खिसा आपोआप हलका होत आहे ह्याचा यत्कीचिंतही विचार न करता मी खरेदीचा आनंद अगदी मनापासून लुटला.
bordikala.jpeg

स्थानिक लोककलेला, संस्कृतीला , समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेणारा तसेच पर्यटकांना पर्यटनाचा सुखद, निखळ आनंद देणारा ' बोर्डी चिकू महोत्सव' साधारण फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला जातो.
tarpa.jpegtarpavadak.jpeg

ह्या चिकू महोत्सवाच्या निमित्ताने जमलं तर तुम्हीही बोर्डी आणि समुद्रकिनार्‍याला अवश्य भेट द्या... मला विश्वास आहे कि, तिथे गेल्यावर तुम्हांला पर्यटनाचा निखळ आनंद नक्कीच लाभेल...
chicken2.jpegchicken2 (2).jpegwarli.jpegwarli2.jpeghandicarft.jpeghandicarft2.jpegbordidesign.jpeg

खरं सांगायचं तर शालेय जीवनापासून बोर्डी आणि तिथल्या समुद्र किनार्‍याबद्दल मला वाटणारं सुप्त आकर्षण चिकू महोत्सवाने अधिकच वाढलं..

चिकू महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी बोर्डी समुद्रकिनार्‍याला नक्कीच भेट देता येईल.. असं स्वतःशीच ठरवत समुद्राला साक्षी ठेवत पुढच्या वर्षी नक्कीच येऊ अशी खूणगाठ मनात बांधून सायंकाळी बोर्डी गावाचा आणि शांत सागरकिनाऱ्याचा आम्ही निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघालो ... मनात बक्कळ, निखळ आनंद साठवूनच..!!

धन्यवाद,

रूपाली विशे- पाटील

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! माझे आजोबा डहाणू येथे नंतर रहायला आले, त्यामुळे हा सगळा भाग अगदी परिचित आहे आणि प्रचंड आवडता. लहानपणाच्या आठवणी. आताही भारत वारी मध्ये डहाणू, महालक्ष्मी करून आले. बोर्डि राहिले त्याची कसर लेख वाचून भरून निघाली Happy सागर किनारा, सुरू च्या बागा, पांढरे जाम आठवले... चिकू फेस्टिवल मस्तच!

अरे व्वा! इथे तर खजिना गवसला!
या महोत्सवाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. जायला आवडेल इथे. सर्व प्रचि सुंदर आहेत.

वर्णिता- धन्यवाद..!! खूप वेगवेगळे प्रकार होते चिकूचे .. मला चिकूचे तेल न वापरता बनवलेले गोड लोणचे खूप आवडले..

वावे - धन्यवाद.. गेल्या आठ वर्षापासून चिकू महोत्सव बोर्डीला आयोजित केला जातोय..

मनमोहन - तुमचेही डहाणूशी खास ऋणानुबंध आहेत हे वाचून छान वाटलं. मागील वर्षापासून डहाणू बीच फेस्टीवल सुद्धा आयोजित केला जातोय.. यावर्षी ११/ १२ मार्चला डहाणूला आयोजित केलाय.. जायची इच्छा आहे पण मुलांच्या वार्षिक परिक्षा सुरू आहेत त्यामुळे कितपत जमेल हि शंका आहे.. अजून एक म्हणजे एप्रिल मध्ये महालक्ष्मीची जत्रा असेल १५ दिवस ... जत्रेला मात्र नक्की जाईन..

धन्यवाद दत्तात्रेयजी, sparkle, प्राचीन, हर्पा, शर्मिलाजी, सामो, स्वाती, दिपक, मैत्रेयी, देवकी...!

धन्यवाद रानभुली ..!!
अरे व्वा! इथे तर खजिना गवसला!>> हो अगदी समुद्र किनार्‍यावरचा खजिनाच आहे चिकू महोत्सव..!!

सुंदर सचित्र माहिती. चिकूचे लोणचं खायची ईच्छा आहे. उत्पादकांची माहिती द्यावी. पर्यटन स्थळाबद्दलची छान माहिती मिळाली.

सगळेच फोटोज सुंदर आहेत.
प्रतिसादास उशीर झाला. साट्यालोट्याचाआ आरोप नको म्हणून थांबलो तर सापडेनाच.

ऋन्मेषसरांच्या माळशेज घाटाच्या धाग्यावर शाळेत असतानाच्या ट्रीपचा किस्सा लिहीला. त्याच वेळी माळशेज घाटातून पुढे डहाणूला गेलो होतो. डहाणूपासून थोड्या अंतरावर आदिवासी डोंगराळ भाग आहे. तिथे रेस्टहाऊस वर राहिलो होतो. नंतर डहाणूला गेलो. तिथलाच फोटो पाहताक्षणी ओळखला. त्या वेळी वाटलेलं कि "जाने जा ढुंढता फिर रहा" या जवानी दिवानीच्या गाण्याचं शूटींग इथलंच आहे. Happy

मस्त समुद्रकिनारा आहे. मच्छीमार्केट मोठं आहे. मांसाहारी लोकांसाठी ड्रायफिशचं स्वस्त मार्केट आहे असं ऐकलं आजूबाजूच्या लोकांकडून. चिकू सुद्धा आणले होते. इथे एक व्यापारी वलसाडचा हापूस आंबा विकतो. आता माहिती नाही. आदिवासीं कलाकार आणि या वस्तूंना राजीव गांधी फाऊंडेशन तर्फे युरोपीय देशात पाठवले होते. त्या इव्हेंटचे नाव आता लक्षात नाही.

हो आता हनुमान जयंती la असते ना जत्रा? माझा मामेभाऊ अनवाणी चालत जातो डहाणू varun. जत्रेचे ही फोटो वर्णन टाका जमल्यास Happy
बीच फेस्टिव्हल baddal सांगते घरी. कोणाला वेळ असल्यास जाऊन येतील!

धन्यवाद किशोरजी... मी तुम्हांला संपर्कातून कळवते उत्पादकांची माहिती..!

रघू आचार्य... : धन्यवाद, साटंलोटं शब्दाला खूप हसले मी.. भारी उपमा लिहिलीयं तुम्ही...

तुमचा एवढा मोठा प्रतिसाद वाचून खूप छान वाटलं...

मूळ डहाणूची असुनही माझ्यापेक्षा तुम्हांला बरीच माहीती दिसते डहाणूची... सुकी मच्छीची क्वालिटी चांगली असते हे मात्र खरं आहे...!

रागिनी mms ह्या चित्रपटाचं शुटींग तिथेच बीचवर आणि बीच जवळच्या बंगल्यात झालंय बहुतेक...
ह्या शुटींगवरून आठवलं... मी सातवीत होते त्यावेळी सई परांजपे ह्यांच्या एका चित्रपटाचं शुटींग डहाणूजवळच्या एका गावात झालं होतं.. काहीतरी आठवडा बाजाराचा सीन होता बहुतेक... माझी मैत्रीण ( तिच्या मामाच्या ओळखीने) आणि अजून दोनतीन जण वर्गातले गेले होते शुटींगला .. त्यांना बाजारात सामान विकायचा रोल दिला होता आणि वर प्रत्येकी १०० रुपये दिले होते त्यांना कामाचे.. मला फार हेवा वाटला होता त्यावेळी सगळ्यांचा...

मला वाटते , वलसाड वरून येणारा आंबा बहुतेक केसर आंबा असेल... मुंबई - अहमदाबाद हायवेवरून गुजरातच्या दिशेने जाताना एकदा का महाराष्ट्राची सीमा संपली की, रस्तोरस्ती आंब्याचे व्यापारी भलेमोठे केसर आंब्याचे ढिग लावून असतात. .. ती दुकान पाहून मला लहानपणी चांदोबा मध्ये पाहिलेल्या दुकानांच्या चित्रांची आठवण येत होती...!

मनमोहन... - हो, हनुमान जयंतीला चालू होईल जत्रा .. आणि पुढे पंधरा दिवस असेल.. जत्रेला गेले तर नक्की लिहेन त्यावर..!!