अभिलाष टोमी, नाव ऐकलंयत?
नसेल तर थोडक्यात ओळख सांगतो:
कमांडर (निवृत्त) अभिलाष टोमी, भारतीय नौसेना, कीर्ति चक्र, नौसेना पदक.
"सिंगलहॅंडेड नॉनस्टॉप सर्कमनॅव्हिगेशन अंडर सेल" करणारा हा पहिला भारतीय. म्हणजे एकहाती विनाथांबा शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला भारतीय. नौसेनेत सेवारत असताना त्यानं हा भीमपराक्रम केला होता. त्यावेळी भारत सरकारने कीर्तीचक्र देऊन त्याचा सन्मान केला होता.
तर हा बहाद्दर अभिलाष आपल्या छत्तीस फुटी शिडाच्या नौकैवर स्वार होऊन एका शर्यतीत भाग घेत आहे. सध्या पॅसिफिक महासागरात आहे, . आत्ता तिथे ताशी ७० किमी वेगानं वादळी वारे वहात आहेत. वाऱ्याचे झोत कधी कधी सुमारे ९० ते १०० किमी वेगाचं असतात. सुमारे नऊ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. नऊ मीटर म्हणजे साधारणतः तीन मजली इमारतीएवढ्या! क्षणभर डोळ्यासमोर चित्र आणा. दर ९ सेकंदांनंतर येणारी सुमारे तीन मजली लाट बोटीला २०-२५ फूट उंच उचलणार आणि लाटेच्या डोक्यावरून खाली फेकणार. आख्खी बोट थरथरणार. तोपर्यंत पुढची लाट तिला उचलायला तयार. येणारी प्रत्येक लाट जणू नावेचा घास बनवून ग्रहण करण्यासाठीच उसळते आहे. पण नाव अजून शाबूत आहे! येणाऱ्या प्रत्येक लाटेवर स्वार होते आहे. पण लाटेनं उचलली की हापटली. की नऊ सेकंदात पुन्हा उचलून पुन्हा आपटली. पुन्हा वर, पुन्हा खाली, आणि तडाखा! जणू कालिंदीच्या डोहात कृद्ध कालियासर्प फण्यामागून फण्यांचे वार कृष्णावर करतो आहे! हे कालियामर्दनाचं तांडव चालू असताना ताशी शंभर किलोमीटर वेगाने पिसाट वादळवात रोरावत आहे. असा वारा की लाटांवरून उडणारे तुषार हे जणू अर्जुनाने केलेला शरवर्षाव आहे. उघड्या अंगावर बरसला तर शरपंजरी पडण्याचीच वेळ यावी! घोंघावता वारा नौकेला झटतो आहे, लोटतो आहे. अहो शिडं तर केंव्हाच उतरवली आहेत अभिलाषनं. या वाऱ्यात मुख्य शिड फडकत ठेवलं तर बोटीचा कधीच कपाळमोक्ष व्हायचा!
तरीही या वाऱ्याच्या आणि लाटांच्या समरात एक भली मोठी लाट रोरावत आली आणि नौकेला एक तडाखा देऊन भुईसपाट करती झाली! महासागरात कुठली भुई काय अन् सपाट कसली, नौकेला आडवं पाडून, पाण्याखालती लोटून गेली. इतर लाटा पश्चिमेकडून येत होत्या पण ही आली उत्तरेकडून. एका नियमीत पश्चिमेकडून येणाऱ्या लाटेवरून नौका खाली घसरत असताना तिला एका बाजूने वेगात येणाऱ्या लाटेनं आपल्या घट्ट पकडीत घेतलं. जबरदस्त ताकदीनं फटका देत कडेवर आडवं केलं. कुशीवर आडव्या झालेल्या नौकेला असं काही ढकलून रेटलं की साठ फुट उंचीची डोलकाठी पूर्ण पाण्याखाली गेली. लाटेचा जोर असा होता की आख्खी लाट बोटीवरून निघून गेली. कित्येक सेकंद, नव्हे मिनिटभर बोट संपूर्णपणे पाण्याखाली होती! पण जशी लाट ओसरली, तशी ही एका कडेवर आडवी झालेली भली बोट, आपसूक हळूहळू पुन्हा सरळ झाली! नशीब बलवत्तर होतं अभिलाषचं. एकदा नाही, हे गेल्या चोवीस तासांत दोनदा घडलंय, दोनदा. छोटं वादळासाठी म्हणून एक शीड लावलं होतं, दिशा देण्यासाठी. त्याच्या या झंझावातात चिंध्या चिंध्या झाल्या आहेत.
गेले छत्तीस तास या निसर्गाच्या प्रलयंकारी अवताराशी झुंज देतोय आपला बहाद्दर अभिलाष. विचार करा, चोवीस तास एका रोलर कोस्टरमध्ये फिरतोय, वर, खाली, वर, खाली, वर...! एकटा आहे, एकदम एकटा. पालथी झाल्यावर बोटीत पाणी घुसलंय. घुसणारंच! सगळं ओलं झालंय, सगळं सामान इतस्ततः परसरलं आहे. बॅटरीचा का फ्यूजचा प्रॉब्लेम आल्यानं लाईट जातायत-येताहेत. तापमान आहे १०च्या आसपास, कडाक्याची थंडी. पायाखाली बोट क्षणभर स्थिर नाही. कुठे तरी धरल्याशिवाय ना बसता येत, ना झोपता येत, ना साधं उभं रहाता येत. झगडून, झगडून थकला असेल आता.
पण बाहेर थैमान चालूच आहे. आणखी दहाबारा तास तरी वादळ चालूच रहाणार आहे. मग निवळेल हे वादळ... आणि मग पुढचा त्रास सुरू होणार. वादळ निघून जातं. वारं कमी होतं पण नुसत्याच लाटा उसळत रहातात. आणि मग त्यांना तोंड द्यायला नौकेला वेग लागतो, पण त्यासाठी पुरेसा वारा नसतो. त्या लाटांचा आवेग कमी होईपर्यंत नौका कमालीची हिंदकळत असते. हताश होऊन पहाण्याव्यतिरिक्त नाविकाच्या हाती काही नसतं. अभिलाष या सगळ्यांशी झुंजतोय, झुंजणार आहे. हजार मैलांच्या परिसरात कुठेही जमीन नाही, कुठेही बेट नाही, कुठल्याही खंडाचा किनारा नाही. आसरा घ्यावा कुणाचा? तिथे काही घडलं तर त्याचं रक्षण करायला कोणीही पोहोचू शकणार नाहीये. कोण आहे तिथे? तर सुमारे शंभर नॉटिकल माईल्सवर (म्हणजे सुमारे २०० किलोमीटरवर) त्याच्याच स्पर्धेत भाग घेतलेली क्रिस्टेन नावाची एक स्पर्धक आहे! या महावादळानं तिला थोडा कमी त्रास दिलाय, पण तिलाही छळलं आहेच. बस, असलाच तर तोच काय तो आधार. दोघांचाही एकमेकांना...
ही कथा नाही कल्पना नाही! तर या क्षणी अभिलाष धैर्याने झुंजतोय, तोंड देतोय सागरी तूफानाला.
या थराराची बातमी वाचायची असेल तर -
करा फॉलो वेबवर: https://goldengloberace.com/
नकाशावर बघा: https://goldengloberace.com/live-tracker/
ट्विटरवर: @ggr2022
द्या त्याच्या पत्नीला शब्दांचा आधार ट्विटरवर: @Urmimala_A
आणि मायबोलीकरांनी उत्साह दाखवला, तर देईन मी आणखी माहिती इथेच!
योगेशजी, आता अभिलाष दक्षिण
योगेशजी, आता अभिलाष दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीच्या समांतर युरोपच्या दिशेने मार्गक्रमणा करतो आहे.
अजून सुमारे ५,५०० नॉटिकल माईल्सचा प्रवास शिल्लक आहे. साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (सुमारे दीड महिन्याने) तो फ्रान्सच्या किनाऱ्यावरील स्पर्धेच्या फिनिश लाईनला पोहोचावा अशी अपेक्षा आहे.
पॅसिफिक महासागरातल्या कठीण काळात नौकेची बरीच हानी झालेली आहे. सोलरवर चार्ज होणाऱ्या बॅटरी काम करत नाहीत. त्यामुळे कम्युनिकेशन्स वर परिणाम झाला आहे. पण फार धोकादायक असं सध्यातरी काही नाहीये. लहरी हवामानाला तोंड देत, धीराने आणि उत्तम मनस्थितीत त्याची मार्गक्रमणा चालू आहे!
Pages