अज्ञातवासी - S02E09 - अग्नये स्वाहा!

Submitted by अज्ञातवासी on 4 January, 2023 - 22:09

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/82838

त्या गाड्या नाशिककडे सुसाट येत होत्या. आठ ट्रकमध्ये खच्चून बंदुका, दारूगोळा आणि हातबॉम्ब भरलेले होते. आठ ट्रक आणि दोन टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये एकूण सत्तर - ऐंशी माणसे बसलेली होती...
"... डिसुझा साब, ये हर आदमी दस लोगो के बराबर हैं। साले एक से एक खुंखार... बकरा खोलो ऐसा आदमी खोलते..."
"इसीलिए आपको बुलाया है गफूरभाई! वो खानकी फौज ऐसीही खूंखार है... उसकी आधी फौज खत्म हो गई है, आधी आप खत्म कीजिए, फिर नासिक आपका।"
"इंशाअल्ला। लेकिन जाधव साब, आपको देखके खुशी तो हुई, लेकिन उससे भी ज्यादा ताज्जुब हुआ।"
"माझा मित्र जिकडे, तिकडे मी. तसंही किती दिवस शेलारांच्या पायाशी राहणार. हा नवीन पोरगा आमच्या डोक्यावर बसवला गेला. आम्ही मेलो होतो? आम्हा सहा लोकांपैकी कुणीही बसलं असतं तरी चाललं असतं."
"जाधव, सहा नाही, पाचच... शेखावतही मरणार आता... मोक्ष नंतर त्यालाच उडवायचं..."
"तुला जे वाटेल ते कर डिसुझा. मी सोबत आहे." जाधव म्हणाला.
डिसुझा समाधानाने हसला.
गाड्या नाशिकमध्ये घुसल्या, व गंगापूर गावाकडे निघाला.
समोरच 'द वाईन कॅपिटल' दिमाखात उभी होती... आशिया खंडातील टॉप टेन वायनरीपैकी एक.
"गफूरभाई, या सगळ्या ट्रक स्टोअरमध्ये मध्ये लावा. टेम्पो ट्रॅव्हलर वायनरीच्या पलीकडच्या नवीन रिसॉर्ट मध्ये घ्या. प्रत्येक ट्रक बरोबर तुमचे दोन तरी माणसं इथे ठेवा, संपूर्ण शस्त्रसज्ज... यातल्या एका ट्रकला ठिणगी जरी लागली ना, तर ही वायनरी जाळून खाक होईल."
"मग रात्री मला तुमचा एकही माणूस इथे नकोय." गफूर म्हणाला
डिसुझाने मान हलवली...
*****
मोक्ष श्रेयाकडून निघाला, व खानसाहेबांकडे पोहोचला.
खानसाहेब जेवण करत होते.
"मलाही बिर्याणी वाढा, भूक लागलीय."
"अरे मोक्षसाहेब केव्हा आले तुम्ही."
"मोक्षदादा म्हणा, नाहीतर मी परत चाललो."
"हो दादा... बेगम..." खानसाहेबांनी हाक मारली.
थोड्याच वेळात मोक्षसमोर बिर्याणीचं ताट आलं.
मोक्षने त्यात सालन टाकलं, व एकत्र करून हातानेच खायला सुरुवात केली...
"माणसं कशी आहेत खानसाहेब?" त्याने प्रश्न केला.
"सगळेजण आता सावरताय..." खानसाहेब म्हणाले. "आम्ही बिर्याणी खातोय, त्यावरूनच तुम्हाला कळायला हवं दादा."
"माझी अर्धी माणसे गेली खानसाहेब. आता अजून असा एखादा हल्ला झाला तर..."
"तर एकही माणूस वाचणार नाही दादा. पण लढू तर शेवटच्या श्वासापर्यंत लढू. शेवटच्या माणसापर्यंत."
"आपला एकही माणूस आता मला गमवायचा नाहीये खानसाहेब. झोया कुठे आहे? त्या दिवसापासून ती मला दिसलेली नाही, भेटलेलीही नाही."
"तेच चांगलंय दादा. तिची स्वप्ने खूप मोठी होती."
"माझं वचन त्याहीपेक्षा मोठं आहे खानसाहेब..."
"मला माहिती आहे..."
मोक्ष जेवण करून उठला, हात धुता त्याची नजर सहज समोर गेली.
...खिडकीतून झोया त्याच्याकडे बघत होती...
"तू वचन दिलंय मला, कायम माझ्या सोबत असशील." तो तिच्याकडे बघून म्हणाला...
"केव्हा हवीये सोबत मोक्षसाहेब, मी येईन नक्की." ती म्हणाली.
तिच्या स्वरात कडवटपणा काठोकाठ भरलेला होता.
मोक्ष काहीही बोलला नाही. तो खानसाहेबांकडे वळला.
"खानसाहेब, रात्री उशीर होईल. जितकी बिर्याणी उरेल, तितकी पातेल्यात बाहेर ठेवून द्या. कुत्रा आणि मांजर पोहोचणार नाही अशी तजवीज करा. मी येईन खायला. वाट बघू नका."
खानसाहेब असहायपणे त्याच्याकडे बघत होते.
तो दिसेनासा झाला.
*****
मोक्ष घरी पोहोचला व त्याने श्रेयाला फोन केला.
"आज रात्री डिनरला येशील?"
"मोक्षा, विसरू नकोस मी तुझी आतेबहीण आहे."
"म्हणूनच जेवायला बोलावतोय. येशील?"
"हो... नक्की येईन. तुला घाबरत नाही मी."
"कधीही घाबरु नकोस. कधीही नाही."
ती हसली, आणि तिने फोन ठेवला.
संध्याकाळी मोक्षने तयारी सुरू केली. सर्वात आधी त्याने केस कापून घेतले, आणि एका प्रोफेशनल माणसाप्रमाणे तुळतुळीत दाढी केली. मिशी काढून टाकली. त्याचा आवडता सूट बाहेर काढला, व तो चढवायला सुरुवात केली...
"डेटवर निघालास की काय?" पिंकीने मागून खोडकरपणे विचारले.
"आपल्याकडे आतेबहिणीबरोबर डेटवर जाण्याची पद्धत नाही पिंकी."
"श्रेया आणि तू?" ती आश्चर्याने म्हणाली.
"हो डिनरला."
"मग मलाही यायचंय..." ती खट्याळपणे म्हणाली.
"आमच्या दोघांमध्ये मला कुणीही नकोय पिंकी, कारण उद्या जेव्हा आपण डिनरला जाऊ, तेव्हा आपल्यामध्ये मला कुणीही नकोय."
"वाह, मी तर तुझ्यावर फिदा झालीय रे."
मोक्षने मान तुकवली व तो निघाला.
*****
ती हॉटेल डोंगराच्या सानिध्यात वसलेलं होती. समोरच डिसुझाची वायनरी दिमाखात उभी होती. मोक्ष आधीपासूनच तिथे येऊन बसलेला होता.
जीन्स आणि एक साधी कुर्ती घालून श्रेया आत आली.
मोक्षने ब्लेअर आणि वेस्टकोट काढून बाजूला ठेवलं होतं.
"मोक्षदादा, आज एकदम प्रोफेशनल लूक, बात क्या है..."
तो हसला.
"स्टार्टर?
तू जी ऑर्डर देशील ते..." ती हसून म्हणाली.
त्याने टेबलावरची घंटी दाबली...
क्षणार्धात हॉटेलमधून सगळी गर्दी रिकामी झाली.
श्रेया भांबावली.
"घाबरु नकोस, तू मला घाबरत नाहीस." मोक्ष हसून म्हणाला.
तेवढ्यात समोर एक स्टार्टरची प्लेट ठेवून वेटर निघूनही गेला.
"मोक्ष हे काय चाललंय..." तिचा हात पर्समध्ये गेला.
"स्टार्टर घे."
"मोक्ष... मी काहीतरी विचारलंय."
"सांगतो... श्रेया, मी एक स्वप्न बघितलं होतं, खूप दिवसांपूर्वी, की शेलारांच्या खुर्चीवर बसायचं. मी बसलो देखील, पण सकाळी जेव्हा तू मला भेटलीस, तू मला या शहराकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोनच दिलास."
श्रेया अजूनही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती.
"म्हणून,त्यासाठी हा डिनर, आणि आजकाल भिंतीनाही कान असतात, म्हणून हे सगळे निघून गेले. ही माझीच माणसे होती श्रेया..."
"... वाह!"
"तुझ्या पर्समध्ये गन आहे. हे मला माहितीये. पण डोन्ट वरी, आज मी गन आणलेली नाही. फक्त तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत."
"तू कधीकधी मला सरप्राइज देतोस मोक्षा. खरंच."
"थॅन्क्स... अजून तरीही आपल्याकडे बराच वेळ आहे."
"येस..." ती थोडी रिलॅक्स झाली.
मोक्षच्या समोरच भलेमोठे काचेचे दार होते. तिथून वाईन कॅपिटल स्पष्ट दिसत होतं, आणि नवीन रिसॉर्टही.
"ही हॉटेलसुद्धा आपलीच आहे ना श्रेया?"
"हो. पण हे बऱ्याच जणांना माहिती नाही."
"चव छान आहे..."
"याहीपेक्षा चांगल्या चवीची हॉटेल्स आहेत नाशिकमध्ये."
"पण इथून बघ ना, तो व्यू किती छान दिसतोय... तो भलामोठा डोंगर, पौर्णिमेचा चंद्र, आणि खाली अंधारात वाईन कॅपिटल..."
"हो खरचं सुंदर आहे."
"श्रेया, चल, थोडं बाहेर जाऊन बघू." तो उठला आणि त्या काचेच्या दरवाजातून बाहेर पडला.
बाल्कनीत गार वारा अंगाला झोंबत होता. मोक्ष निश्चल नजरेने समोर बघत होता.
"हे नाशिक, माझं आहे श्रेया. या नाशिककडे कुणीही वाईट नजरेने बघितलं, तर मी त्याला जिवंत सोडणार नाही... माझ्या माणसांना कुणी धक्का लावायचा प्रयत्न जरी केला, तरीही ते लोक जिवंत राहणार नाहीत...
पण यात माझ्या माणसांना धक्का नको लागायला. माझ्यामुळे खानसाहेबानी त्यांची अर्धी माणसे गमावलीत... ती आजही लढतील, पण मग काहीही उरणार नाही..." मोक्षचे डोळे पाणावले...
"मोक्ष, दादासाहेबानीसुद्धा हेच केलं रे. त्यांची माणसे त्यांच्यासाठी सर्वस्व होतं..."
मोक्ष हसला.
"एकेकाळी नाशिकने वेताळ बघितला. सहा भुते बघितली. आता राक्षस बघतील...चल, आजच तुझं दुसरं सरप्राइज. समोर बघ... आपली वायनरी..."
"तू काय करणार आहेस मोक्षा?" ती आता घाबरली होती.
"सरप्राइज. इतकं सुंदर सरप्राइज तू कधीही बघितलं नसशील. बघ समोर."
ती नाईलाजाने समोर बघू लागली.
तीन, दोन..एक...
धडाम...
समोरच एक आगीचा प्रचंड मोठा लोळ उठला...
आणि अनेक किंकाळ्या फुटल्या...
श्रेया थिजून मागे सरकली... आणि डोळे फाडून बघू लागली...
रिसॉर्टच्या अक्षरशः चिंध्या झाल्या होत्या...
"श्रेया, नीट बघ..."
धडाम...दुसरा स्फोट झाला.
उरलंसुरलं रिसॉर्ट अक्षरशः उडून गेलं...
"काय करतोय मोक्षा... वेडा आहेस का..." ती पूर्णपणे भांबावून गेली होती.
"एक गफूर नावाचा भाई, अनेक वर्षांपूर्वी या नाशिकवर कब्जा करायचं स्वप्न बघत होता. त्याला दादासाहेबांनी त्याच्या घरात घुसून तुडवलं, पण शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही, या उक्तीप्रमाणे त्यांनी त्याला जिवंत सोडलं."
श्रेयाला क्षणार्धात सगळं कळालं...
"म्हणजे... गफूर... समोरच्या रिसॉर्टमध्ये?"
"ही समोरची वायनरी आहे ना, तिथे आठ ट्रक आहेत. त्या ट्रकमध्ये आपली सगळी माणसे संपून उरेल इतका दारूगोळा आहे..."
ती शहारली.
"गेट रेडी फॉर लास्ट सरप्राइज... द बिगर वन..."
"थांब..." ती त्याच्या जवळ आली...
तिने त्याचा दंड घट्ट पकडला...
.... धडाम!!!!!!.......
प्रचंड मोठाच मोठा आगीचा लोळ आसमंतात उठला...
कमीत कमी अर्धा किलोमिटर रुंद त्या आगीच्या लोळाने भवताल आसमंतात सामावून घेतला...
...तो हादरा इकडे हॉटेललाही बसला... सगळ्या काचा खळकन फुटल्या...
तो भलामोठा दरवाजाही फुटला...
...त्यातून ते भीषण अग्नीतांडव बघणारे दोघेही पाठमोरे दिसत होते...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिरियल प्रमाणे डोळ्यासमोर सगळे बघतेय असे वाटतेय वाचताना... चित्रदर्शी लेखन..
कादंबरी छापाच. माझी पण कादंबरीची ऑर्डर घेऊन ठेवा.

@गौरी - धन्यवाद!
@आबा. - धन्यवाद! बदल केलेला आहे.
@धनवंती - धन्यवाद! सध्या तरी फक्त हौशी लेखक म्हणून काम करतोय. Happy

वाह वाह वाह... सगळं समोर घडतय असं वाटलं...
यावर चित्रपट, वेब्सिरीज वगैरे काही आलं तर कास्ट काय असेल असा विचार केला.
दादासाहेब - नाना पाटेकर
मोक्ष - गश्मीर महाजनी / ललित प्रभाकर ( पण त्याला जरा जाड केला पाहिजे )
संग्राम - अभिजित खांडकेकर / सिद्धर्थ चांदेकर
खानसाहेब - चिन्मय मांडलेकर
झोया - सोनाली कुलकर्णी नवीन

बास एवढेच सुचले सध्या Wink

@स्मिता श्रीपाद - धन्यवाद! खरं सांगायचं झालं, तर माझ्याही डोक्यात स्टार कास्ट फिट्ट आहे, पण ती बरीचशी हिंदी, साऊथ मराठी अशी आहे.
थोड्याच वेळात टाकतो.

@स्मिता प्रसाद >> काय हो अज्ञातवासी, माझं नावच बदललं तुम्ही :-)\
माझ्याही डोक्यात स्टार कास्ट फिट्ट आहे >> टाका नक्की.पण त्या आधी पुढचा भाग टाका.

खरं सांगायचं झालं, तर माझ्याही डोक्यात स्टार कास्ट फिट्ट आहे, पण ती बरीचशी हिंदी, साऊथ मराठी अशी आहे.
थोड्याच वेळात टाकतो. >>>>> झाला का थोडा वेळ Wink

Mastach