आमची अमेरिका वारी….. भाग 6
कॅलिफोर्निया..सीमि व्हॅली...
कॅलिफोर्निया..आमच्या या अमेरिका वारीतल पुढच ठिकाण. फळफळावळीसाठी प्रसिद्ध कॅलिफोर्नियाची कीर्ती लहानपणापासूनच ऐकलेली. आम्ही कोकणवासी तर कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या गोष्टी ऐकतच मोठे झालो. दुसर म्हणजे, जगातल्या मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर कंपन्यांच माहेरघर असलेली आपल्या परिचयाची सिलिकॉन व्हॅली, जगप्रसिद्ध डिस्ने लॅंड आणि हॉलीवूड पण इथेच. त्यामुळे आमच्या अमेरिका बकेट लिस्ट मध्ये कॅलिफोर्नियामधल्या या गोष्टी होत्याच पण त्याचबरोबर इथे वरचेवर पडणारा दुष्काळ, जंगलात लागणारे भीषण वणवे, शेतजमिनींवर मोठ्या संख्येने उभी रहात असलेली व्यावसायिक आणि निवासी संकुलं, घटत चाललेल कृषी क्षेत्र आणि कमी होत चाललेल कृषी उत्पादन याविषयीही बरच वाचनात आल होत. त्यामुळे या राज्याबद्दल जास्तच कुतुहल.
आमचा इथला मुक्काम लॉस एंजेलिस जवळच्या सीमि व्हॅली भागात रहाणाऱ्या माझ्या मेहुणीकडे. सिमि व्हॅली हे कॅलिफोर्नियाच्या व्हेंचुरा काउंटीमधल्या सिमि व्हॅली नावाच्याच खोऱ्यातल एक छोटस शांत आणि सुंदर उपनगर, लॉस एंजेलिसपासून अवघ्या 40 मैलांवर. टेकड्यांच्या अंगाने वसलेली बैठ्या आणि एक मजली सुंदर घरांची निवासी संकुलं, सुनियोजित रस्ते आणि ठराविक अंतरावर मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स असलेल हे शहर आजूबाजूच्या डोंगरांमधल्या अनेक ट्रेकिंग आणि हायकिंग ट्रेल्समुळे ट्रेकर्स आणि हायकर्सच आवडीच ठिकाण.
या शहराची ओळख म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि त्यांच्या पत्नी नॅन्सी रेगन यांच दफनस्थान असलेली ‘रोनाल्ड रेगन प्रेसिडेन्शिअल लायब्ररी’. या लायब्ररीमध्ये रेगन यांच्या कार्यकाळातील प्रशासनीय कागदपत्र, कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर म्हणून त्यांच्या कार्यकाळातील कागदपत्र, अध्यक्षीय प्रचार साहित्य आणि वैयक्तिक कागदपत्राचे संग्रह आहेत. इथल्या संग्रहालयात ओव्हल ऑफिसची प्रतिकृती आणि रेगन यांच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तु आहेत. पण आमच्यासारख्या पर्यटकांसाठी इथलं खास आकर्षण म्हणजे ‘एयर फोर्स वन पॅव्हेलियन’.
या पॅव्हेलियनमध्ये 1973 ते 2001 या काळात रेगन यांच्यासह सहा राष्ट्राध्यक्षांनी वापरलेल ‘फ्लाइंग व्हाइट हाऊस’ म्हणून ओळखल जाणार ‘एयर फोर्स वन’ हे बोइंग विमान ठेवलं आहे. आपण या विमानाच्या अंतर्भागात जाऊ शकतो. या ‘फ्लाइंग व्हाइट हाऊस’ मधून प्रवास करताना राष्ट्राध्यक्ष देशाचा कारभार कसा चालवतात याची माहिती इथला गाईड देतो. याव्यतिरिक्त इथे मरीन वन हेलीकॉप्टर, रेगन यांनी वापरलेली लिमोझिन कार आणि इतर अध्यक्षीय मोटारिंचा ताफा ठेवलेला आहे.
हे संग्रहालय पहाताना रोनाल्ड रेगन यांच्याविषयी एक गंमतीदार माहिती समोर आली. आपले वित्तीय धोरण, दृढनिश्चय आणि आशावाद याबरोबरच रोनाल्ड रेगन त्यांच्या जेली बीन्स या (आपल्याकडील लीमलेट सदृश्य गोळी) कँडीवरच्या प्रचंड प्रेमासाठीही प्रसिद्ध होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत कॅबिनेट बैठका, सामाजिक कार्यक्रम आणि जगभरातील मान्यवरांसोबतच्या महत्त्वाच्या बैठकींमध्ये ते ही जेली बीन्स वाटत असत. म्युझियम स्टोअर मध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या या जेली बीन्सची चव घेण्याचा मोह मग आम्हालाही नाही टाळता आला. रोनाल्ड रेगन यांच आयुष्य म्हणजे हॉलीवूड सिनेमा स्क्रिप्टसारखच. हे संग्रहालय पहाताना हॉलीवूड नट ते कॅलिफोर्निया गव्हर्नर आणि शेवटी व्हाईट हाऊसपर्यंतचा त्यांचा प्रवास आपल्यासमोर उलगडतो.
इथल्याच एका फॅमिली फार्ममध्ये झाडावरची फळ, भाज्या आपल्या हाताने खुडून घेता येतात....अर्थातच पैसे देऊन....हे समजल्यावर आमची मोहीम तिकडे निघाली..हे फार्म एवढं मोठ की त्यात फिरण्यासाठी दर 15 मिनिटांनी फार्मची गाडी आहे.. आपणाला पाहिजे त्या मळ्यात उतरायच..काम झाल की पुढच्या गाडीने दुसऱ्या मळ्यात. इथे प्रवेश करताच आजूबाजूला पसरलेले फळांचे आणि भाज्यांचे हिरवेगार मळे पाहूनच नजर शांत होते. काही मळे आपल्या हाताने फळ, भाज्या खुडून घेणाऱ्यांसाठी राखीव.. आम्हीही मग या मळ्यातून ताजे टोमॅटो, मिरच्या, चेरी, संत्री अशी बरीच फळ आणि भाज्या खुडून घेतल्या.
इथे नांगरणी, लावणी.. फवारणी सारखी शेतीची बहुतेक सगळी काम यंत्राद्वारे..पाण्यासाठी स्वयंचलित स्प्रिंक्लर्स..मानवी बळाचा कमीत कमी वापर... इथली सुपीक जमीन बागायती साठी योग्य.. पाऊस कमी असला तरी नद्या, तलाव, जलाशय आणि भूगर्भामधील पाणी शेतीसाठी पुरवल जात. त्यामुळेच संपूर्ण अमेरिकेच्या भाज्या, फळांच्या उत्पादनाच्या निम्म्याहून अधिक उत्पादन कॅलिफोर्निया राज्यातून होत. अमेरिकन शेतीमध्ये अशा फॅमिली फार्मस् चा हिस्सा खूप मोठा. त्यानिमित्ताने आमच्या अमेरिकन शेतीविषयीच्या ज्ञानात भर पडली.
सिमि व्हॅली पासून 40 मैलांच्या अंतरावरच सांता मोनिका शहर प्रशांत महासागराची विशाल किनारपट्टी आणि सांता मोनिका पियरसाठी प्रसिद्ध. इथे किनाऱ्याजवळून जाणाऱ्या रस्त्यावरून होणार निळ्याशार अथांग प्रशांत महासागराच दर्शन केवळ अविस्मरणीय.
बिच आणि पियरवर तर जत्राच भरली होती. किनाऱ्यावर समुद्रस्नानाचा आनंद घेत पसरलेले आबालवृद्ध, जायंट व्हील, वॉटर गेम्स, खाद्य पदार्थांचे अगणित स्टॉल्स, हॉटेल्स..पियरवर जाणाऱ्या रस्त्यावर चौका चौकात चाललेली गाणी बजावणी आणि तरुणाईबरोबर तेवढ्याच उत्साहाने थिरकणारी वृद्ध मंडळी.. भारून टाकणाऱ्या त्या वातावरणात तो बिच आणि पियर फिरताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आणि मग प्रसिद्ध चिपोटले चेनच्या हॉटेलमध्ये ‘बरीटो’ या इथल्या लोकांच्या आवडीच्या मेक्सिकन डिशची चव घ्यायचा योगही आला.
सॅन फ्रान्सिस्को
कॅलिफोर्निया राज्यातल सॅन फ्रान्सिस्को शहर..डोंगरकुशीत वसलेल्या या शहराची मुख्य ओळख म्हणजे जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज आणि जगातला सर्वात जास्त वेडीवाकडी वळणं (The most crooked street) असलेला लोंबार्ड स्ट्रीट. आमचा मुक्काम असलेल्या सिमि व्हॅलीपासून सॅन फ्रान्सिस्को 375 मैलांच्या म्हणजे साधारणपणे सहा तासांच्या अंतरावर. तसा वेळ वाचवणारा विमानाने जायचा पर्यायही परवडेबल आहे..पण डोंगराळ भागातून समुद्र किनाऱ्याने बिग सर या छोट्याशा सुंदर गावातून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारा पॅसिफिक किनारी महामार्ग थोडा लांबचा पण अतिशय सुंदर असल्याच समजल्याने आम्ही रस्त्याचाच पर्याय निवडला. जाताना आम्ही निवडलेला थोडा जवळचा मार्ग जरी काहीशा रुक्ष आणि रखरखीत डोंगरांच्या मधून जाणारा असला तरी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मैलोन् मैल पसरलेल्या पिच, प्लम, चेरी, द्राक्ष या सारख्या फळांच्या हिरव्यागार मळ्यांमुळे भर दुपारच्या कडकडीत उन्हाचा जाळ डोळ्यांना जाणवत नव्हता. रात्री साडे आठच्या सुमारास आम्ही झगमगणाऱ्या सॅन फ्रान्सिस्को शहरात प्रवेश केला आणि रोषणाईत न्हाऊन निघालेल्या गोल्डन गेट ब्रिजच रात्रीचं नयनरम्य मुखदर्शन घेतल.
निरीक्षण भाग रात्री साडेआठला बंद झाल्याने तिथून निघण्याची सूचना आम्ही तिथे असेपर्यंत पोलिसांच्या गाडीवर दोनदा झाली. त्यावर ‘भाईसाब थोडा रुकने दो.. बहोत दूर से आये है’ अशी मुंबई स्टाइल विनंती करायची इच्छा झाली..पण त्यातला सॅन फ्रान्सिस्को लॉकअप सैर घडण्याचा धोका ओळखून आम्ही काढता पाय घेतला.
तिथे जाताना पर्वतात वसलेल्या या शहरातल्या सात आठ स्तर सरळसोट चढत जाणाऱ्या रस्त्यांचा थरार अनुभवायला मिळाला. प्रत्येक स्तराला छेदणाऱ्या चौकात लाल सिग्नलला थांबत त्या चढावावर गाडी चालवण म्हणजे नवख्या चालकांसाठी आव्हानच. तिथून परतताना जगप्रसिद्ध घिरार्डेली चॉकलेट फॅक्टरीच मूळ ठिकाण असलेला घिरार्डेली चौक दिसल्यावर आमच्या यंग ब्रिगेडने गाड्या थांबवल्या. घिरार्डेली चॉकलेट शॉप, विविध आंतरराष्ट्रीय ब्रॅंडसची दुकानं, संग्रहालयं, आणि रेस्टॉरंट्स असलेला हा चौक सॅन फ्रान्सिस्कोमधल खरेदीच मुख्य ठिकाण. तिथे घिरार्डेली आइस्क्रीम आणि चॉकलेट्सची चव घेऊन इथल्या प्रसिद्ध मच्छिमार घाटावरच्या (Fisherman's Wharf) एका हॉटेलमध्ये पोटपूजा आटोपुन आम्ही सॅन फ्रान्सिस्कोजवळच्या सांता क्लारा गावातल्या आमच्या रात्रीच्या मुक्कामाच्या मॉटेल मध्ये परतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वप्रथम इथल्या ‘पुरणपोळी’ या भारतीय आणि त्यातही वडा पाव ते उकडीच्या मोदकापर्यंत शंभर टक्के मराठी नाश्ता देणाऱ्या रेस्टॉरंटकडे मोर्चा वळवला. पहिली ऑर्डर अर्थातच वडापाव, त्यानंतर मिसळ, गोड म्हणून उकडीचे मोदक आणि त्यावर मसाला चाय असा भरपेट मऱ्हाठी नाश्ता झाल्यावर आमच्या गाड्या गोल्डन गेट ब्रिजच्या दिशेने निघाल्या. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर ब्रिजचे नारिंगी उंच मनोरे आणि त्याच भव्य रूप समोर आल. सॅन फ्रान्सिस्कोला मरीन काऊंटीशी जोडणारा 1.7 मैल लांबीचा 746 फूट उंचीच्या टॉवर्सवर आधारलेला हा पूल भणाणणारा वारा, धुकं, खवळलेला समुद्र यांचा सामना करत बांधायला चार वर्ष लागली. 1937 साली वाहतुकीसाठी खुला झाला त्यावेळी तो जगातील सर्वात लांब झुलता पूल(Suspension Bridge) होता. याच ‘गोल्डन गेट ब्रिज’ नाव प्रशांत महासागरातून सॅन फ्रान्सिस्को खाडीच प्रवेशद्वार असलेल्या गोल्डन गेट सामुद्रधुनीवरून पडलं. या पूलाच्या 50 व्या वर्धापनी 80,000 ची अपेक्षित गर्दी 800,000 पर्यंत वाढली आणि अंदाजे 300,000 लोक या पुलावरून चालत गेले यावरुन या पूलाच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.
या पूलाच रांगडेपण आणि सौन्दर्य आजमायला दोन्ही टोकाला असलेल्या डोंगरावरच्या वह्यूपॉइंटवरच जायला हवं. थोडं ट्रेकिंग होत पण तिथून प्रशांत महासागराच्या विशाल पार्श्वभूमीवर दिसणारं पूलाच भव्य स्वरूप पहाताना घेतलेल्या श्रमाच सार्थक झाल. तिथे मनसोक्त फिरत फोटोग्राफी करत आम्ही पुलाच्या साईड वॉकने चालत अर्ध्या किलोमिटर अंतरावरच्या पुलाच्या पहिल्या टॉवरला हात लावून आम्ही लोम्बार्ड स्ट्रीट या पुढच्या पॉइंटकडे निघालो.
लोम्बार्ड स्ट्रीट..सॅन फ्रान्सिस्को मधला हा आठ वेडीवाकडी वळणं (हेअरपिन) घेत उतरणारा जेमतेम एक कार पास होऊ शकेल एवढा अरुंद रस्ता "The Crookedest Street in the World" असल्याच मानल जात. सॅन फ्रान्सिस्कोच हे एक प्रमुख आकर्षण. इथे पर्यटकांच्या गाड्यांची एवढी मोठी रांग असते की या रस्त्यापर्यन्त पोचायलाच तीन चार तास लागू शकतात; यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येते. आमच्या नशिबाने त्यादिवशी फारशी गर्दी नव्हती. दोन्ही बाजूच्या बागेमधून वळणावळणाने उतरत त्या एकदिशा मार्गिकेन गाडी चालवणं हा खूपच मजेदार अनुभव..प्रत्यक्षच घेण्याजोगा. तो मजेशीर अनुभव घेऊन आम्ही इथली ‘पॅलेस ऑफ फाइन आर्ट्स’ ही ऐतिहासिक वास्तू पाहायला निघालो. 1915 साली पनामा पॅसिफिक एक्सपोझिशन मध्ये कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी बांधलेल्या वास्तूंपैकी शिल्लक ही एकमेव वास्तू खूपच भव्य आणि सुंदर.
मावळत्या सूर्याच्या प्रकाशात त्याच सौन्दर्य आणखीनच खुलून दिसत होत. अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांच चित्रीकरण इथे झाल. त्या पॅलेसचा भव्य परिसर फिरत पलीकडच्या डोंगराआड जाणाऱ्या मावळत्या सूर्याच दर्शन घेऊन आम्ही सॅन फ्रान्सिस्कोचा निरोप घेऊन रात्रीच्या मुक्कामासाठी मॉटेलकडे प्रयाण केल. सॅन फ्रान्सिस्को हे बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपटसृष्टिच चित्रीकरणाच आवडत ठिकाण. अनेक चित्रपटांमधुन इथल्या पर्यटन स्थळांची तोंडओळख झालेली. त्यामुळे हे शहर जास्त जवळच.
आमच्या या टूरचा तिसरा दिवस निसर्गसौंदर्याने नटलेल्या पॅसिफिक किनारी महामार्गाने बिग सर या गावातून सिमि व्हॅलीला घरी परतण्याचा. सकाळी जवळच्याच मद्रास कॅफेमध्ये साऊथ इंडियन नाश्ता-कम-जेवण करून निघेपर्यंत एक वाजला. या महामार्गावरच थोड्याशा आडवाटेने जाणारा ‘17 माइल्स ड्राइव्ह’ हा रस्ता सुंदर किनारपट्टी, त्यावरची 17 पर्यटन स्थळ आणि गोल्फ मैदानांसाठी प्रसिद्ध. आम्हीही त्याच मार्गे निघालो. एका बाजूला झाडीत लपलेली सुंदर सुंदर घरं, हिरवीगार गोल्फ मैदानं आणि दुसऱ्या बाजूच्या ‘पिबल बिच’ समुद्रकिनाऱ्यामधून जाणाऱ्या या नितांतसुंदर रस्त्यावरचा पहिला स्टॉप होता ‘पिबल बीच पॉइंट’. नावाप्रमाणेच बिचवर असंख्य लहानमोठ्या रंगीत दगडगोटयांचा सडा पडलेला. मग प्रशांत महासागराच्या पाण्यात पाय भिजवून तिथे पर्यटकांनी केलेल्या दगडगोटयांच्या मनोऱ्यात आमच्या एका मनोऱ्याची भर घालून आम्ही पुढे निघालो. हा रस्ता आणि त्यावरचे सर्व पॉईंट्स सुंदरच. त्यातले बर्डस रॉक, लोन सायप्रस ट्री, क्रॉकर ग्रोव्ह, घोस्ट ट्रीज हे पॉईंट्स खास नमूद करण्याजोगे.
बर्डस रॉक हा किनाऱ्याजळचा महाकाय खडक विविध प्रकारचे समुद्रपक्षी, सील आणि सी लायन्सच्या वस्तीच ठिकाण. दुपारच्या उन्हात अनेक सी लायन्स आणि सील कुटुंबासहित या खडकावर मस्त पसरले होते. सी लायन्सच ओरडणं तर किनाऱ्यापर्यन्त पोहोचत होत. पण ती मजा पहायला दुर्बिणच हवी..सुदैवाने निघताना आम्ही दुर्बिण बरोबर घेतली होती, पण त्याची सशुल्क सोयही इथे अशा सर्व ठिकाणी असते.
याच रस्त्यावर ‘लोन सायप्रस ट्री’ हे किनाऱ्यावरच्या एका खडकावरच जगप्रसिद्ध सायप्रसच झाड गेली अडीचशे वर्ष वादळवाऱ्याशी झुंज देत एकटच दिमाखात उभं आहे. ते पहाताना रविन्द्रनाथांच्या ‘एकला चलो रे’ कवितेच्या ‘जोदी तोर डाक सुने केउ ना आसे..तोबे एकला चलो रे’ या ओळी आठवल्या.
त्यापुढच्या ‘घोस्ट ट्रीज पॉइंट’ची पांढऱ्या रंगाची अंधारात चमकणारी सायप्रसची झाडं, त्यांचा रंग आणि आकार पहाता अस वाटत इथे जणू भूतांची मैफिलच जमली आहे. इथे समुद्रात येणाऱ्या 50 फूट उंच लाटांमुळे हे ठिकाण ‘बिग वेव्ह सर्फ स्पॉट’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथला क्रॉकर ग्रोव्ह हा जगातील सर्वात जुनी आणि मोठी मॉनटेरी सायप्रस झाडं असलेला भाग. या प्रकारच्या जगात शिल्लक झाडांच्या फक्त दोन जंगलांपैकी एक या किनाऱ्यावर आहे.
निसर्गाच्या त्या अगम्य रचनांचा आस्वाद घेत तो सतरा मैलांचा ड्राइव्ह संपून बिग सरच्या मुख्य रस्त्याला लागेपर्यंत संध्याकाळ झाली. डोंगरदऱ्यामधून किनाऱ्याजवळून जाणाऱ्या या रस्त्यावरच मुख्य आकर्षण म्हणजे अभियांत्रिकी आश्चर्य मानल जाणारा बिक्सी क्रीक ब्रिज. या ब्रिजवरुन प्रशांत महासागराचा विहंगम नजारा दिसतो. पण आम्ही तिथे पोहोचेपर्यंत काळोख झाल्याने त्याच नीटस दर्शन नाही झाल. बिग सर गावात पोहोचेपर्यन्त तर रात्र झालेली त्यामुळे ते गावही पहाता नाही आल. मग त्या गावातल्या एकमेव रेस्टोरंटमध्ये पोटपूजा करून आम्ही सिमि व्हॅलीचा रस्ता पकडला. सकाळी निघताना झालेल्या उशीरामुळे काही गोष्टी आम्ही पाहू शकलो नाही हे खर, पण रात्रीच्या प्रवासात बिग सर गावात पोहोचण्याआधी डोंगरदऱ्यांमधल्या आणि आमच्याशिवाय एखाद दुसर चुकारु वाहन दिसणाऱ्या त्या निर्मनुष्य रस्त्यावर मिट्ट अंधारात एका ठिकाणी थोडस घाबरतच थांबून घेतलेल आकाशदर्शन केवळ अविस्मरणीय. अक्षरश: लाखो चांदण्या आणि ताऱ्यांची लखलख चंदेरी दुनियाच..आकाशगंगा तर उघड्या डोळ्यांनी दिसत होती. डोळ्यांच पारण फेडणारा तो अनुभव.. (प्रशांत मठकर मोबाइल 9619036406 )
हा पण भाग छान झाला आहे.
हा पण भाग छान झाला आहे.