मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -१२

Submitted by Sujata Siddha on 10 February, 2023 - 03:11

https://www.maayboli.com/node/82983 -11

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -१२

त्या दिवशी शनिवार होता , निशी ला शाळेला सुट्टी होती , दुपारी मी घरी निशी चा अभ्यास घेत बसले होते. वाहिनी आणि ऋचा पलीकडच्या खोलीत झोपल्या होत्या तितक्यात यु डी आणि जाई घरी आले , दोघेही कपडे बदलून डायनींग टेबल पाशी येऊन बसले , आणि यु डी ने मला जेवण वाढण्यासाठी हाक मारली , क्षणभर खूप राग आला , मी निशी चा अभ्यास घेतेय दिसतंय ना यांना ? हाताने घेता येत नाही का?सगळं टेबल वर तर मांडलंय ना ?आणि त्या जाईला काय होतंय हाताने घ्यायला ?जाईच्या अशा आयतं जेवण्याचाहि मला राग आला , ही कोण माझी ? हिचं का मी करत बसू ? यु डी चे हाका मारणे चालूच होते ,”मी निशीचा अभ्यास घेतेय , तुम्ही जरा हाताने घ्या किंवा जाईला सांगा “ मी आवाजात शक्य तितका शांतपणा आणत म्हणले पण यु डी ला ते आवडले नाही , त्याची ऑर्डर होती ती , ऑफिस मध्ये सगळे जसे पट्कन त्याचं ऐकतात तसे ईथेही झाले पाहिजे असा त्याचा दंडक होता , रागारागाने मी उठले आणि जेवण वाढले , माझ्या धुसफुसण्याकडे यु डी ने दुर्लक्ष केले , जेवण करून ते दोघे दुसऱ्या खोलीत गेले , यु डी ने त्याचा ग्रामोफोन काढला मग ती दोघे गजल्स ऐकत बसली , स्वयंपाक घरात आवरा आवर करताना मी त्या दोघांना पहात होते , काही महिन्यांपुर्वीचे दिवस मला आठवले ,किती बदललेत हे , आधी वागत होते ते यु डी खरे ? की हे ? किंबहुना त्यांनी मला आधी एवढं डोक्यावर बसवून ठेवलं होतं की मी म्हणजेच त्यांचं सर्वस्व , त्या पार्श्वभूमीवर हे त्यांचं काय चालू आहे ? आधी जी गोष्ट मिळणार नाही अशी शक्यता असताना ती मिळवण्यासाठी आपण जीवाचं रान करतो आणि मग एकदा का ती मिळाली की त्या गोष्टीची किंमत शून्य होते , ही मानवी प्रवृत्ती आहे , यु डी च ही तेच झालं होत का ? जाई तर होतीच की त्यांच्या आयुष्यात आधीपासून , मग असं तर नाही ना की जाई हे सगळं घर सांभाळणे वैगेरे करू शकत नाही , तिला स्वयंपाक वगैरे येत नाही म्हणून माझ्या बावळट स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्याना हवे तसे त्यांनी मला ट्रेन करून घेतले आणि त्या दोघांच्या सेवेला लावले ? मनात हा विचार येताच मला रडू कोसळलं , तितक्यात पाणी पिण्यासाठी म्हणून यु डी बाहेर आले ,मला रडताना बघून त्यांचे डोके फिरले , “रडायला काय झालंय तुला ? सगळं काही मानसारखं झालंय तुझ्या , तुझ्यासाठी मोठ्या फ्लॅट चा घाट घातला , नक्की कशाचं रडू येतंय तुला , काय कमी पडतंय ? “ त्यांच्या या अशा रूड बोलण्याचं मला मनस्वी दु:ख झालं , काही दिवसांपूर्वी हाच यु डी माझी किती आर्जवं करत असे , मी क्षणभर हसावं म्हणून काय काय करत असे , रडता रडताच एक रागाचा कटाक्ष त्यांच्याकडे टाकून मी सरळ बाहेर गेले आणि दाराजवळच्या जिन्यात जाऊन बसले ,हे सगळं यु डी च्या घरी निषिद्ध आहे हे माझ्या गावीही नव्हते , यु डी चा राग मी आत्तापर्यन्त पहिला नव्हता . सुपर्णा ने एकदा फोन करून सांगितले होतेच की , पण मी विसरून गेले होते . “उल्का आत ये “ यु डी गरजला , मी लक्ष दिले नाही ,त्याने पुन्हा एकदा हाक मारली पण तरीही मी लक्ष दिले नाही , त्यावर तो तरातरा बाहेर आला आणि त्याने अक्षरश: एका हाताने फरफटत मला आत खोलीत नेले . मी ओरडत होते , हात सोडवायचा प्रयत्न करत होते पण त्याच्या हाताची पकड विलक्षण घट्ट होती , माझा आवाज ऐकून वाहिनी आणि ऋचा बाहेर आल्या , निशी भेदरून बघत होती , जाईही तिथेच उभी होती , खोलीत त्याचे माझे जोरदार भांडण झाले , मी ही खूप चवताळले होते ,त्याने मला शांत आवाजात बोल असं सांगायचा खूप प्रयत्न केला पण मी त्याचे काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते , गेल्या काही दिवसातलं माझं सगळं फ्रस्टेशन मी त्याच्यावर काढत होते अगदी बेभान होऊन ओरडत होते , त्याच वेळी खाडकन आवाज झाला आणि माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले , यु डी ने माझ्या थोबाडीत मारली होती . एका सेकंदात मी भानावर आले , एकदम शांत बसले , पण त्यानंतर कितीतरी वेळ मी अवाक होते . मी कोणाचा तरी आज मार खाल्ला होता . लहानपणी आईने कधी एक बोट लावले नव्हते आणि आज तिशीच्या उंबरठयावर मी एका परक्या पुरूषाचा मार खाल्ला होता … … !..
त्याच दिवशी संध्याकाळी मी बॅग भरली ,अजून स्वतः:चे पुढचे धिंडवडे मला काढायचे नव्हते , भाऊ -वाहिनी कोणाशीही न बोलता निशी ला उचलले आणि आईकडे निघून आले . दारातूनच रिक्षावाल्याला बिल देत असताना निशी आनंदाने आज्जी … म्हणून पळत आत गेली ,जणू एखाद्या कोंडवाड्यातून तिची सुटका झाली होती , मी मात्र विलक्षण थकले होते , आई बाबा मला बरंच काही विचारत होते पण माझ्या मेंदूपर्यंत ते शब्दच पोहोचत नव्हते , पुढे कित्येक दिवस मी अशीच वावरत होते ,मध्यंतरीच्या काळात बातम्या ही बंद झाल्या होत्या , आपल्या एका आततायी पाऊल उचलण्याने आपण निशीचेही भवितव्य टांगणीला लावले आहे या विचारांनी मला रात्र रात्र झोप लागेनाशी झाली . यु डी ने मिनीनाथ बरोबर पाठवलेले पैसे मी परत पाठवून दिले. भाऊ आणि वाहिनी यु डी कडेच राहिले . मी आल्यापासून ताई ,आई बाबा सगळेच चिंतेत होते ,यु डी ने एकदा दोनदा घरी फोन केले पण बाबांनी त्याला काही दिवस फोन करू नकोस असे सांगितले .
मी जरी कोणाशीही बोलत नसले डोक्यात मात्र प्रचंड उलथापालथ चालू होती ,मी परत आले आहे हे कळताच ताई भेटायला आली , मग तिनेच मला पोस्ट ग्रँज्युएशन कर म्हणून सल्ला दिला आणि नारळकर इन्सिटीट्युट ला ऍडमिशनही घेऊन दिली ,कोर्स सुरू झाला तशी मी पूर्वपदावर येऊ लागले , एकदा सकाळी क्लास वरून परत येत असताना ,एक ‘ ग्रीन कलरची , स्पिरिट’ माझ्या शेजारी येऊन थांबली , ही तर मानस ची गाडी , मी वळून पाहिले तर तो मानसच होता !.. किती तरी वेळ अविश्वसाने मी त्याच्याकडे पाहतच राहिले , त्याचा अगदी हाडांचा सापळा झाला होता , डोके मोठे आणि शरीर लहान असा काहीतरी चमत्कारिक दिसू लागला होता, मी काही बोलणार तेवढ्यात तोच म्हणाला , “उल्का ?..किती खराब झालीयेस . कुठे चालली आहेस ? बस गाडीवर सोडवतो .”
मी त्याला म्हटलं नको ,” मी जाईन बसने . जवळच आहे स्टॉप . “
“बरं मग चल , समोरच्या गाडीवर ज्यूस पिऊ “ असं म्हणत त्याने गाडी बाजूला घेतली , मी ऍपल ज्युस च्या गाडीजवळ उभी राहिले , त्याने दोन ग्लास मागवले ,एकमेकांशी शब्द ही न बोलता आम्ही ज्युस प्यायलो . काय बोलणार ? जवळजवळ सहा महिन्यांनी आम्ही असे अचानक भेटलो होतो , मी विचार करत होते , का हा असा झाला असेल ? संसाराच्या -भवितव्यच्या चिंतेने की लोकांना काय वाटेल याच्या काळजीने ? त्याचा तो अवतार पाहून मला भडभडूनही येत होते पण वरकरणी काहीही न बोलता ज्युस पिऊन झाल्यावर मी निघाले , त्यानेच मला घरी गाडीवर सोडवले , त्याच्या मागे बसताना खूप सुरक्षित वाटत होते . हे सगळे माझ्या मनाचे खेळ होते कि पूर्व संस्कारांचा पगडा माहिती नाही .
घरी आले नाही तोच फोन खणखणला , “ झाला ऍपल ज्युस पिऊन ? “
मी एकदम शॉक झाले , फोन यु डी चा होता .
“बोल ना झाला का ऍपल ज्युस पिऊन ?”
“ तुम्ही काय चोवीस तास वॉच ठेऊन असता का माझ्यावर ? “
“ शेवटी तुला तिथेच जायचे होते परत ,तर आली कशाला होतीस ?दोन वर्षांच्या करारावर एवढं मोठं घर घेतलं त्याच आता काय करायचं ? माझं तु प्रचंड नुकसान केलेलं आहेस .आर्थिक आणि मानसिक ,कळतंय का तुला ?” हे यु डी बोलत होते ? या सगळ्या प्रकरणाचा आरंभ माझ्याकडून झाला होता ? माझ्या संसारात मी समाधानी नाही हे यांना कळलं म्हणून यांनी माझा गैरफायदा घेतला असं मी ही म्हणू शकले असते ना ? नुकसान जेवढं यांचं झालंय त्याच्या तिपटीने माझं झालंय ना ? असं असताना यांनी असा आव का आणावा ? मी तर यांना वैचारिक पातळीवर अतिशय प्रगल्भ आहेत असं समजत होते . सतत मला वाटायचं की विचारी बुद्धिमान आणि प्रगल्भ माणसे खूप छान संसार करत असतील , पण नाही आता कळलं की वरची सर्व आवरणं उघडी पडली की माणूस त्याच्या मूळ स्वरूपात येतो हेच खरं .यांच्यापेक्षा खेड्यातली अशिक्षित लोकं समरसून संसार करतात .
अतिशय शांत पण अतिशय ठाम आवाजात मी उत्तरले .
“ कोणाचं कोणामुळे किती आणि कसं नुकसान झालंय हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही , त्यामुळे आता राहता राहिला माझा प्रश्न तर कुठे जायचं ते अजूनही माझ्याच हातात आहे . तुम्हाला त्याची काळजी करायचं कारण नाही .पुन्हा फोन करू नका “
प्रत्येक वेळी आपण जे ठरवतो ते घडेलच असे नाही ,पण नेमका आपण चुकीचा निर्णय घेतो तेव्हा मात्र पट्कन गोष्टी जुळून येतात आणि घडतातही , मग त्या चुकांचं खापर आपणच आपल्या माथ्यावर फोडून आयुष्यभर त्याचं अपराधी पण वागवत बसतो कदाचित यालाच दैव म्हणत असावेत . आता फक्त आयुष्य निशी साठी काढायचं असं मी ठरवलेलं असताना , एके दिवशी मानस निशीला घ्यायला आला , आम्ही यु डी कडे राहायला गेलो हे त्याला निशी कडून कळले होतेच आणि परत आलो ते ही त्याला कळले , आता तो बाहेरूनच तिला हाक मारत होता , निशीबरोबर मी ही बाहेर गेले तसा त्याने माझ्याकडे घरी परत यायचा विषय काढला , “ मी तुला कधी बोललो नाही उल्का कारण बोलून दाखवायचा माझा स्वभाव नाही , पण तू आणि निशी तुमच्या दोघींशिवाय मी नाही राहू शकत गं .. “
“हे तु आत्ता बोलतोयस मानस ? तुला मी हवी आहे या एका वाक्यासाठी मी किती वर्ष तडफ़डले माहिती नव्हतं का तुला ? बघ ना काय होऊन बसलंय ? “
“अगं हो .. नाही येत लक्षात माणसाच्या की आपल्या न बोलण्याचा समोरच्यावर एवढा परिणाम होत असेल , मला काय माहिती गं की तु एकदम असं पाऊल उचलशील ? पण उल्का अजूनही वेळ गेलेली नाहीये , घरी काही फारसं माहिती नाहीये , तु घरातल्या भांडणांमुळे निघून गेलीयेस असंच सगळ्यांना वाटतंय , त्यामुळे आता आपण दोघांनी वेगळं राहावं असं सगळ्यांचं मत बनलं आहे , सुदैवाने बाबांनी पाषाणला घेतलेल्या जागेचे काही पैसे मिळाले आहेत , त्यातले निम्मे वहिनींना दिले आणि आता आपण पण वेगळे राहू शकतो .मी कसब्यात एक घर बघितलं आहे , तुला पहायचं असेल तर जाऊयात बघायला “ मानस आपल्या भावाला , वहिनीला , माऊ ला सोडून चक्क माझ्याबरोबर आणि निशी बरोबर राहणार ? खूप अविश्वसनीय गोष्ट होती , घरी आल्या आल्या मी आई-बाबांना सांगितलं की मानस परत ये म्हणतोय , वेगळं राहू म्हणतोय , ते दोघे काही बोलले नाहीत .फक्त दरवेळेला कुठलाही निर्णय एकदम भावनेच्या भरात घेऊ नकोस असेच त्यांचे म्हणणे होते .
मी नवीन घरी राहायला आले ,मी आणि मानस दोघांनी घर लावलं , या दरम्यान एकदा पुन्हा गावातल्या घरी मानस च्या आग्रहाखातर मी गेले , सासूबाई आणि वहिनींच्या पाया पडून माफी मागितली , सासूबाई काही बोलल्या नाहीत फक्त एवढंच म्हणाल्या की निशी घरात नव्हती तर घर कसं सुनं सुनं वाटत होतं ,वाहिनी घुश्शात होत्याच , मी विचार केला की जाऊ दे ,मोठ्या आहेत मी पडती बाजू घेऊन चुकले असं म्हटलं तर काही लहान होणार नाही , पण त्या म्हणजे अगदी हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं मी पाय पडायला वाकले असताना मला डावलून सरळ पुढे निघून गेल्या . मग मानस ने आळीपाळीने मला प्रत्येकाच्या घरी नेले . चुलत सासूबाई , जाऊ बाई सगळी कडे एकच गोष्ट करायची, नमस्कार करायचा , चुकले म्हणायचं . हे सगळं करायला मानस ने मला बळजबरी नव्हती केली आणि खरं तर माझ्या कृतीने ईतर नातेवाईकांच्या आयुष्यात काय फरक पडला होता ? पण मानस चे म्हणणे की त्यांनी तुला ऑफिस ला एवढे फोन केले पण तु कोणाशीही बोलली नाहीस याचा त्या सगळ्यांच्या डोक्यात राग आहे , आता काय सांगू त्याला की हे फोन आलेले मला ठाऊकच नव्हते म्हणून ? पण माझ्या अपराधाच्या बोजाने मीच ईतकी वाकले होते की हे करून हलकं वाटेल असं मला वाटत होतं .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालाय हा भाग

मागच्या भागात यू. डी. च अस अचानक बदलणं खटकल होत पण अनपेक्षित नव्हतं, उलट लेखिकेने "see I told you...." moments वाचकांना दिली.
उल्काच्या दृष्टीने यू. डी. ला आदर्श मांडताना , वाचकांच्या मनात त्या पात्राबद्दल शंका निर्माण केलीत.
एकंदरीत कथेचा प्रवाह, लेखनशैली सुरेख. उल्का च आयुष्य, ते प्रसंग तिच्या बरोबर अनुभवतोय अस वाटत.

मागील भागात एक प्रश्न उल्का ने केला होता
>>>>तमाम सती सावित्रीना माझा हाच प्रश्न होता की तुमच्या आयुष्यात यु डी सारखं जीवाला जीव देणारं पात्र आलं असतं तर तुम्ही काय केलं असतं ?

हे विचार करण्यासारखं आहे, एका जॉब ला कंटाळून दुसरा जास्त पगाराचा जॉब घेतानाही त्यात किती future आहे ह्याचाही विचार करतो पण हल्ली संसाराला कंटाळलो/ली आणि तेवढ्यात दुसरा पर्याय दिसतो म्हणून घटस्फोटा पर्यंत जाणारी प्रकरण दिसतात आजूबाजूला

ह्या कथेतील नायिका - उल्का ह्यापुढे पहिल्या ,दुसऱ्या पर्यायावर न अवलंबता स्वतःच्या पायावर पुढची वाटचाल करेल अशी आशा आहे, पण लेखिका महोदया हा प्रवास कसा रेखाटतात ह्याची उत्सुकता आहे

manya : सखोल आणि सुंदर विवेचनाबद्दल खूप आभारी आहे . खूप छान वाटलं. ,
आबा. : खूप खूप धन्यवाद !..