मराठी भाषा गौरव दिन - लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - सामो - अपराध

Submitted by सामो on 25 February, 2023 - 09:33

कमालीचे सकस कथाबीज/ पटकथा, सशक्त अभिनय, अतिशय कर्णमधुर गाणी, आणि बावनकशी दिग्दर्शन अशा एका मराठी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मला मागे जावे लागेल. याची कारणे दोन. मी तितकेसे चित्रपट पाहात नाही आणि आजकालचे बरेचसे सिनेमे मला विशेष आवडत नाहीत. लहानपणीची मराठी व हिंदी चित्रपटांची रेशनिंगचे मजा औरच होती. रविवारी साप्तहिकी पाहून त्या त्या आठवड्याचे कार्यक्रम कळत असता आणि मग शनिवार-रविवारची वाट पाहण्याची उत्सुकता लागे. अगदी लहानपणी असा पाहिलेला एक चित्रपट म्हणजे 'अपराध.' राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेला, चंद्रकांत काकोडकर आणि शरद पिळगावकर यांच्या कथेवर बेतलेला, मधुसूदन कोल्हटकरांची पटकथा , संगीत एन दत्ता यांचे. इंद्राणी मुखर्जी, रमेश देवा, सीमा देवा, विवेक, राजा परांजपे असे एकाहून एक सरस अभिनेते. रसिकांकरता मेजवानी आहे हा सिनेमा.
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AMWts8Cm1sJuHgUyCGXoasgbc_zWBvE7Eq880adjpeSMBKUY8RTVafGs1-b7zVjppxihRZ8w9hVfa_PLXBh6wxa8_G-xWUn3lDk_d63bUna0HG1xLyRiCt4LvXimfOgEJqc6UZcIMJLYEFEpO4j4uaiFs1DCfA=w426-h600-no?authuser=0
.
श्याम दाते (रमेश देव) हा एक नभोवाणी गायक आहे. त्याच्या आजारपणात नर्स वसुधा (सीमा देव) त्याची शुश्रूषा करते आणि वसुधा व श्याम प्रेमात पडतात. परंतु वसुधाच्या, श्यामकडूनच्या सुखी संसाराविषयी अपेक्षा बऱ्याच अतिरंजित असतात. तिला फ्रिज, टीव्ही, एअरकंडिशन्ड फ्लॅट आदि सुखसुविधा हव्या असतात आणि श्यामला त्या पूर्ण करणे, त्याच्या पगारात तरी शक्य नसते. त्याच काळात, वसुधाला एका श्रीमंत पण काही दिवसांचीच सोबती असलेल्या आसावरीची (इंद्राणी मुखर्जी) कंपॅनिअनशिपचे काम मिळते. आणि श्याम आणि वसुधा, दोघेजण , वसुधाच्या सूचनेनुसार एक बेत आखतात. वसुधा, आसावरीचा विश्वास संपादून, तिची आणि राजबिंड्या श्यामची गाठ घालून देते. आसावरीला संगीताची आवड असतेच. एकाकी व आजाराने थकलेल्या तिला श्यामची पटकन भुरळ पडते. वसुधाचा आणि श्यामचा बेत असा असतो की, श्यामने आसावरीशी लग्न करायचे. आसावरी काही दिवसांची सोबती असल्याने, तिच्या मृत्यूपश्चात, तिची सर्व संपत्ती श्यामला मिळेल व वसुधाला त्याच्याशी लग्न करता येईल. आता हा बेत आसावरीला पसंत पडतो का, ती देखण्या श्यामच्या आणि वसुधेच्या कारस्थानाला, फशी पडते का फसते का, श्याम व वसुधाचे अध:पतन कोणत्या थरापर्यंत जाते. त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीची त्यांना टोचणी लागते की आसावरीची संपत्ती गिळंकृत करण्यात दोघांना यश येते का हा सगळा थरार आपल्यापुढे उलगडत जातो. रमेश आणि सीमा देव यांची थोडी खलनायिकीच भूमिका आहे.

हा चित्रपट्या एकाहून एक सरस अश्या गाण्यांनी सजलेला आहे - सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, स्वप्नांत पाहिले जे ते रुप हेच होते, असेच जुळले गीत सुरात अशीच जुळते साथ,सूर तेच छेडिता गीत उमटले नवे, तुझी प्रीत आज कशी स्मरू अशी एकाहून एक श्रवणिय गाण्यांनी सजलेल्या या चित्रपटाने रसिकांना मोहीनी घातली नसती तरच नवल. ;अपराध' ने, १९७० चे फिल्मफेअर पारितोषिक पटकावले. मस्त गोड संवाद आहेत सिनेमात. अगदी सॅकरिन स्वीट. थोडी कथा फोडण्याचा धोका पत्करुन, श्यामची भेट घडल्यापासून, आसावरीच्या चेहऱ्यावरती जी टवटवी आणि तेज येउ लागते. छान अभिनय केलेला आहे इंद्राणी मुखर्जींनी. मध्यंतरात एक कवड्याचे अर्थात थातूरमातूर कविचेही मजेशीर पात्रही घुसडलेले आहे. त्याने ताण जरा कमी होतोच शिवाय वसुधाचा निग्रही, कपटी स्वभावाला छान रुपरेखा येते. खूपदा पाहीला आहे हा सिनेमा. कधी गाण्यांकरता तर कधी संपूर्ण कथेकरता. अगदी एव्हरग्रीन सिनेमा आहे. हां जरा गडद छटा आहे. विवेक यांची लहानशीच भूमिका आहे पण सोने केले आहे. श्यामचा, भावुक, मदत करणारा मित्र मस्त साकारला आहे त्यांनी. सीमाने हट्टी, दुराग्रही आणि तत्वहीन तरुणीची भूमिका मस्त केलेली आहे. रमेश देव यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. इंद्राणी मुखर्जी यांचा अभिनय सुद्धा फार आवडला.

नसेल पाहीला तर नक्की पहा. युट्युबवरती आहे. - https://www.youtube.com/watch?v=Lbj96hRIpZg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! छान होता हा सिनेमा. सीमा खलनायकी भूमिकेत प्रथमच आणि बहुधा शेवटचीच दिसली ना यात? तिने कामही चांगलं केलं होतं.

छान लिहिले आहे सामो. चित्रपटही छान आहे. लहानपणी कधीतरी पाहिलेला. गाणी मात्र एव्हरग्रीन.. सांग कधी कळणार तुला आवडीचे गाणे. सूर तेच छेडिता देखील छान आहे.. ईतर शोधून ऐकायला हवीत..

पाहिला मुव्ही आताच.... आवडला.... सीमा देव ने अभिनय छान केला पण अशी खलनायकी भूमिका एकदम समोरच्याला राग येईल अशी जबरदस्त केली....

पण ती का अपरा धी ठरते? गुन्हा दोघांचा असतो. श्याम सुटतो. त्याल कुठे निष्पाप दाखवलाय. गुन्हेगाराचा साथी असूनही तो माफीचा साक्षीदार ठरतो.

छान परिचय करून दिला आहे! मला ही गाणी माहीत होती पण चित्रपट katha एवढी रोचक असेल असे वाटले नव्हते. Baghen. Thank you Samo!
जुन्या. मराठी चित्रपटांच्या katha खरच छान असायच्या, पाठलाग वगैरे

छान लिहिले आहे. चित्रपट पाहिलाय. गाणी - विशेषतः सूर तेच छेडिता आणि सीमाचा अभिनय आवडले होते.

तुमचा लेख वाचताना मला अमोल पालेकर, झरीना वहाब, डॉ लागू अभिनीत घरौंदा हा चित्रपट आठवला.

धन्यवाद वावे, मनमोहन आणि भरत.
भरत तो सिनेमा का आठवला? घरोंदा तर घराविषयी, स्वतःच्या घरकुलाच्या स्वप्नाविषयी आहे अ‍ॅज फार अ‍ॅज आय रिमेम्बर.

भरत तो सिनेमा का आठवला? घरोंदा तर घराविषयी, स्वतःच्या घरकुलाच्या स्वप्नाविषयी आहे अ‍ॅज फार अ‍ॅज आय रिमेम्बर.>> सामो, तिथेही सार तेच आहे, अपराध सारखं. फक्त त्यात बाई ऐवजी पुरुषाच्या मरणाची वाट बघण आहे.

छान लिहिलंय सामो.

गाणी छानच आहेत. पण सिनेमा बद्दल काही माहिती नव्हते. बघायला हवा.

मस्त लिहिलेय….

रमेश देव अगदी आय कॅण्डी होता तेव्हा… असला नवरा लाभल्यावर आजारी बाई ठणठणीत का बरे होणार नाही????

सुर तेच छेडितासाठी महेंद्र कपुरला सर्वोत्कृष्ट गायकाचे बक्षिस मिळाले होते असे वाचल्याचे आठवतेय. शेवट छान आहे.

छान परिक्षण..!
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला... हे गीत लहानपणी रेडिओवर नेहमी ऐकले आहे... तेव्हा ही ते आवडायचे आणि आताही आवडते..!!
youtube ची लिंक दिली ते बरं झालं .. बघेन मी..!

अरे वा ! छान ओळख करून दिली आहे. धन्यवाद यासाठी.
रमेश देव कसला देखणा अभिनेता लाभलेला मराठी चित्रपटसृष्टीला. बोलका चेहरा, मिस्कीलपणा यामुळं बघणेबल असायचे त्यांचे चित्रपट.
दूरदर्शनवर दाखवला गेला आहे.आठवत नाही हा चित्रपट. गाण्यामुळे लक्षात आलं.

घरौंदा - झरीना वहाबचा वृद्ध आणि हृदयरुग्ण बॉस श्रीराम लागू याला ती आवडू लागते. ते लग्नासाठी मागणी घालतात.
अमोल पालेकरला यात एक संधी दिसते आणि तो झरीनाला त्यांच्याशी लग्न करायला सांगतो.
यातली पात्रे अपराधपेक्षा अधिक छटांची आहेत. घरासाठी वणवण आहेच.

*** अवांतर ***
'घरौंदा'मधलं श्रीराम लागूंचं पात्र मला आवडलं होतं असं आठवतं.
'मैं बिझनेसमन हूँ, कर्ज देने और लेने में मुझे कोई शर्मिंदगी नहीं लगती' अशा अर्थाचं काहीतरी वाक्य आहे त्यांच्या तोंडी.
त्यात एकदा लग्न झाल्यावर अमोल पालेकर जवळपास तिच्या आयुष्यातून बाहेर फेकला जातो, 'अपराध'मध्ये मात्र सीमा तिची (लिव्ह इन? हे आठवत नाही, पण पूर्णवेळ असते बहुतेक) नर्स असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात रुतून आहे. अगदी हनिमूनलाही त्यांच्याबरोबर जाते ती.
('घरौंदा'ची गाणी गुलजा़रची आहेत) Happy

>>>>>>>घरौंदा - झरीना वहाबचा वृद्ध आणि हृदयरुग्ण बॉस श्रीराम लागू याला ती आवडू लागते. ते लग्नासाठी मागणी घालतात.
अमोल पालेकरला यात एक संधी दिसते आणि तो झरीनाला त्यांच्याशी लग्न करायला सांगतो.
यातली पात्रे अपराधपेक्षा अधिक छटांची आहेत. घरासाठी वणवण आहेच.
हे सर्व आहे खरे. मी पार विसरलेले.

वाह सुंदर ओळख करुन दिलीस. या उपक्रमाच्या निमित्ताने बरेच मराठी उत्तम चित्रपट बघितलेले नाहीत याची जाणिव झाली.