https://www.maayboli.com/node/82983 -12
मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -१3 (समाप्ती )
नवीन जागी येऊन आम्ही अजून रुळू पाहत होतो , निशी आता बऱ्यापैकी खुलली होती , तोवर घरात एक नवीन नाटक म्हणजे ब्लँक कॉल्स येणे सुरू झाले , मानस घरी असताना त्याने उचलला तर घोगऱ्या आवाजात कोणी तरी बोलायचं “उल्का आय लव्ह यु “ … मी उचलला तर कोणी काही बोलायचं नाही .हे काय गौडबंगाल ? मला वाटले की यु डी आता मला त्रास देतायत की काय , पण आवाज एखाद्या स्त्री चा असावा असं मानस चं म्हणणं होतं , कोण करत असेल हे? जाई ? मानस ला आवाज कळायचा नाही आणि मी फोन घेतला की कोणी बोलायचं नाही , हे असं सुरू असतानाच मानस चे हळू हळू दारू पिणे सुरू झाले , त्याच्याशी मी प्रतारणा केली याचे दु:ख त्याला वारंवार छळायचे , त्यात या ब्लँक कॉल्स ने भर पडली . हे सगळं सुरू असतानाच माझा कोर्स पूर्ण होऊन मला एक चांगली नोकरी मिळाली , काही महिन्यातच प्रमोशन होऊन पगारही चांगला वाढला. माऊ साठी सासूबाई सुनीता वहिनींकडेच रहात असत , पण एकदा त्या दोघींचे जोरदार भांडण झाले आणि मानस सासूबाईंना घरी घेऊन आला. आणि मग पुढे शेवटपर्यंत त्या माझ्या कडेच राहिल्या , पण हळूहळू मानस चे पिणे वाढत गेले , त्याचे प्रमाण ईतके वाढले की दिवस रात्र तो दारू पिऊन झोपलेला राहू लागला , घराची संपूर्ण जबादारी मी उचलली , तिकडे सुनीता वाहिनी आणि ईकडे मी , मला कधी कधी असं वाटे की सासूबाईंना आयुष्यभर कष्ट करून त्यांच्या दोन मुलांना आणि त्यांना सांभाळणारे दोन बैल आयते मिळाले आहेत , कारण दोन्ही सुनांनी घराची जबाबदारी उचलली तरी त्यांच्या राहणीमानात आणि ठसक्यात काहीही बदल झाला नाही . माहिती नाही का पण मीही त्यांचे सगळे ऐकत गेले त्यांना मान देत गेले , त्यांनी मला कधीही विचारले नाही पण मी मात्र खाण्यापिण्यासकट त्यांचे सगळे लाड पुरवत गेले , निशी मोठी होत गेली तसे मी न सांगताही तिला बऱ्याच गोष्टी कळू लागल्या , यु डी नंतर पुन्हा कधीही दिसले नाहीत , ब्लँक कॉल्स ही आपोआप थांबले ,मात्र पुढे कित्येक वर्ष मानस मला त्यावरून बोलत राहिला , माझ्या पिण्याला तु जबाबदार आहे असं म्हणत राहिला , त्याच दरम्यान आलेला एकाकीपणा घालवण्यासाठी आणि मन:शांतीसाठी मी अनेक वर्क शॉप्स केले ज्याची सुरूवात कळत नकळत पणे मला यु डी नेच करून दिली होती . पुढे प्राणायाम , ध्यानधारणा यामध्ये मी जशी जशी रमत गेले तशी एकेका गोष्टीची मला उकल होऊ लागली , असंख्य पुस्तके वाचनात आली ,आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात त्यामागे काही कारण मीमांसा असते त्याचं आकलन होऊ लागलं , थोडक्यात डिकोडिंग जमू लागलं , मग मनस्ताप आणि मी अन्याय का सहन करायचा या आणि अशा गोष्टी मनात येईनाशा झाल्या , अशीच जवळ जवळ वीस एक वर्षे गेली , निशी, माऊ मोठ्या होत गेल्या ,माऊ माझ्याकडे येऊन महिना महिना राहू लागली , दोन्ही मुली त्यांची गुपितं , त्यांचे सारे काही माझ्याशी शेअर करू लागल्या , वहिनींचा ताठा वयोमानाप्रमाणे कमी कमी होत जाऊन शेवटी त्या अगदी माझ्याशी सख्ख्या बहिणी ईतक्या प्रेमाने वागू लागल्या , सासूबाईही रूपयात चार आणे एवढ्या बदलल्या . मानसने ही ‘A.A च्या मीटिंग्ज अटेंड करून स्वतः:च स्वतः:चे पिणे प्रयत्नपूर्वक थांबवले .आणि आम्ही सर्व जण बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालो , याच दरम्यान एकदा मी आणि निशी काही खरेदी करण्यासाठी लक्ष्मी रोड वर फिरत होतो , समोरून बॉयकट केलेlल्या , एका जाडसर स्त्री ने “उल्का … अशी हाक मरून थांबवलं , तिने नाव सांगेपर्यंत मी तिला ओळखलेच नाही , ती जाई होती , “किती बदलीयेस तु “ असं आम्ही दोघीही एकमेकींना म्हणालो , निशीला बघून तिला खूप आश्चर्य वाटलं मग मला ही बघून तिने म्हटले “उल्का तुझे लांबसडक केस का कापलेस ? पण खरं तर हा हेअरकट तुला छान सूट होतोय आणि तु आत्ता खूपच जास्त छान दिसतेयस पूर्वीपेक्षा , पूर्वी तुझा चेहेरा सुंदर दिसायचा आत्ता पूर्ण व्यक्तिमत्व सुदंर दिसतंय अगदी बहरल्यासारखं “ती खूप कौतुकाने बोलत होती पण मला जास्त बोलायचे नव्हते , मागचे पाश मागेच ठेवायचे त्याला आता पुन्हा कशाला उजाळा द्या असं मला वाटलं , पण तिच्या बोलण्यामुळे काही गोष्टींची उकल झाली . मी तिकडून निघून गेल्यानंतर , येणारे ब्लँक कॉल्स माझी वाहिनी करत होती , शिवाय ती मानस ला ही फोन करून त्याला काहीबाही माझ्याबद्दल सांगत असे जे एखाद्या नवऱ्याला त्याच्या बायकोबद्दल ऐकलेले सहन होणार नाही , आता मला कळले मानस अचानक ईतका व्यसनाधीन का झाला होता . मला जाब विचारायचा सोडून त्याने तिचे ऐकावे याचे मला वाईट वाटले पण आता या सर्वांचा काय उपयोग ? यु डी ने जाई चे लग्न करून दिले होते आणि बरीच वर्ष एकट्याने काढल्यानंतर आता दोन वर्षांपूर्वी त्यानेही त्याच्याच क्लास ला येणाऱ्या त्याच्यापेक्षा खूपच लहान असणाऱ्या मुलीशी लग्न केले होते . मग त्याने जाई शी लग्न का केले नाही ? पण असो मला आता कुठल्याही प्रश्नांची उत्तरे नको होती . तिचा निरोप घेऊन आम्ही निघालो , निशी काही बोलली नाही , पण खरंच आजवर सर्वात जास्त तिनेच मला समजून घेतले होते . पुढे तिला जर्मन भाषेसाठी स्कॉलरशिप मिळाली आणि पुढच्या शिक्षणासाठी ती जर्मनीला गेली , माझी नोकरी चालू असतानाच मी परत माझ्या आवडीच्या विषयांमध्ये अभ्यास सुरू केला. कालांतराने सासूबाईही गेल्या , मानस मुंबईला एका व्यसनमुक्ती केंद्रात पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून काम करू लागला . आणि एके दिवशी एका पहाटेच्या ध्यानात मला एक विलक्षण दृश्य दिसले .ते दृश्य ईतके जिवंत होते की जणू काही समोर बसून मी एखादे नाटक पहाते आहे .
“ वेदांतात अधिकारी पदावर असणारे एक वयस्कर गुरुजी आणि स्वतः:च्या सौंदर्याचा तसेच आपल्या हुशारीचा गर्व असलेली त्यांची एक तरुण शिष्या ,दोघांचे द्वैत आणि अद्वैत या विषया वर वाद -विवाद चालू आहेत . शिष्या जिंकते, गुरू हरतात , त्या एका वाद- विवादात जिंकल्याच्या धुंदीने ती स्वतः:ला गुंरूंच्या जागी समजायला लागते, आणि अधिकार पद हवे हा एकच ध्यास तिला लागतो , त्यासाठी काय वाट्टेल ते करायची तिची तयारी असते , मग ती स्वतः:च्या सौंदर्याचा उपयोग करून शेवटी तिच्या ब्रह्मचारी गुरूंना तिच्या प्रेमात पाडते , लग्न करण्यास भाग पाडते ,तिच्या फसव्या प्रेमात अंध झालेल्या गुरूना शेवटी आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि एका क्षणिक मोहाला बळी पडून आपण गुरूपदाला काळिमा फासला या धक्क्याने गुरू मरण पावतात . अहंकाराच्या धुंदीत ही मृत्युशय्येवर असलेल्या आपल्या वडिलांकडे पण पूर्ण दुर्लक्ष करते ,मृत्युशय्येवर असलेले वडील तिच्याकडे अपेक्षेने बघत आपला प्राण सोडतात , त्यानंतर दिसली एक मैत्रीण जी तिला सतत सावध करायचा प्रयत्न करत असते . हे दृश्य संपले आणि मग अगदी दूरदर्शन वर दाखवतात तसे गोल गोल चक्र फिरले आणि एक आवाज मला ऐकू आला , तो आवाज माझ्या कानांवर पडत नव्हता तर आतून कुठून तरी ऐकू येत होता , “ स्वप्नगंधा ,केवळ अधिकाराच्या हव्यासापायी आणि गर्वापायी तु तीन लोकांचे ऋण आपल्याबरोबर या जन्मात घेऊन आली आहेस . आणि ते ऋण फेडणे हे या जन्मातील तुझे आद्य कर्तव्य आहे . हा जन्म तुझा फक्त आणि फक्त त्यांची सेवा करणे ,त्यांना सांभाळणे आणि त्यांचे ऋण फेडणे यासाठी द्यावा लागेल . “
आवाज थांबला आणि मी भानावर आले . ती उन्मत्त तरुण स्त्री स्वप्नगंधा कोण ? बाकीचे तीन कोण ? हे कोडं कालांतराने गुरूजींनी सोडवलं. ती स्वप्नगंधा म्हणजे मीच होते , ते वयोवृद्ध गुरू म्हणजे मानस आणि तिचे वडील म्हणजे माझ्या सासूबाई आणि ती मैत्रीण म्हणजे निशी . अशी ही पात्र योजना ऐकून मला अर्थातच अविश्वास , नवल ,बकवास ,भंकस अशा बऱ्याच भावना येऊन गेल्या पण हळूहळू तर्कसंगती लागत गेली . लॉजिक प्रत्येक ठिकाणी फिट बसत होतं . असो … म्हणून म्हटलं प्रत्येकाचं भवितव्य हे आधीच लिहिलं गेलं असतं , आपण फक्त कळसूत्री बाहुल्या असतो हे ज्ञान कुणाला आधी येतं कुणाला नंतर आणि कुणाला कधीच येत नाही . !!!!...
ईथपर्यंत स्टोरी सांगून उल्काताई थांबली . पहाट झाली होती , तिच्या पर्णकुटीत पक्ष्यांची किलबिल ऐकू येऊ लागली होती . एक आख्खी रात्र आम्ही टकटकीत जाग्या होतो . मी तिच्या कथेत एवढी रंगून गेले होते की मी तिच्याच कथेत एक पात्र होऊन वावरतेय असं एव्हाना मला वाटू लागलं . अवघडलेली मान सरळ करत बसल्या बसल्या मी पाय लांब केले . दोघींमध्ये निस्तब्ध शांतता होती . बोलावसं वाटत नव्हतं तरी मनात बरेच आश्चर्योद्गार येऊन गेले , तिच्या आयुष्यातलं हे वळण मला अनपेक्षित होतं ,मी हळूच उठले ,काही न बोलता सरळ आत गेले आणि बेडवर झोपून घेतलं .स्वप्नात मी न पाहिलेले यु डी , जाई,स्वप्नगंधा ,मानस ,असलं काही बाही येत राहिलं , जाग आली तेव्हा जवळजवळ दीड वाजला होता , उल्का ताईचा किचन मधून गुणगुण्याचा मधुर आवाज येत होता , ती बहुधा स्वयंपाक करता करता गात असावी . घरभर खमंग दरवळ सुटला होता , त्या वासानेच कडकडून भूक लागली . मी उठले , फ्रेश होऊन किचनमध्ये आले , टेबलवर सर्व पदार्थ मांडून ती माझी वाट बघत होती .नेहेमी दिसते तशीच दिसत होती , नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत आणि तजेलदार . रात्रभर जागरण करून माझे मात्र डोळे सुजलेले आणि चेहेरा जड झालेला . काय यार कॉम्प्लेक्स आणते ही तरुण लोकांना .मी जरा जेलस झाले ,पण भोजन मात्र सुग्रास होतं . किती तरी दिवसांनी मी मनसोक्त खाल्लं . अगदी डाएट चा धुव्वा उडवत . नाही म्हणायला शौर्य ची खूप आठवण आली, त्याला महाराष्ट्रीयन पदार्थ खूप आवडतात .
समाप्त !
हा ही भाग छान आहे.
हा ही भाग छान आहे.
खूप सुंदर मालिका. !!!
खूप सुंदर मालिका. !!!
<<<खूप सुंदर मालिका. !!! >>>>
<<<खूप सुंदर मालिका. !!! >>>>
सहमत..
अश्विनीमामी , सुप्रिया१२३
अश्विनीमामी , सुप्रिया१२३ ,धनवन्ती खूप खूप धन्यवाद !..
खूप छान, शेवट ही अगदी चांगला
खूप छान, शेवट ही अगदी चांगला वाटला
उल्का च स्वप्न आणि त्याची उकल, संपूर्ण कथेचं सार सांगून जातात
पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा
कित्येक दिवसांनी इथे एक छान
कित्येक दिवसांनी इथे एक छान दीर्घ कथा वाचायला मिळाली. धन्यवाद सुजाताजी.
तुम्ही नियमित पणे कथेचे पुढील भाग पोस्ट केल्यामुळे आधीचा भाग विस्मरणात जाऊन रसभंग होणे टळले.
तुमच्या लिखाणाची शैली आवडली.
कथेत लॉजिक शेवटपर्यंत टिकून राहिले....कथा भरकटली नाही.
अशाच उत्तमोत्तम कथांची मेजवानी आम्हाला भविष्यात द्या.
पुलेशु.
अतिशय सुंदर कथामालिका... !!!
अतिशय सुंदर कथामालिका... !!!
लिखाणात सातत्य ठेवल्याने वाचताना पण मजा आली.
छान शेवट !
छान शेवट !
manya , स्वाती२, आबा. एस :
manya , स्वाती२, आबा. एस : तुम्ही दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभारी आहे . खूप खूप धन्यवाद !..
सुजाताजी धन्यवद,
सुजाताजी धन्यवद,
खुप छान आहे कथा, भागहि पटापट येत गेले त्यामुळे लिन्क तुटली नाहि. कथा कुठेतरि आतमधे भिडत गेली. अस वाटत गेल की ही सत्य कथा आहे. पहाटेच्या ध्यानात जे दिसल ते कथेत लॉजिकली अगदी फिट बसत.
लिहित रहा, खुप छान लिहिता तुम्ही
सुर्यकान्त : खूप मनापासून
सुर्यकान्त : खूप मनापासून आभारी आहे !..
सुंदर मालिका.
सुंदर मालिका.
आता नीट वाचेन ही मालिका.
आता नीट वाचेन ही मालिका. समाप्त झाल्यावर मगच वाचायचे ठरवले होते.