तर आता हा रिकामा ब्लॉक राहण्यायोग्य करायचा तर सुरुवात करायला हवी होती ती पहिले इंटरनेटकनेक्शन आणि झोपायला गादया. कारण भांडीकुंडी आणि रेशन तर आम्ही बॅगा भरभरून घेऊनच आलो होतो.
आजकाल जगायला हवा, पाणी, अन्न, निवारा आणि इंटरनेट लागतं.
तर पहिली खरेदी मोडेम/इंटरनेट कनेक्शनची. इकडे दोनच पर्याय एकतर AT&T किंवा Xfinity. इकडे तस बऱ्याच गोष्टींसाठी दोनच ऑप्शन्स असतात. जसे दोनच पार्टी democrat किंवा रिपब्लिकन, uber किंवा Lyft, Lyzol किंवा Clorox. असो!
तर आता दुसरी महत्वाची खरेदी, गादी.
आपल्यासारख्या कापसाच्या गादया अजून तरी नाही मिळत. तर इकडे mattress घ्यावी लागते. ही mattress ची दुकान खूप मोठी असतात. तस तर इकडे सगळच भव्य असतं. तर ह्या मोठ्या दुकानात सगळीकडे बेडच बेड आणि त्यावर टाकलेल्या matresses. मी मोजल्या नाहीत पण २०-२५ तरी असतील.
त्यांना आम्ही size सांगितल्यावर लगेच प्रश्न आला "हार्ड, सॉफ्ट की सेमी सॉफ्ट? " आम्ही आपला नेहेमीप्रमाणे मध्यम मार्ग स्वीकारला. तस त्यांनी आम्हाला त्या बेड्स वर झोपून बघायला सांगितलं. गादी घेताना झोपून बघायचं तेही ह्या परक्या दुकानदारा समोर? मला अगदीच अवघडल्यासारखं झालं. आम्ही आपले " no it's ok!" म्हणून आढेवेढे घ्यायला लागलो.
"तुम्ही झोपून बघितल्याशिवाय तुम्हाला तो कंफर्टेबल आहे का ते कसं कळेलं." म्हणून त्याने परत आग्रह धरला. कसनुसं अवघडत त्या बेडवर झोपून बघताना मला तीन वर्षांपूर्वी गादया करायला टाकलेल्या ते आठवलं. नुसतं आपण जाऊन मोजमाप द्यायचं आणि कापसाची क्वालिटी सांगायची . दोन दिवसात ताजी ताजी बनवलेली गादी तुमच्या घरात हजर. आणि त्या गादी वर झोपही चांगली लागायची.
दोन तीन सेकंद झोपल्यासारखे करून लगेच त्याला किंमत विचारायला उठलो .
ती किंमत ऐकून तीन ताड उडालो. अहो, ५०० डॉलर्स पासून पुढे तीन हजारांपर्यंत त्या mattresses होत्या. लगेच डोक्यातला कॅल्क्युलेटर activate झाला. अरे बापरे म्हणजे ३५००० रुपयांना स्वस्तातली स्वस्त matress आणि चांगल्यातली म्हणजे दोन सव्वा दोन लाखांना एक matterss??? पण जर “किती महाग ह्या mattresses..” अशी complaint केलीत तर दुकानदारच नाही इतर कोणीही म्हणजे तुमचे सहकारी, मित्र, झालच तर जाहिराती तुम्हाला लगेच सांगतील , "हा वायफळ खर्च नाही, इन्व्हेस्टमेंट आहे. रात्रीची झोप महत्वाची. ती नाही झाली तर पुढचा अक्खा दिवस खराब जातो वगैरे वगरे." रात्रीची झोप महत्वाची हे तर जगन्मान्य आहे. पण गावाला सतरंजीवर आणि घरी कापसाच्या साध्या गादीवरही अगदी गाढ झोप लागते की. उलट छान झोप लागावी म्हणून जर चांगल्यातली matress घेतली तर रोज रात्री डोळ्यांसमोर आकडे नाचत राहतील आणि झोप काही येणार नाही.
स्वस्तातली स्वस्त म्हणजे ३५००० रुपयांची matress पण आम्हाला भलतीच महाग वाटत होती.
मला तीन वर्षांपूर्वीच गादयांचं बिल आठवलं, घरातील सगळ्या गाड्या मिळून ५००० च्या पुढे गेलं नसेल. मनात आलं, "हे आधी माहित असत तर एव्हढ्या सगळ्या सामानाबरोबर गादीच्या चार वळकट्या पण बांधून आणल्या असत्या तर काय बर झालं असत?"
मग आम्ही दोन चार दुकान , वेबसाइट्स पालथ्या घालून त्यातल्या त्यात स्वस्त माल बघितला.
आता उशा, पलंग, सोफा, मिक्सर, झालच तर डायनिंग टेबल, खुर्च्या , TV (सगळ्यात महत्वाचं ), TV ठेवायचं कपाट . microwave, पुस्तक ठेवायला कपाट वस्तूंची यादी वाढतच होती मारुतीच्या शेपटा सारखी. ते जरा टप्प्या टप्प्याने घ्यायचं ठरलं.
इथे Costco नावाची दुकानाची एक मोठी साखळी आहे. पण त्याची मेम्बरशिप घ्यावी लागते. बेसिक मेम्बरशिप फी वर्षाला साधारण पन्नास डॉलर्स असते . त्या दुकानात मेम्बरशिप कार्ड दाखवल्यावरच प्रवेश मिळतो. तर आम्ही त्या दुकानात गेलो. अबब दुकान कसलं मोठाच्या मोठं warehouse होतं ते. साधारणतः एक costco स्टोर १५० हजार चौ. फूट इतकं मोठं असतं. बाहेर पार्किंग ला काही हजार गाड्या तरी उभ्या असतात. डायमंड दागिन्यां पासून टॉयलेट क्लिनर पर्यंत आणि लॅपटॉप-कॉम्प्युटर्स पासून ते कांदे बटाट्यानं पर्यंत सगळं मिळत. ह्याची खासियत अशी कि उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू अत्यंत वाजवी किमतीत मिळतात म्हणून मग इतकी मेंबर फी. पण इकडे सगळ्या वस्तू दुकानासारख्याच खूप मोठया पॅक मध्ये घ्याव्या लागतात. जसे एकदम २ डझन अंडी, दोन गॅलन (१ गॅलन म्हणजे ३.7लिटर ) दूध वगैरे. तिथली व्याप्ती, तिथली थंडी या सगळीमुळे मी इतकी भांबावून गेले होते कि मला जास्त काही डिटेल्स आठवतही नाहीत. जरी त्यानंतर येत्या सात आठ वर्षात शेकडो फेऱ्या तरी तिकडे मारली असतील.
आता मी costco पुराण बंद करते, कारण मी तासंतास त्यावर बोलू शकते ते माझं आत्ताच अतिशय आवडीचं दुकान आहे.
IKEA हाही असाच एक अगडबंब प्रकार आहे. त्याची महाकाय मोठी sign , मोठी उंच बिल्डिंग , कैक माजली पार्किंग. आता भारतातही IKEA आलय तीही स्टोअर्स बहुदा अशीच असावीत मी तिकडे कधी गेली नाहीये.
पाय दुखेस्तोवर तिकडे फिरलो. इतकं सुंदर फर्निचर, पडदे, भांडी , आणि प्रत्येक गोष्टीची खूप सारी व्हरायटी. माझी अशी भाबडी समजूत, आपल्याला आवडलेलं फर्निचर त्यांना सांगायचं कि ते घरपोच. पण इतकं सरळ साधं सोपं नसतं सगळं.
आपल्याला आवडणाऱ्या फर्निचरचा एक कोड असतो तो लिहून घ्यायचा, मग खालती तळात त्यांचं warehouseअसत तिकडे जायचं. ते परत (Costco warehouse सारखं ) अवाढव्य ! त्या भूलभूलैय्यातुन आपली रांग शोधून काढायची, तिकडे मोठ्या खाकी रंगाच्या कार्डबोर्ड च्या खोक्यात तुम्हाला आवडणार फर्निचर dismantle करून ठेवलेलं असतं. तो अत्यंत जड असा खोका, त्यांच्याकडे मोठ्या स्पेशल ट्रॉल्या मिळतात त्यावर घालायचा, लायनीत उभं राहायचं, पैसे भरायचे, तो अजस्त्र खोका ट्रॉलीतून गाडीपर्यंत न्यायचा आणि (तुमची जर मोठी गाडी असेल तर) तो त्यात भरून घरी न्यायचा.
ह्यातले काही शॉर्टकट घ्यायचे असतील, म्हणजे आपण warehouse मध्ये जाऊन शोधण्यापेक्षा डायरेक्ट कॉउंटर वर पोहचवायला सांगितलं तर त्याचे ३० डॉलर (२१०० रु ), होम डिलिव्हरी मागितली तर त्याचे १०० डॉलर (७००० रु) असे अतिरिक्त पैसे भरावे लागतात.
बरं हे फर्निचर परत वरती घरात घेऊन जायचं. मग ते त्या खोक्यातून बाहेर काढायचं. त्याबरोबर एक पुस्तिका असते त्यात वाचून वाचून खिळे, हातोडे ठोकत ठोकत ते फर्निचर बनवायचं. मग राहिलेला सगळा पसारा आवरायचा , प्लॅस्टिकची कव्हर, कार्डबोर्ड खाली नेवून recycle करायचं, कारण इकडे कचरेवाला घरी बेल दाबून कचरा घेऊन जात नाही. तो आपल्याला जाऊन टाकावा लागतो.
तर आता एवढ्या सगळ्या द्राविडी प्राणायामनंतर मग तुमच्या घरात ते फर्निचर सजत. आता हे सगळं कळल्यावर तुम्ही कल्पना करू शकता कि माझा आधीच घर सजविण्याचा उत्साह किती राहिला असेल.
आणि जर हे फर्निचर बनविण्याचा ससेमिरा टाळायचा आसेल तर मग १००-१५० (७०००-१०००० रु ) डॉलर खर्चायाची तयारी ठेवायची. असे तीन आयटम घरी मागवले, असेम्बल करून घेतले तर चौथ्या फर्निचर ची किंमत व्हायची. नुकत्याच गेलेली आम्हाला ते काही परवडणाऱ्यातले नव्हते.
शेवटी गाडीचा साईझ आणि बॉक्सेस चे साईझ ह्यांचा ताळमेळ न बसल्याने, फिरून फिरून पायाचे तुकडे पडायची पाळी आल्याने आम्ही बऱ्याचशा गोष्टी हळू हळू ऑनलाईन Walmart कडून मागवल्या, Walmart ची डिलिव्हरी फी माफ होती बहुदा. मग नंतरच्या २-३ महिन्यात आमचे बरेचसे वीकेंड्स ऑनलाईन फर्निचर बघायचे (विश्वास ठेवा त्यातही तासं तास जायचे आणि डोक्याला शीण यायचा), मागवायचे , असेम्बल करायचे, त्याचे खोके -पिशव्या recycle करायच्या ह्यातच गेले. आणि आमचं अमेरिकेतलं घरकुल नीट राहण्यायोग्य झालं.
हळू हळू आमच्या लक्षात आल कि मुलांबरोबर ते फर्निचर बनवायला मजा येते. एक फॅमिली प्रोजेक्ट केल्यासारखं वाटतं. मुलं पण त्यातून स्वावलंबन, कष्टांची, पैशाची किंमत, क्रीटीव्हिटीचा आनंद, आणि खिळे, हातोडे ह्याच्या बरोबर काम करताना लागणार कौशल्य, पुस्तकातल्या स्टेप्स समजून प्रत्यक्षातल्या वस्तूंशी त्यांचा ताळमेळ लावणं, असं बरच काही शिकत होते. आणि हे सगळं करताना आमचे पैसे .. हां .. हां.. डॉलर्स पण वाचत होते ते वेगळच!
पुढच्या भागात बघूया इकडच्या शाळा आणि शिक्षण पद्धती!
मस्त लिहिलय..
मस्त लिहिलय..
मजा येते आहे वाचायला.
मजा येते आहे वाचायला.
छान लिहिलंय .
छान लिहिलंय .
छान लिहिले आहे, मजा येतेय
छान लिहिले आहे, मजा येतेय वाचायला.
मस्तच.
मस्तच.
सुंदर
सुंदर
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिले आहे, मजा येतेय
छान लिहिले आहे, मजा येतेय वाचायला. /+७८६
अमेरीका न पाहिलेल्या भारतीयांनाही मजा येईल हे वाचायला.. खुसखुशीत आणि सारे चित्र डोळ्यासमोर उभे करत आहात
छान लिहिलंय. उत्सुकता आहे
छान लिहिलंय. उत्सुकता आहे पुढच्या भागाची.
लेखमालिका छान सुरू आहे.
लेखमालिका छान सुरू आहे. वाचतेय.
छान लिहिताय. पुढील भागाच्या
छान लिहिताय. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
मस्त! ह्यातून गेलोय त्यामुळे
मस्त! ह्यातून गेलोय त्यामुळे फील आला
ऑनलाईन फर्नीचर चा १ वाईट अनुभव आहे मात्र, दरवाजा आणि मुळ कपाटाच्या स्क्रू फिटींग ची लेवेल चुकीची होती, नव्याने होल पाडावे लागले, मनस्ताप झाला होता. इकीया चे तसे होत नाही.
वाचून दिलेल्या अभिप्रायाबद्दल
वाचून दिलेल्या अभिप्रायाबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद ! पुढचा भाग शुक्रवारी टाकेन.
छान लिहिलंय .
छान लिहिलंय .
मजा येतेय.
मजा येतेय.