मायभाषा

Submitted by अरभाट on 20 February, 2023 - 23:41

(आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. त्यानिमित्ताने...)

माणसाला भाषा फुटते
मातीला कोंब फुटावा तशी
अनावर आवेगाने आपोआप
कधी हळुवार खुदकन
कधी सरसरत सटकन्
कडूगोड कानापुढून अन्
तिखट कानामागून येते
भाषा नक्की कुठे राहते?

माणसावर भाषा फुटते
जणू खडकावर समुद्री लाट
जणू वाटेवर फुटावी वाट
किंवा फुटावा चिन्हातून आवाज...
फुटत फुटत घट्ट होत जाय
भाषा नेमकी असते काय?

माणूस भाषेला पिळतो, कधी गिळतो
व्याकरण आणि अर्थ काय काय पिळतो
यमक-बिमक, छंद-स्वच्छंद
उगा आपला जरासा खेळतो
कितीही खेळलं, पिळलं, गिळलं तरी
भाषा जाता जात नाही...
माणूस जातो, भाषा उरतेच

कधीकधी मग
भाषेला माणूस अंकुरतो
माणसाला करते भाषा पुष्ट
भाषा घेते अपार कष्ट
भाषा रचते जोती, भाषा पेटवते ज्योती
भाषा होते माझी माय सरसोती
भाषा असते माती ओली
माणसाला रुजवत रिचवत
भाषा होते मायबोली

मग माणूस नक्की कोण काय?
मायभाषेला फुटलेले हातपाय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय आवडली. अशी फ्री फॉर्ममधली कविता खूप आवडते मला.
'क्या भाषा औरत है' नावाच्या कवितेची आठवण झाली. लिंक मिळाली की देते.
-------
ही ती किशोर काबरा यांची कविता -
http://kavitakosh.org/kk/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AD%...

वा!!