मी मऊ गोधडी पांघरूण झोपलेलो. आदल्या दिवशी शाळेतून आल्यावर संध्याकाळी वैरणपाणी करुन थोडं खेळलो. तेवढ्यात दादा म्हणला “तुका जा बैलांला पेंड चार म्या लय दमलोय.”
म्या वाडघ्यावर गेलो. बैलांना पेंड चारली .वैरण घातली. घरी आलो खंदीलाच्या उजेडात तुकाराम बुवांचा धडा शिकवला होता त्यावर गृहपाठ केला. आयनी तवर गरम भाकर आन कालवान ताटलीत वाढलं. म्या जेवलो आन वसरीला गोधडी आथरुण झोपलो. थंडी पडलेली . अगदी मेल्यागत झोपलो.
एकदा आमच्या घरात रातचं चोर आलं. चोरांनला कुठं माहीत आमच्या घरात काय बी मिळणार नाय. खाली हातानी कसं जायचं म्हून दादाचं सवान्यातलं चार बिडीचं बंडलच घेऊन गेलं. सकळी झाड्याला जायच्या अदूगर दादाला बिडीनं तोफ डागाया लागतीया. सवान्यात बघतो तर बंडल गायब.
दादा म्हणतो पॉट साफ व्हतं बिडी वडल्याव.
एकदा मला दोन दीस झाड्याला झाली नाय. म्हून म्या बिडी पेटवली इतक्यात दादा आला. बडव बडव बडावला. मार खाल्ल्या नंतर आपसूक पोटात कळ आली. मी चिनपाट घिऊन वढ्याला गेलो.
तर मंडळी लय यिषयांतर झालं. तर वसरीला झोपलो व्हतो.
अशात सकाळी सकाळी कानावर हाळी आली….
“ए पोरा जा जोंधळा राखायला…. सकाळी सकाळी पाखरं पडत्यात ज्वारीवर . लवकर निघ.”
म्या अर्धवट डोळं उघडत उठलो.
दादा कडाडला
ए म्हसुबा घे की तोंडाव पाणी आन लाग चालायला.
तोंडावर दोनचार पाण्याचं हाबकं मारलं. तशी झोप पळाली. दात राखूंडीनं घासलं. आईनं तवर च्या चपाती खायला दिली.
घाईघाईत चादर हाताला लागली ती अंगाभोवती गुंडाळली. खिशात काड्याची पेटी कोंबली. हातात गोफाण घेतली. अनवाणी पायांनी मळ्याची वाट धरली. वाटतला फुपाटा नुसता बर्फाच्या गोळ्यागत थंडगार पडलेला. पाय बधीर झालं. वढं, नालं वलांडत रानवाट पळत होती. तिच्या मागं मागं म्या जात व्हतो. पाण्यातून जाताना पाय अजुनच गारठत. पाण्याचा खळखळाट टाळ, चिपळ्या वाजवत व्हती. पाखरं गाणी म्हणत व्हती.
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला, गाणी
रानाच्या वाटेवर झाडांची ही दाट गर्दी . भारद्वाज पक्षी खोल घुमणारा आवाज काढतोय. काय सांगतोय त्यो कुणाला पोटतिडकीनं? त्याचा हा असला आवाज सकाळचं शांत वातावरण गुढ करतोया. शांत पाण्याच्या डव्हात म्या मला बघतूया आसं वाटत होतं.
मधीच भोरड्यांचा बारवंवर पाण्याला गेलेल्या बायकांनी गलका करावा तसा कलकलाट ऐकू यतोय. कुठंतरी साळुक्यांचं मंजुळ हितगुज चाललया. असं वाटतं एकमेकीला खुशाली विचारतायेत. तीच आपुलकी कठांत दाटलीय. झाडं गारठलीत. मधीच येणारं गार वारं. अंगावर काटा येतोय.
मळ्याच्या वाटेव राखणीला जाणारं दोनचार मैतर भेटलं . मग मजा आली.वाटेत एक बोरीचं झाड होतं. एकजन बोरीवर चढला. गदागदख बोर हलवली. खाली बोरांचा हा पाऊस. लाल, पिवळी, हिरवट पिवळी बोरं वेचून झाल्यावर राखणीची आठवण आली .
म्या बोरं खात खात अंगावरची चादर सावरत वावराकडं चाललो व्हतो.
वावरात पोहचल्यावर ध्यानात आलं गोफाण बोरीखालीच राहीली. पुन्हा बोरीखाली गेलो. गोफाण उचलून पुन्हा मळ्याकडं पळालो.
पाखरं यायला सुरुवात झालेली. आयला ह्यानला बी सकाळी सकाळी दाणं टिपायची लहर येती. आमची फुकटची झॉप मोड व्हतीया. सकाळी कसं ऊबदार गवताच्या घरट्यात मस्त ढुंगांव ऊन येईस्तोवर झोपावं.
लगबगीने मचानावर चढून घमेल्यात ठेवलेलं ढेकुळ गोफणीत घातलं आणि तोंडान ह्याssss करत गोफण गरागरा फिरवली. हातातला गोफणीचा शेव सोडला तसं ढेकळाचे बारीक तुकडं झालं. आजूबाजूच्या पाखरांवर ,जोंधळ्यावर आदळलं. त्यासरशी पाखरं फाडफाड करत उडाली. पण परत थोडं गेल्यासारखं करुन परत दाणं टिपायला आली. तशी मला तुकोबांची गोष्ट आठवली.
तुकोबांची भूतदया थक्क करणारी. दुष्काळात धान्याचं कोठार खाली केलं लोकांला. कर्जमाफी केली. लोकांच्या जमिनी परत केल्या. शेवटी काय बी जवळ उरलं नाही. तरी हा माणूस इटुबाच्य नादात. कसली भक्ती म्हणायची. लोकं म्हणत्यात ते संसार विरक्त व्हते. आपल्याला काय बी कळत नाय बा ही विरक्ती फिरक्ती.
एकदा तुकोबा ध्यान करत असताना तिथला जवळचा शेतकरी आला. म्हणला हितं तुमी बसलाच हाये तर माझं शेत राखा म्या तुमाला दीड मण दाणं देईल. तुकोबा हो म्हणाले. तुकोबांची बायको आवलीला धान्य मिळल म्हणल्यावं आनंद झाला.
राखण चालू झाली. तुकोबा मचानावर चढलं अगदी म्या आता चढलोय तस्स.
पाखरं येत होती. चिवचिवाट करत पीक खात होती. तुकारामांना ती खूप गोड वाटत. त्यांच्यात ते इटुबा बघत. भजन करत. पाखर दाणं टिपताना कसं हाकलावं? उपाशी मरतील म्हणून टिपू दिलं दाणं. कणसांच्या पिशा उरल्या. शेताचा मालक आला. तुकोबांना पंचासमोर उभं केलं. पंच शेत पाहायला आले तर तिप्पट दाणेदार कणसं लागलेली.
हाय का नाय चमत्कार.
माझं बी नाव तुकाराम हाय आन गळ्यात इटुबाची माळ बी हाय. भजन, किर्तन ऐकतो. आभंग गातो. एकादस करतो. वारीला जातो. तवा कशाला गोफण फिरवायचा तरास घेऊ. पांडुरंग राखल की आपली बी लाज.
आसं काय तरी वाटलं न म्या मचानावरनं खाली आलो. म्हणलं खा काय खायचं ती. पुण्याचं काम हाय.
आता मलाही भूक लागली व्हती.
हुरडा भाजावा म्हणलं आन आगटी उकारली. बांधावर शेणाच्या वाळलेल्या गव-या व्हत्या त्यातल्या दोन आगटी पेटवायला आणल्या. थोडा पाचोळा जमा केला. त्यो आगटीच्या तळाला ठेवला. वर गव-याचं तुकडं ठेवलं आन पाचोळा काडी ओढून पेटवला. हळूहळू आगटी पेटू लागली. धुर डोळ्यात जात व्हता. मी फुंकर घालत होतो. हळूहळू गव-या पेटू लागल्या. मी बाजूची जोंधळ्याची चारपाच ताट उचलली. त्याची कणसं खुडली आणि आगटीत भाजू लागलो. आगटीच्या बाजूला चादर हातारली. त्यावर एक मऊ दगडी कपची ठेवली. एक एक भाजकं कणीस त्या कपचीवर ठेवून दुस-या कपचीनं कणसं मळत गेलो. हिरवागार कोवळा हुरडा चादरीवर साठला.
हुरडा मळता मळता फुंकर मारुन एक एक घास खात होतो . हातानं मळणं, खानं दोन्ही चालू होतं.
मी ही पाखरांच्या पंगतीत बसलो होतो आम्ही सगळे यथेच्छ ताव मारत व्हतो.
सगळी कणसं मळून झाली. चादरीवरचा हुरडा गोळा केला. फुंकर मारुन चड्डीच्या खिशात भरला. खात खात विहिरीवर पाणी प्यायला गेलो.
पाणी प्यायला खाली उतरलो. दोन पाय-या पाण्यात उभा राहिलो. वंजळीन घटाघटा पाणी प्यालो. पाणी पिताना पाण्यात भूत आसलं तर या इचारानं अंगावर काटा आला तसा झपाझप पाय-या चढू लागलो.
वर चढताना चि-यात उगवलेल्या कडूलिंबांच्या फुटव्यवर गवळणीचं कोटं बघत व्हतो. ह्यांला आडचणीत कोटं करावंस का वाटतं ? एखादं पिलू पाण्यात पडून मरायचं की. आसं म्हणत्यात कोण बुडून मेलं तर त्याचं भूत होतं आन यीरीतच राहतं.
पाय-या चढून येताना भितीनं घाम फुटला. .वर आलो. बघतो तर मचानावर उभं राहून दादा पाखरं हाकलतोय. काय करावं काय सुचना. आता मार पडणार हे कळून चुकलं. तरी धीर धरुन मचाना जवळ आलो. दादा जोरजोरात ह्याsssहुर्र करत गोफण फिरवत होता आणि पाखरं हाकलत होता. काही येळानं एखादं दुसरं पाखरु सोडलं तर बरीच निघून गेली व्हती. दादानं मचान बनवताना अंथरलेल्या निरगुडीचा फोक काढला आनं खाली उडी टाकली.
मुलान्यानं कोंबड्याची मान पकडल्यावर त्याला कळतं पुढं काय होईल तसं मला बी कळलं आन मी पळायला लागलो. जोंधळ्यात लपलो. पण पळताना हाललेला जोंधळा बघून दादा गपचीप मागच्या बाजूनं आला आन माझी कालर धरली.
"मला गुंगारा देतो व्हय. लेका चांगला राखणला पाठावला आन तू राखाण सोडून खेळत बसला व्हय."
"नाय म्या आताच पाणी प्यायला गेल्तो विहिरीवर."
"आता गेल्तां मग कणसाच्या माथ्यावर पिसं उघडी कशी झाली."
आसं म्हणून सडासड ढुंगणावर फोकानी मारलं. लय मारलं. वळ उठलं.
मी आई, आई वरडत होतो. ओक्साबोक्शी रडत व्हतो.
इतक्यात आई मळ्यात आली आणि तिने मला सोडवलं नाहीतर आज काय खरं नव्हतं.
आई दादावर ओरडली.
"चार दाणं खाल्लं तर एवढं मारायचं का त्याला.लहान हाय. चुकलं आसल."
"संमदं शिवार खाऊ दे की मग बोंबला उपाशीपोटी."
"आवं जरा दमानं घ्या की."
"काय दमानं घ्या घोडा १२ वर्साचा झालाय. कवा कळणार?"
"सगळी काय आयच्या पोटातनंच शिकून येत्याती."
"जा त्याला आता तरी शिकव."
आई म्हणाली
"चल रं तुका बाभळीखाली बसू. भाकर आणली ती खा आन साळंला जा. "
आईनं मला बेसान भाकर वाढली. म्या शेतातून एक कांदा उपटला. दगडावर फोडला . कांदा, भाकरी, बेसान कसला भारी बेत. पण दोन पायावर बसून खाल्लं.
खाता खाता आयला विचारलं
"आय तुकोबांनी भंडारा डोंगरा जवळ श्यात राखाया घेतलं व्हतं ना?"
"व्हय रं बाबा. पण त्याचं काय आता तू जेव."
"त्यांचं श्यात पाखरांनी खाल्ल. शेतात नुसत्या पिशा उरल्या. पांडुरंगानी त्या शेतात तीन पट दाणेदार कणसं दिली. मंग मलाबी दिली असती. तरी दादानं मला कुंबल कुंबल कुंबालला."
"आरं तुकाराम बुवा लई मोठ्ठं संतं. इटुबा त्यांच्या ऐकण्यात व्हता. तू मोटा संत व्हायला यळ हाय. मग ऐकल तुझं."
"पण आय नामदेवाचा नीवद खाल्ला तवा नामदेव लहानच व्हतं."
"त्याचा गाढ इश्वास होता दगडाचा देव जेवतो म्हणून. त्याच्या बांनं म्हंजी दामाजीनं आणलेला नीवद पांडुरंग रोज खातो मग माझाही खाईल आसं वाटायचं त्याला. "
"आर तू जेव लवकर साळला जा. नाय तं दादा हाणलं आजून."
"ये पण मला सांग म्या बी भजान करतो. किर्तान ऐकतो. मला का नाय देव पावत?"
"आरं देवाला आपून आपल्यासाठी काय मागायचं नसतं. त्याला कळतं की समंदं, काय हवं, काय नको."
"त्याची निरपेक्ष भक्ती करायची ती त्याला आवाडती. तुकोबा काय किंवा सारं संत काय? कमी पीडा सोसली का? पण कधी देवापुढं काय बी सवतासाठी मागितलं नाय. मागितलं तर सर्वांसाठी. तू माऊलीचं पसायदान म्हणतोसना रोज. आरं हे संत सुखदुःखाच्या पल्याड गेलेले असतात. जे काय मिळल त्यो देवाचा परसाद असतो त्यांच्यासाठी. "
मला थोडं कायतरी कळल्यागत व्हत होतं. मला माझ्या आयच्या रुपात ज्ञानेश्वर माऊलीच बोलतीया आसं वाटलं.
म्या भाकर खाल्ली . खिशातला हुरडा आयला दिला आन घराची चावी घेऊन साळसाठी गावात आलो. दप्तार घेतलं. साळत गेलो.
रात्री अभ्यास केलाच नाय. काय बी करुसं वाटंना. जेवलो आणि झोपलो.
रात्री जाग आली ती अंगावर काय तरी वळवळलं म्हणून. बघतो तर दादा बाजूला बसला होता. माझ्या अंगावरुन त्याचा खडबडीत पण मायेचा मऊ हात फिरत होता. माझ्या कपाळावर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याचे दोन थेंब पडले.
© दत्तात्रय साळुंके
....पण दोन पायावर बसून खाल्लं
....पण दोन पायावर बसून खाल्लं.
>>> मनानं तुक्यासोबत शेतात फिरता फिरता खुद्कन हसू आलं
sanjana25 खूप धन्यवाद....
sanjana25
खूप धन्यवाद....
>>>मनानं तुक्यासोबत शेतात
>>>मनानं तुक्यासोबत शेतात फिरता फिरता खुद्कन हसू आलं>>>
प्रतिसाद वाचून मलाही फिदीफिदी हसू आलं.
खूप छान आहे .
खूप छान आहे .
.... पण दोन पायावर बसून
.... पण दोन पायावर बसून खाल्लं
>>>>> जाम हसलो
>>>पण दोन पायावर बसून खाल्लं>
>>>पण दोन पायावर बसून खाल्लं>>>>
कथेत कथा नायक ढुंगणावर वळ उठेसतोवर वडीलांचा मार खातो असा उल्लेख आहे....कारुण्य...
त्यामुळे त्याला जेवायला मांडी घालून बसायला आले नाही... म्हणून दोन पायांवर बसून खाल्लं.
मला वाटतं तुमचं शंका निरसन व्हावं.
मला फिदीफिदी हसू आलं कारण इतर कोणाला माझ्या कथेत विनोद दिसला नाही आणि तुम्हालाच कसा दिसला ब्बा म्हणून...
radhanisha खूप धन्यवाद...
radhanisha
खूप धन्यवाद...
Pages